कपाशीवरील पिठ्या ढेकणाचे एकात्मिक व्यवस्थापन

कपाशीवरील पिठ्या ढेकणाचे एकात्मिक व्यवस्थापन
कपाशीवरील पिठ्या ढेकणाचे एकात्मिक व्यवस्थापन

पिठ्या ढेकूण ही कीड पिकात शिरल्यानंतर त्याचे नियंत्रण करणे कठीण जाते. पिठ्या ढेकणाची मादी २५० ते ६०० अंडी, पिशवीसारख्या आवरणात घालते. यातील बऱ्याचशा अंड्यांतून पिले निघालेली असतात, तर काही अंडी घातल्यानंतर लगेच उबतात. अशी पिले व अंडी पांढरट व काळपट मादीच्या पोटाखाली आढळतात. अधूनमधून पिले मादीच्या अंगावर व सभोवताली फिरताना दिसतात. अंडी लांबट पांढऱ्या रंगाची व सूक्ष्मदर्शकाखाली तांदळाच्या दाण्यासारखी दिसतात. पिले २२ ते २५ दिवसांत प्रौढ होतात. त्यांच्या शरीराभोवती मऊ केस व त्यालगतच्या मेणामध्ये करवतीसारखी नक्षी दिसते. मिलीबगचा जीवनक्रम साधारणतः एक महिन्यात पूर्ण होतो. एक वर्षात १२ ते १५ पिढ्या होतात. नुकसानीचा प्रकार

  • कपाशी व्यतिरिक्तच्या हंगामात ही कीड अन्य पिके, जास्वंदासारखी फुलझाडे आणि प्रामुख्याने गाजर गवत, रानभेंडी, आघाडा या सारख्या तणांवर उपजीविका करते. पुढे कपाशीचे पीक उपलब्ध झाल्यानंतर पिकात येते. खाद्य उपलब्ध नसल्यास पीक अवशेषात पडून राहते.
  • या किडीचा प्रादुर्भाव साधारणतः सप्टेंबर-ऑॅक्टोबर महिन्यापासून सुरवात होते.
  • सुरवातीच्या काळामध्ये पिठ्या ढेकूण कपाशी पानांच्या खालील बाजूने रस शोषण करतो. नंतर कोवळे शेंडे व फुले, बोंडे यांचे नुकसान करतो. या किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असल्यास शेतामध्ये पिठ्या ढेकूणग्रस्त असलेली झाडे पूर्णपणे पांढरी झालेली दिसतात. तसेच ढेकूण आपल्या शरीरातून एक प्रकारचा चिकट द्रव बाहेर टाकतात. त्यामुळे पाने,कळी यावर वॅप्नोडियम नावाची काळी बुरशी येते. उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.
  • व्यवस्थापन ः

    1. शेताजवळील शोभिवंत झाडे (उदा. जास्वंद, क्रोटॉन इ.) झाडावरील पिठ्या ढेकणाचा बंदोबस्त करावा. अधिक प्रादुर्भावग्रस्त झाडांचा अधिक प्रादुर्भावग्रस्त भाग किंवा संपूर्ण झाड उपटून नष्ट करावे.
    2. पिठ्या ढेकणाचा प्रादुर्भाव सुरवातीला शेताच्या कडेच्या झाडावरच कमी क्षेत्रात होतो. तेव्हा फक्त प्रादुर्भावग्रस्त भागावरच कीटकनाशकाचा वापर करावा. संपूर्ण शेतातील पिकावर फवारणी करण्याची गरज नाही.
    3. पिठ्या ढेकणावर उपजीविका करणारे क्रिप्टोलिमस मॉन्ट्रोझायरी व इतर ढालकिडे, क्रायसोपा हे परभक्षी व लॅप्टोमेस्टिकस डॅक्टोलोपी, अॅनागायरस कमाली हे परोपजीवी किटक निसर्गात आढळून येतात. त्यांचे संवर्धन करावे.
    4. मित्रकिडी अधिक क्रियाशील असल्यास रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळावा. त्याऐवजी जैविक किटकनाशके उदा. व्हर्टिसिलीयम लेकॅनी, मेटारायझीम अॅनिसोप्ली ५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. जैविक कीटकनाशकांचा वापर वातावरणात आर्द्रता अधिक असताना करावा. संध्याकाळी फवारणी करावी.
    5. आवश्यकता भासल्यास मित्रकीटकास कमी हानिकारक असलेली रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा. उदा. बुप्रोफेझीन २ मिली प्रतिलिटर पाणी.
    6. प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्यावर गेल्यास नियंत्रणासाठी, फवारणी प्रतिलिटर पाणी. बुप्रोफेझीन (२५ एस.सी.) २ मिलि. किंवा डायमेथोएट (३० ई.सी.) १.३ मिलि. किंवा फ्लोनिकॅमीड (५० डब्ल्यू जी.) ०.४ ग्रॅम.

    या किडीच्या अंगावर मेणचट आवरण असल्यामुळे फवारणी करतांना कीटकनाशकासोबत २० ग्रॅम धुण्याची पावडर किंवा फिश ऑइल रोझीन सोप प्रति १० लिटर पाण्यात मिसळावी. डॉ. पंकज पाटील, ७५८८९२११९६ (संशोधन सहयोगी - क्रॉपसॅप, कृषी कीटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com