निर्यातीसाठी ड्यूरम गहू लागवडीचे करा नियोजन

ड्युरम गहू लागवड
ड्युरम गहू लागवड

भारतामध्ये आपली देशांतर्गत गरज भागवून उर्वरित गव्हाची निर्यात करण्याची क्षमता आहे. त्यातून परकीय चलन मिळवण्यास वाव आहे. निर्यातीसाठी शासनामार्फत भरपूर सवलती देण्यात येतात व त्यामुळे शेतकरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपला माल विकून जास्त पैसे मिळवू शकतो. गव्हाचे अस्टीवम (शरबती), ड्यूरम (बन्सी/ बक्षी) व डायकोकम (खपली) अशा तीन प्रजाती आहेत. परदेशात ड्यूरम गव्हाला जास्त मागणी आहे. जो ड्यूरम गहू जिरायती क्षेत्रात घेतात त्याला ‘बन्सी गहू’ म्हणतात आणि बागायती ड्यूरम गव्हाला ‘बक्षी गहू’ म्हटले जाते.

  • ड्यूरम गव्हापासून चांगल्या प्रतीचा ब्रेड, मेकौरोनी (शेवया, कुरडया इ.) वर्म्हीसेली, इन्स्टट दलिया, नुडल्स इ. पदार्थ तयार करता येतात.
  • ड्यूरम गहू दाण्यांचा आकर्षक रंग व चमकदारपणा यासाठी प्रसिद्ध असून, तो निर्यातीसाठी उत्तम आहे.
  • महाराष्ट्रातील हवामान, जमीन ही गहू उत्पादनासाठी योग्य आहे. त्यातून पिवळसर चमकदार रंगाचे टपोरे गहू दाणे मिळू शकतात. त्याच प्रमाणे राज्यामध्ये काजळी रोगाचाही प्रादुर्भाव फारसा होत नाही.
  • आपल्या हवामानात गव्हामध्ये कवडी (येलोबेरी)चे प्रमाण १० टक्क्यापेक्षा कमी आढळते. हा निर्यातीसाठी महत्त्वाचा निकष आहे.
  • गव्हाच्या निर्यातीसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मापदंड :

  • प्रतीचे गुणधर्म ः प्रमाण (%)
  • कमाल आर्द्रता ः १४ पेक्षा कमी
  • प्रथिने ः १२ ते १४
  • चमकदारपणा ः ८० पेक्षा जास्त
  • इतर पदार्थ ः १ पर्यंत
  • शरबती गव्हाचे मिश्रण ः ५ पेक्षा कमी
  • तुटलेले खराब रोगट बियाणे ः ४ पेक्षा कमी
  • सेडिमेन्टेशन ः ३५ पेक्षा जास्त
  • कवडीचे प्रमाण (येलोबेरी) ः १० पेक्षा कमी
  • बीटा केरोटीन ः ५ पी पी एम पेक्षा जास्त
  • हेक्टोलिटर वजन ः ७८ पेक्षा जास्त
  • १०० दाणे वजन ः ५ ग्राम पेक्षा जास्त
  • ड्यूरम गव्हाचे निर्यातीसाठी गुणधर्म : खाली दिलेल्या तक्त्यामधील भौतिक तसेच रासायनिक गुणधर्मामुळे ड्यूरम गहू निर्यातक्षम आहे. भौतिक गुणधर्म

  • वजनदार दाणे
  • दाण्यांचा एक सारखा आकार व आकारमान
  • चकाकी असलेले पिवळसर दाणे
  • जास्त रवा देणारे दाणे
  • सारख्या आकाराचे कण असणारा रवा
  • कडक व न चिकटनारे कणीक जास्त
  • पाणी कमी शोषणारा रवा  
  • पांढऱ्या डागाविरहित दाणे  
  • रासायनिक गुणधर्म

  • जास्त प्रथिने
  • कमी अल्फा अमिलेन हिचा
  • लिपाकसीडेज क्रिया विरहित
  • जास्त बीटा केरोटीन
  • जास्त ग्लूटेन
  • लवचिक ग्लूटेन
  • जमीन :

  • या पिकास जमिन मध्यम ते भारी, काळी कसदार व पाण्याचा निचरा होणारी निवडावी.
  • हलक्या मध्यम जमिनीत भरपूर भरखते आणि योग्य प्रमाणात रासायनिक खतांचा वापर केल्यास चांगले उत्पादन घेता येते.
  • पूर्वमशागत : गव्हाची मुळे ६० ते ७० सेंमी खोलीपर्यंत वाढत असल्याने जमिनीची पूर्वमशागत चांगली करावी. १५ ते २० सेंमी खोल नांगरणी करून, ढेकळे फोडून घ्यावीत. त्यात शेणखत किवा कंपोस्ट खत पसरावे. त्यानंतर कुळवाच्या २-३ पाळ्या देऊन जमिन भुसभुशीत व समपातळीत करावी. पूर्वीच्या पिकाची धसकटे, तणांच्या मुळ्या (काशा), इ. वेचून शेत स्वच्छ करावे. पेरणी :

