कोरडवाहू क्षेत्रातील रब्बी हंगामाची पूर्वतयारी

कोरडवाहू क्षेत्रातील रब्बी हंगामाची पूर्वतयारी
कोरडवाहू क्षेत्रातील रब्बी हंगामाची पूर्वतयारी

रब्बी हंगामाच्या यशस्वितेसाठी कोरडवाहू क्षेत्रामध्ये जमिनीतील ओलावा टिकून राहणे महत्त्वाचे आहे. जास्तीत जास्त पाणी मुरण्याच्या अनुषंगाने मशागत व जमिनीची बांधबंदिस्ती करावी. त्याचप्रमाणे हंगामाच्या सुरवातील विविध निविष्ठा खरेदी करताना योग्य काळजी घ्यावी. कोरडवाहू क्षेत्रातील रब्बी हंगामाचा कालावधी सप्टेंबर ते फेब्रुवारीपर्यंत असतो. या काळातील कोरडवाहू भागातील मशागतीच्या कामामध्ये मृद व जलसंधारण करण्याच्या दृष्टीने बदल केले पाहिजेत.

  • कोरडवाहू क्षेत्रामध्ये पावसाची एकंदर परिस्थिती प्रामुख्याने अत्यंत कमी, लहरी आणि बेभरवशाची असते. परिणामी पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरवणे आवश्यक आहे. या जमिनीत मुरलेल्या पावसावरच रब्बी पिकांचे उत्पादन अवलंबून असते. अगदी खरीप हंगामातही पडणारा पाऊस जमिनीत मुरविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
  • परतीच्या पावसाची तीव्रता जास्त असल्यास आणि जमीन उताराच्या असल्यास पाणी वेगाने वाहून जाते. जमिनीत कमी पाणी मुरते अशा उथळ व मध्यम खोल जमिनीत ढाळीचे बांध टाकावेत किंवा पावसाळ्यापूर्वी किंवा लहान सारे पाडून जमिनीची बांधणी करावी. यामुळे वाहणारे पाणी ठिकठिकाणी थोपविले, मुरण्याची क्रिया दीर्घकाळ सुरू राहते.
  • बांधबदिस्ती केलेल्या क्षेत्रात, नांगरणी, कुळवणी, पेरणी, कोळपणी यासारखी मशागतीची कामे जमिनीच्या उतारास आडवी करावीत.
  • नांगरणीमुळे जमीन भुसभुशीत होऊन, जास्त ओलावा साठविण्यास मदत होते.
  • कुळवणी केल्यामुळे तणांचा नाश होतो. तणे पिकापेक्षा जास्त ओलावा शोषून घेतात. अशा पाण्यासाठी पिकांसोबत स्पर्धा करणाऱ्या तणांचा बंदोबस्त केल्यास पिकास अधिक ओलावा मिळतो.
  • निविष्ठांची खरेदी घ्यावयाची काळजी - १) बी-बियाणे ः

  • बियाण्यांच्या पिशवीवर उत्पादकाचे नाव, प्रमाणित असल्याची नाेंद, वजन, किंमत इ. माहिती असते. ती पडताळून पाहा.
  • बियाणे पेरणीपूर्वी पिशवी वरून न फाडता डाव्या किंवा उजव्या बाजूने, थोडी फाडावी. प्रमाणपत्र नोंद असलेले लेबल पिशवीला तसेच कायम ठेवा.
  • पिशवीत बियाण्याचे २०-२५ दाणे पीक निघेपर्यत जपून ठेवा. बियाण्याची उगवण न झाल्यास त्याची तक्रार अधिकाऱ्याकडे करताना पुरावा म्हणून उपयोगी पडेल.
  • पिशवीवरील नमूद दरापेक्षा अधिक दर देऊ नये. जास्त रक्कम घेतल्यास कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडे तक्रार करा.
  • बियाणे खरेदीचे पक्के बिल घ्यावे. बिलावर दुकानाचे नाव, खरेदीदाराचे नाव, बियाण्याचे नाव, लाॅट नंबर इत्यादी मजकूर व दुकानदाराची सही, तारीख, किंमत पावतीवर नमूद असावी. बिलाचा आग्रह धरा. मिळालेले बील जपून ठेवा.
  • बियाण्याच्या पिशवीवर प्रमाणीकरणाचे निळे टॅग शिवलेले असावे. सत्यतादर्शक पिवळे लेबल लावलेले असावे. टॅगवर, बियाणे, जातीचे नाव, बी परीक्षण तारीख, उगवणशक्ती, वजन नमूद असावे.
  • २) खते ः

  • खताचे नाव, प्रकार तपासून पाहा.
  • खताची गोणी मशिनने शिवलेली असावी.
  • खत खरेदी करताना पक्के बिल घ्यावे. त्यावर दुकानदाराचे नाव, खरेदीदाराचे नाव, खताचा प्रकार, किंमत, तारीख, वजन नमूद असावे. खताचे बील व बियाणे गोणी पीक निघेपर्यंत जपून ठेवावे.
  • खताच्या गोणीवरील वजन, नमूद वजनापेक्षा पोते हलके असल्यास कृषी अधिकारी, पंचायत समिती, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद व वजन मापे निरीक्षक यांच्याकडे तक्रार करा.
  • ३) कीटकनाशके, बुरशीनाशके, संजीवके ः

