पिकासाठी जमिनीतून खतांचे उपलब्धीकरण

पिकासाठी जमिनीतून खतांचे उपलब्धीकरण
पिकासाठी जमिनीतून खतांचे उपलब्धीकरण

वनस्पती व त्याच्या केशमुळाभोवतीचे जिवाणू यांच्यामध्ये पोषणासंबंधीचा संवाद सुरू असतो. केशमुळाभोवती प्रत्येक अन्नद्रव्य उपलब्ध करून देणाऱ्या सूक्ष्मजीवांचे गट सुप्तावस्थेत असतात. एकच अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्यासाठी कित्येक प्रजाती काम करत असतात. वनस्पती आपल्या मुळातून काही स्राव सोडत असते, त्याला शास्त्रीय भाषेत "रूट एक्‍झूडस्‌'' असे म्हणतात. हे स्राव म्हणजे सूक्ष्मजीवांचे अन्न असते. वाढीसाठी नेमकी कोणती अन्नद्रव्ये हवी आहेत, त्यांच्या उपलब्धीसाठी काम करणाऱ्या जिवाणूंना उत्तेजित करण्याचे काम हे स्राव करतात. उर्वरीत जिवाणू शांत राहतात. वाढीसाठी आवश्यक इतक्याच प्रमाणात स्थिर साठ्यातून अन्नद्रव्यांची मागणी स्रावाच्या स्वरुपातून जिवाणूंकडे होते. अन्नद्रव्ये गरजेप्रमाणे उपलब्ध करून दिल्यानंतर परत ते जिवाणू सुप्तावस्थेत जातात. प्रत्येक वनस्पती अगर एकाच पिकाच्या दोन जातींची पोषणाची गरज वेगवेगळी असते. वनस्पती आपल्या आवडी-निवडीनुसार कशाप्रकारे अन्नद्रव्ये मिळवते, याचे उत्तर येथे मिळते. प्रत्येक वनस्पती आपल्या गरजेनुसार व आवडीनुसार अन्नद्रव्याचे द्रावण आपल्या केशमुळाजवळ सूक्ष्मजीवाकडून तयार करून घेत असते. ही सर्व प्रक्रिया मातीआड आणि अत्यंत सूक्ष्म पातळीवर सुरू असल्याने मानवी डोळ्यांना दिसत नाही. ही सहजीवी किंवा समन्वयाची पद्धत आहे. सूक्ष्मजीवशास्त्रातील माहितीनुसार, मुळातून स्राव सोडणे व त्यातून पोषण मिळविणे या कामासाठी पानामध्ये प्रकाश संश्लेषण प्रक्रियेतून तयार झालेल्या अन्नद्रव्यांपैकी ३३% साठा खर्च होतो. ३३% अन्नसाठा वापरून होणाऱ्या या प्रक्रियेची किती शेतकऱ्यांना माहिती आहे? शास्त्राचा हा भाग शेतकऱ्यांसाठी अजून तरी अंधारातच आहे. कृषी रसायन शास्त्राला स्थिरीकरण - उपलब्धीकरणाच्या मार्गाने वनस्पतीचे अन्नपोषण ही प्रक्रिया मान्य नाही. शास्त्रज्ञाच्या मते, रासायनिक खते जमिनीत टाकल्यानंतर ती उपलब्ध अवस्थेत राहतात. वनस्पती गरजेप्रमाणे त्यातील आवश्यक भाग उचलते. सूक्ष्मजीवशास्त्रानुसार, उपलब्ध साठा सर्वात नाशवंत आणि वनस्पतीच्या त्यावेळच्या गरजेइतकाच असतो. विपरित परिस्थिती उद्भवल्यास उपलब्ध साठा नाश होतो. मात्र, उपलब्ध साठ्याचे प्रमाण कमी असल्याने अत्यल्प साठ्याचाच नाश होईल. उर्वरीत साठा स्थिरीकरणामुळे सुरक्षित राहील. वनस्पतीच्या अन्नद्रव्यांचा विनाकारण नाश होऊ नये, यासाठी निसर्गाने केलेले हे नियोजन आहे. महापुरात १०-१२ दिवस बुडालेल्या जमिनीत पूर उतरताच परत नवीन वनस्पतीची वाढ होऊ लागते. कोठून मिळाले त्यांना पोषण? ४०-५० वर्षांपूर्वी या सूक्ष्मजीवांच्या कार्याबाबत फारसी माहिती नव्हती. अलिकडे थोडी थोडी जागृती होत अन्नद्रव्य व्यवस्थापनात सूक्ष्मजीवांचा सहभाग असतो इतपत बोलले जाते. मात्र, खोलात जाऊन सर्व विषय समजून घेतला जात नाही. याचा आणखी एक पुरावा म्हणजे माती परीक्षणातून मातीचा नमुना पाण्यात घुसळला जातो. हे पाणी गाळून पृथःकरणासाठी वापरले जाते. त्यात विरघळलेल्या अन्नद्रव्याला उपलब्ध अन्नद्रव्ये असे म्हटले जाते. हा उपलब्ध साठा म्हणजेच जमिनीतून पिकाला उपलब्ध होणारी अन्नद्रव्ये होय. कमी पडणारा भाग टाकण्याची शिफारस केली जाते. संपूर्ण स्थिर साठा मोजला जात नाही.

