ग्रामविकासाच्या नव्या संकल्पना स्पष्ट झाल्या

दिशा ग्रामविकासाच्या
दिशा ग्रामविकासाच्या

तांदलवाडी (ता. रावेर, जि. जळगाव) येथील सरपंच श्रीकांत महाजन यांनी ग्रामविकासाच्या अनेक योजना आपल्या गावात राबविल्या आहेत. ग्रामविकास आणि कृषी विकास यांची सांगड घालण्याचा दृष्टिकोन ॲग्रोवनच्या सरपंच महापरिषदेतून मिळाल्याचे ते सांगतात. त्या दिशेने गावाची वाटचाल सुरू आहे. त्यांचे मनोगत.. २००९ या वर्षी वयाच्या २७ व्या वर्षी मी प्रथम सरपंच झालो. आमच्या गावाची लोकसंख्या पाच हजार असून, १३ सदस्यांच्या ग्रामपंचायतीचा डोलारा सांभाळणे तसे जिकिरीचे असते. त्याला सामोरे जात ग्रामविकासही साधावा लागतो. पहिल्या वेळी केलेल्या कामाचे फळ म्हणून दुसऱ्यांदा बिनविरोध सरपंचपद मिळाले. माझ्या परीने गावामध्ये सुधारणा करण्याचे प्रयत्न चालूच होते. तेव्हाच फेब्रुवारी २०१८ मध्ये आळंदी येथे ॲग्रोवनने आयोजित केलेल्या सरपंच महापरिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी निवड झाली. या महापरिषदेतून ग्रामविकास व शेतीचा विकास यांचा परस्पर संबंध कसा व किती महत्त्वाचा आहे, हे स्पष्टपणे कळले. शिवाय ग्रामविकास मंत्री, राज्य सरकारमधील व्यक्ती, कर्तृत्ववान सरपंच यांचे व्याख्यान, मार्गदर्शन खूप मोलाचे ठरले. मला नवे विचार मिळाले. शिवाय सर्वांगीण आणि पर्यावरणपूरक विकास यासंबंधीचे मुद्दे प्रभावीपणे लक्षात आले. सरपंच महापरिषदेत सहभागी झालेले विविध ठिकाणचे अभ्यासू, ग्रामविकासाच्या उत्तम मुद्द्यावर काम करणारे अनेक अनुभवी सरपंचही भेटले. त्यांच्याशी मी व्हॉट्‌सॲप व इतर माध्यमातून चर्चा करतो. त्यातून गावाचा सर्वांगीण विकास करण्याचे चांगले मुद्दे, योजना समजण्यास मदत झाली. आतापर्यंत केलेली कामे    ग्रामपंचायतीने तीन टक्के राखीव निधीतून १० दिव्यांग बांधवांना मिनी चक्कीचे वितरण केले.  गावात केळीखालील क्षेत्र अधिक असून, त्यानंतर भाजीपाला पिके घेतली जातात. मात्र, भाजीबाजार  हवा तसा भरत नव्हता, म्हणून महाराष्ट्र कृषी स्पर्धाक्षम योजनेतून २५ लाख रुपये निधी उपलब्ध करून १६ बाजार ओटे बांधले. तसेच, ४० हजार वर्गफूट जागेत पेव्हर ब्लॉक बसविले. आता या बाजारात गावातील शेतकऱ्यांसह परिसरातील अनेक गावांतून शेतकरी भाजी विक्रीसाठी आणतात. यासाठी गावातील शेतकऱ्यांना कोणतेही शुल्क भरावे लागत नाही. या बाजाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे. बाजारासाठी प्रसाधनगृहासह अन्य आवश्‍यक सुविधाही ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिल्या.  लोकांचा विश्‍वास पंचायतीवर असल्याशिवाय सर्वांगीण विकास शक्य होत नाही. हे लक्षात आल्याने गावातील लोकांचा सहभाग मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. गावातील स्मशानभूमीमध्ये लोकांच्या बसण्यासाठी सुविधा नव्हती. लोकवर्गणीतून अडीच लाखांचा निधी उभा केला. त्यातून स्मशानभूमीमध्ये बाक बसवले. निधी देणाऱ्याचे फलक तिथे लावले आहेत.  पूर्वी शेतरस्त्यांची अनेक कामे झाली होती. त्याचे खडीकरण तत्कालीन सरपंच व लोकप्रतिनिधींनीही केले होते. आम्हीही गरज असलेल्या ठिकाणी शेतरस्ते, सहा रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण व डांबरीकरणाची कामे केली.  गावाच्या मुलांच्या शिक्षण आणि भविष्यासाठी शाळा महत्त्वाची आहे. ती स्वच्छ आणि सुंदर राहिल्यास आपोआपच पटसंख्या टिकते. शिक्षकांच्या सहकार्याने शाळेच्या स्वच्छतेवर भर दिला आहे. गत वर्षी ग्रामपंचायतीच्या महिला व बाल कल्याणसंबंधीच्या १० टक्के राखीव निधीतून २५० विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाच्या स्कूल बॅग वाटप केले.  गावात राममंदिरामध्ये १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून पेव्हर ब्लॉक बसवून घेतले.  स्वच्छतेसाठी ट्रॅक्‍टरच्या घंटागाड्या व इतर व्यवस्था आहे. त्याला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. स्वच्छता हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवण्याचा विचार आहे. आमच्या गावाने लोकसहभागातून कामांना वेग व दिशा देणारे गाव असा लौकिक पंचक्रोशीत मिळवला आहे.  भावी काळात ही कामे करण्याचे नियोजन

  •  गावाकडे येणाऱ्या मुख्य रस्त्यावर दुभाजक व एलईडी पथदिवे उभारणे.  
  •  परसबागांची उभारणीचे कामही करायचे आहे.
  •  भूिमगत गटारी आणि गरजूंना घरकुल योजनेचा लाभ मिळवून द्यायचा आहे.
  •  शेतीच्या विकासासाठी पूरक बाबी राबवणे.
  •  ः श्रीकांत महाजन, ९९७५६२७२५७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com