इतिहासातील जलसंधारण संकल्पना अन् प्रत्यक्ष काम

इतिहासातील जलसंधारण संकल्पना अन् प्रत्यक्ष काम
इतिहासातील जलसंधारण संकल्पना अन् प्रत्यक्ष काम

मागच्या भागात आपण इतिहासातील सागरी किल्ल्यांवरील जलसंधारणाचे उपाय पाहिले. आपण हे सगळे उपाय नजरेआड करून नुकसान करून घेत आहोत. या सर्व उपायांचा विचार आणि योग्य पद्धतीने वापर करून आजही जल संधारण अतिशय कार्यक्षमतेने करू शकतो. आजच्या भागात डोंगरी आणि भुईकोट किल्ल्यांतील जलसंधारण उपायांची माहिती घेत आहोत. रायगड किल्यामधील काटेकोर जलव्यवस्थापनाचा अभ्यास केला तर असे दिसून येते की, या किल्ल्यावरील अनेक कुंड आणि तलावांच्यामध्ये वर्षभर पाणी साठवून ठेवण्याची सोय आहे. एवढंच नव्हे, तर त्या त्या भागात पडणाऱ्या पावसाचे पाणी दगडात मार्ग कोरून साठवण तलावांच्या दिशेने जाईल याची काळजी घेतली आहे; पण किल्ल्यांवर जाणाऱ्या बहुसंख्य लोकांना याचा गंधही नसतो आणि हे बघण्यात रसही नसतो, असा अनुभव आहे. चिखलदरा गावाजवळील गाविलगड हा डोंगराच्या एका टोकावर असलेला किल्ला, एका गवळी राजाचा. गोधन विपुल असल्याने पाण्याची गरज भरपूर, तेही डोंगराच्या टोकाला, खूप उंचीवर. पण, त्या ठिकाणी असलेल्या भौगोलिक परिस्थितीचा उपयोग करून झालेले जलव्यवस्थापन पाहिले की आपण चकित होतो. प्रचंड मोठे तलाव आहेत. येथील योजना अशी आहे की एक तलाव भरला की पाणी दुसऱ्या तलावाकडे सहज उताराने जाते. जमिनीवरच्या किल्ल्यांपैकी एक उदाहरण म्हणजे लातूर जिल्ह्यातील औसा येथील भुईकोट किल्ला. याच्या आतल्या भागात एक भूमिगत तलाव किंवा साठवण टाकी आहे. ती बाहेरच्या खंदकाशी जोडली आहे. पावसाळ्यात जेव्हा खंदक भरतो, तेव्हा पाणी आत घेण्याची सोय आहे. किल्ल्याच्या परिसरात पडलेले पावसाचे पाणीदेखील इकडे वळवलेले आहे. त्यामुळे, आजही या भूमिगत तलावात स्वच्छ पाणी दिसते. वरून काही दिसत नाही, पण पायऱ्या उतरून खाली गेले, की हा साठा दिसतो. अगदी बाहेरच्या खंदकात पाणी नसले, तरीही किल्ल्यामधील या भूमिगत साठ्यावर त्याचा परिणाम होत नाही, इथे वर्षभर पाणीसाठा असतो. विशेष म्हणजे हा सगळा भाग हा दुष्काळी भाग म्हणून प्रसिद्ध आहे. बाकी सगळीकडे पाण्याची टंचाई असली तरी किल्ल्यावर पाणीसाठा पुरेसा असतो. हेच आपल्याला कोणत्याही डोंगरी किल्ल्यांवरही सहज दिसते. एक तलाव, काही कुंड किंवा विहिरी इत्यादी उपाय करून उपलब्ध पाणीसाठा वापरायची सोय केलेली दिसते. हे स्थलानुरूप जलसंधारण आजही यशस्वी होताना दिसते. ही उदाहरणे झाली ती राज्यकर्त्यांना किल्ल्यांवर जास्त काळ सुरक्षित राहता यावं, गाव वसवता यावं, सैन्याला पुरेसा पाणीसाठा असण्यासाठी; पण हे केवळ किल्ल्यांपुरते मर्यादित नव्हते. तर अशा पद्धतीने जल संधारण आणि व्यवस्थापन हे लोकसहभागातून केले जावे, लोकांचा सहभाग त्यात असावा म्हणून या गोष्टी संस्कृती, धार्मिक कर्तव्य, परंपरा इत्यादि गोष्टींशी जोडल्या होत्या. पाणी ही पवित्र, देवासमान गोष्ट मानली जात होती. लोकांसाठी पाणी मिळवून देणे ही पुण्याची गोष्ट मानली जात होती. आजही आपण अनेक ठिकाणी शेकडो वर्षांपूर्वी बांधलेले तलाव, पुष्करणी, बारवा, इत्यादी पाहू शकतो. लोकसहभागातून जल व्यवस्थापन ः १) नगर जिल्ह्यातील पारनेरजवळ असणारी काही मंदिरे आणि त्यांच्या आसपास दिसणारे बंधारे, तलाव किंवा पुष्करणी यांचा अभ्यास केला तर लक्षात येते की, तो प्रदेश, त्याचे भौगोलिक स्थान, पावसाचे प्रमाण, मातीचा प्रकार यांचा अभ्यास करून योग्य उपाय योजून जल संधारण करण्यात आले होते. जे आजही व्यवस्थित काम करते. २) पारनेरजवळ मनकर्णिका आणि कुंभकर्णिका या दोन नद्यांच्या संगमावर १४ व्या शतकात बांधलेल्या संगमेश्वर मंदिराच्या जवळ आपल्याला घडीव पाषाणात बांधलेला बंधारा आजही उत्तम स्थितीमध्ये दिसतो. पात्रातील गाळ काढल्यानंतर