  • सूक्ष्मजीवशास्त्रानुसार उपलब्ध साठा हा त्या वेळच्या पिकाच्या गरजेइतकाच असतो. त्यातच मातीचा नमुना उन्हाळ्यात कोणतेही पीक जमिनीत नसताना घेण्याची शिफारस आहे. मग, उपलब्ध अन्नद्रव्याच्या आकड्यावरून जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्याची मात्रा कशी काय ठरविता येते? थोडक्यात या तंत्राचा पायाच चुकीचा ठरतो.
  • माती परीक्षण अहवालातील सामू, क्षारता व सेंद्रिय कर्बाची टक्केवारी हे सर्वात महत्त्वाचे मुद्दे असूनही बाजूला पडतात. फक्त माती परीक्षणातून रासायनिक खतांच्या शिफारशी यालाच अधिक महत्त्व दिले जाते. केंद्र सरकारकडून प्रत्येक शेतकऱ्याला दिल्या गेलेल्या आरोग्यकार्डमध्येही खतांच्या शिफारशी हाच मुद्दा महत्त्वाचा आहे. या देशव्यापी योजनेतून शेतकऱ्याचा नेमका काय फायदा होणार? फक्त रसायनशास्त्राचाच प्रभाव असल्याचा हा परिणाम आहे.
  • माती परीक्षण अहवालात फक्त खते किती टाकावीत, याची शिफारस असते. मात्र, पुढे त्यांचे स्थिरीकरण- उपलब्धीकरण याविषयी काही माहिती दिली जात नाही. थोडक्यात, या प्रक्रियेला शास्त्रीय जगताने मान्यता नसल्याचेच हे द्योतक आहे.
  • विद्राव्य खते ः

