सोयाबीन : तूर आंतरपिकासाठी सुधारित पट्टापेर पद्धत

सोयाबीन : तूर आंतरपिकासाठी सुधारित पट्टापेर पद्धत
सोयाबीन : तूर आंतरपिकासाठी सुधारित पट्टापेर पद्धत

 सोयाबीन : तूर आंतरपीक घेताना सुधारित पट्टापेर पद्धतीचा अवलंब करावा. त्याच्या दोन पद्धती असून, ही पेरणी बैलजोडीचलीत पेरणीयंत्र, ट्रॅक्टरचलीत पेरणीयंत्र, बीबीएफ प्लँटरद्वारे करता येते. ही पद्धती अन्य मूग ः तूर, उडीद : तूर, मटकी : तूर यामध्येही वापरता येते.

जिरायती शेतीमध्ये अनेक शेतकरी सोयाबीन व तूर या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करतात. सामान्यतः ट्रॅक्टर अथवा बैलजोडीद्वारे पेरणी करताना चार ओळी सोयाबीन : दोन ओळी तूर, चार ओळी सोयाबीन : एक ओळ तूर, पाच ओळी सोयाबीन : दोन ओळ तूर ही पद्धत अवलंबतात. यात मुख्य पीक असलेल्या सोयाबीनचे उत्पादन कमी न होता तूर पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी व्यवस्थापनाची गरज असते.

आंतरपीक पद्धतीमध्ये तूर पिकासंदर्भात आढळणाऱ्या प्रमुख समस्या : मुख्य पिकाची कापणी, काढणी, मळणी होईपर्यंत तुरीचे पीक पूर्णपणे दुर्लक्षित राहते. सोयाबीनसारखे मुख्य पीक पसरट वाढून जमीन झाकण्यासोबत दाटी करते. परिणामी तुरीचे पीक झाकोळले जाते. तुरीच्या वाढीवर त्याचा परिणाम होतो. मुख्य पिकांच्या उंचीपर्यंत तूर पिकाच्या मुख्य खोडावरील फांद्या सुकतात, गळतात. अशा प्रकारे फांद्याची संख्या कमी होऊन तुरीची उभट वाढ होेते.

उपाययोजना

  • मुख्य पिकाचा कालावधी जेवढा लांब असेल, त्या प्रमाणात तूर पिकाची उत्पादकता कमी - कमी होताना आढळते. मुख्य पीक कमी कालावधीचे असल्यास त्याचे अवशेष जमिनीवर पडून तुरीला उपलब्ध होतात. या आच्छादनामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहतो. पावसाचे पाणी संपूर्णपणे तुरीला मिळते. तसेच वाढीला जागा मिळते.
  • आंतरपीक पद्धती प्रामुख्याने जिरायतीमध्ये वापरली जाते. मुख्य पिकाची पाण्याची गरज जास्त असल्यास व मुख्य पिकाच्या कापणीनंतरचा माॅन्सूनचा परतीचा पाऊस न आल्यास, तुरीच्या पिकाला जमिनीतील ओलावा कमी पडतो. परिणामी उत्पादनात मोठी घट होते.
  • तूर पिकाच्या वाढीसाठी आवश्यक घटक मिळण्यासाठी सोडओळ (पट्टा पेर) पद्धतीचा अवलंब करावा. यात पद्धतीनुसार ओळी मोकळ्या सोडलेल्या असल्याने तुरीच्या वाढीला मोकळी जागा, भरपूर, सूर्यप्रकाश मिळतो. तूर पिकाचे मुख्य खोड जोमदार बनण्यास मदत होते. मुख्य खोडावर खालपासूनच फांद्या लागल्याने उत्पादकतेत वाढ होते. सोयाबीन : तूर आंतरपीक पद्धतीतसुद्धा सोडओळ (पट्टा पेर) पद्धतीचा अवलंब निश्चितच फायद्याचा ठरतो.
  • सोयाबीन : तूर पट्टापेर पद्धत   ट्रॅक्टरचलीत सात दात्याचे पेरणी यंत्राद्वारे : ट्रॅक्टरचलीत पेरणीयंत्र सामान्यत: सात दात्याचे असते. याद्वारे सोयाबीन : तूर आंतरपीक पट्टापेर करताना तीन ओळी सोयाबीन : दोन ओळी तूर, चार ओळी सोयाबीन : एक ओळ तूर याप्रमाणे नियोजन करता येते. आंतरपीक पद्धतीत सोयाबीनसोबत तुरीची एक ओळ अथवा दोन ओळी घ्यावयाच्या याचा निर्णय शेतकऱ्यांनी आपल्या पसंतीनुसार घ्यावा. तीन ओळी सोयाबीन : दोन ओळी तूर

