agricultural stories in Marathi, agrowon, Gavshivar story of Anagar dist. Solapur | Agrowon

एकमुखी निर्णयातून साकारले ग्रामविकासाचे 'अनगर मॉडेल'
सुदर्शन सुतार
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

ग्रामपंचायतीच्या इतिहासात अद्यापपर्यंत एकदाही निवडणूक न होता गावपातळीवर आरक्षणानुसार बिनविरोध सदस्य व सरपंचाची निवड होते. एकमुखी निर्णयामुळे नावन्यपूर्ण योजना, उपक्रम यामध्येही गावाने नेहमीच आघाडी घेतली आहे. साहजिकच, यशवंत पंचायत राज, तंटामुक्त गाव समिती, निर्मलग्राम, पर्यावरण पूरक ते जिल्हास्तरीय स्मार्टग्राम असे विविध पुरस्कार आज अनगरच्या नावावर आहेत. सोलापूर जिल्ह्यातील अनगर हे आदर्श मॉडेल गाव म्हणून ओळखले जाते.

ग्रामपंचायतीच्या इतिहासात अद्यापपर्यंत एकदाही निवडणूक न होता गावपातळीवर आरक्षणानुसार बिनविरोध सदस्य व सरपंचाची निवड होते. एकमुखी निर्णयामुळे नावन्यपूर्ण योजना, उपक्रम यामध्येही गावाने नेहमीच आघाडी घेतली आहे. साहजिकच, यशवंत पंचायत राज, तंटामुक्त गाव समिती, निर्मलग्राम, पर्यावरण पूरक ते जिल्हास्तरीय स्मार्टग्राम असे विविध पुरस्कार आज अनगरच्या नावावर आहेत. सोलापूर जिल्ह्यातील अनगर हे आदर्श मॉडेल गाव म्हणून ओळखले जाते.

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळच्या अलीकडे तीन किलोमीटरवर अनगरकडे जाण्यासाठी फाटा फुटतो. तिथून ८-१० किलोमीटरवर अनगर हे साधारण दहा हजार लोकसंख्येचं गाव आहे. गावात प्रवेश करतानाच दोन्ही बाजूने झाडांची हिरवाई आपले स्वागत करते. अनगर परिसरात जवळपास अठरा वाड्या असून, त्यांचा राबता अनगर गावात होत असल्याने बाजारपेठेचे गाव म्हणूनही ओळख आहे. सध्या अंकुश गुंड हे सरपंच आणि अमर मुलाणी हे उपसरपंच आहेत. ग्रामपंचायतीची सदस्य संख्या १७ आहे. त्यात सर्वाधिक ९ महिला सदस्या आहेत. सोलापूर जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष तथा माजी आमदार राजन पाटील यांचे गाव असल्याने अनगर गावातील विकासावर त्यांचे लक्ष असते. त्यांच्यामुळेच गावात सामाजिक बदलाचे चित्र उभे राहू शकल्याचे गावकरी सांगतात. गावामध्ये स्वच्छता, पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण, रस्ते आणि वीज अशा पायाभूत सुविधांवर चांगले काम झाल्याचे दिसते. तसेच गावामध्ये घनकचरा व्यवस्थापन, गांडूळखत प्रकल्प, कंपोस्ट खत असे उपक्रम राबवते जातात. त्यातून पर्यावरणासोबतच कृषिकेंद्रित ग्रामविकासाची संकल्पना गावाने साधली आहे. गावाचे भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे तीन हजार हेक्‍टर इतके असून, त्यातील ८० टक्के क्षेत्रावर शेती होते. ऊस हे प्रमुख पीक असले, तरी कांदा, भाजीपाला, द्राक्ष, डाळिंब ही पिकेही घेतली जातात. हे गाव भाजीपाल्याच्या रोपवटिकांसाठी जिल्ह्यात प्रसिद्ध असून, येथे सुमारे दोन डझन रोपवाटिका आहेत.

शुद्ध आणि स्वच्छ पाणीपुरवठ्यासाठी

गावात पिण्यासाठी शुद्ध पाण्याची उपलब्धता व्हावी, या उद्देशाने ताशी दोन हजार लिटर क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प (आरओ) बसवला आहे. सोबत पाच टनी चिलर, क्वाइन बॉक्‍स व पंचकार्ड यंत्रणाही उपलब्ध केली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना स्वस्तामध्ये पिण्याचे पाणी शुद्ध मिळते. गावातील पाण्याचा स्रोत जिवंत राहण्यासाठी विंधन विहिरींचे पुनर्भरण केले आहे.

विजेसाठी सौरऊर्जेचा पर्याय

वीज बचतीसाठी ग्रामपंचायतीने वेगवेगळे पर्याय वापरले आहेत. गावातील ११५ पोलवर एलईडी दिवे लावले असून, पाचपीर, सावतामाळी मंदिर, इनाम वस्ती, कॉलेज परिसर येथे सौर ऊर्जेचे एक एचपीचे पंप बसवले आहेत. त्याशिवाय गाव परिसरातील वाड्या वस्त्यावरही २१६ सौरदिवे लावले आहेत.

