कापसाच्या फरदडीत गुलाबी बोंड अळीचा धोका

कापसाच्या फरदडीत गुलाबी बोंड अळीचा धोका
कापसाच्या फरदडीत गुलाबी बोंड अळीचा धोका

चालू हंगामात सुरवातीच्या काळात कपाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाचे प्रमाण कमी करणे शक्य झाले. परंतु काही तुरळक शेतकऱ्यांनी जरी कापसाची फरदड घेतली तर अळीचे जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी खाद्य व वाढीव कालावधी मिळेल. त्यामुळे पुढील हंगामात कपाशीवर गुलाबी बोंड अळीचे प्रमाण वाढून नुकसान होऊ शकते.

चालू हंगामात जुलै महिन्‍याच्या अखेरच्या आठवड्यात व ऑगस्ट महिन्‍यात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात आढळून आला. परंतु, या अळीच्या व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांनी व्यापक प्रमाणात एकत्मिक कीड व्यवस्थापनाचे उपाय अवलंबिल्यामुळे सप्टेंबर महिन्यापासून गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात आढळून आला नाही. त्याचा परीणाम म्हणून पहिल्या वेचणीमध्ये कापसाची प्रत चांगली मिळाली. परंतु, चालू वर्षात खरिपातील पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे कोरडवाहू पिकाच्या उताऱ्यामध्ये घट झाल्याचे दिसून येते. राज्यामध्ये कापूस पिकाची लागवड चालू हंगामात ४२.५३ लाख हेक्टर क्षेत्रावर झाली. कापूस पिकाखालील एकूण क्षेत्रापैकी जवळपास ८५ ते ९० टक्के क्षेत्र कोरडवाहू लागवडीमध्ये येते. उर्वरित बागायती क्षेत्र आणि ज्या भागात एखादे सिंचन देण्याची उपलब्धता असल्यास अशा भागामध्ये कापूस पिकाची फरदड घेण्यात येते.

फरदड कापूस कापसाच्या वेचण्या झाल्यानंतर सिंचन उपलब्ध असलेल्या जमिनीमध्ये पाणी देऊन पुन:श्च कापूस पीक घेतले जाते. अशा वेळी पिकापासून जोमदार उत्पन्न मिळण्यासाठी पाणी, खते, कीटकनाशके यांचा वापर करून कापूस पीक मार्च महिन्यानंतरही घेतले जाते.

फरदड का घेतली जाते? कापसाची फरदड न घेतल्यास खरिपातील कापूस पिकाची वेचणी झाल्यानंतर पुढील रब्‍बी पश्चात हंगामामध्ये नवीन पीक घेण्यापूर्वी जमिनीची मशागत करून दुसऱ्या पिकाची पेरणी करावी लागते. त्यासाठी जमिनीच्या माशागतीवरील खर्च, पेरणीचा खर्च आणि पुढील पिकाच्या बियाण्याची किंमत या बाबींवरील एकूण खर्च टाळला जातो. त्यामुळे बचत करून हंगामामध्ये लागवड झालेल्या कापूस पिकापासूनच फरदड कापसाचे वाढीव उत्पादन मिळते. त्यामुळे प्रतिएकर क्षेत्रापासून कापूस पिकाची मिळणारी उत्पादकता वाढते. थोडक्यात उत्पादन खर्चामध्ये विशेष वाढ न करता अधिक उत्पादन मिळविता येते. यामुळे शेतकरी कपाशीची फरदड घेण्यासाठी इच्छुक असतात.