  • ट्रॅक्टरचलीत सात दात्याच्या पेरणी यंत्राच्या दोन्ही बाजूच्या काठावर प्रत्येकी एका कप्प्यामध्ये तूर बियाणे भरावे. पेरणी यंत्राच्या काठावरील दोन्ही बाजूकडील प्रत्येकी दोन नंबरचे छिद्र टिकली लावून अथवा त्यामध्ये बोळा भरून बंद करावे. उरलेल्या मधल्या तीन कप्प्यांमध्ये सोयाबीनचे बियाणे भरावे. अशा प्रकारे नियोजन केल्यास काठावरची ओळ तूर पिकाची-खाली ओळ-तीन ओळी सोयाबीन-खाली ओळ-तुरीची ओळ अशी पेरणी होईल. ट्रॅक्टर प्रत्येक वेळी पलटून येताना व जाताना तुरीच्या ओळीच्या बाजूला तूर पिकाची ओळ येईल. म्हणजेच धुऱ्याच्या काठावरची ओळ वगळता पूर्ण शेतात वरीलप्रमाणे रचना होईल.
  • सोयाबीन : तूर पिकाची पेरणी ३:२ प्रमाणात होते. तूर व सोयाबीनच्या बाजूला प्रत्येकी एक ओळ खाली राहते. अशा प्रकारे खाली ठेवलेल्या ओळीच्या ठिकाणी डवऱ्याच्या फेरासोबत डवऱ्याच्या जानोळयाला दोरी गुंडाळून गाळ (सरी अथवा दांड) पाडून घ्यावा. म्हणजे सोयाबीनच्या तीन ओळी व तूर पिकाच्या दोन ओळी गादी वाफ्यावर येतात.
  • चार ओळी सोयाबीन : एक ओळ तूर