स्वच्छता आणि निर्मल ग्राम

 • गावात कचरा कुंड्यासाठी जागा करण्यात आली आहे. तसेच कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडीची सुविधाही आहे.
 • त्याशिवाय गावात बहुतेक ठिकाणी सेफ्टिटॅंक आहेत.
 • सर्व गटारे भूमिगत केले असून, गटारीची लांबी ४८५० मीटर इतकी आहे.
 • वाड्या-वस्त्यावरही शोषखड्ड्याचे शौचालय आहे.
 • गावाने स्वच्छतेसाठी उचललेल्या कामगिरीमुळे आठ वर्षापूर्वीच ग्रामपंचायतीला निर्मलग्राम पुरस्कार मिळाला आहे.
 • गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. गावातील एकूण कुटुंब संख्या १३५४ इतकी आहे. त्यापैकी १२०१ कुटूंबांकडे स्वतःची शौचालये असून, दोन ठिकाणी सार्वजनिक शौचालयांची उभारणी केली आहे. दोन वर्षापूर्वीच शासनाच्या या उपक्रमाने दखल घेतली असून, सन २०१६-१७ मध्ये गाव पूर्ण हागणदारीमुक्त म्हणून घोषित झाले.

शिक्षण, आरोग्यासह पायाभूत सुविधा

 • गावातील सर्व रस्ते सिमेंट कॉंक्रिटचे केले आहेत. भूमिगत गटार असल्यामुळे ते पुरेसे रुंद आणि दर्जेदार आहेत.
 • आरोग्य व शिक्षणाच्या दृष्टीने एक प्राथमिक आरोग्य केंद्र, १६ अंगणवाड्या, १२ प्राथमिक शाळा, एक माध्यमिक शाळा, एक महाविद्यालय तर एक उच्च माध्यमिक विद्यालय आहे.
 • गावातील शंभू महादेव मंदिर आणि श्री गणपती मंदिर आहे. तेथे चांगल्या सोयीसुविधा पुरवल्यामुळे लोकांची आवक जावक वाढली आहे. परिसरातील पर्यटनस्थळ म्हणून विकसित झाली आहेत.

थेट संपर्कासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

ग्रामपंचायतीच्या वतीने खास गावकऱ्यांसाठी व्हॉटसअॅप ग्रुप तयार केला असून, त्यावर सर्व शासकीय योजना, शासनाचे नवे निर्णय आणि ग्रामपंचायतीचे विविध उपक्रम यांची माहितीही दिली जाते. त्यातून ग्रामपंचायत आणि गावकरी असा थेट संपर्क साध्य झाला आहे.

पर्यावरण जागृतीचे प्रयत्न सुरू

गावपातळीवर वृक्षारोपणासाठी प्रयत्न केले जात असून, त्यासाठी गावातील दानशुरांचीही मदत घेतली आहे. त्यातून १७०० झाडे लावली असून, त्यांच्या संरक्षणासाठी ५०० ट्री गार्ड बसवणे शक्य झाले.
कुऱ्हाडबंदी, चराई बंदीसाठी सध्या प्रयत्न केले जात असून, त्याला थोडाथोडा प्रतिसाद मिळत आहे.
शिवाय गावालगतच्या ओढ्यातून वाळू उपशास पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे.

आठवडे बाजारासाठी सुविधा

अनगर हे जवळपास १८ वाड्या-वस्त्यांनी वेढलेले गाव आहे. या गावांसाठी मुख्य बाजारपेठ अनगर आहे. येथील आठवडी बाजार गुरुवारी भरतो. या बाजारासाठी स्वतंत्र जागा दिली आहे. तिथे पत्र्याच्या शेडसह आडोसा आणि प्रत्येक विक्रेत्यासाठी सुसज्ज ओटाही बांधला आहे. प्रशस्त सुविधांमुळे विक्रेत्यांसह ग्राहकांनाही आठवडे बाजारात खरेदीचा वेगळा आनंद घेता येतो.

खोलीकरणातून वाढवली साठवण क्षमता

 • अनगरच्या गावाजवळ वाफळे-अनगर मार्गावर गावओढा आहे. पूर्वी अतिक्रमण, झाडे झुडूपे यामुळे ओढा दिसत नव्हता. मात्र, गावकऱ्यांनी श्रमदानातून या ओढ्याचे रुंदीकरण, खोलीकरण केले. येथील वाढलेली झाडे-झुडपे काढण्यात आला. या गाळाचा वापर विविध शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात केल्याने नापीक जमिनी सुपीक होण्यास मदत झाली. ओढ्यातून सुमारे ५६ हजार १८ घनमीटर इतका म्हणजे १९ हजार ७९४ ब्रास इतका गाळ निघाला. या कामाची अंदाजित किंमत सुमारे ३५ लाख ३ हजार ६६२ रुपये इतकी झाली. श्रमदानातून झालेल्या या कामामुळे या ओढ्याची पाणी साठवण क्षमता ५६.१८ टीसीएम इतकी झाली आहे.
 • दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत आटणाऱ्या या परिसरातील सुमारे ६८ बोअर व विहिरींनाही यावर्षी चांगले पाणी आहे. शेतकऱ्यांना रब्बी हंगाम चांगला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राजकारणविरहित विकासावर विविध पुरस्कारांची मोहोर

