धनत्रयोदशी : जीवनतत्त्वाच्या पूजनाचा दिवस

आश्‍विन वद्य त्रयोदशीला `धनत्रयोदशी` म्हणतात. या दिवशी वस्त्र आणि अलंकाराची खरेदी करणं शुभ मानलं जातं. घरातले अलंकार तिजोरीतून काढून स्वच्छ करून ते पुन्हा जागेवर ठेवले जातात. बळिराजा नव्या धान्याचे पूजन करतो. आपल्या जीवनाचे पोषण सुरळीत आहे, अशा तत्त्वांचे पूजनही यादिवशी केले जाते.
संपादकीय
संपादकीय

धनत्रयोदशी म्हणजे धनाची पूजा. अर्थात धन म्हणजे काय तर जे आपण कमावलेलं आहे, ज्यावर आपला हक्क आहे ते. मग आपण काय कमावतो, तर आपण शेतात धान्य पिकवतो, आपण शरीर कमावतो, आपण शिक्षण घेतो, आपण शब्दांचे धन कमावतो. म्हणून तर तुकाराम महाराजांनी म्हटलंय, ‘आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू’ अर्थात आमच्यासाठी शब्दांनाच धनाचे अन्‌ शस्त्रांचे मोल आहे. अशा विविध प्रकारातील धनाचे पूजन धनत्रयोदशीला केले जाते.

धनत्रयोदशीचे महत्त्व आयुर्वेदाचे प्रवर्तक असलेला विष्णूचा अवतार धन्वंतरी. धन्वंतरी सर्व वेदात निष्णात होते. मंत्र-तंत्रातही विशारद होते. त्यांच्या अलौकिक प्रतिभेने नाना औषधींचे सार अमृतरूपाने देवांना प्राप्त झालं. त्यांना देवांच्या वैद्यराजाचे पदही मिळाले. त्यामुळे संध्याकाळी ईशान्य दिशेकडे तोंड करून धन्वंतरीची प्रार्थना केल्यामुळे दीर्घायुष्य मिळतं, असं मानलं जातं. धनत्रयोदशीला यमाला दीपदान केले जाते. या दिवशी संध्याकाळी घराच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर एका पात्रात अन्न ठेवलं जातं. राईच्या तेलाचा दिवा त्यावर ठेऊन दक्षिण दिशेकडे वात करून तो लावला जातो. त्या दिव्याचे विधिवत पूजन करून यमराजाची प्रार्थना केली जाते. या दिवसाला बोलीभाषेत `धनतेरस`ही म्हणतात. या दिवशी व्यापारी तिजोरीचे पूजन करतात. व्यापारी वर्ष दिवाळी ते दिवाळी असे असते. नव्या वर्षाच्या हिशोबाच्या वह्या या दिवशीच आणून त्यांचे पूजन करून वापरात आणल्या जातात. धनत्रयोदशीच्या दिवशी नवे सुवर्ण विकत घेण्याचा प्रघात आहे. त्यामुळे वर्षभर घरात धनलक्ष्मी वास करते असे मानले जाते. कडुनिंबाच्या पानांचा प्रसाद धनत्रयोदशीला प्रामुख्याने धन्वंतरी देवतेचे पूजन केले जाते. धन्वंतरीचा जन्म समुद्र मंथनातून झाला. धन्वंतरीच्या एका हातात अमृत कलश, दुसऱ्या हातात जळू, तिसऱ्या हातात शंख आणि चौथ्या हातात चक्र आहेत. चारही हातातील या गोष्टींचा उपयोग करून अनेक व्याधींना, रोगांना बरे करण्याचे काम भगवान धन्वंतरी करतो. वैद्य डॉक्टर मंडळी या दिवशी धन्वंतरीचे पूजन करतात. कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे आणि साखर प्रसाद म्हणून वाटतात. या कृतीमागेदेखील मोठा अर्थ आहे. कडुनिंबाची उत्पत्ती अमृतापासून झाली असे मानले जाते आणि धन्वंतरी अमृततत्त्व देणारी देवता. कडुनिंबाची पाच-सहा पाने नियमित खाल्ली तर कोणताही आजार होण्याची शक्यता कमी होऊन जाते. इतके महत्त्व कडुनिंबाच्या पानांत आहे. प्राण हरण करण्याचे कार्य यमराज पार पाडतात. मृत्यू कोणालाच चुकलेला नाही आणि तो चुकवताही येणार नाही; पण अकाली मृत्यू टाळता येऊ शकतो. यासाठी धनत्रयोदशीस यमधर्माच्या उद्देशाने कणकेचे १३ दिवे तयार करून ते घराच्या बाहेरच्या बाजूस दक्षिणेला तोंड करून सायंकाळी लावले जातात. एरवी दिव्याचे तोंड दक्षिणेला कधीही नसते.