  • ट्रॅक्टरचलीत सात दात्यांच्या पेरणीयंत्राद्वारे पेरणी करताना चौथ्या कप्प्यात तूर पिकाचे बियाणे व त्याच्या बाजूची दोन्ही छिद्रे टिकली अथवा बोळा वापरून बंद करावीत. यानंतर उरलेल्या दोन्ही बाजूच्या प्रत्येकी दोन कप्प्यांमध्ये सोयाबीनचे बियाणे भरावे. म्हणजेच काठावरच्या दोन ओळी सोयाबीनच्या-खाली ओळ-तुरीची एक ओळ-खाली ओळ-सोयाबीनच्या दोन ओळी असे नियोजन होते. प्रत्येक वेळी ट्रॅक्टर पलटून येताना व जाताना सोयाबीनच्या दोन ओळींच्या बाजूला पुन्हा दोन ओळी सोयाबून येते. म्हणजेच पूर्ण शेतात धुऱ्याच्या काठावर सोयाबीनच्या दोन ओळी वगळता तुरीची एक ओळ-खाली ओळ-सोयाबीनच्या चार ओळी-तुरीची एक ओळ-खाली ओळ - सोयाबीनच्या चार ओळी असे चित्र तयार होते. खाली ठेवलेल्या प्रत्येक ओळीच्या ठिकाणी डवऱ्याच्या जानोळ्याला दोरी गुंडाळून सरी पाडून घ्यावी. त्यामुळे चार ओळी सोयाबीन व एक ओळ तूर गादीवाफ्यावर येते.
  • बैलजोडीद्वारे ‘तीन ओळी सोयाबीन : एक ओळ तूर’ पेरणी : बहुतांश शेतकरी तीनदाती काकरी, सरत्याचा, पाभरीचा अथवा तिफणीचा वापर करतात. तिदाती काकरीने पेरणी करताना पट्टापेर पद्धतीनुसार, शेताच्या धुऱ्याकडून पेरणी सुरू करताना तीन ओळी तिन्ही सरत्याद्वारे सोयाबीनच्या घ्याव्यात. पलटून येताना तीनपैकी काठावरच्या प्रत्येकी एक सरत्याने बियाण्याची पेरणी न करता, केवळ मधल्या सरत्यावर फक्त तूर बियाणे पेरावे. पुन्हा परत जाताना तिन्ही सरत्यावर सोयाबीन पेरावे. पलटून येताना केवळ मधल्या सरत्यावर तुरीची पेरणी करावी. खाली ठेवलेल्या ओळीच्या ठिकाणी डवऱ्याच्या साह्याने गाळ पाडून घ्यावा.  
  • बीबीएफ प्लँटरने पेरणी : या ट्रॅक्टरचलीत पेरणी यंत्राद्वारे सोयाबीनची पेरणी रुंद वरंबा व सरी पद्धतीने करता येते. यामध्ये दोन्ही बाजूला प्रत्येकी एक नांगराची फाळ लावलेली असल्याने पेरणी करतेवेळी दोन्ही बाजूला नाली तयार होते. या यंत्रावर बियाणे व खत पेरण्यासाठी पेटी दिलेली असते. या माध्यमातून चार दाती पेरणीयंत्राद्वारे सोयाबीन चार ओळीमध्ये गादीवाफ्यावर पेरणे शक्य होते. याद्वारे सोयाबीन व तूर आंतरपीक घेताना बीबीएफ प्लँटर प्रत्येक वेळी पलटून येताना व जाताना पेरणीच्या अंतरानुसार म्हणजेच दोन ओळीतील अंतरानुसार एक ओळ सुटेल एवढी जागा सोडून द्यावी. म्हणजेच प्रत्येक चार ओळी सोयाबीनच्या गादीवाफ्यानंतर एक ओळ मावेल एवढा लांब वरंबा (छोटा गादी वाफा) तयार होतो. या खाली ठेवलेल्या छोटया गादीवाफ्यावर सोयाबीन पेरणीसोबतच महिलांच्या साह्याने सरळ रेषेत तुरीचे टोकण करावे. तुरीचे बियाणे डोबताना दोन झाडातील अंतर साधारणत: २० सेंमी राखत एका ठिकाणी २ बिया, सुमारे ४-५ सेंमी खोलीवर डोबाव्यात. अशाच प्रकारे मूग-तूर, उडीद-तूर, मटकी-तूर या पिकांची सुधारीत पट्टापेर पेरणी बीबीएफ प्लँटरने करता येते.

    महत्त्वाचे : पट्टापेर पद्धतीमध्ये सुरुवातीचे ३५-४० दिवस खाली ठेवलेल्या ओळीमुळे खूप जागा वाया गेल्याचा समज होऊ शकतो. मात्र, साधारणत: ५५-६० दिवसामध्येच पिकाची वाढ होऊन ही जागा पूर्णपणे व्यापली जाते. केवळ पाऊलवाट शिल्लक राहते. ही पायवाट पिकाची निगराणी, निरीक्षण, फवारणी यासाठी फायदेशीर ठरते.

    संपर्क : जितेंद्र दुर्गे, ९४०३३०६०६७ (श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com