अभ्यासक्रमात हवा भूसूक्ष्मजीवशास्त्राचा समावेश

अभ्यासक्रमात हवा भूसूक्ष्मजीवशास्त्राचा समावेश
अभ्यासक्रमात हवा भूसूक्ष्मजीवशास्त्राचा समावेश

महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे असून, तिथे १२ वीनंतर कृषी पदवीचा चार वर्षांचा अभ्यासक्रम आहे. पदवीपर्यंत कृषीसंबंधित सर्व विषयांचा एकत्रित अभ्यास करावा लागतो. त्यानंतर पदव्युत्तर ते आचार्य पदवीपर्यंत निवडलेल्या विशेष विषयात शिक्षण घेता येते. आठ सत्रांमध्ये विभागलेल्या या अभ्यासक्रमात साधारणतः पाचव्या सत्रामध्ये भूसूक्ष्मजीवशास्त्र हा विषय आहे. सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक असे त्याचे स्वरूप असते. पुस्तकी अभ्यासक्रमातील घटक ः सूक्ष्मजीवशास्त्राची तोंडओळख, त्यांची शेती व अन्य क्षेत्रांतील उपयुक्तता, भूसूक्ष्मजीवशास्त्राचा इतिहास, सूक्ष्मदर्शक यंत्राचा इतिहास, सूक्ष्मजीवांचे वेगवेगळे पेशी केंद्रिकाआधारित गट, पेशीची रचना व कार्याचा अभ्यास, जिवाणूच्या पोषण आणि ऊर्जाविषयक गरजा, प्रजोत्पादन, जमिनीच्या सुपिकतेसंबंधित व पीक उत्पादनात असणाऱ्या सूक्ष्मजीवांचा सहभाग, सूक्ष्मजीवशास्त्रीय नत्र, स्फूरद, गंधकांची स्थित्यंतरे, जैविक नत्र स्थिरीकरण (सहजीवी, असहजीवी पद्धती), अॅझोला व निळे, हिरवे शेवाळांकडून होणारे जैविक नत्र स्थिरीकरण, मायकोरायझा बुरशीचे प्रकार व वनस्पतीच्या वाढीत सहभाग, पीक पोषणासंबंधित जिवाणूंचा अभ्यास (रायझोस्फिअर), पानावरील जिवाणूंचा अभ्यास (फायलोस्फिअर), सायलेज उत्पादन, जैविक इंधनाचे उत्पादन, जैविक खते व कीडरोगनाशके, कृषीतील टाकाऊ पदार्थांचे व्यवस्थापन, अळिंबी उत्पादन, मानवी आरोग्यात जिवाणूंचा सहभाग, सेंद्रिय पदार्थांचे विघटन. प्रात्यक्षिकातील घटक ः सूक्ष्मदर्शक यंत्र व इतर प्रयोगशाळेतील उपकरणांची ओळख, निर्जंतुकीकरणाच्या पद्धती, विशिष्ट सूक्ष्मजीवांच्या प्रयोग शाळेतील वाढीसाठी कृत्रिम माध्यमे तयार करणे, मातीचे जैविक पृथक्करण (प्रतिग्रॅम माती नमुन्यातील जिवाणू, अॅक्‍टिनोमायसेड्‌स व बुरशींची संख्या मोजणे, जिवाणूंचे शुद्ध कल्चर तयार करण्याच्या पद्धती, अॅझो, रायझो, अॅझोस्पिरिलियम यांचे शुद्ध कल्चर तयार करणे. वरीलप्रमाणे सूक्ष्मजीवांची तोंडओळख करून दिल्यानंतर पुढील अभ्यासक्रमात वनस्पती विकृती शास्त्राचा अभ्यास प्रामुख्याने शिकविला जातो. कृषिपदवी अभ्यासक्रम तयार करण्याच्या सुरवातीच्या काळात जमिनीची सुपिकता हा काही ज्वलंत प्रश्‍न नव्हता. त्यामानाने पिकावर पडणाऱ्या रोगामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होई. त्यामुळे बहुतेक विद्यापीठात वनस्पती विकृतीशास्त्र व सूक्ष्मजीवशास्त्र असा एकत्रित विभाग आहे. मात्र, आज जमिनीची सुपिकता हा सर्वांत ज्वलंत प्रश्‍न आहे. ही सुपिकता वाढविल्याशिवाय शेतीतील अनेक प्रश्‍न सुटू शकत नाहीत. इथे सूक्ष्मजीव शास्त्राची मदत घेणे याला पर्याय नाही. सूक्ष्मजीव म्हटले, की केवळ पिकावर रोग निर्माण करणारे अशी बहुतेक शेतकऱ्यांची समजूत झाली आहे. या व्यतिरिक्त काही मोजक्‍या जिवाणूंचा किंवा जिवाणू खतांचा शेतात वापर करता येतो, इतपतच माहिती आहे. सूक्ष्मजीवशास्त्राची व्याप्ती इतकी मर्यादित नक्कीच नाही. कृषी विद्यापीठात भूसूक्ष्मजीवशास्त्र अशी स्वतंत्र विद्याशाखा असणे गरजेचे आहे. भू-सूक्ष्मजीवशास्त्राचे अन्य अनेक शास्त्र शाखाशी जवळचा संबंध आहेत. आजवर कृषी क्षेत्रामध्ये या शास्त्राचा उपयोग केवळ रोगशास्त्र, जिवाणू खते, कीटकनाशके इतक्या मर्यादेत केला गेला आहे. परिणामी, विद्यार्थ्यांचे आणि पुढे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होत आहे. सूक्ष्मजीव करीत असलेली कामे ः

  • यंत्रांचे काम - आज माझ्या जमिनीमध्ये पूर्व मशागतीचे काम जिवाणू करतात, त्यामुळे शेतीतील पॉवरटीलर, ट्रॅक्‍टरचे काम खूप कमी झाले आहे. यंत्रांची झीज, देखभाल, इंधन, वंगण अशा खर्चात बचत झाली.
