गाव आणि शेती विकासामध्ये ग्रामपंचायत हा महत्त्वाचा केंद्रबिंदू. ग्रामपंचायत सदस्यांमध्ये एकी आणि नवी दिशा देण्याची दृष्टी असेल तर निश्चितपणे ग्रामस्थांची साथ मिळतेच. असाच काहीसा अनुभव कडवंची गावामध्ये येतो.
जालना ते सिंदखेड राजा रस्त्याच्या दोन्ही बाजूला पडीक जमिनी दुष्काळी परिस्थितीची जाणीव करून देत असताना हळूहळू द्राक्ष बागा दिसू लागल्या की ओळखायचे, कडवंची शिवार सुरू झाले. मुख्य रस्त्यावर द्राक्ष विक्री स्टॉल आणि गावामध्ये शिरताना दोन्ही बाजूला द्राक्ष बाग आणि शेततळे हे दृष्य तुम्हाला मराठवाड्यातील द्राक्ष पंढरीची ओळख पटवते. हे एके काळी पाण्याची तीव्र टंचाई असलेलं गाव. परंतु प्रयोगशील शेतकरी, खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राचे मार्गदर्शन, पाणलोट समिती आणि ग्रामपंचायतीमधील कार्यक्षम सदस्यांच्या एकत्रित प्रयत्नातून शास्त्रीय पद्धतीने जल, मृद संधारणाच्या कामामुळे पावसाचे पाणी चांगल्या पद्धतीने मुरले, विहिरींचा झिरपा वाढला. सोयाबीन, कापूस, तूर पिकावर अवलंबून असणारे गाव टप्प्याटप्प्याने ठिबकच्या माध्यमातून द्राक्ष, डाळिंब, पपई, भाजीपाला लागवडीकडे वळले. संरक्षित पाण्यासाठी गावात सुमारे ५०३ शेततळी, ६०१ विहिरी आहेत. गेल्या वीस वर्षांत दरडोई उत्पन्न ३,२६४ रुपयांच्यावरून १.५० लाखांवर रुपयांवर गेले. शेतकरी गटातून प्रगती माजी सरपंच गणेश जारे आणि ग्रामपंचायत सदस्य भानूदास साळवे म्हणाले की, मनरेगाच्या माध्यमातून गाव तसेच प्रत्येकाच्या शेतापर्यंत चांगले रस्ते झाले. या रस्त्याची लांबी सुमारे ४८ किलोमीटर भरते. रस्त्यांमुळे द्राक्ष, भाजीपाला वाहतुकीला फायदा झाला, व्यापारी थेट शेतामध्ये खरेदी करत असल्यामुळे गावामध्येच अपेक्षित दर मिळतो. गावामध्ये आठ शेतकरी गट आणि २४ महिला गट कार्यरत आहे. या गटांच्या माध्यमातून पूरक उद्योगाला चालना मिळाली. यामध्ये प्रामुख्याने गाई, म्हशी, शेळीपालन, डाळ मील उद्योग, पीठ गिरणीला सुरवात झाली. खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्र तसेच खासगी कंपन्यांतील तज्ज्ञांची हंगामनिहाय पीक व्यवस्थापन चर्चासत्रे होतात. कृषी विज्ञान केंद्रामध्ये दर महिन्याच्या पाच तारखेला होणाऱ्या चर्चासत्रामध्ये गावातील शेतकरी सहभागी होतात. पशू लसीकरण शिबिराचे आयोजन होते. गावकऱ्यांना विविध व्हॉटसॲप ग्रुपच्या माध्यमातून ग्रामपंचायतीचे उपक्रम, निर्णयाची माहिती दिली जाते.
गावाकडून शेताकडे चला...
शेततळ्यात मत्स्यपालन दोन वर्षांपूर्वी ‘आत्मा’च्या माध्यमातून गावातील शंभर शेततळ्यात मासे सोडण्यासाठी सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी यांच्याकडे निधी देण्यात आला होता. कडवंची गावासाठी जिल्हांतर्गत प्रशिक्षण वर्ग मत्स्य विभागाकडून राबविण्यात आला. येत्या जुलै महिन्यात शेततळ्यामध्ये मत्स्यबीज सोडण्यात येणार आहेत. यातून नवा आर्थिक स्त्रोत मिळणार आहे.
कृषी विभागाची मोलाची साथ सातत्याने पडणाऱ्या दुष्काळाला कडवंचीने शह देण्याचे काम केले. हे घडले केवळ गावशिवारातील जल-मृद संधारण, शेततळे, तंत्र आणि यंत्रांच्या स्वीकारामुळे. यासाठी कृषी विभागाची चांगली साथ मिळाली. आजपर्यंत गावशिवारात ९५ सामूहिक शेततळी तयार झाली. आरकेव्हीवाय अंतर्गत १७८ आणि मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत १८४ शेततळ्यांची निर्मिती झाली. बावीस शेतकऱ्यांना वैयक्तीक प्लॅस्टिक अस्तरीकरणासाठी शासन योजनेतून मदत मिळाली. सुमारे ६१० हेक्टरवर ठिबक सिंचन झाले आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी नुकतीच कडवंचीला भेट देऊन शेती विकास आणि तंत्रज्ञान विस्ताराची माहिती जाणून घेतली. मंडळ कृषी अधिकारी आणि कडवंचीमधील कृषी सहाय्यक एन. बी. सौंदरे यांच्या प्रयत्नातून ‘आत्मा’ अंतर्गत सहा गट स्थापन झाले आहेत. शेती, यांत्रिकीकरणाचा विस्तार रोजगार हमीतून २५.५० हेक्टरवर फळबाग लागवड. एनएचएम अंतर्गत १२ शेडनेट उभारणी. कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत फवारणी यंत्र, पेरणी यंत्र, मळणी यंत्र, ट्रॅक्टरचलीत यंत्र, ट्रॅक्टरचलीत ब्लोअर, कपाशी उपटण्याचे श्रेडर, कडबा कुट्टी यंत्राचा पुरवठा. सेंद्रिय शेती, गांडूळ खत निर्मिती युनिट, नॅडेप खत निर्मिती योजनेस सुरवात.
येत्या काळातील नियोजन
ग्रामसभेतून विकासाला चालना ग्रामसेविका अलका धांडे म्हणाल्या की, गावामध्ये सुसज्ज ग्रामपंचायत आहे. यामध्ये सरपंच कार्यालय, संगणक कक्ष, सचिव कक्ष, तलाठी कक्ष आणि लहानसे सभागृह आहे. ग्रामपंचायतीच्या दारातील फलकावर ग्रामविकास योजना, कृषी विषयक योजनांची माहिती दिली जाते. ग्रामपंचायतीमध्ये दरमहा मासिक सभा होते. वर्षांतून चार वेळा ग्रामसभा होतात. त्यापूर्वी महिला सभा घेतली जाते. ग्रामसभेच्या माध्यमातून विविध कामांना चालना देण्यात येते.
दृष्टिक्षेपात कडवंची
चंद्रकांत क्षीरसागर (सरपंच) ९७६५७७०६०५ गणेश जारे,( माजी सरपंच) ९९२३७६६६०५ एन. बी. सौंदरे (कृषी सहाय्यक) ७४९८०८५६७४
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.