जमिनीचा पोत वाढवण्यासाठी हिरवळीची खते

जमिनीचा पोत वाढवण्यासाठी हिरवळीची खते
जमिनीचा पोत वाढवण्यासाठी हिरवळीची खते

हिरवळीच्या खताचा अधिक फायदा मिळण्यासाठी या पिकाचे लागवड व योग्य वेळी गाडणे याबाबीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या मनात साधारणतः हिरवळीची खत पिके केव्हा घ्यावीत, उभे पीक जमिनीत कधी गाडावे, किती दिवसाने दुसरे आंतरपीक घ्यावे असे तीन प्रश्न असतात. त्याची उत्तरे देण्याचा प्रयत्न या लेखातून केला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये जनावरे सांभाळणे ही अनेक कारणांमुळे जिकिरीचे होत आहे. परिणामी शेतीसाठी गावपातळीवर शेणखताची उपलब्धता कमी होत असून, शेतीमध्ये वापरण्याचे प्रमाणही कमी होत आहे. राज्यातील अनेक विभागांमध्ये मातीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण अल्प ते अत्यल्प झाल्याचे निदर्शनास येत आहे. यावर मात करून जमिनीचा पोत सांभाळण्यासाठी हिरवळीची खते मोलाची ठरू शकतात. हिरवळीची खत पिके ही जमिनीत हेक्टरी साधारणत: ६०-८० किलोपर्यंत नत्र स्थिरीकरणाचे काम चांगल्या पद्धतीने करतात. बागायती जमिनीमध्ये हिरवळीच्या खतपिकांची लागवड केली जाते. पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा विभागात मुख्य पीक म्हणून हिरवळीची पिके घेतली जातात. उत्तर भारतात मुख्यत: दिल्ली, हरियाना, पंजाब, उत्तर प्रदेश या राज्यांतील शेतकरी आंतर पीक म्हणून त्यांची लागवड करताना दिसतात. हिरवळीचे खत तयार करण्याच्या प्रमुख दोन पद्धती ः १. शेतात लागवडीद्वारे तयार करणे : या पद्धतीत हिरवळीच्या खत पिकांची लागवड केली जाते. ठराविक वाढ झाल्यानंतर हे पीक त्याच शेतात गाडले जाते. या पद्धतीतही दोन उपप्रकार आहेत. अ) मुख्य पीक (main crop) ब) आंतर पीक (Inter crop) २. शेतीबाहेर किंवा बांधावर वनस्पती लागवड व पालापाचोळा यातून हिरवळीचे खत तयार करणे : या पद्धतीत कमी कालावधीत येणारी झाडे व झुडपे यांची बांधावर लागवड केली जाते. ती झाडे फुलोरा अवस्थेत आल्यानंतर पाने, फांद्या व पडलेला पालापाचोळा शेतात पसरवून नांगराने गाडून घेतात. ही पद्धत अलीकडे मराठवाड्यात राबवली जात असल्याचे दिसते. उदा. धैंचा (सिसबेना अक्युलटा), सनहेंप किंवा बोरू (क्रोटालारिया जुंसी) हिरवळीचे खत तयार करण्यासाठी वापरली जाणारी पिके :

  • धैंचा (सिसबेना अक्युलटा), सनहेंप / बोरू (क्रोटालारिया जुंसी),
  • धैंचा (सिसबेना अॅक्युलटा) : हे पीक उत्तम हिरवळीचे खत म्हणून प्रसिद्ध आहे. क्षारयुक्त चोपण व चिबड जमिनीमध्ये क्षार मुक्ततेसाठी यांचा वापर मोठ्या प्रमाणात करतात.
  • सनहेंप / बरु ( क्रोटालारीया जुंसी) : उत्तम हिरवळीचे खत म्हणून प्रसिद्ध असून, साधारणत: देशात सर्वच ठिकाणी हे पीक घेतले जाते. हे जोड पीक म्हणूनही बटाटा, ऊस, फळझाडे या पिकाबरोबर घेता येते.
  • अन्य पिके ः चवळी (विगना कटजंग), बरसीम गवत (ट्रायफोलीयम ॲलेक्झान्ड्रम), सेनजी (मेलिओथस परविफलोरा).
  • हिरवळीचे खत लागवड तयार करण्याचे तंत्रज्ञान :

