ढगाळ वातावरण, भुरीच्या धोक्याकडे लक्ष द्या

द्राक्ष सल्ला
द्राक्ष सल्ला

बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या वादळाचा परिणाम आजपासून महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये दिसू लागेल. त्यामुळे सांगली, सोलापूर, नांदेड या पट्ट्यातील अनेक ठिकाणी गुरुवार- शुक्रवार (ता. १३-१४) पासून पुढे वातावरण ढगाळ राहील. हळूहळू हे ढगाळ वातावरण पुणे व जवळपासचे भाग उदा. नारायणगाव, जुन्नर येथे शुक्रवार- शनिवार (ता. १४-१५) पासून वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. नाशिकचा काही भागात रविवार (ता. १६) पासून वातावरण अधूनमधून ढगाळ होण्याची शक्यता आहे. पुढील आठ दिवसांमध्ये तरी नाशिक, पुणे भागामध्ये पावसाची शक्यता दिसत नाही. परंतु सांगली भागामध्ये तसेच सोलापूरच्या दक्षिण किंवा पूर्व भागामध्ये शुक्रवार (ता. १४) हलक्या पावसाची शक्यता आहे. अशाच प्रकारचा पाऊस पुन्हा रविवारी- सोमवारी (ता. १६ व १७) सांगलीच्या कवठे महांकाळ, विटा, पळशी, तासगाव व जवळपासच्या भागामध्ये होण्याची शक्यता आहे. तर सोलापूरच्या नानज, वैराग, बार्शी, काटी, कारी, तुळजापूर, उस्मानाबाद, लातूर या सर्व भागामध्ये होण्याची शक्यता आहे. हा पाऊस हलका किंवा रिमझिम सरीइतकाच मर्यादित राहील, परंतु २१-२२ तारखेनंतर पुन्हा मोठ्या पावसाची शक्यता दर्शवली जात आहे. या अनुषंगाने द्राक्ष बागायतदारानी सावध राहिले पाहिजे. उपाययोजना भुरी ः खरे पाहता वातावरण बहुतांश भागामध्ये बराच काळ ढगाळ राहणार असल्यामुळे व अपेक्षित पावसामुळे आजूबाजूची आर्द्रता वाढणार असल्याचे भुरीचा धोका जास्त दिसतो. भुरीच्या नियंत्रणासाठी योग्य वेळी फवारण्या अत्यंत आवश्यक आहेत. विशेषतः नाशिक, पुणे येथील जुन्नर, यवत व इंदापूरच्या जवळपासचा भाग येथे भुरीसाठी विशेष काळजी घ्यावी लागेल. या विभागातील सर्वच बागा फळधारणेनंतर फळांच्या वाढीच्या अवस्थेत आहेत. या परिस्थितीमध्ये छाटणीनंतरचे ५५ ते ६० दिवस झालेले असल्यास आता आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर करणे रेसिड्यूच्या दृष्टिकोनातून धोक्याचे होऊ शकते. ज्या रसायनाची एमआरएल ३ ते ७ पीपीएमपर्यंत आहे, अशा बुरशीनाशकांचा वापर शक्य आहे. परंतु ज्या रसायनांचा वापर होईल, त्याचे उर्वरित अंश हे एमआरएल (कमाल अवशेष मर्यादा) पेक्षा कमी राहिले तरी आढळतील हे निश्चित. असा आढळ टाळावयाचा असल्यास फक्त गंधकाचा (सल्फर) वापर दीड ते दोन ग्रॅम प्रतिलिटरप्रमाणे फवारणीद्वारे करणे योग्य होईल. वातावरणामध्ये ढगामुळे सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी असल्यामुळे आर्द्रता वाढलेली असल्यामुळे जैविक नियंत्रणासाठी ॲंम्पिलोमायसिस किंवा ट्रायकोडर्मा (५ ग्रॅम प्रतिलिटर फवारणीद्वारे) वापरणे शक्य आहे. सल्फर वापरलेले असल्यास जैविक नियंत्रणाला फारसा प्रतिकार होणार नाही. परंतु सल्फर नंतर कायटोसॅन २ ते ३ मिलि प्रतिलिटर या प्रमाणात फवारलेले असल्यास भुरीचे नियंत्रण जास्त चांगले मिळेल. त्याच बरोबर जैविक नियंत्रणसुद्धा चांगले मिळू शकेल. कायटोसॅनचा वापर फक्त स्थानिक बाजारपेठेच्या बागेसाठी करावा. डाऊनी मिल्ड्यू ः

