मोसंबी बागेचे खत व्यवस्थापन
मोसंबी बागेचे खत व्यवस्थापन

मोसंबी बागेचे खत व्यवस्थापन

प्रगत देशांमध्ये मोसंबीची उत्पादकता ही हेक्टरी २५ टनांपर्यंत आहे. भारतातील राष्ट्रीय उत्पादकता ही हेक्टरी १५ टन असून, मराठवाड्यामध्ये ती केवळ ८ ते १० टन आहे. उत्पादकता वाढवण्यासाठी अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन संतुलितपणे करण्याची आवश्यकता आहे. सध्या मराठवाड्यामध्ये मोसंबी बागाची मर होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामागे असलेली कारणे प्रामुख्याने खालील प्रमाणे : १. बागेचे नियोजन व व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष २. अयोग्य जमिनीची निवड. ३. सेंद्रिय खताचा अपुरा पुरवठा. ४. मुख्य अन्नद्रव्याचा असंतुलित वापर. ५. सूक्ष्म अन्नद्रव्ये वापराकडे दुर्लक्ष. त्याच प्रमाणे मराठवाड्यातील मोसंबीची उत्पादकता ही केवळ हेक्टरी ८ ते १० टन एवढी आहे. (तुलनेसाठी राष्ट्रीय उत्पादकता १५ टन आणि प्रगत देशांमध्ये ती २५ टनांपर्यंत आहे.) एकूणच कमी उत्पादकता आणि निरोगी बागांचा हळूवारपणे होणारा ऱ्हास या दोन मुख्य समस्या दूर करण्यासाठी खत व्यवस्थापन काटेकोरपणे करणे अत्यावश्यक ठरते. बागायतदार प्रामुख्याने नत्र, स्फुरद व पालाश या मुख्य अन्नद्रव्यांच्या पूर्ततेकडे लक्ष देतात. या अन्नद्रव्याचा पुरवठा युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट व म्युरेट ऑफ पोटॅश या रासायनिक खतांद्वारे केला जातो. मात्र, या मुख्य अन्नद्रव्यांशिवाय मोसंबी पिकास सूक्ष्म अन्नद्रव्ये उदा. मॅग्नेशियम, लोह, जस्त, मॅंगेनीज, तांबे, मॉलिब्डेनम व बोरॉन यांची आवश्यकता असते. बागेमध्ये सेंद्रिय खते योग्य प्रमाणात दिलेली असल्यास त्यातून ही सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज काही प्रमाणात भागविली जाते. मात्र, अलीकडे पशुधन कमी झालेले असल्याने शेणखत, गांडूळखत, कंपोस्ट खत ही कमी प्रमाणात दिली जातात. मोसंबीला रासायनिक खताबरोबर सेंद्रिय व कमतरता असलेल्या सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खताचा पुरवठा आवश्यक असतो. पिकांना अन्नद्रव्य पुरवठा करणारी खते म्हणजे सेंद्रिय खत, रासायनिक खत, जैविक खते यांच्या एकत्रित वापर करण्याला एकात्मिक खत व्यवस्थापन असे म्हणतात. एकात्मिक खत व्यवस्थापनामुळे रासायनिक खतातील अन्नद्रव्याची उपलब्धता वाढून फळधारणा चांगली होते. उत्पादकता वाढून, फळांची प्रतही सुधारते. मोसंबी पिकास झाडाच्या वयोमान व अवस्थांप्रमाणे खते देणे आवश्यक आहे.

  • मुख्य अन्नद्रव्ये वर्षातून दोन वेळेस (जून व जानेवारी महिन्यामध्ये) वयोमानानुसार द्यावीत. मोसंबी पिकासाठी जस्त, लोह, तांबे, मॅग्नेशिअम, बोरॉन व मोलाब्द या सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज अधिक असते. या सूक्ष्मअन्नद्रव्यांच्या कमतरतेची वेगवेगळी लक्षणे मोसंबी झाडावर दिसून येतात. त्याचा झाडाच्या वाढीवर फळधारणा, फळांची प्रत व उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. अशी झाडे डायबॅक या रोगाला बळी पडतात.
  • माती परीक्षणानंतर कमतरता असलेल्या सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करावा. ही अन्नद्रव्ये गरजेनुसार जमिनीतून किंवा फवारणीद्वारे देता येतात. त्याचप्रमाणे झाडाची पाने, खोड, फळे यावर प्रत्येक सूक्ष्म अन्नद्रव्यांची विशिष्ट कमतरता भासू नये, या दृष्टीने जून महिन्यात शेणखतातून सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खताची निर्धारीत मात्रा दरवर्षी देणे चांगले.
  • मुख्य अन्नद्रव्यांसाठी शिफारशीत खत वापर (वर्षातून दोन वेळेस )