 • ग्रामपंचायतीच्या इतिहासात अद्यापपर्यंत एकदाही निवडणूक झालेली नाही. सर्व निवडणुका या आरक्षणानुसारच मात्र बिनविरोध होतात. यातून राजकारण टाळले जात असल्याने वादाचे प्रसंग कमी होतात. एकमुखी निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनगर हे आदर्श मॉडेल गाव म्हणून ओळखले जाते.
 • नावीन्यपूर्ण योजना, उपक्रमासह ग्रामपंचायत शासनाच्या प्रत्येक योजना, उपक्रमात तेवढ्याच हिरिरीने भाग घेते. गावकऱ्यांच्या एकीमुळे त्यात यशही मिळाले आहे. आजपर्यंत संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, तंटामुक्त गाव अभियान, निर्मलग्राम स्वच्छता अभियान, पर्यावरण संतुलन ग्रामसमृद्ध अभियान, तालुकास्तरीय स्मार्ट ग्राम, जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम, यशवंत पंचायतराज पुरस्कार, पर्यावरण विकासरत्न असे अनेक पुरस्कार गावाला मिळाले आहेत.

भविष्यात गावातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते शेतीसाठी वापरण्याचे आमचे नियोजन आहे. त्यामुळे गावातील डासमुक्तीबरोबरच शेतीसाठीही अतिरीक्त पाण्याचा पर्याय उपलब्ध होईल.
- अंकुश गुंड, (संपर्क ः ९८६०३५९२६४)
सरपंच, अनगर

गावकऱ्यांच्या एकी, सहकार्य आणि पाठिंवा यामुळेच गावामध्ये विविध उपक्रम राबवणे शक्य झाले. सर्व प्रशासकीय खर्च भागवून ग्रामपंचायतीचे एक कोटी ६१ लाख रु. निव्वळ शिल्लक मुदत ठेव म्हणून ठेवली आहे. यापुढेही गावाच्या विकासासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचा आमचा संकल्प आहे.
- सचिन कदम, (संपर्क ः९७६३३५३०९५)
ग्रामविकास अधिकारी, अनगर

फोटो गॅलरी

इतर ग्रामविकास
गटशेती : काळाची गरजशेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने शेती...
संरक्षित शेतीतून आर्वीतील शेतकऱ्यांची...वाढती पाणीटंचाई आणि  बदलत्या हवामानामुळे...
जमिनीच्या आरोग्य कार्डाची उपयुक्तताभारतातील प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या जमिनीचे...
भूगर्भात पाणीसाठा टिकविण्यासाठी भूमिगत...भूमिगत बंधारा बांधण्याचे काम जमिनीखाली असल्याने...
निर्धारातून टाकोबाईची वाडीच्या...सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याचा काही भाग...
गळणाऱ्या बंधाऱ्याची दुरुस्ती शक्यसध्याच्या काळातील बंधाऱ्यांची परिस्थिती पाहिली तर...
विविध उपक्रमांच्या माध्यमातून माणगाव...कोल्हापूर जिल्ह्यातील माणगावच्या ग्रामस्थांनी...
योग्य ठिकाणीच करा पाझर तलावपाझर तलावाचा उपयोग आणि प्रयोजन हे केवळ पडणारे...
आर्थिक, सामाजिक, कृषिसंपन्न राजुरीचा...आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत व...
कडवंची : पाणंदमुक्‍त रस्त्यांची...रस्ते, पाणी आणि वीज हे शेतीविकासातील महत्त्वाचे...
कडवंची : पाणलोटाचं स्वप्न साकारकडवंची गावात जल, मृद संधारण, शेती विकासामध्ये...
‘वॉटर बजेट’ कडवंचीचे वैशिष्ट्यपाणलोट विकास, पीक बदल, पूरक उद्योगात मनापासून...
कडवंची : एकात्मिक पाणलोटातून पाणी,...पाणलोटाची जी कामे आम्ही करतो ती मृद संधारणावर...
कडवंची : ग्रामविकासाचे सूत्र : जल अन्...गाव आणि शेती विकासामध्ये ग्रामपंचायत हा...
जल व्यवस्थापनासाठी हवी लोकचळवळलक्षावधी हेक्टर जमीन, हजारो टीएमसी पाणी आणि...
लोकसहभाग, श्रमदानातून लोहसर झाले ‘आदर्श...नगर जिल्ह्यातील लोहसर (खांडगाव) येथील गावकऱ्यांनी...
भूजलाची कल्पना अन्‌ वास्तवपाणीटंचाई सुरू झाली की त्यावर उपाय करताना आपण...
दुष्काळातही शिवार समृद्ध करण्याचे...पिकांची विविधता, पूरक उद्योगांचेही वैविध्य,...
अल्पभूधारक, भूमिहीन महिलांना बचतगटातून...बेल्हेकरवाडी (ता. नेवासा,जि.नगर) मधील तुकारामनगर...
मोनेरा फाउंडेशन देतेय पर्यावरण, शिक्षण...परिसरातील पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जागृती हा...