दिव्यांग मुले, महिलांना ‘साहस'ची साथ

दिव्यांग मुले, महिलांना ‘साहस'ची साथ
दिव्यांग मुले, महिलांना ‘साहस'ची साथ

पालनपोषणासाठी आव्हान असणाऱ्या दिव्यांग मुलांच्या पालकांनी एकत्रित येऊन साहस प्रतिष्ठान या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. गेल्या दोन वर्षांपासून पालकांनी संस्थेच्या माध्यमातून दिव्यांग मुलांचे पालनपोषण सुसह्य केलेच, त्याचबरोबरीने शहरी, ग्रामीण भागांतील महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

कोणतीही सामाजिक संस्थेची स्थापना करायची म्हटले, की त्यांचे उपक्रम कोणते असावेत असा एक आराखडा तयार करून संस्थेची स्थापना केली जाते. परंतु वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) साहस प्रतिष्ठान मात्र याला अपवाद आहे. संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ. रुपाली दीपक पाटील यांची मुलगी श्रृती ही दिव्यांग आहे. नियमितपणे शाळेत जात असताना देखील मुलीकडे शिक्षकांचे विशेष लक्ष जात नसल्याचे सौ. पाटील यांच्या लक्षात आले. या समस्येतूनच दिव्यांग मुलांसाठी स्वतंत्र्य व्यवस्था तयार करण्याचा विचार त्यांच्या मनात आला. यासाठी दिव्यांग मुलांच्या पालकांशी त्यांनी चर्चाकरून यातून मार्ग काढण्याचा त्यांनी प्रयत्न सुरू केला. अनेक वर्षे प्रयत्न केल्यानंतर दोन वर्षांपूर्वी संस्थेला मूर्त रूप आले. दिव्यांगांच्या पालकांनी एकत्र येऊन सुरू केलेली ही पहिली संस्था ठरली. संस्थेने केवळ सिंधुदुर्ग जिल्हा कार्यक्षेत्र न ठेवता राज्याचे कार्यक्षेत्र ठेवून कामकाजास सुरवात केली आहे. हे काम करताना शेतकरी कुटुंबे, पालक, विधवा, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठीही कामाचे नियोजन करून मूळ उद्देशाबरोबरच कामाचा विस्तारही वाढविला आहे. रूपाली पाटील यांना त्यांचे पती प्रा. दीपक पाटील आणि घरच्यांची चांगली साथ मिळाली आहे.

शेतकरी कुटुंबातजागविला आत्मविश्‍वास दिव्यांग मुलांचे पालनपोषण हे कठीण काम असते. जर कुटुंब शेतकरी, शेतमजूर असेल तर मात्र अडचणीत वाढतात. परंतु संस्थेने अशा परिस्थितीने ग्रासलेल्या कुटुंबाना नवा आधार दिला. शेतकरी, मासेमारी, मोलमजुरी व अन्य लहान व्यवसाय करणाऱ्यांच्या दिव्यांग मुलांना एकत्र केले. कोकणातील विविध गावांतील पालकांची मोट बांधली. आपल्यासारखेच अनेक पालक एकत्र आल्याचे पाहून या पालकांना आत्मविश्वास मिळाला. त्यांनी आनंदाने संस्थेच्या शाळेत मुले दाखल केली. शासकीय निर्णयासाठी पाठपुरावा दिव्यांग मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी संस्थेचा प्रत्येक घटक प्रयत्नशील असतो. सौ. पाटील यांचा शासनाच्या प्रत्येक निर्णयाची माहिती मिळविण्याचा प्रयत्न असतो. दिव्यांगासाठी लेखनिक सुविधा करणारा शासन निर्णय संस्थेच्या पाठपुराव्याचे यश आहे.  याचबरोबर अंशत: अंध विद्यार्थ्यांसाठी मोठ्या फाॅँन्टची पुस्तके मिळविण्याकरिता बालभारतीकडे पत्रे पाठविली आहेत. याबाबतही सकारात्मक निर्णयाची अपेक्षा संस्थेला आहे.