  • काही वर्षांपूर्वी १०० टक्के विरघळणाऱ्या (विद्राव्य) खतांचा नवा प्रकार बाजारात उपलब्ध झाला. ते ठिबकद्वारे किंवा फवारणीद्वारे वापरण्यासाठी उपयुक्त आहे. ते साध्या खताच्या तुलनेत भरपूर महाग आहे. या खतातील अन्नांश वनस्पतींनी थेट शोषण करण्याच्या अवस्थेत (उदा. नायट्रेट नत्र) असतात. इथे स्थिरीकरण उपलब्धीकरण असा काही प्रकार नसतो. परिणामी सूक्ष्म जीवांना या खत व्यवस्थापनात कोणतेही काम नसते. थोडक्‍यात साधी खते म्हणजे विविध घटक गोळा करून स्वतः स्वयंपाक करून खाणे, तर विद्राव्य खते म्हणजे हॉटेलातील आयते जेवण.
  • साध्या खतांचे महिना दीड महिन्याच्या गरजेचे हप्ते आपण एका वेळी देऊ शकतो. पुढे गरजेप्रमाणे थोडा थोडा भाग पिके वापरतात. विद्राव्य खताचे हप्ते त्यावेळच्या गरजे इतकेच द्यावयाचे असतात. त्यामुळे ठिबकद्वारे दररोज अगर एक दिवसाआड थोडी थोडी अशी खते दिली जातात. विद्राव्य खताचे परिणाम लगेच दिसतात. जमिनीची परिस्थिती सूक्ष्म जिवामार्फत पोषणासाठी योग्य नसली तरीही ही खते काही प्रमाणात उपलब्ध होतात. परिस्थिती उत्तम असेल व योग्य वेळी हप्ता दिल्यास साधे खत व विद्राव्य खताच्या वापरातून फार मोठा फरक पडू नये.
  • विद्राव्य खते ही इस्त्राईलमध्ये तयार झाली. तेथे ती प्रामुख्याने कृत्रिम माध्यमात वापरली जातात. अशी खते वापरण्यापूर्वी पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार त्याच्या वेगवेगळ्या अन्नद्रव्याच्या गरजांचा बारकाईने अभ्यास केला गेला आहे. त्यानुसार एखाद्या पिकाच्या संपूर्ण कालावधीसाठी आवश्यक खत वापराचे कोष्टक तयार केले जाते. तेवढाच वापर केला जातो. इथे एखाद्या अन्नद्रव्याचा अतिरेक होऊ नये हा उद्देश असतो. भारतात अशा सर्व पिकांसाठीच्या शिफारसी अद्याप उपलब्ध नाहीत. सर्व अंदाजपंचे कारभार सुरू आहे. त्यातून ही खते माती माध्यमात वापरल्यास काही प्रमाणात यांचेही स्थिरीकरण उपलब्धीकरणाकडे वाटचाल होऊ शकते. किंवा निचऱ्यावाटे नाशही होऊ शकतो.
  • सेंद्रिय कर्ब महत्त्वाचेच...

  • पीक पोषणामध्ये होणाऱ्या विविध जैव रासायनिक क्रियांना डावलून चालणार नाही. यात पिकांच्या वाढीसह सहभागी सूक्ष्मजीवांचे शरीर पोषण व प्रजोत्पादनासाठी जमिनीत सेंद्रिय कर्बाची गरज असते. सूक्ष्मजीवांचे आयुष्यमान केवळ २० ते २५ मिनिटांचे असते. अशा परिस्थितीत एखाद्या पिकाच्या पोषणात त्यांच्या किती पिढ्या कार्यरत असतात, ते आकड्यात मोजणेही अवघड आहे.
  • सेंद्रिय कर्बाचे प्रमाण योग्य असेपर्यंत हरितक्रांती यशाच्या शिखरावर होती. ती बदनाम होण्यामध्ये सेंद्रिय कर्बाची कमतरताच कारणीभूत ठरली. पुढे रासायनिक खत वापराची कार्यक्षमता कमी कमी होऊन उत्पादन मिळेनासे झाले. माती परीक्षणानंतर खत वापराच्या शिफारशी करताना दिलेल्या मात्रेतून योग्य उत्पादन मिळत नसल्याचे पाहून रासायनिक खतांच्या मात्रा वाढविणे सुरू केले. शेतकरी अगदी शिफारशीपेक्षा दुप्पट अडीचपट हप्ते देऊनही उत्पादन मिळत नाही. मी केवळ सेंद्रिय खत व्यवस्थापनात सुधारणा केल्याने मला गेल्या ४८ वर्षात १ ग्रॅमनेही खत वाढवावे लागले नाही. उत्पादन पातळीही सुधारतच आहे.
  • रासायनिक खते आयात करावी लागत असल्याने देशाचे परकीय चलनही खर्च होते. खतांच्या अनावश्यक वापरातून पर्यावरणाचे प्रश्‍न निर्माण होतात. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांच्या खर्चात वाढ होते. या सर्वावर भू सूक्ष्म जीवशास्त्रातून उत्तर मिळू शकते.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com