  • सांगली, सोलापूर, उस्मानाबाद येथील बऱ्याचशा बागांमध्ये डाऊनी मिल्ड्यू कार्यरत असलेला काही दिवसांपूर्वी आढळला. सुरवातीच्या काळामध्ये शेंड्याला येणाऱ्या नवीन पानावर डाऊनी होता. त्यानंतर तो घडाच्या काही पाकळ्यावर दिसला. या विभागामध्ये सकाळी मोठ्या प्रमाणात दव पडणे आणि कमी थंडी असे वातावरण होते. ज्या ज्या भागांमध्ये डाऊनीच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक फवारण्या झालेल्या नव्हत्या, त्या ठिकाणी अशा प्रकारचे प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळले. अलीकडे मिरज व जवळपासच्या भागामध्ये द्राक्ष बागायतदारांनी मणी सेटिंग झाल्यानंतर जीए बरोबरच युरिया फवारण्याची पद्धत सुरू केली आहे. अशा बागांमध्ये युरियाच्या फवारणीमुळेसुद्धा डाऊनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव वाढला असल्याची शक्यता राहू शकते. घडावर दिसणारी कूज किंवा मण्याची गळ डाऊनीच्या प्रादुर्भावामुळे झाली असण्याची शक्यता आहे.
  • ज्या ठिकाणी डाऊनी दिसत असेल, अशा शेतकऱ्यांनी सर्वप्रथम प्रादुर्भाव झालेले शेंडे किंवा घडाच्या पाकळ्या काढून घ्याव्यात.
  • छाटणीनंतरच्या ५०-६० दिवसांपर्यंतच्या बागांमध्ये डाऊनीच्या नियंत्रणासाठी सायमोक्झॅनिल अधिक मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ते ३ ग्रॅम प्रतिलिटर फवारल्यास डाऊनीचे नियंत्रण चांगले मिळू शकेल. रेसिड्यूचा धोकासुद्धा फारसा राहणार नाही.
  • छाटणीनंतर ६० दिवसांपेक्षा जास्त काळातील बाग असल्यास फोसेटिल एएल ३ ते ३.५ ग्रॅम प्रति लिटर किंवा पोटॅशिअम सॉल्ट ऑफ फॉस्फरस ॲसिड ३ ते ४ ग्रॅम प्रतिलिटर प्रमाणात फवारल्यास डाऊनीचे नियंत्रण मिळू शकते.
  • बाग ७५ दिवसांपर्यंत असल्यास अशा फवारणीने युरोपीय देशामध्ये निर्यात होणाऱ्या द्राक्षांमध्ये फॉस्फरस ॲसीडचे रेसिड्यू मिळू शकतील. मात्र, एमआरएल १०० पीपीएम असल्यामुळे रेसिड्यूचा धोका नाही. चीनमध्ये जाणाऱ्या द्राक्षामध्ये मात्र अशा प्रकारची फवारणी कदाचित शक्य होणार नाही. कारण रेसिड्यू १० पीपीएम (एमआरएल) पेक्षा कमी होण्यासाठी ५० ते ६० दिवसांची जरुरी आहे. स्थानिक बाजारपेठेसाठी किंवा बेदाण्यासाठी तयार केलेल्या द्राक्षामध्ये मात्र अशा फवारणीने धोका नाही.
  • २१-२२ तारखेनंतर सांगली, सोलापूर भागामध्ये पावसाची पुन्हा शक्यता दिसत आहे. या शक्यतेमुळे बागेमध्ये असलेल्या डाऊनी मिल्ड्यूचा संपूर्णपणे नायनाट त्वरित करणे अत्यावश्यक आहे. डाऊनी असलेल्या बागांमध्ये आता डाऊनीचे चांगले नियंत्रण न केल्यास २२ ते २३ तारखेनंतर पाऊस आल्यास स्थिती हाताबाहेर जाऊ शकते.
  • संपर्क ः ०२० -२६९५६००१ (संचालक, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com