शून्य मशागत तंत्रातून कस वाढविला...

शून्य मशागत तंत्रातून कस वाढविला...
शून्य मशागत तंत्रातून कस वाढविला...

मी १९७६ पासून आजपर्यंत जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी तसेच पीक फेरपालटीच्या दृष्टीने विविध प्रयोग करीत आहे. या प्रयोगातून सगुणा राइस तंत्र (एसआरटी) हे शून्य मशागत तंत्र विकसित केले.

गेल्या काही वर्षांतील अनुभवातून सातत्याने जमिनी नांगरून सुपीकतेचे नुकसान होत असल्याचे आढळले. जमिनी सुपीकतेसाठी शेणखत, गांडूळखताचा वापर करण्याऐवजी जमीन न नांगरता पिकाची मुळे जागेवरच कुजवली पाहिजेत. ही मुळे हळूहळू कुजत असताना जमिनीतील सूक्ष्मजीवांना खाद्य मिळते. गांडुळे जमीन भुसभुशीत करतात. हे तंत्र आम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी प्रताप चिपळूणकर यांच्याकडून समजले.

वनस्पतीचे मूळ मजबूत असते. कारण मूळ हे लिग्निनपासून बनले आहे. ते जास्त चिवट असते, त्याचे विघटन हळूहळू होते. पाने आणि खोड हे सेल्युलोजपासून बनलेले असते. त्यांचे विघटन लवकर होते. शेणखत एका ठिकाणी कुजल्यावर शेतात पसरवले जाते. पसरलेले शेणखत उन्हात तापताना सेंद्रिय कर्ब हवेत निसटून जातो. शेतात शिल्लक राहतो तो चोथा. त्यातच शेणखत वेळेवर उपलब्ध होत नाही. हे लक्षात घेऊन आम्ही आमची जमीन गेली सात वर्षे नांगरली नाही. दरवर्षी आम्ही एकाच शेतात एकामागून एक अशी तीन वेगवेगळी पिके घेतो. तीनही पिकांची मुळे जमिनीत ठेवतो. सर्व हंगामातील तणे जागेलाच ठेवून ती तणनाशकाच्या साह्याने मारतो.  तणे, वनस्पतीची मुळे जागेवरच कुजतात.वरखतांचे लागणारे प्रमाण ५० टक्क्यांवर आले आहे. कीटकनाशकांच्या फवारण्या पूर्णत: बंद होतील असे वाटत आहे. उत्पादन खर्च ६० टक्के कमी होऊन पीक उत्पादनात दुपटीने वाढ झाली. पिकांची गोडी वाढली आहे. सध्या राज्यातील १४ जिल्ह्यांतील सुमारे दोन हजारपेक्षा जास्त शेतकरी आमच्या तंत्रज्ञानाचा वापर करतात.

  • एसआरटी तंत्र वापरण्यासाठी जमीन एकदाच नांगरून कायमस्वरूपी गादीवाफे करायचे असतात. या जमिनीमध्ये पुढील २० वर्षे नांगरणी, कुळवणी, चिखलणी (भात पिकासाठी), कोळपणी इ. कामे करावयाची आवश्यकता नाही.
  • एकामागून एक पिके न नांगरता घेण्यासाठी पहिल्या पिकाची मुळे जमिनीत ठेवून त्यावर तणनाशकांचा वापर करून एसआरटी साच्याच्या साह्याने भोके पाडून बियाणे टोकणणी केली जाते.
  • सुपीक जमीन म्हणजे जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा एक टक्का असला पाहिजे. आज आपल्या देशाचा सरासरी सेंद्रिय कर्ब हा ०.५ टक्के आहे, तर महाराष्ट्राचा तो ०.३ टक्के इतका कमी आहे. हा सेंद्रिय कर्ब वाढवायचा असेल तर त्यासाठी एसआरटी शून्य मशागत तंत्र हा सोपा पर्याय आहे.
  • एसआरटी पद्धतीने खरिपातील भात, नाचणी, भुईमूग, कापूस तसेच रब्बीमध्ये कांदा, पालेभाज्या, कलिंगड, भेंडी, वाल, चवळी, हरभरा आणि मधुमका तसेच उन्हाळी भुईमूग, मूग अत्यंत यशस्वीपणे होऊ शकते हे सिद्ध झाले आहे. मागील तीन वर्षांत माझ्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा ०.३ टक्क्यावरून १.५ टक्क्यापर्यंत पोचला आहे.  
  • संपर्क: चंद्रशेखर भडसावळे, ७०५७६२५७२४  (संपर्क वेळ- दुपारी ४ ते ६ )

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com