गारपीटग्रस्त संत्रा, मोसंबी बागांचे व्यवस्थापन

गारपीटग्रस्त संत्रा, मोसंबी बागांचे व्यवस्थापन
गारपीटग्रस्त संत्रा, मोसंबी बागांचे व्यवस्थापन

वादळी पाऊस आणि गारपीटच्या माऱ्यामुळे संत्रा / मोसंबी आंबिया बहाराच्या फुलांची आणि लहान फळांची सुद्धा गळ आलेली आहे. फळांवर काळे डाग पडलेत. गारांच्या माऱ्यामुळे झाडाच्या फांद्या, लहान फळांच्या सालीस जखमा होऊन पानांची व फळांची गळ झाली, झाडांच्या खोडावरील आणि फांद्यावरील साल गारांच्या माऱ्यामुळे फाटली. इजा झालेल्या झाडांच्या फांद्या व खोडावर बुरशीजन्य रोगांची लागण होत आहे. अतिप्रादुर्भावामुळे काही झाडे वाकल्याचे दिसत आहे. पानगळ झाल्यामुळे झाडाच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेवर प्रतिकूल परिणाम दिसून आला. अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे जखमा भरून निघण्याची ताकद कमी झाली. नुकसान झाले तरी संत्रा / मोसंबी बागांना बहारासाठी तयार करणे गरजेचे आहे. तसेच आंबिया बहार टिकवून ठेवण्यासाठी खालील उपाय योजना अमलात आणल्या तर झाडाच्या उभारीसाठी फायदेशीर ठरू शकते.

  •  आंबिया बहार, थोड्या फार प्रमाणात असलेल्या झाडावर एक टक्का युरिया किंवा पोटॅशियम नायट्रेटची (युरिया किंवा पोटॅशियम नायट्रेट १ किलो प्रती १०० लिटर पाणी) फवारणी करावी.
  •  फांद्यांवर तसेच फळांवर ढगाळ वातावरणात कोलोटोट्रीटीकम यासारख्या इतर बुरशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कार्बेन्डाझिमची (१ ग्रॅम प्रती लिटर पाणी) फवारणी करावी. गरज भासल्यास दुसरी फवारणी १० दिवसांनी करावी.
  •  गारांच्या माऱ्यामुळे झाडांच्या खोडावर / फांद्यांवर झालेल्या जखमांवर १ ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  •  झाडाच्या मोडलेल्या फांद्या आरीने किंवा कात्रीने व्यवस्थित कापून, कापलेल्या भागावर बोर्डो पेस्ट लावावी (१ किलो चुना + १ किलो मोरचूद + १० लिटर पाणी) तसेच खोडावरही बोर्डो पेस्ट लावावी.
  •  हवामानातील अचानक बदलामुळे व पाने गळाल्यामुळे झाडामध्ये अशक्तपणा निर्माण होतो. यासाठी एक टक्का युरिया किंवा डायअमोनियम फॉस्फेटची (युरिया किंवा डाय अमोनियम फॉस्फेट १ किलो प्रती १०० लिटर पाणी) फवारणी करावी. यामुळे अन्नद्रव्यांचे त्वरित शोषण होऊन झाडाला उभारी येते. गरज भासल्यास तज्‍ज्ञांच्या शिफारसीनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा. त्यामुळे झाडांना नवीन पाने फुटण्यास मदत होते.
  •  झाड आधीच अशक्त झाल्यामुळे व प्रतिकारकशक्ती कमी झाल्याने किडींचा प्रादुर्भाव लवकरच होतो. प्रौढ सायला व पिल्ले कोवळे शेंडे, पाने, फुलकळ्या व फुलातून रस शोषण करतात. परिणामी शेंडे सुकतात, कळ्या आणि लहान फुले गळतात. या किडीपासून पांढुरके स्फटिकासारखे गोडसर पदार्थ स्त्रवतात. त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते. पानांची वाढ खुंटते.
  •  या किडीच्या नियंत्रणासाठी ०.२ मिली इमिडाक्लोप्रिड (२०० एस. एल.) प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारावे. किडीचा प्रादुर्भाव कमी असेल तर कडूनिंबावर आधारित कीडनाशक १ मिली अॅझाडिरॅक्टिन (१००० पीपीएम) प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गरज भासल्यास आठ ते दहा दिवसांनी दुसरी फवारणी करावी.
  • आंबिया बहरासाठी देण्यात येणारी नत्राची मात्रा (६०० ग्रॅम युरिया) त्वरित द्यावी.
  •  यानंतर उष्ण तापमानात वाढ होत असल्यामुळे ७ ते १० दिवसांच्या अंतराने ओलित नियमित सुरू ठेवावे. ठिबक सिंचन संच असल्यास १ ते ४, ५ ते ७ व ८ वर्षांवरील झाडांना अनुक्रमे १२ ते ५३, ७८ ते १२७ व १४५ ते १८० लिटर प्रती दिवस पाणी द्यावे.
  •  शेतातील गवत, तणस, गव्हाण्डा, कुटार असल्यास झाडाभोवती ५ ते १० सें.मी. थर देऊन आच्छादन करावे. यामुळे बाष्पीभवन कमी होऊन जमिनीत ओलावा टिकून राहतो आणि आंबिया बहाराची फळगळ कमी होण्यास मदत होते.
  •  आंबिया बहाराची फळधारणा टिकून राहण्यासाठी एन.ए.ए. १० पीपीएम (१ ग्रॅम) + युरिया १ किलो, १०० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
  •  तापमानात ३५ ते ४० अंश सेल्सिअस एवढी वाढ झाल्यास ताबडतोब शिफारशीनुसार २,४-डी अधिक पोटॅशियम नायट्रेट १ किलो प्रती १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  •  फायटोप्थोराग्रस्त झाडावर मेटॅलेक्झील अधिक मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) हे १ ग्रॅम किंवा फोसेटिल ए एल १ ग्रॅम प्रती लिटर पाणी या प्रमाणात द्रावण करून संपूर्ण झाड ओले होईपर्यंत फवारावे.
  •  संत्र्यावरील कोळी, कोवळ्या पानातील आणि आंबिया बहाराच्या लहान फळातील रस शोषून घेतो. पानांचा पृष्ठभाग राख किंवा धूळ साचल्याप्रमाणे धुळकट दिसतो. त्यामुळे पानांच्या वरच्या भागाला फिक्कट गोलाकार चट्टे पडतात. जे खालच्या भागावर दिसत नाही. फळांवर मोठे, चंदेरी वा करड्या रंगाचे चट्टे पडतात. कोळी नियंत्रणासाठी डायकोफॉल १.७५  मिली किंवा सल्फर ३ ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. नवीन लागवड केलेल्या कलमांचे व्यवस्थापन
  •   गारांच्या माऱ्यामुळे झाडांच्या खोडावर / फांद्यावर झालेल्या जखमांवर एक ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  •  खोडावर बोर्डो पेस्ट लावावी.
  •  कलमांना तीन किलो निंबोळी ढेप आळ्यात मिसळून द्यावी.
  •  ः डॉ. सुरेंद्र पाटील, ९८८१७३५३५३ (फळशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com