चिंच फळपिकातील अनियमित फळधारणा : कारणे व उपाययोजना

चिंच फळपिकातील अनियमित फळधारणा - कारणे व उपाययोजना
चिंच फळपिकातील अनियमित फळधारणा - कारणे व उपाययोजना

दिवसेंदिवस पर्जन्यमान कमी होत आहे. हवामान बदलाचे धोके विविध फळपिकात जाणवत आहेत. कोरडवाहू फळपीक लागवड वाढत आहे. बहुतांश ठिकाणी मध्यम साधारण जमिनीवर माेठ्या प्रमाणात चिंच लागवड झाली आहे. विविध ठिकाणी बांधावरही चिंच लागवड झालेली दिसत आहे. मात्र चिंचेला फळधारणा न होण्याचे प्रमाण भरपूर आहे. त्याच्या कारणांची माहिती घेऊन उपाययोजना करावी. १) चिंचोक्याद्वारे लागवड :

चिंच फळपिकाची लागवड बहुतांश शेतकरी चिंचोका लावून करतात. चिंचोक्यापासून उगवलेल्या झाडांना फळधारणेसाठी १० वर्षांपेक्षा अधिक काळ लागू शकतो. त्यातही चिंचोका ज्या झाडापासून घेतलेला असेल त्या झाडाची अनुवांशिकता कशी होती यावरही फळधारणा अवलंबून असते. उपाययोजना : चिंचोळ्याद्वारे लागवड केलेल्या झाडांवर नवीन आलेल्या धुमाऱ्यांवर (फांद्यांवर) सुधारित जातींचे उदा. पी.के.एम - १ (पेरियाकुलम - १), उरीगम, नं-२६३, प्रतिष्ठान यांचे मार्च - एप्रिल महिन्यात कलम करावे. अशाप्रकारे गावठी जातींचे सुधारित जातीत रूपांतरण केल्यास फळधारणा लवकर होते.

२) भारी जमिनीत लागवड :

बहुतांश ठिकाणी चिंच फळझाडांची लागवड ही भारी जमिनीत केली जाते. अशा जमिनीची पाणी धारण क्षमता अधिक असल्याने झाडास सातत्याने पाण्याचा पुरवठा होतो. परिणामी झाडांना फुले येण्यासाठी अपेक्षित ताण बसत नाही. परिणामी अशा झाडांची सतत कायिक वाढ होताना दिसते. पानोळा कायम हिरवागार दिसतो मात्र झाडांना फुलांचा बहर लागत नाही. उपाययोजना : फळधारणा होण्यासाठी लागवड कलमाद्वारे करावी. लागवड कमी पाणी धारण क्षमता असलेल्या हलक्या, मध्यम, मुरमाड जमिनीत तसेच डाेंगरउतारावर करावी.

३) कलम जोड तुटलेला असणे :

कलमाद्वारे चिंच लागवड केलेली असली तरी फळधारणा न होण्याचे प्रकार घडतात. अशाठिकाणी कलमीकरण जरी केले असले तरी आंतरमशागतीच्या वेळी कलम जोड तुटल्याचे व खुंट फांदीची वाढ झाल्याचे दिसून येते. परिणामी कलमाची वाढ न होता मूळ गावठी झाडाची वाढ होऊन फळधारणा उशिरा किंवा कमी प्रमाणात होते. उपाययोजना : लागवड केलेल्या कलमांची प्रत्यक्ष पाहणी करावी. जोड तुटलेल्या ठिकाणी छाटणी करून सुधारित जातीचे कलमीकरण करावे. आंतरमशागत करताना कलमाचा जोड तुटणार नाही याची काळजी घ्यावी. नवीन लागवड केलेली कलमे शेळ्या, जनावरे तुडवणार नाहीत याची काळजी घ्यावी.

४) नियमित पाणीपुरवठा :

पावसाळा संपल्यानंतर हलक्या जमिनीवर सतत ठिबकसिंचन पद्धतीने चिंचझाडांना पाणी दिले जाते. वास्तविक पाहता फुलधारणा चांगली होण्यासाठी चिंच झाडास ताणाची गरज असते. ताण चांगला बसल्यास फुलधारणा भरपूर व मोठ्या प्रमाणात हाेत असते. फुलगळ होऊ नये म्हणून देखील या अवस्थेत पाणीपुरवठा काही ठिकाणी केला जातो. हे सर्वस्वी शास्त्रीयदृष्ट्या चुकीचे आहे. उपाययोजना : मार्च - एप्रिल महिन्यात फळांची काढणी झाल्यानंतर झाडांना ताणावर सोडावे. कोणत्याही परिस्थितीत सिंचन करू नये. फुलांचे रूपांतर फळात झाल्यानंतर पाणी दिल्यास चालू शकते. चिंच पिकास भरपूर फुलधारणा होऊन केवळ ३ ते ५ टक्के फुलांचेच फळात रुपांतर होत असते. म्हणून फुलधारणेनंतर १० आठवड्यांनी पाणी द्यावे.

५) नर फुलांच्या आधी मादी फुले पक्व होणे :

चिंच या फळपिकामध्ये मादी फुले ही नर फुलांपेक्षा आधी पक्व (प्रोटोगायनी) होतात. परिणामी फलन होण्यास अडथळा निर्माण होतो. चिंचेमध्ये परपरागीकरण हे माशा, लाल मुंग्या, मधमाशी, हवा याद्वारे हाेत असते. चिंचेमध्ये निसर्गत : नर फुलांचे प्रमाण कमी असते. मादी फुलांचे फलन होण्यासाठी नर फुले कमी पडतात. याचा विपरित परिणाम फळधारणेवर होतो. सशक्त व योग्य व्यवस्थापन असलेल्या बागेतील नरांची फलनक्षमता ही अशक्त झाडांच्या परागापेक्षा अधिक असते. चिंच फुलातील परागकण हे चिकट असल्यामुळे हवेपेक्षा माश्‍या, मधमाश्‍या आदी किटकांच्या वाढीसाठी प्रयत्न केल्यास परपरागसिंचन वाढून फळधारणाही वाढते. उपाययोजना : मधमाश्‍यांची वाढ होण्यासाठी बागेभोवती शोभिवंत, सुवासिक फुलझाडांची लागवड करावी. चिंच बागेत मधुमक्षिका पेट्या ठेवाव्यात. बागेमध्ये एकरी ३ ते ४ ठिकाणी पाणी सतत पडत राहील अशापद्धतीने पाइपलाइनचे झाकण ढिले ठेवावे. त्यामुळे मधमाशा वाढीस लागतील. साखर २ टक्के (२० ग्रॅम प्रतिलिटर)अधिक गुळ २ टक्के अधिक बोरॉन २ टक्के याप्रमाणात फवारणी केल्यास परागधारणक्षमता वाढीस लागते. झाडांवर मुंग्यांची संख्या वाढीस लागून परपरागीकरण चांगले होते. लाल मुंग्या झाडावर चढण्यासाठी एखादे लाकुड वा बांबू जमीन ते फांदी यांच्या संपर्कात ठेवावे. जेणेकरून याद्वारे मुंग्या वर चढून परपरागीकरण अधिक होण्यास मदत होते. बागेत हवा खेळती ठेवण्यासाठी १०x१० मीटर अंतरावर लागवड केल्यास हवेच्या सहाय्याने देखील परपरागीकरण चांगले होईल. चिंच लागवड यापेक्षा कमी अंतरावर केल्यास हवेद्वारे परपरागीकरण होण्यास अडथळा निर्माण होतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com