  • खरीपात डाळवर्गीय पिक घेऊन रब्बी हंगामात ड्यूरम गव्हाची लागवड केल्यास फायदेशीर ठरते.
  • अधिक व उत्तम प्रतिच्या उत्पादनासाठी १५ ते ३० नोव्हेंबरच्या दरम्यान पेरणी करावी. त्यामुळे गव्हास पोषक हवामान उपलब्ध होते. दोन ओळीतील अंतर २३ सेंमी ठेवून ‘बी’ साधारणपणे २.५ ते ३.० सेंमी खोल पेरावे. हेक्टरी १०० ते १२५ किलो बियाणे वापरावे. बियाण्यास प्रति किलो ३ ग्रॅम कार्बेन्डाझिमची प्रक्रिया करावी. काजळी रोग टाळणे शक्य होईल.
  • ड्यूरम पिकातील अंतर : गव्हाच्या इतर जातींचे मिश्रण टाळण्यासाठी दोन गव्हाच्या जातींमध्ये योग्य अंतर असावे. खते :

  • हेक्टरी २५ ते ३० गाड्या शेणखत किवा कंपोस्ट खत द्यावे.
  • पेरणी वेळी ६० : ६०: ४० किलो नत्र, स्फुरद व पालाश प्रति हेक्टरी द्यावे.
  • नत्राचा उर्वरित ६० किलोचा हप्ता पहिल्या पाण्याच्या पाळी बरोबर युरीयाच्या स्वरुपात द्यावा.
  • पेरणीनंतर ३०-३५ दिवसांनी सूक्ष्म खते १९:१९:१९ किवा १२:४२:०० किवा ००:५२:३४ किवा १२:३२:१६ इ. खतांचा योग्य वापर करावा.
  • निर्यातक्षम ड्यूरम गव्हाच्या जाती : महाराष्ट्रासाठी ड्यूरम गव्हाच्या पुढील सुधारित जातींची शिफारस केली आहे.

    सुधारित वाण पिक तयार होण्यास लागणारा कालावधी सरासरी उत्पादन क्विं/हेक्टर) प्रमुख वैशिष्ट्य
    एम. ए. सी. एस. ३१२५ (बागायती वाण) ११२ ते ११५ ४४ ते ५२ तांबेरा रोगास प्रतिकारक, पिवळसर चमकदार व जाड दाणे, रवा, शेवयासाठी उत्तम वाण
    एन. आय डी. डब्ल्यू. १५ (पंचवटी) (जिरायती वाण) ११५ ते १२० १२ ते १५ प्रथिने १२ %, दाणे जाड, चमकदार आणि आकर्षक, तांबेरा रोगास प्रतिकारक,
    एम. ए. सी. एस. ४०२८ (जिरायती वाण) १०० ते १०५ १८ ते २० तांबेरा रोगास प्रतिकारक, प्रथिने १४.७ %, जस्त ४०.३ पी पी एम, लोह ४६.१ पी पी एम
    एम. ए. सी. एस. ३९४९ (बागायती वाण) ११० ते ११२  ४४ ते ५०   आकर्षक व तजेलदार दाणा, तांबेरा रोगास प्रतिकारक, रवा, कुरडया, शेवयासाठी उत्तम वाण
    एन. आय डी. डब्ल्यू.२९५ (बागायती वाण) ११५ ते १२० ४० ते ४५ दाणे चमकदार व मोठे जाड, तांबेरा रोगास प्रतिकारक, उत्तम वाण,

    पाणी व्यवस्थापन : पेरणीनंतर १८ ते २० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. हलक्या-मध्यम जमिनीत १० ते १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. तथापि, पिक वाढीच्या ज्या महत्त्वाच्या अवस्था आहेत. त्या वेळी पाणी देणे फायद्याचे ठरते. पिकाची अवस्था - दिवस

  • मुकुटमुळे फुटण्याची वेळ पेरणी नंतर - २१ ते २३ दिवस
  • फुटवे येण्याची वेळ पेरणी नंतर - ३० ते ३५ दिवस
  • कांडी धरण्याची वेळ पेरणी नंतर - ४० ते ४५ दिवस
  • पिक फुलोरा/ओम्बीवर येण्याची वेळ पेरणी नंतर - ६० ते ६५ दिवस
  • दाण्यात चिक भरण्याची वेळ पेरणी नंतर - ९० ते ९५ दिवस
  • श्रीकांत एस. खैरनार; ८८०५७५७५२७ अखिल भारतीय समन्वित गहू संशोधन प्रकल्प, आघारकर संशोधन संस्था, (महाराष्ट्र विज्ञान वर्धिनी), पुणे.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com