  • खत व्यवस्थापनाचे काम - मागील पिकाच्या जमिनीखालील अवशेष व पिकातील अगर दोन पिकाच्या मधील काळात वाढणाऱ्या तणातून सेंद्रिय खतातही त्यांची मदत होते. कोणत्याही प्रचलित तंत्राच्या तुलनेत जास्त उत्तम दर्जाचे सेंद्रिय खत चार बांधाच्या आतच उपलब्ध होते. यातून पशुपालनातून सेंद्रिय खत अगर सेंद्रिय खत, खरेदी वाहतूक, पसरणे, जमिनीत मिसळणे या अनेक खर्चात बचत होते. तण नियंत्रणासाठी प्रामुख्याने तणनाशकाचा वापर केला जातो. त्याचा खर्च रानाला मिळणाऱ्या सेंद्रिय खतातून वसूल होतो.
  • वनस्पतिशास्त्र विभाग - सेंद्रिय कर्बाची टक्केवारी वाढवण्यात सूक्ष्मजीवांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे रासायनिक खत वापराची कार्यक्षमता खूप वाढते. गेल्या ४०-४५ वर्षांत शिफारसीपेक्षा अधिक खतांचा वापर करण्याची वेळच आली नाही. म्हणजेच खत खर्चात बचत झाली.
  • कृषी रसायनशास्त्र विभाग ः जमिनी सुपीक झाल्याने झाडांची ताकद, प्रतिकारक क्षमता वाढते. पूर्वीच्या तुलनेत रोग कीडींचे प्रमाण खूप कमी झाले आहे. कीडनाशकांची खरेदी व फवारणी यावरील खर्चात बचत झाली आहे. केवळ रोग कीड आल्यानंतर कोणत्या जिवाणू अगर कीडीमुळे आली व त्याचे नियंत्रण कसे करावे, इतकाच मर्यादित विचार करण्याची आवश्यकता नाही. त्याऐवजी रोग कीड का आली आणि ती न येण्यासाठी काय करावे, याकडे शेतकऱ्यांना वळविणे गरजेचे आहे.
  • मजुरीसह उत्पादन खर्चात बचत ः अनेक कामे सूक्ष्मजीव करत असल्याने मजुरांवरील अवलंबित्व कमी झाले. भूसूक्ष्मजीवशास्त्राच्या अभ्यासाने शेतीतील प्रत्येक खर्चाच्या बाबींवर बचतीचे उपाय मिळू शकतात. उत्पादनवाढीबरोबरच दर्जा सुधारणे हा तर खास भूसूक्ष्मजीवशास्त्राशी संबंधित विषय आहे. यातूनच शेतकऱ्यांचे अर्थशास्त्र सुधारणार आहे.
