वेळेवर करा ओट चारापिकाची लागवड

चारापिक ओट
चारापिक ओट

ओट हे एक महत्त्वाचे एकदल वर्गीय चारापीक आहे. ओट हे जोमाने वाढणारे, लुसलुशीत, रसदार, पौष्टिक व पालेदार असते. थंड हवामानात येणाऱ्या बरसीम लुसर्ण या द्विदलवर्गीय पिकाबरोबर खाऊ घातल्यास उत्कृष्ट संतुलित व पोषक आहार मिळतो. वेळेवर पेरणी केल्यास दोन कापण्यांमध्ये चांगले उत्पादन मिळू शकते. अन्य एकदल पिकांच्या तुलनेत ओट हे पेरणीसाठी, कापणीसाठी हाताळणीसाठी व खाऊ घालण्यासाठी सोपे असल्याने शेतकऱ्यांत लोकप्रिय पीक आहे. ओटचा हिरवा चारा म्हणून वापरता येतो. तसेच अतिरिक्त हिरव्या चाऱ्याचे मुरघासामध्ये रूपांतर करून किंवा वाळवून तुटवड्याच्या वेळी वापरता येते. पौष्टिकता ः ओटमध्ये ८ ते १० टक्के प्रथिने व १८ ते २० टक्के शुष्कपदार्थ असतात. या चाऱ्याची पचनीयता ६५ ते ७० टक्के एवढी (म्हणजेच जवळजवळ लुसर्णएवढी) आहे. हवामान ः

  • थंड व दमट हवामान ओटच्या वाढीसाठी उपयुक्त आहे. धुके व अतिथंड हवामान मात्र या पिकाच्या वाढीस मारक ठरते.
  • उष्ण व कोरड्या हवामानामुळे पीक लवकर फुलावर येऊन उत्पादनात घट येते. निकृष्ट दर्जाचा चारा तयार होतो.
  • यासाठी ओटची पेरणी वेळेवर म्हणजेच १५ ऑक्‍टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत करणे आवश्‍यक आहे.
  • जमीन ः

  • सर्वसाधारणतः विविध जमिनींमध्ये ओटची लागवड करता येत असली तरी पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या, मध्यम ते पोयट्याच्या जमिनीमध्ये ओटची चांगली वाढ होते.
  • जमिनीचा सामू (pH) साधारणतः ७ ते ८ पर्यंत असावा. म्हणजेच थोडीशी विम्ल जमीन ओट लागवडीसाठी चालते. परंतु, ८.५ च्या पुढे सामू असलेल्या जमिनीत ओट चांगले वाढत नाही.
  • जमिनीची पूर्वमशागत ः जमिनीची नांगरट करून, आडवी उभी काकरणी करून घ्यावी. त्यामुळे जमीन भुसभुशीत होऊन जमिनीत असणाऱ्या तणांचा व किडींचा नाश होईल. पेरणी ः ओटची पेरणी १५ ऑक्‍टोबरपासून ते १५ नोव्हेंबरपर्यंत करतात. वेळेवर व लवकर पेरलेल्या पिकापासून दोन कापण्या मिळतात. उशिरा म्हणजे डिसेंबरनंतर केलेल्या पेरणीपासून एकच कापणी मिळते. ओटची पेरणी दोन ओळींतील अंतर २५ सें.मी. ठेवून पाभरीने करावी. बियाणे ः हेक्‍टरी ८० किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यास ॲझोटोबॅक्‍टर व स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणूखताची प्रति दहा किलो बियाण्यास २५० ग्रॅम याप्रमाणे प्रक्रिया करावी. सुधारीत जाती ः कॅट, आरओ-१९, जेएचओ-८२२ खते ः

  • जमीन नांगरटीनंतर कुळवाच्या शेवटच्या पाळीपूर्वी हेक्‍टरी १२ ते १५ टन चांगले कुजलेले शेणखत समप्रमाणात पसरून द्यावे.
  • पेरणीच्या वेळेस हेक्‍टरी ४० किलो नत्र, ४० किलो स्फुरद व ४० किलो पालाश द्यावे. पेरणीनंतर ३० दिवसांनी हेक्‍टरी ४० किलो नत्र द्यावे.
  • पाणी व्यवस्थापन ः पेरणी करण्यापूर्वी जमीन ओलवून घेतल्यास बियाण्यांची उगवण चांगली होते. त्यासाठी पेरणीपूर्वी पाच ते सात दिवस अगोदर जमिनीची ओलवणी करावी. जमिनीत वापसा येताच बियाण्यांची पेरणी करावी. बियाण्यांच्या उगवणीनंतर पाण्याची पहिली पाळी आठवड्याने द्यावी. नंतरच्या पाण्याच्या पाळ्या दर पंधरा दिवसांच्या अंतराने द्याव्यात. याप्रमाणे साधारणतः चार ते पाच पाण्याच्या पाळ्यांमध्ये पीक कापणीस तयार होते. तण नियंत्रण ः

  • ओट पिकामध्ये जंगली ओट व इतर रुंद पानांची तणे आढळून येतात. यामुळे पिकांची वाढ खुंटते. उत्पादन कमी येते. यासाठी मशागत किंवा खुरपणी करून तणांचा बंदोबस्त करावा.
  • मजुरांची उपलब्धता नसल्यास, रासायनिक तणनाशकांचा वापर करावा.
  • रुंद पानांच्या तणासाठी पेरणीनंतर २१ दिवसांनी, २-४ डी ७५० ग्रॅम प्रति ५०० लिटर पाणी प्रतिहेक्टरी फवारणी करावी.
  • चारा कापणी ः

  • ओट पिकांच्या दोन कापण्या घ्यावयाच्या असल्यास पहिली कापणी पीक पोटरीत असताना म्हणजेच पेरणीनंतर ४५ ते ५० दिवसांनी जमिनीपासून २ ते ३ इंच उंचीवर करावी. पहिली कापणी उशिरा केल्यास दुसऱ्या कापणीचे उत्पन्न फारच घटते.
  • दुसरी कापणी पहिल्या कापणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी करावी. दोन कापण्या घेण्यासाठी पीक ऑक्‍टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात पेरावे. त्यामुळे पहिली कापणी डिसेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात मिळेल.
  • पहिली कापणी जशी उशिरा होत जाईल तसे दुसऱ्या कापणीचे उत्पादन कमी कमी होत जाते, हे लक्षात ठेवावे.
  • चारा उत्पादन ः दोन कापण्या मिळून हेक्‍टरी ५० ते ६० टन एवढे हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते. चांगले पीक व्यवस्थापन केल्यास हेक्‍टरी ६५ टनापर्यंत हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळू शकते.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com