    अ.क्र. झाडाचे वय खते देण्याचा महिना शेणखत (किलो/झाड) रासायनिक खते ( ग्रॅम/झाड)
            नत्र स्फूरद पालाश
    ६ माहिने फेब्रुवारी ०० २५ ०० ००
    १ वर्ष जून १० ५० २५  २५
    जानेवारी ०० ५० २५ २५
    २ वर्र्ष जून १५ १०० ५० ५०
    जानेवारी ०० १०० ५० ५०
    ३ वर्र्ष जून २० १५० ७५ ७५
    जानेवारी ०० १५० ७५ ७५
    ४ वर्र्ष जून २५ ३०० १०० १००
    जानेवारी ०० ३०० १०० १००
    ५ ते ७ वर्र्ष जून ४० ३५० १५० १५०
    जानेवारी ०० ३५० १५० १५०
    ८ ते १० वर्र्ष जून ५० ४०० २०० २००
    जानेवारी ०० ४०० २०० २००
    ११ व त्यापुढे वर्र्ष जून ६० ५०० २५० २५०
    जानेवारी ०० ५०० २५० २५०

    अशाच प्रकारे मोसंबी बागेस शिफारशीत खते वर्षातून तीन वेळेस - जून, ऑक्टोबर आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये देता येतात. त्यांचे प्रमाण शिफारशीनुसार ठरवावे लागते. सूक्ष्म अन्नद्रव्ये व्यवस्थापन : मराठवाड्यातील लिंबूवर्गीय बागांमध्ये बहुतेक जस्त, लोह, मॅग्नेशिअम, बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता दिसून येत आहे. सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता कमी करण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्ये फळबागेला मातीतून, फवारणीद्वारे देता येतात. मातीतून व फवारणीद्वारे द्यावयी सूक्ष्म अन्नद्रव्ये मात्रा

    खत मातीतून खत मात्रा (ग्रॅम /प्रतिझाड/वर्ष) फवारणी
    जस्त सल्फेट २५०-३०० ०.५ टक्के
    फेरस सल्फेट २००-२५० ०.२५ टक्के
    मॅंगनीज सल्फेट २००-३०० ०.५ टक्के
    तांबे १००-१५० १ किलो चुना अधिक १ किलो कॉपर सल्फेट प्रति ५०० लिटर पाणी.
    अमो. मॉलिब्डेट २५-५० ०.४ – ०.५ (सोडियम मोलिब्डेट)
    बोरॉक्स २५-५० ०.२ टक्के
    मॅंगनिज सल्फेट २००-३०० ०.२५ टक्के

    वरील खते वयोमानानुसार जमिनीतून किंवा फवारणीतून द्यावीत. सूक्ष्म अन्नद्रव्ये एकत्रित स्वरुपाच्या खतांचा वापर : महाराष्ट्र राज्य शासनाने पिकाला सूक्ष्म अन्नद्रव्याचा पुरवठा करण्यासाठी दोन ग्रेड शिफारस केलेल्या आहेत. एक जमिनीतून देण्यासाठी व दुसरा फवारणीसाठी. या दोन्ही ग्रेडमध्ये आवश्यक सर्व सूक्ष्म अन्नद्रव्याचा समावेश आहे.

  • (ग्रेड - १) जमिनीतून. जून व जानेवारी माहिन्यात २०० ग्रॅम प्रति झाड.
  • (ग्रेड-२) फवारणीद्वारे बहाराच्या फळाची अवस्थानुसार.
  • संपर्क : डॉ. एम. बी. पाटील, ७५८८५९८२४२ (प्रभारी अधिकारी, मोसंबी संशोधन केंद्र, बदनापूर, जि. जालना)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com