शासकीय उपक्रमांना मदत शासनाच्या वतीने नवीन मतदार नोंदणीसाठी मोहीम घेतली जाते. या मोहिमेत संस्थेने सक्रीय सहभाग घेतला. विशेष करून अठरा वर्षांवरील दिव्यांगांना मतदानाचा अधिकार मिळावा, यासाठी प्रयत्न करून असे मतदार वाढविले. त्यांना समाजाच्या प्रवाहात आणले. दोन हजारांहून अधिक युवकांची नोंदणी संस्थेमार्फत निवडणूक विभागाकडे करण्यात आली. यासाठी संस्थेने विविध विभागात बैठका, मेळावे घेऊन माहिती संकलीत केली. आधार कार्डच्या धर्तीवर दिव्यांगाची वैश्‍विक ओळखपत्रे बनविण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. दिव्यांगाबरोबर ज्येष्ठांनाही सुविधा मिळाव्यात यासाठी ज्येष्ठ नागरिक व संस्थेच्या वतीने एकत्रित येऊन प्रयत्न सुरू आहेत. लोकसहभागातून प्रगती  संस्थेच्या उपक्रमाबाबत सौ. रुपाली पाटील म्हणाल्या, की खरं तर दिव्यांग मुलांचे पालक म्हणून आम्ही ही संस्था सुुरू केली. मुलांचे सर्व्हेक्षण करताना अडचणी आमच्या समोर आल्या. मुलांना बस, रेल्वेत मिळणारे आरक्षण, दिव्यांग भवन, ऑडिओ लायब्ररी, कमोड सिस्‍िटमची सोय करण्याबाबत आम्ही सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. पुढील काळात दिव्यांगाच्या विवाहांबरोबर १७ ते ३० वर्षांतील अस्थीव्यंग मुलींची क्रिकेट टीम तयार करण्यासाठी संस्थेने प्रयत्न सुरू ठेवले आहेत. केवळ या विद्यार्थ्यांसाठीच काम न करता इतर घटकांना सुविधा मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. समाजातील अनेक घटकांनी तसेच मंत्र्यांपासून विविध उद्योजक, मोठ्या व्यक्तींनी आम्हाला मदत करून साथ दिली आहे. हे काम खूप मोठे आहे. समाजातून प्रतिसाद मिळाल्यास आम्ही संस्थेची व्याप्ती वाढवून दिव्यांगाबरोबरच इतर घटकांसाठी प्रभावीपणे काम करू असा आम्हाला आत्मविश्‍वास आहे. वृक्षारोपणाद्वारे जागृती लोकांची निसर्गाप्रती आवड वाढावी, यासाठी वृक्षारोपणसारखे उपक्रम संस्था घेते. भित्तीपत्रकाच्या साह्याने मुलांपर्यंत पर्यावरणपूरक उपक्रम पोचविले जातात. संस्था परिसरात विविध प्रकारची झाडे लावण्याचे कामही प्रगतिपथावर आहे.

गावोगावी बचत गटांची स्थापना दिव्यांग व्यक्तींना जास्तीत जास्त लाभ देण्यसाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील असते. अठरा वर्षांवरील स्त्री व पुरुषांचे बचत गट स्थापन करून त्यांना शासकीय लाभ देण्यासाठी संस्थेने अविरत प्रयत्न सुरू केलेले आहेत. किमान महिन्याला वीस रुपयांची वर्गणी भरून शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून अर्थसाह्य या बचत गटांना मिळवून दिले जात आहे. सध्या संस्थेने २५ बचत गट उभारले आहेत. हे बचत गट मसाला निर्मिती, पिशवीनिर्मिती, काजू प्रक्रिया, खाद्यपदार्थ विक्री असे व्यवसाय करत आहेत. या व्यक्तींना स्वयंनिर्भर करण्यासाठी संस्थेने शासकीय नियमाचा आधार घेऊन वाटचाल सुरू ठेवली आहे. आतापर्यंत दहा ग्रामपंचायतीत भेटून बचत गटांची स्थापना करण्यात आली आहे.

विधवांना अर्थसाह्य केवळ दिव्यांगासाठीच काम न करता संस्था तसेच विशेष करून संस्थापक सौ. पाटील यांनी विधवा व आर्थिक स्राेत नसलेल्या महिलांना स्वत: आर्थिक मदत करून मदतीचा हात दिला आहे. दुसरीकडे धुणी भांडी, मोलमजुरी करणाऱ्या महिलांना व्यवसायाचे आर्थिक स्राेत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. काजू प्रक्रिया युनिट व अन्य साधनांची मदत या महिलांना मोलाची ठरली आहे. हळदी कुंकवाचे होणाऱ्या कार्यक्रमाचा खर्च मर्यादित ठेवून सौ. पाटील यांनी महिलांना डबे व संसारिक साहित्य देऊन महिलांना बळ दिले, असे उपक्रम सातत्याने सुरू आहेत. संजय गांधी निराधार योजनेसारख्या योजनेत सहभागी करून देण्यासाठी वैयक्‍ितक पातळीवरही मदत करण्यात येते.

 सौ. रूपाली पाटील, ९६२३८८३७६५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com