  • लागवड हंगाम व तंत्र : खरीप हंगामात मान्सून पाऊस पडल्यावर या पिकाची लागवड करावी. यासाठी विशेष मशागतीची आवश्यकता नसली तरी जमिनीची नांगरणी व वखरणी करावी. पेरणी करताना जमिनीत पेरणीयोग्य ओलावा असणे आवश्यक आहे. त्यामुळे पिकांची उगवण व वाढ चांगली जोमाने होते. पीक लागवडीवेळी स्फुरदयुक्त खते द्यावीत. बियाणे पाभरीच्या साह्याने पेरून लागवड करता येते. या पद्धतीत प्रतिहेक्टरी बियाणे जास्त ठेवावे लागतात.
  • हिरवळीचे खत पीक शेतजमिनीत गाडण्याची योग्य वेळ : हिरवळीचे पीक फुलोऱ्यात असताना जमिनीत गाडावे. बहुतेक हिरवळीची पिके ही ६-८ आठवड्यात फुलोऱ्यात येतात. या अवस्थेत सनहेंपसारखे पीक जमिनीत गाडल्यास नत्राचे स्थिरीकरण अधिक होते. परीणामी त्यानंतर घेतल्या जाणाऱ्या गहू पिकाच्या उत्पादनात १२-२५ टक्क्यांनी वाढ होते.
  • हिरवळी पीक म्हणून निवडण्यासाठी वनस्पतीतील गुणधर्म :

  • वनस्पतीचा जीवनक्रम लवकर पूर्ण होणारा असावा. यातून जास्तीत जास्त प्रमाणात फांद्या तयार होऊन अधिक पाने मिळतात. परिणामी अधिक बायोमास मिळतो.
  • वनस्पतींच्या मुळे जमिनीत खोलपर्यंत जाणारी असावीत. जमिनीच्या खालील थरापर्यंत जाऊन स्वतःच्या वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्ये घेण्याची क्षमता असावी.
  • वाढीसाठी सिंचनाची आवश्यकता कमी असावी. म्हणजे ही पिके कमी पाण्यावर किंवा कोरडवाहू स्थितीमध्येही जमिनीतील ओलाव्यावर लवकर वाढतील.
  • खराब व प्रतिकूल जमिनीत तग धरण्याची क्षमता असावी.
  • शेंगवर्गीय वनस्पती या हिरवळीच्या खतासाठी योग्य मानल्या जातात. त्यांच्या मुळ्यावरील गाठींमध्ये असलेले सहजिवी जिवाणू नत्राच्या स्थिरीकरणात मोलाची भूमिका निभावतात. अधिक गाठी येणाऱ्या शेंगवर्गीय वनस्पतीची निवड करावी. प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा नत्र स्थिरीकरण लवकर करण्याची क्षमता असावी.
  • हिरवळीच्या खताचे फायदे :

  • जमिनीत सेंद्रिय पदार्थाची भर पडून सूक्ष्म जीवजंतूंची हालचाल वाढते.
  • हिरवळीच्या पिकाद्वारे जमिनीच्या खालच्या थरातील अन्नद्रव्य परत जमिनीच्या वरील थरात पिकांना उपलब्ध केले जातात.
  • जमिनीचे आरोग्य व पोत सुधारतो.
  • जमिनीची सच्छिद्रता वाढत असल्याने पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते.
  • जमिनीची धूप कमी होते.
  • हिरवळीखत पिकांमुळे वनस्पतींना लागणारी अन्नद्रव्ये जमिनीत धरून ठेवली जातात.
  • धैंचा व सनहेंपसारख्या शेंगावर्गीय हिरवळीच्या पिकांचा वापर केल्यास जमिनीतील नत्राचे प्रमाण वाढते. पुढील पिकांसाठी त्याचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे स्फुरद, पालाश, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, लोह व इतर अन्नद्रव्येही पिकांना काही प्रमाणात उपलब्ध होतात.
  • संपर्क ः अंबादास मेहेत्रे, ९५४५३२३९०६, डॉ. उल्हास सुर्वे, ९८२२६०६५११, डॉ. अरुण तुंबारे, ९६५७६७४८३०. (कृषि विद्या विभाग, पदव्युत्तर महाविद्यालय, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com