प्रतिबंधात्मक पीक संरक्षणातून निर्यातक्षम केळी उत्पादन

प्रतिबंधात्मक पीक संरक्षणातून निर्यातक्षम केळी उत्पादन
प्रतिबंधात्मक पीक संरक्षणातून निर्यातक्षम केळी उत्पादन

जळगाव जिल्ह्यातील तापी नदीच्या काठावरील नायगाव (ता. मुक्ताईनगर) येथील शेतकरी ऋषीकेश अशोक महाजन हे आपल्या केळी बागेत कीड व रोग नियंत्रण व्यवस्थापनाबरोबर सिंचन, खते यांचे काटेकोर नियोजन करतात. त्यातून निर्यातक्षम केळीचे उत्पादन ते घेत आहेत. ऋषीकेश यांची शेतजमीन मध्यम प्रकारची आहे. दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात केळीच्या उतिसंवर्धित रोपांची लागवड करतात. सिंचनासाठी तापी नदीवरून जलवाहिनी टाकून घेतली आहे. १०० टक्के केळीला सुक्ष्मसिंचनाची सुविधा आहे.

  • हुमणी नियंत्रण ः लागवडीनंतर महिनाभरात हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. तिच्या नियंत्रणासाठी पंधरा दिवसांच्या अंतराने दोन वेळा ड्रेचिंग केली जाते. प्रथम ड्रेचिंगमध्ये रासायनिक कीडनाशकांचा, तर दुसऱ्या वेळी मेटारायझीम या बुरशीजन्य कीडनाशकाचा वापर केला जातो. हुमणीचे नियंत्रण सुरवातीलाच करण्याला प्राधान्य देतो. कारण, तिचा प्रकोप वाढल्यास रोपे उपटून फेकण्याशिवाय पर्याय राहत नाही. प्रकोप अधिक असला तर आठ दिवसांनंतर ड्रेचिंग केली जाते.
  • पाने खाणारी अळी ः केळीमध्ये लागवडीनंतर पहिले दोन महिने कोवळी पाने असतात. या काळात पाने खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव वाढतो. या भागामध्ये साधारणतः लागवडीनंतर दोन महिन्यांनी अळ्याचा प्रादुर्भाव होतो, असे निरीक्षण ऋषीकेश यांनी नोंदवले. त्याच्या नियंत्रणासाठी शिफारशीत कीडनाशकांचा वापर केला जातो. सोबत रोगाच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक म्हणून बुरशीनाशकाचाही वापर केला जातो. दहा दिवसांनंतर पुन्हा एकदा अशी फवारणी घेतली जाते.
  • काही झाडांवर इरविनिया रॉट हा रोगही लागवडीनंतर दोन - अडीच महिन्यांनी दिसून येतो. यामुळे झाडांचे पोगे सडतात. काळे - पिवळे पडून झाडाचे १०० टक्के नुकसान होते. बागेतील तीन ते चार टक्के झाडे या रोगाने बाधीत होतात. त्याला रोखण्यासाठी बुरशीनाशकांची फवारणी घेतली जाते.
  • फवारणीचा शेवटचा टप्पा हा करपा नियंत्रणासाठी असतो. लागवडीनंतर अडीच ते तीन महिन्यांनी म्हणजेच ऑगस्टअखेर करपासंबंधी प्रतिबंधात्मक फवारणीचे नियोजन केले जाते. केळीची चांगली निसवण सुरू होईपर्यंत करपासाठी फवारण्या घेतल्या जातात. त्यात शिफारशीप्रमाणे कार्बेन्डाझीम, मॅन्कोझेब व अन्य बुरशीनाशकांचा आलटून पालटून वापर केला जातो.
  • या काळात वाफसा कायम राहील, एवढेच सिंचन केले जाते. हिवाळ्यात सिंचनासंबंधी अधिक काळजी घ्यावी लागते. बागेमध्ये अधिक पाणी झाल्यास करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो.
  • या काळात प्रतिदिन एक तास बागेचे सिंचन पुरेसे होते. सिंचनातून अन्नद्रव्ये बागेला दिली जातात. व्हेंच्युरीचा वापर त्यासाठी केला जातो. प्रतिदिन खत व्यवस्थापन तंत्राचा अवलंब ते हिवाळ्यात करतात.
  • हिवाळ्यात करपा नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक फवारणीचे वेळापत्रक बनवले जाते. हिवाळ्यात दर १५ दिवसाने फवारणीचे नियोजन असते.
  • घड निसवण्यास जानेवारीत चांगली सुरवात झालेली असते. घडांचे फुलकिडी व काळ्या डागांपासून संरक्षण करण्यासाठी स्कर्टींग बॅग लावल्या जातात. यामुळे दर्जेदार केळी तयार होतात.
  • कीड व रोग व्यवस्थापनावर सातत्याने लक्ष ठेवले जात असल्याने ९७ ते ९८ टक्के केळीची कापणी होते. करपा रोगाबाबत प्रतिबंधात्मक फवारणी कार्यक्रमावर भर असल्याने नुकसानीची पातळी अतिशय कमी राहिली आहे. निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेणे शक्य झाले.
  • मागील हंगामात एकदा परदेशात त्यांच्या केळीची निर्यात झाली. नंतर हिमाचल प्रदेश, काश्‍मिर, पंजाब, दिल्ली येथे वातानुकूलित यंत्रणा असलेल्या वाहनातून क्रेटमध्ये भरून त्यांची केळी पाठविण्यात आली. क्विंटलमागे १५० रुपये जादा (ऑन) दर त्यांना मागील हंगामात मिळाला, तर सरासरी १२५० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळू शकले.
  • केळीचा पिलबागही ते दरवर्षी घेतात. त्यासाठी मुख्य झाडानजीक जानेवारीत फुटवे वाढीसाठी सोडतात. या बागेची जोमात वाढ होते आणि पुढे कापणीही व्यवस्थित होते. कमी खर्चात पिलबागेचे उत्पादन ते घेतात.
  • संपर्क ः ऋषीकेश महाजन ः ९५७९५३४५३४

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com