फरदडीतील जोखीम

  • फरदड कपाशीमध्ये लागणाऱ्या बोंडाचे पोषण सुयोग्य न झाल्यामुळे धाग्यांची लांबी कमी होते. त्याचप्रमाणे धाग्याची मजबुती आणि रुईचा उतारा घटतो. कापसाची प्रत घटते. त्यामुळे कापसाला बाजारभाव कमी मिळतो.
  • कीड व रोगांचा प्रदुर्भाव वाढण्याची शक्यता असते.
  • पिकावर येणाऱ्या अळ्यांना हंगामानंतर आयतेच खाद्य उपलब्ध झाल्यामुळे गुलाबीआणि हिरवी बोंड अळी यांच्या पुढील पिढ्यांना खाद्य उपलब्ध होते. पुढील हंगामात त्यांचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते.
  • कापूस पिकाचा कालावधी जसा – जसा वाढतो त्याप्रमाणे त्यामधील बीटी प्रथिनाचे प्रमाण कमी होत जाते. बोंड अळ्यांच्या प्रभावी नियंत्रणासाठी आवश्यक किमान पातळीपेक्षा प्रथिनाचे प्रमाण कमी झाल्यास बोंड अळ्यांमध्ये बीटी प्रथिनाविरुद्ध प्रतिकारक्षमता निर्माण होण्याची शक्यता असते.
  • सिंचनाची आवश्यकता असते.
  • खरीप हंगामातील पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्यावर निओनिकोटीनाईडस् वर्गातील कीटकनाशकांचा वापर करण्यात येतो. फरदड पिकावर चीकटा (मावा) च्या व्यवस्थापनासाठी या कीटकनाशकांचा पुन:पुन्हा वापर करण्यात येतो. त्यामुळे या वर्गातील कीटकनाशकांची परिणामकारकता कमी होत आहे.
  • खरीप हंगामामध्ये कापूस पिकावर पिठ्या ढेकुण या किडीचा प्रादुर्भाव झाला असल्यास त्याचा फरदड कपाशीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसार होऊन उत्पादनामध्ये घट होते.
  • पांढरी माशी या किडीचा प्रादुर्भाव कापूस हंगामाच्या शेवटी (ऑक्टोबर महिन्‍यात) होतो. या परीस्थितीमध्ये कापसाची फरदड घेतल्यास पांढरी माशी किडीचे प्रमाण वाढून पुढील हंगामामध्ये या किडीचा प्रादुर्भाव लवकर होण्याची शक्यता असते.
  • जमिनीमध्ये फ्युजारियम या बुरशीमुळे होणारी मर, व्हर्टीसिलीयम मूळ सडणे इ. मृदाजन्य रोगकारक बुरशींचा प्रसार होऊ शकतो.
  • फरदड कापूस पीक शेताबाहेर काढण्याच्या वेळी माती कडक झालेली असते. त्यामुळे झाडे उपटून काढण्यासाठी अधिक प्रमाणात मजूर, वेळ, श्रम आणि पैसा खर्च होतो.
  • बी टी कापसाची फरदड घेतल्यास बोंड अळ्यांमध्ये बीटी प्रथिनाविरुद्ध प्रतिकारशक्ती तयार होऊ शकते. वास्तविकत: गुलाबी बोंड अळ्यांमध्ये बीटी प्रथिनाविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे. त्याबरोबरच अन्य बोंड अळ्यांमध्ये प्रतिकारशक्ती तयार होऊ शकते.
  • गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव

  •  दीर्घ कालावधीच्या पिकावर गुलाबी बोंड अळीच्या जास्त पिढ्या पूर्ण होत असल्यामुळे या अळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो. त्यामुळे गुलाबी बोंड अळीच्या वाढीसाठी सतत पोषक वातावरण निर्माण होते.
  •  नोव्हेंबर महिन्‍यानंतर पाणी देऊन एप्रिल-मे पर्यंत ठेवल्यामुळे कपाशीचे पीक शेतामध्ये जवळपास वर्षभर राहते. हंगामानंतर कपाशीला चांगला भाव येत असल्यामुळे शेतकरी पीक उशिरापर्यंत ठेवण्याचा मानसिकतेमध्ये असतात.
  •  गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव मुख्यत: हिवाळ्यात ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी ते नोव्हेंबरमध्ये होतो. हा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी गुलाबी बोंड अळी डिसेंबर महिन्‍यात कोष अवस्थेत कपाशीच्या पऱ्हाटया किंवा वाळलेल्या नख्यांमध्ये निद्रावस्थेत जाते.
  •  नोव्हेंबरनंतर पीक ठेवल्याने गुलाबी बोंड अळीच्या वाढीसाठी कपाशीची बोंडे सतत उपलब्ध होत असल्याने तिच्या वाढीच्या अवस्थेस आणखी चालना मिळत असल्याने बी टी जनुकाविषयी प्रतिकाराकता निर्माण झाली आहे.
  •  प्रदीर्घ काळापर्यंत कच्च्या कपाशीची जिनिंगमध्ये आणि व्यापारी संकुलात साठवण केल्याने गुलाबी बोंड अळी आगामी हंगामात येण्यासाठी पोषक वातावरण तयार होते.
  •  ः डॉ. खिजर बेग, ७३०४१२७८१०  ः अरविंद पांडागळे, ७५८८५८१७१३ (डॉ. बेग कापूस संशोधन केंद्र, नांदेड येथे कापूस विशेषज्ज्ञ तर पांडागळे कृषी विद्यावेता आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com