नियोजन, सातत्यामुळे शेडनेटमधून वाढवले उत्पादन

शेडनेटमधील ढोबळी मिरचीसह विक्रम पांढरे.
शेडनेटमधील ढोबळी मिरचीसह विक्रम पांढरे.

शेतकरी ः विक्रम पांढरे गाव ः खुपसंगी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर   सलग दोन वर्षे शेडनेटमधील ढोबळी मिरचीत जेमतेम यश मिळाले, पण ते थांबले नाहीत, यंदा तिसऱ्यावर्षी पुन्हा त्यांनी प्रयत्न केले. यावर्षी मात्र ढोबळी मिरचीने चांगली साथ दिली. नियोजन आणि सातत्यामुळे खुपसंगी (ता. मंगळवेढा) येथील विक्रम पांढरे यांनी लागवडीपासून गेल्या तीन महिन्यांत सुमारे २० टन ढोबळी मिरचीचे उत्पादन मिळवले असून, सरासरी २० रुपये प्रतिकिलो इतका दर त्यांना मिळाला आहे. जवळपास अडीच लाखांचे उत्पन्न त्यांनी तीन महिन्यांत मिळवले. खुपसंगी येथील विक्रम पांढरे यांची साडेचार एकर शेती. विहिरीच्या पाण्यावरच त्यांची शेती चालते. अर्धा एकर शेडनेटमधील ढोबळी मिरचीशिवाय टोमॅटो, गवार, डाळिंब आदी पिके त्यांच्याकडे आहेत. तीन वर्षांपूर्वी (२०१५ मध्ये) त्यांनी अर्धा एकरावर शेडनेट उभारले. पहिल्यावर्षी त्यांनी ढोबळी मिरची लावली. पहिल्या वर्षी पाण्याची कमतरता, उत्पादनाची अाणि मार्केटची माहिती नसल्यामुळे फारसा फायदा मिळाला नाही. त्यामुळे फक्त आठ टन उत्पादन मिळाले अाणि सरासरी प्रतिकिलो दहा रुपये इतका दर मिळाला. दुसऱ्यावर्षीही पुन्हा पाण्याची कमतरता आणि बाजारातील मंदीमुळे ढोबळी मिरचीचे १० टन उत्पादन आणि सरासरी प्रतिकिलो दहा रुपये भाव मिळाला. सततच्या प्रयत्नानंतरही जेमतेम उत्पादनामुळे पांढरे यांची काहीशी निराशा झाली. पण यंदा पुन्हा त्यांनी ढोबळी मिरचीची लागवड केली. यंदा मात्र त्यांनी अवघ्या तीनच महिन्यांत २० टन उत्पादन घेतले आहे. ठळक वैशिष्ट्ये

  • ढोबळी मिरचीची गेल्यावर्षी १७ ऑगस्टला लागवड केली. मशागतीनंतर ५ किलो १०ः२६ः२६, निंबोळी पेंड ३०० किलो, पोटॅश १०० किलो आणि सेंद्रिय खत ३०० किलो या प्रमाणात मिसळले. याशिवाय चार ट्रॉली शेणखतही मिसळले.
  • रोटर मारून बेड तयार करून रोपांची दोन ओळीत एक फूट आणि दोन रोपात दीडफूट अंतर ठेऊन लागवड केली. अर्धा एकरासाठी सहा हजार रोपे लागली.
  • लागवडीनंतर महिनाभराने ०ः५२ः३४ पाच किलो, १३ः४०ः१३ पाच किलो आणि १२ः६१ः० पाच किलो ही खते पुन्हा एक दिवसाआड आलटून पालटून दिली.
  • झाडाच्या वयोमानानुसार पाणी दिले. पहिल्या महिन्यात एक दोन दिवसाआड २० मिनिटे, त्यानंतर ३० मिनिटे आणि नंतर एक ते दीड तासापर्यंत वाफसा पाहून पाणी दिले.
  • ढोबळी मिरची हे तसं संवेदनशील पीक आहे. शेडनेटमध्ये कीडरोगाचा प्रादुर्भाव शक्‍यतो कमी प्रमाणात होतो, पण एकदा झाला, तर तो झपाट्याने वाढू शकतो, असा अनुभव आहे. विशेषतः रसशोषक किडीचा प्रादुर्भावाचा मोठा फटका बसू शकतो. त्यासाठी वेळीच प्रतिबंध केला.
  • झाडांच्या मुळ्या सतत कार्यक्षम राहण्यासाठी त्यांचे प्रयत्न असतात. 
  • अर्थकारण पहिल्यावर्षी २०१५ मध्ये ८ टन उत्पादन निघाले. तर सरासरी प्रतिकिलोला १० रुपयाचा दर मिळाला, यावर्षी ८० हजार रुपये मिळाले, त्यात ४५ हजारांचा खर्च वजा जाता ३५ हजाराचा नफा मिळाला. दुसऱ्यावर्षी २०१६ मध्ये १० टन उत्पादन निघाले, यावर्षीही सरासरी दर १० रुपयांचाच दर मिळाला. एकूण उत्पन्न १ लाख रुपये इतके मिळाले. त्यापैकी ४० हजार खर्च झाला, ६० हजाराचा नफा मिळाला, तर यंदा २०१७-१८ मध्ये २० टन उत्पादन मिळाले. सरासरी प्रतिकिलोला २० रुपयाचा दर मिळाला. त्यातून अडीच लाख रुपये मिळाले. पैकी ५० हजार रु. खर्च वजा जाता प्रत्यक्षात २ लाखाचा नफा मिळाला. आणखी किमान वीस टन उत्पादन मिळेल असा अंदाज अाहे. संपर्क : विक्रम पांढरे, ९८९०२३१३८२

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com