कांदा पिकावरील किडीचे नियंत्रण

कांदा पिकावरील किडीचे नियंत्रण
कांदा पिकावरील किडीचे नियंत्रण

सध्या थंडीचा कडाका चांगलाच वाढलेला आहे. या काळात कांदा व लसूण पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी खालील उपाययोजना कराव्यात. फुलकिडे : शा. नाव ः थ्रिप्स टॅबासी

  • कांदा पिकाचे नुकसान करणारी प्रमुख कीड असून, केलेल्या जखमांमधून काळा करपा, जांभळा करपा किंवा तपकिरी करपा या रोगांच्या बुरशीस पानात सहज शिरकाव करतात. परिणामी फुलकिड्यांमुळे कांद्याचे उत्पादन ३० ते ४० टक्के घटू शकते.
  • पिल्ले व प्रौढ कीटक पानाचा रस शोषतात. परिणामी पानांवर पांढुरके ठिपके पडतात. असंख्य ठिपके जोडले गेल्यामुळे पाने वाकडी होतात आणि वाळतात.
  • पिकाच्या कुठल्याही अवस्थेत ही कीड येते.
  • या किडींच्या तीव्र प्रादुर्भावामध्ये पाने वाळल्यामुळे कांदे पोसत नाही.
  • कांदा तयार होत असताना या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास माना जाड होतात. कांदा साठवणीत टिकत नाही.
  • व्यवस्थापन : फवारणी प्रतिलिटर पाणी

  • प्रोफेनोफॉस १ मिलि, किंवा कार्बोसल्फान १ मिलि किंवा फिप्रोनिल १ मिलि
  • पुढील फवारणी १२ ते १५ दिवसांच्या अंतराने कीटकनाशक बदलून करावी.
  • परिणामकारकता वाढवण्यासाठी त्यांत चिकटद्रव्यांचा वापर करावा.
  • बीजोत्पादनासाठी लावलेल्या कांद्याच्या रोपांमध्ये फुले उमलल्यानंतर कीटकनाशक फवारू नये.
  • कंद किंवा खोड कुरतडणारी अळी : ही अळी राखाडी रंगाची असून ३५ मिमी लांब असते. या किडीच्या अळ्या कांद्याचा जमिनीखालचा भाग कुरतडतात. रोप पिवळे पडते. हलक्या जमिनीत या किडीचा उपद्रव मोठ्या प्रमाणात होतो. व्यवस्थापन : क्लोरपायरीफॉस दाणेदार १० ते १५  किलो प्रति हेक्टर या प्रमाणात वाफ्यात घालावे. लाल कोळी : कांदा पिकावर येणारी महत्वाची कीड असून, प्रादुर्भावामुळे कांद्याची रोपे पूर्णपणे वाकडी होतात. पाने व्यवस्थितपणे उघडत नाहीत. बहुतेक पानांच्या कडांवर छोटे पिवळे चट्टे दिसून येतात. व्यवस्थापन : प्रादुर्भाव झाल्याचे आढळून येताच, फवारणी प्रतिलिटर पाणी डायकोफॉल २ मिली किंवा गंधक २ ग्रॅम. एकात्मिक पीक संरक्षण रोग पसरवणाऱ्या बुरशी, जिवाणू, विषाणू , कृमी आणि किटकांचे अस्तित्व सर्वत्र आणि विविध अवस्थेत निसर्गात असते. पोषक हवामान मिळताच त्यांची तीव्रता वाढते. केवळ किडनाशकांच्या वापरातून नियंत्रण चांगल्या प्रकारे मिळू शकत नाही. त्यामुळे एकात्मिक रोग व कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करावा. १. हंगामानुसार एखाद्या भागात लागवड एकाच आठवड्यात पूर्ण करावी. दोन हंगामामध्ये बराच काळ अंतर राखून रोगकारक घटकांचा किंवा किडींचा जीवनक्रम तोडता येईल. २. प्रमाणित बियाणे वापरावे. तसेच बीजप्रक्रिया अवश्य करावी. ३. पिकाची फेरपालट करावी. ४. पाण्याचा चांगला निचरा न होणाऱ्या जमिनीत कांदा लागवड करू नये. ५. रोपे नेहमी गादीवाफ्यांवर लावावीत. ६. फवारणी करताना द्रावणामध्ये प्रति लिटर पाण्यात ०.६ मिली चिकट द्रवाचा उपयोग करावा. ७. किडी व रोग यांच्या नियंत्रणाकरिता एकमेंकांना पुरक अशा रसायनांची एकत्रित फवारणी करावी. ८. एकच कीडनाशक सतत वापरू नये. किडींची प्रतिकार शक्ती वाढते. ते टाळण्यासाठी वेगवेगळी कीडनाशके आलटून-पालटून वापरावीत. ९. बीजोत्पादनासाठी लावलेल्या कांद्याच्या रोपांमध्ये फुले उमलल्यानंतर बुरशीनाशक किंवा कीटकनाशक फवारू नये. संपर्क ः डॉ. शैलेंद्र गाडगे, ०२१३५-२२२०२६ राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर, जि. पुणे.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com