  • कृषी पदवीधरांपर्यंत हा विषय पोचल्यास त्या बाबी हळूहळू शेतकऱ्यांपर्यंत रुजत जातात. फार थोडे कृषी पदवीधर प्रत्यक्ष शेती करतात, याची मला जाणीव आहे. मात्र, बहुतेक जण कृषीसंबंधित क्षेत्रात नोकरी करतात व त्यांचा शेतकऱ्यांशी संबंध येतो, हे विसरता कामा नये. त्यामुळे कृषी विस्ताराच्या दृष्टीनेही यावर विचार व्हायला हवा. या शास्त्रशाखेला फक्त वनस्पती विकृती शास्त्रापाठीमागे झाकून ठेवणे कितपत योग्य आहे? माझ्यासारख्या कृषी पदवीधर शेतकऱ्याला गेल्या २८ वर्षांपासून भूसूक्ष्मजीवशास्त्राचा प्रचंड उपयोग होत आहे. केवळ पुस्तकांच्या साह्याने शिकलेल्या या विषयाने माझी शेती पुनश्‍च आर्थिक सुस्थितीत आणली. हे ज्ञान सर्वदूर सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने मी माझ्याही नकळत लेखक, व्याख्याता व विस्तार कार्यकर्ता बनून गेलो. ही लेखमाला लिहिण्याचाही केवळ तोच उद्देश आहे. कृषी शिक्षण, संशोधन व विस्तार यात कालसापेक्ष बदल होत जाणे गरजेचे आहे, असे वाटते. समस्या सोडवण्याची प्रक्रिया ः ४८ वर्षांपूर्वी पुणे येथील कृषी महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षात कृषी विस्तारशास्त्रामध्ये शिकलेला एक पाठ आठवतो. शेतकऱ्यांपुढील प्रश्‍न सोडविण्याची प्रक्रिया (प्रॉब्लेम सॉल्व्हिंग प्रोसेस) ही चार पायऱ्यांची असते. १) कृषीतज्ज्ञाने प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या शेताच्या बांधावर जाऊन त्यांच्यात मिळून-मिसळून त्यांच्यापुढील प्रश्‍न शोधले पाहिजेत. २) विद्यापीठात, प्रयोगशाळेमध्ये त्यावर उपाय शोधले पाहिजेत. ३) पुन्हा बांधावर जाऊन त्या नेमक्या उपाययोजना शेतकऱ्यांपर्यंत पोचवल्या पाहिजेत, प्रबोधन केले पाहिजे. ४) पाठपुरावाही तितकाच महत्त्वाचा असून, आपण सांगितलेल्या उपायाने त्याच्या प्रश्‍नाचे निराकरण झाले का? की उपाय अवलंबताना काही नवीन प्रश्‍न उभे राहिले? जर नवीन प्रश्न उभे राहिले असल्यास पुन्हा चार पायऱ्यांचा प्रवास. आज अशा प्रकारे शेतकऱ्यापुढील प्रश्‍नांचे निराकरण होते का? हा प्रश्न या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. या प्रक्रियेत पहिल्या पायरीविषयी थोडेसे ...

    तज्ज्ञाने काम करायचे का, शेतकऱ्यात फिरून त्यांचे प्रश्‍न शोधायचे, असा सवाल अनेक जण विचारतात. त्याऐवजी शेतकऱ्याने स्वतः आपले प्रश्‍न, समस्या तज्ज्ञापुढे का मांडू नये, असेही विचारले जाते. आज ४८ वर्षे शेतकऱ्यात राहिल्यानंतर या पायरीची मांडणी अत्यंत योग्य व योजनाबद्ध असल्याचे जाणवते. सर्वसामान्य शेतकऱ्यापुढे प्रश्‍नांचा डोंगर असतो. परंतु, तो मांडण्याची, समजून घेण्याची कुवत नसते. अनेक वेळा हे असेच असते, असे समजून त्या प्रश्नाविषयी सहनशीलता निर्माण झालेली असते. त्यामुळे तो त्याला प्रश्नच वाटत नाही. त्याच्यासोबत मिळून-मिसळून राहिल्यानंतर कदाचित तज्ज्ञांच्या लक्षात ती समस्या येऊ शकते. हे एक कौशल्याचेच काम आहे. आज शेतकरी मेळाव्यातून प्रयोगशाळेतून शेताकडे असे एकतर्फी मार्गदर्शन होते. यातील शेतातून प्रयोगशाळेकडे प्रश्न जाणे, ही पहिली आणि त्यावरील उपाययोजना शोधल्यानंतर त्याचा पाठपुरावा ही चौथी पायरी कधीच अवलंबिली जात नाही. म्हणून कृषी शिक्षण व प्रत्यक्ष व्यवहारातील त्याचा उपयोग यात मोठी दरी पडलेली दिसते. शेतीचा पसारा व तज्ज्ञांची संख्या यांचा विचार करता ही केवळ त्यांच्याबाबतची तक्रार नक्कीच नाही. ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत कृषी पदवीच्या अंतिम वर्षात पहिले सत्र रावे कार्यक्रमाचे असते. या काळात विद्यार्थ्यांनी खेड्यात राहून शेतकऱ्यांत मिसळून प्रत्यक्ष शेती व त्यातील प्रश्नांविषयी समजून घेणे आणि महाविद्यालयातील तज्ज्ञांच्या मदतीने त्या सोडवणे अपेक्षित असते. या अभ्यासक्रमाचा मूळ उद्देश खूप चांगला आहे. ही एक नंतर झालेली सुधारणा आहे. सर्वसामान्यपणे परीक्षा पास होऊन केवळ पदवी मिळवणे, इतक्‍या मर्यादित हेतूनेच शिक्षण पूर्ण होते. कृषी पदवी घेऊनही शेतीत कशाला पडलास? शिक्षणाचा शेतीत काही उपयोग होतो का? असे प्रश्न मला विचारले जात. केवळ परीक्षापुरत्या अभ्यासाने प्रत्यक्ष शेतीत काही उपयोग होणार नाही. म्हणूनच कृषी पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन मी शेतीत प्रवेश केला, तेव्हा मला कृषीशास्त्राच्या प्राथमिक इयत्तेत प्रवेश घेत असल्याची जाणीव झाली.  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com