शेतकरी विकसित सीताफळ वाणांना हवे प्रोत्साहन : नवनाथ कसपटे

शेतकरी विकसित सीताफळ वाणांना हवे प्रोत्साहन
शेतकरी विकसित सीताफळ वाणांना हवे प्रोत्साहन

द्राक्ष, डाळिंब, केळी या फळांच्या तुलनेत सीताफळाकडे सरकारी यंत्रणेने हवे तेवढे लक्ष दिलेले नाही. आज द्राक्षाचे विविध वाण शेतकऱ्यांनीच निवड पद्धतीने विकसित केले आहेत. त्या वाणांपासून अनेक शेतकरी सर्वाधिक उत्पादनही घेतात. पण माझ्यासारख्या शेतकऱ्याने संशोधित केलेल्या सीताफळाच्या वाणाचा सरकारी पातळीवर विचार होणे गरजेचे आहे. - नवनाथ कसपटे ------------------------------------------

कृषी विद्यापीठाने माझ्याच नव्हे, तर माझ्यासारख्या अन्य शेतकऱ्यांच्या शेतांवर येऊन वाणांचा अभ्यास करावा. तसेच, त्याला अधिकाधिक प्रोत्साहित करावे. आज एवढ्या वर्षांत सीताफळाच्या ४२ वाणांवर मी प्रयोग केले. त्यापैकी एनएमके- १ हे वाण शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायदेशीर ठरले आहे. मात्र सरकारी यंत्रणेच्या मदतीशिवाय अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोचण्यात अडचणी येतात ही खंत आहे. सीताफळ हे मध्यम, हलक्‍या जमिनीवर येणारे फळ आहे. शिवाय, पाणी कमी लागते. खर्चही कमी येतो. उत्पादन आणि क्षेत्र यांत वाढ होण्यासाठी नवीन वाणांची आवश्‍यकता आहे. आज राज्यातील एकूण ७० हजार हेक्‍टर क्षेत्रापैकी १५ हजार हेक्‍टरवर एनएमके- १ वाणाची लागवड झाली असावी. अलीकडील वर्षांत सीताफळ लागवडीचे क्षेत्रही वाढले आहे. पूर्वी ४० हजार हेक्‍टरवर असलेले क्षेत्र आज ७० हजार हेक्‍टरवर पोचले आहे. राज्यातील मराठवाडा, विदर्भासह उत्तर महाराष्ट्र, पश्‍चिम महाराष्ट्रातील काही ठराविक भागांत सीताफळाचे क्षेत्र हमखास वाढू शकते. मृग किंवा उन्हाळी बहर त्यासाठी धरता येतो. सर्वाधिक ४० अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान असणाऱ्या ठिकाणी मृग, तर त्याखाली तापमान असणाऱ्या भागात उन्हाळी बहर फायदेशीर ठरतो. जुन्या वाणांची एकरी उत्पादकता चार टन होती. नव्या वाणाची हीच उत्पादकता ८ ते १२ टनांपर्यंत पोचली आहे. खते आणि कीडनाशकांवर अन्य फळांच्या तुलनेत खर्च कमी येतो. झाडाला फांद्यांची संख्या जेवढी वाढेल तेवढ्या प्रमाणात फळे लागतील. पण त्याची गुणवत्ता राहत नाही. त्यासाठी छाटणी करून काडी संख्या मर्यादित करणे आवश्‍यक आहे. नवीन झाडांचीही हलकी छाटणी केली पाहिजे, तरच गुणवत्ता वाढणार आहे.   प्रक्रिया उद्योगातील अडचणी प्रक्रियेमध्ये सीताफळाचा पल्प काढला जातो; ज्यूस, रबडी, आइस्क्रीमसाठी वापर होतो. सर्व फळांमध्ये सर्वाधिक महाग पल्प सीताफळाचाच आहे. त्यामुळे प्रक्रिया हा मोठा उद्योग होऊ शकतो. मात्र गुंतवणुकीचा विचार करता ते फार जिकिरीचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळणे आवश्‍यक आहे. पूर्णवेळ वीज, शीतगृहासारख्या सुविधा पुरवल्या पाहिजेत.

सीताफळाचे वैशिष्ट्य सीताफळामध्ये सर्वाधिक गर खाल्ला जातो. सीताफळ जितके चविष्ट, तितके ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे. सीताफळ हे पित्तशामक, वातदोष कमी करणारे व रक्तवर्धक आहे. देशी सीताफळाच्या तुलनेत निवड पद्धतीने विकसित झालेले सीताफळ आकार, वजन, चव आणि गराच्या बाबतीत चांगले आहे. त्याची टिकवणक्षमताही चांगली आहे. फळाचे किमान पावकिलोपासून एक किलोपर्यंत वजन मिळते. साहजिकच, ग्राहकांसह शेतकऱ्यांनाही ते परवडू     शकते.

मुंबई, दिल्ली, गुजरातसह आखातचे मार्केट सीताफळाला स्थानिक भागात मार्केट मिळतेच. देशातंर्गत मुंबई, दिल्ली, कोलकत्ता आणि गुजरातमधील सुरत, अहमदबाद येथे सीताफळाचा मोठा व्यवहार होतो. महाराष्ट्रात मुंबई हे उत्तम मार्केट आहे. सध्या आखाती देशात सीताफळाची निर्यात होते. पण, एमआरएलमधील काही त्रुटीमुळे युरोपीय देशात सीताफळाची निर्यात होऊ शकत नाही. युरोपीय देशात सीताफळाला मोठे मार्केट मिळू शकते. त्यासाठी संघटनेद्वारे आमचा पाठपुरावा सुरू असला तरी शासनाने यात लक्ष घातले पाहिजे. ‍  

‘एनएमके-१’ ला मान्यतेसाठी प्रयत्न मी स्वतः निवड पद्धतीने विकसित केलेल्या एनएमके-१ या वाणाला कृषी विद्यापीठाची मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याशिवाय या वाणासाठी स्वामित्व हक्कासाठीची (पेटंट) प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.

सीताफळ पिकाविषयी अपेक्षा ः

  • विमा संरक्षण मिळावे
  • लागवडीसाठी बॅंकांकडून कर्ज मिळावे
  • शेतकऱ्यांच्या वाणांस परवानगी द्यावी
  • प्रक्रिया उद्योगासाठी प्रोत्साहन द्यावे.
  • - नवनाथ कसपटे अध्यक्ष, अखिल भारतीय सीताफळ उत्पादक संघ   (शब्दांकन : सुदर्शन सुतार )  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com