  • डबा, बाटली, पाकीट, व्यवस्थित असावे. त्यावर उत्पादकाचे नाव, बॅच नंबर, प्रमाण, घटक, निर्मिती तारीख, वापराची अंतिम तारीख इ. माहिती छापलेली असावी.
  • मुदत संपलेली किटकनाशके खरेदी करू नये.
  • खरेदीची पावती घ्यावी. पावतीवर दुकानदाराचे नाव, कीटकनाशकाचे नाव, बॅच नंबर, निर्मिती तारीख, अंतिम तारीख, वजन इत्यादी माहिती लिहून घ्यावी. बिलावर खरेदीदाराचे नाव, तारीख लिहून त्यावर सही करा.
  • बिल व कीटकनाशकाची रिकामी बाटली, डबा, पॅकेट, पीक निघेपर्यंत जपून ठेवा. शक्य असल्यास त्यात थोडेसे कीटकनाशक शिल्लक ठेवा.
  • काही तक्रार असल्यास आपला तक्रार अर्ज कृषी अधिकारी, पंचायत समिती व कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडे करावा.
  • रब्बी पिक लागवड सल्ला

    हरभरा

  • जमीन - मध्यम ते भारी काळी कसदार व चांगल्या निचऱ्याची जमीन निवडावी. हलकी अथवा भरड, पाणथळ, चोपण किंवा क्षारयुक्त जमीन हरभरा लागवडीसाठी निवडू नये.
  • हवामान - कोरडी व थंड हवा चांगली मानवते.
  • पेरणी - कोरडवाहू क्षेत्रात सिंचनाची सोय अजिबात नसल्यास हस्त नक्षत्राच्या पहिल्या चरणानंतर म्हणजे २५ सप्टेबरनंतर जमिनीतील ओल कमी होण्यापूर्वी पेरणी करावी. यासाठी प्रामुख्याने विजय आणि दिग्विजय हे वाण वापरावेत. बागायती हरभरा २० आॅक्टोबर ते १० नोव्हेंबर या दरम्यान पेरल्यास चांगले उत्पादन येते. हरभऱ्याची पेरणी ३० x १० सें. मी. अंतरावर करावी. पेरणीकरिता विजय वाणांचे ६५ ते ७० किलो तर दिग्विजय या वाणाचे १०० किलो प्रति हेक्टरी बियाणे पुरेसे होते.
  • बीजप्रक्रिया - पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास २ ग्रॅम थायरम किंवा २ ग्रॅम कार्बेन्डाझीम किंवा ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा याची प्रक्रिया करावी. यानंतर २५ ग्रॅम रायझोबियम प्रति किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणामध्ये मिसळून चोळावे. असे बियाणे तासभर सावलीत वाळवून पेरणी करावी. बीजप्रक्रियेमुळे बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण होते. मुळावरील नत्राच्या ग्रंथी वाढतात. पिकाची वाढ चांगली होते.
  • खत व्यवस्थापन - पेरणीपूर्वी कुळवाच्या शेवटच्या पाळीत हेक्टरी एक गोणी युरिया व सहा गोण्या सिंगल सुपर फाॅस्फेट द्यावे. अथवा अडीच गोणी डीएपी प्रति हेक्टरी पेरणीच्या वेळी दोन चाड्याच्याय पाभरीने द्यावे.
  • पीक फुलोऱ्यात असताना आणि घाटे भरण्याच्या अवस्थेत २ टक्के युरियाची (२० ग्रॅम प्रति लिटर पाणी) फवारणी करावी. पेरणीनंतर ३० व ४५ दिवसांनी १ टक्का पोटॅशिअम नायट्रेट व २ टक्के डी. ए. पी. ची स्वतंत्ररित्या फवारणी करण्याची केल्यास हरभरा उत्पादनात वाढ होते.
  • सूर्यफूल

  • जाती - कोरडवाहू स्थितीत पेरणीसाठी भानू व फुले भास्कर या वाणांची निवड करवी.
  • पेरणी - हलक्या ते मध्यम जमिनीत सें. मी. तर भारी जमिनीत ६० x ३० सें. मी. अंतरावर पेरणी करावी. पेरणीकरिता १० ते १२ किलो बियाणे पुरेसे होते. पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी. म्हणजे बी आणि खत एकाच वेळी पेरता येते. बियाणे ५ सें. मी. पेक्षा जास्त खोल पेरू नये.
  • बीजप्रक्रिया - पेरणीपूर्वी बियाण्यास २.५ ग्रॅम थायरम  प्रति किलो बियाण्यास चोळावे. त्यानंतर अॅझोटोबॅक्टर व पी. एस. बी हे जैविक खत २५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास पेरणीपूर्वी लावावे.
  • खत व्यवस्थापन - कोरडवाहू पिकास हेक्टरी २.५ टन शेणखत द्यावे. तसेच पेरणी करते वेळी दोन गोण्या युरिया, तीन गोण्या सिंगल सुपर फाॅस्फेट व एक गोणी म्युरेट आॅफ पोटॅश द्यावे. गंधकाची कमतरता असलेल्या जमिनीसाठी सल्फेट आॅफ पोटॅश वापरावे. हेक्टरी २० किलो गंधक शेणखतात मिसळून द्यावे.
  • डाॅ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९ (प्रभारी अधिकारी, मध्यवर्ती रोपवाटिका (बियाणे), महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com