द्राक्षबागेतील समस्यांवरील उपाययोजना

द्राक्षबागेतील समस्यांवरील उपाययोजना
द्राक्षबागेतील समस्यांवरील उपाययोजना

सध्या द्राक्षबागेतील वेली या वाढीच्या विविध अवस्थेमध्ये आहेत. काही भागामध्ये आगाप छाटणी केल्यामुळे मण्यात पाणी उतरण्याच्या स्थितीही दिसून येत आहे. तर उशिरा छाटणी झालेली असल्यास आता डोळे फुटण्याची अवस्था असेल किंवा प्रीब्ल्यूम अवस्थेतील द्राक्षघड आढळून येईल. अशा वेगवेगळ्या बागामधील सध्या दिसून येणाऱ्या अडचणी आणि उपाययोजनांचा माहिती घेऊ. कलम केलेली द्राक्षबाग ः या बागेमध्ये उशिरा कलम झाले असल्यास आता डोळे फुटायला उशीर होत आहे. काही परिस्थितीत कलम केल्यानंतर डोळे फुटत नसल्याची समस्या दिसून येत आहे. वास्तविक कलम केल्यानंतर १२ ते १५ दिवसांमध्ये डोळे फुटतात. याकरिता कल यशस्वी करण्यासाठी सायन काडीची परिपक्वता, बागेतील तापमान आणि आर्द्रता या गोष्टी महत्त्वाच्या असतात. ज्या बागेत कलम उशिरा केले त्या वेळी ही स्थिती उपलब्ध होती. मात्र त्यानंतर लवकरच वातावरणातील तापमानामध्ये अचानक घट झाली. म्हणजेच कलम डोळा फुटण्यासाठी आवश्यक तेवढे तापमान आणि आर्द्रता नसल्यामुळे कलम डोळा फुगणे व फुटून बाहेर येण्याच्या प्रक्रियेला उशीर होत आहे. अशावेळी बागायतदार गोंधळून वाढरोधकाचे पेस्टिंग करतो. कलम केल्यानंतर फूट हळूहळू स्वबळावर निघाल्यास त्याचा पुढे फायदा होतो. त्यासाठी आवश्यक वातावरण तयार करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी,

  • बागेमध्ये बोदावर जास्त प्रमाणात पाणी द्यावे.
  • कलम काडीवर दिवसातून दोनवेळा पाण्याची फवारणी करावी. या दोन्ही उपाययोजनांमुळे कलम केलेल्या डोळ्याभोवतीची आर्द्रता वाढेल. बाग फुटण्यास मदत होईल.
  • त्यासोबत जमिनीतून युरिया ३ ते ४ किलो प्रतिएकरी द्यावा.
  • बोदावरील वाढलेले गवत ः बऱ्याच बागेमध्ये कलम फुटलेल्या नवीन फुटीवर डाऊनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव दिसून येतो. ज्या ठिकाणी बोदावर गवत वाढलेले आहे, अशा ठिकाणी डाऊनीचा जास्त प्रादुर्भाव दिसून येईल. कलम काडीभोवती गवत जास्त उंच वाढल्यामुळे आर्द्रतेचे प्रमाण वाढलेले असते. तसेच दाटीमुळे तापमानही कमी झालेले असेल. याचसोबत बागेत सकाळी दव पडत असल्यास ही परिस्थिती रोगाच्या प्रादुर्भावास अनुकूल ठरते. बागेतील डाऊनी मिल्ड्यू नियंत्रणात ठेवता न आल्यास, तो काडीमध्ये प्रवेश करेल. त्यामुळे पुन्हा कलम करणे भाग पडू शकते. त्यासाठी खालील उपाययोजना कराव्यात.

    1. बोदावरील गवत काढून घ्यावे.
    2. कलम यशस्वी झालेल्या सर्वच फुटी बांबूस न बांधता फक्त एकच फूट बांधावी. इतर फुटी ३ ते ४ पानांवर खुडून घ्याव्यात.
    3. कलम जोडाच्या पुढे ३ -४ पाने काढून टाकावीत, यामुळे मोकळी हवा खेळती राहील. रोगाचा प्रादुर्भाव कमी होईल.

    जुनी बाग अ) डोळे मागेपुढे फुटणे - ज्या बागेत उशिरा छाटणी झाली आहे, अशा बागेत आता डोळे फुटत आहे. मात्र, अनेक ठिकाणी डोळे मागेपुढे फुटत असल्याचे दिसून येते. बागेमध्ये डोळे एकसारखे फुटण्यासाठी खालील गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

  • काडीची जाडी एकसारखी असावी.
  • काडीवरील पानगळ पूर्ण झालेली असावी.
  • फळछाटणी होतेवेळी काडीवरील सर्व डोळे फुगलेले असावेत.
  • याकरिता बागेतील कॅनोपी व्यवस्थापन (खरड छाटणीनंतर) महत्त्वाचे असते. डोळे फुटण्यारिता बागेतील पानगळ पूर्णपणे होणे गरजेचे असते. पूर्ण पानगळ होऊनही डोळे फुगलेले नसतील, अशा बागेत मागेपुढे डोळे फुटण्याची समस्या दिसून येते. त्यासाठी खालील उपाययोजना कराव्यात.

    1. वेलीवर पाण्याची फवारणी करावी.
    2. जमिनीतून नत्राचा पुरवठा करावा. साधारणतः १ किलो युरिया किंवा अमोनिअम सल्फेट प्रति एकर तीन ते चार दिवस पुरेसे होईल.

    ब) दोडा अवस्थेत गळ होणे - प्रीब्लुम अवस्थेतील बागांमध्ये गळ होण्याची समस्या दिसून येते आहे. दोडा अवस्थेतील गळसाठी खालील परिस्थिती जबाबदार असू शकते.

    1. दाट कॅनोपी - वेलीवर नवीन निघालेल्या फुटींची संख्या जास्त असणे.
    2. कॅनोपीमध्ये दमट वातावरण तयार होणे. यामुळे द्राक्षघडास श्वासोच्छवास करणे कठीण जाते.
    3. बागेत पाऊस झाला असल्यास हवेत वाढलेले नायट्रेट स्वरूपातील नायट्रोजनचे प्रमाण.
    4. बागेमध्ये पाणी जास्त झालेले असल्यास शेंडा जोरात चालतो. यामुळे वेलीमध्ये सायटोकायनीनची पातळी कमी होते.
    5. वातावरणातील सध्या होत असलेले बदल. उदा. तापमान जास्त होणे.
    6. बागेत कमी पाण्याची उपलब्धता होणे.

    उपाययोजना -

    1. कॅनोपी मोकळी करणे - बगलफुटी काढून घ्याव्यात.
    2. घडाच्या मागेपुढे एक-दोन पाने काढावीत.
    3. बागेमध्ये पाणी वाफसा स्थितीपर्यंतच द्यावे.
    4. सायटोकायनीनयुक्त संजीवकांची शिफारशीप्रमाणे फवारणी करावी.
    5. पोटॅशची फवारणी करावी.

    डॉ. आर. जी. सोमकुंवर, ०२० -२६९५६०६० (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी जि. पुणे.)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com