त्यात आजही पाणी साठवले जाते. तिथून थोड्या अंतरावर असलेल्या सिद्धेश्वर मंदिराच्या आवारातसुद्धा घडवलेल्या पाषाणात बांधलेली रेखीव पुष्करणी आहे, जी आजही उत्तम स्थितीत आहे. याच्या जवळ एक कुंड आहे, ज्याला सीताकुंड म्हणतात. त्यात गेल्या काही वर्षांत पाणी वर्षभर उपलब्ध झालेले नाही. पूर्वी याठिकाणी पाणी वर्षभर उपलब्ध असायचे. मग असं काय घडलं की ही परिस्थिती निर्माण झाली? दोन्ही नद्या डिसेंबरपासूनच पूर्ण कोरड्या का होतात? असे कोणते उपाय केले, ज्यामुळे नदीपात्र तर खोल झाले, पण पाणी गायब झाले? सगळा भाग उजाड झाल्याची कारणे काय असावीत? यावर काय विचार केला गेला आणि त्या दिशेने काही प्रत्यक्ष कृती घडली आहे का?, असे अनेक प्रश्न अशा ठिकाणी जाऊन अभ्यास करताना पडतात. ३) भारतात बहुसंख्य ठिकाणी असणाऱ्या मोठ्या मंदिरांचा अभ्यास करताना लक्षात येते की, या सर्व ठिकाणी बांधकाम करताना भौगोलिक परिस्थिती, उतार, जमिनीची जडणघडण, पावसाचे प्रमाण, इत्यादी गोष्टी विचारात घेऊन, त्या वास्तूच्या परिसरातील पडणारे पावसाचे पाणी विशिष्ट मार्गाने त्या परिसरातील तलाव, पुष्करणी किंवा उपलब्ध पाण्याच्या स्त्रोताकडे वळवलेले आहे. त्यामुळे त्या परिसरातील भूगर्भातील पाणी पातळी कायम राहायला मदत झाली. त्याचप्रमाणे, अशा ठिकाणाला असलेल्या धार्मिक महत्त्वामुळे हा पाण्याचा साठा स्वच्छ रहाण्यास मदत होते. कित्येक ठिकाणी तर हे केवळ पिण्याच्या पाण्यासाठी नव्हे तर शेतीसाठीसुद्धा उपयोगात येते. उदाहरणार्थ आपण रामेश्वर मंदिर किंवा तत्सम समुद्रकिनारी असणारी मंदिरे पाहिली, तर एक विशेष गोष्ट लक्षात येते. रामेश्वर मंदिर अगदी समुद्राजवळ आहे. या मंदिराजवळ गोड्या पाण्याचा तलाव किंवा कुंड आहे. आपण या परिसराचा अभ्यास केला तर लक्षात येते, की परिसरात पडणारे पावसाचे पाणी याच परिसरात मुरवून ते तलाव, कुंडाकडे वळवले आहे. तलावाच्या बाजूला असलेले बांधकाम पाहिले, की विहिरीची आठवण येते. जसे विहिरीच्या तळाला झरे मोकळे राहावेत म्हणून कच्चे बांधकाम करतात, तसेच काम आपल्याला अशा ठिकाणीही दिसते. यातून त्या परिसरात मुरवलेले पावसाचे पाणी या जलाशयात येते. समुद्राजवळ असूनही वर्षभर गोड पाणी देणारा जलाशय दिसतो. गोव्यातील बहुतेक मंदिरांमध्ये पर्जन्य संधारण करून पाणी वर्षभर वापरासाठी मिळवलेले बघायला मिळते. गोव्यातील विजयदुर्गा संस्थानात देवीचा प्रचंड तलाव आहे. मार्गशीर्ष महिन्यात, म्हणजेच डिसेंबरमध्ये देवीचा जलोत्सव आणि नौकोत्सव असतो, तोपर्यंत हे पाणी राखले जाते. हा उत्सव झाल्यानंतर हे पाणी सोडतात, जे प्रवाहाच्या खालच्या बाजूच्या शेकडो हेक्टर दुबार शेतीला पुरेसे होते. देवीचा तलाव असल्याने हा साठा सुरक्षित ठेवला जात. त्यामुळे लोकांना चांगले पुरेसे पाणी पिण्याबरोबरच दुसऱ्या पिकासाठीही मिळते. पण, हे सर्व नियोजन पूर्वीच्या काळी करण्यात आले होते. तेव्हा स्थानिक राजा, सरदार किंवा गावातील सावकार किंवा धनिक हे सर्व समाजासाठी बरेचदा स्वखर्चाने करत. मात्र, इंग्रज सत्ता आल्यावर त्यांनी सरकारी पाणी पुरवठा योजना चालू केल्या. त्यामुळे हे समाजाने चालवलेले उपक्रम कमी झाले किंवा बंद पडले. या सर्व उपायांमध्ये आणखी एक गोष्ट होती, ती म्हणजे, यात प्रत्यक्ष कामात लोकसहभाग मर्यादित होता. पाणीपुरवठा हे सरकारी काम झाल्यापासून पाण्याच्या नियोजनात गडबड सुरू झाली असं म्हणायला वाव आहे. कारण, त्यानंतर जल संधारण आणि व्यवस्थापन ही कामे सरकारी खात्यांची झाली आणि सामान्य माणूस यासाठी सरकारवर अवलंबून रहायला लागला, या क्षेत्रात असलेले स्वावलंबन जवळपास विसरून गेला. संपर्क ः डॉ. उमेश मुंडल्ये, ९९६७०५४४६० ( लेखक पाणी, पर्यावरण आणि शेती विषयाचे अभ्यासक आहेत)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com