धनत्रयोदशीची कथा धनत्रयोदशी या सणामागे काही दंत कथा सांगितल्या जातात. पूर्वी हेमा राजा होता. त्याचा पुत्र सोळाव्या वर्षी मृत्यूमुखी पडणार असे भाकित वर्तवले गेलेले असते. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चवथा दिवस हा त्याच्या मृत्यूचा दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवती-भोवती चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वार ही असेच सोन्या चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. राजपुत्रास गाणी व गोष्टी सांगून जागे ठेवले जाते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्प रूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याचे डोळे सोन्या चादींने दीपतात. या कारणास्तव यम यमलोकात परततो. अशाप्रकारे नववधू राजकुमाराचे प्राण वाचवते. म्हणूनच या दिवसास `यमदीपदान` असेही म्हणतात.

शेतकऱ्यांचे धन केवळ पैसे, दागदागिने म्हणजे धन नव्हे. या पलीकडे जाऊन धनाची व्याख्या करता येते, ती लक्षात घेतली पाहिजे. शेतकरी शेतात राबतो काबाडकष्ट करतो, काळ्या आईची सेवा करतो तेव्हा कुठे बीज अंकुरते. अंकुरणाऱ्या बीजाला टपोर दाण्याचे कणीस लगडते शेतकऱ्यांसाठी ते खरे धन. अर्थात आज सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे, पाण्याचा अभाव आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसह सर्वच जण चिंतेत आहेत. मात्र परिस्थिती काहीही असली तरी लढणे हे आपले काम आहे. आलेल्या परिस्थितीला सामोरे जावेच लागणार आहे. ही परिस्थिती का उद्भवली याचादेखील गांभीर्याने विचार करायला हवा. त्याचबरोबर शेतात नवतंत्रज्ञानाची कास धरल्यावर निश्चितच बदल घडेल यावर विश्वास ठेवला पाहिजे. आजच्या दुष्काळी परिस्थितीचे आकलन करून, शेतीचे व्यवस्थित नियोजन करून अन्न-धान्य वाढविणारे शेतकरीदेखील आपल्याच अवतीभोवती आहेत. आपण त्यांच्याकडे पाहिले पाहिजे. त्यांनी शेतात अवलंबलेलं नवतंत्रज्ञान आपणही स्वीकारलं पाहिजे. हार न मानता लढले पाहिजे. तरच धान्याची टपोरं कणसं शेतात डोलू लागतील. घरात धान्याच्या राशी उभ्या राहतील. बळिराजा समाधानी होईल. शेतातील काळी माती, पाणी आणि सर्जा-राजाची जोडी हे शेतकऱ्यांचे धन. या दिवशी शेतकरी शेतातील मातीचेदेखील पूजन करतो. शेतातील नवे धान्य घरात आणले जाते आणि त्याचे मनोभावे पूजन केले जाते. इतकेच नव्हे तर जिथे शेण गोळा केले जाते तिथे देखील दिवा लावून पूजन केले जाते.

आमची धन संपदा आपण सारे नियमितपणे कष्ट करतो, काम करत असतो. कशासाठी करतो, तर कष्टातून धन-संपत्तीची निर्मिती व्हावी हा त्यामागे उद्देश. आपण जे जे कमावतो त्याचे पूजन करायलाच हवे. म्हणून मग धनत्रयोदशी साजरी केली जाते. आयुष्य जगत असताना आपण व्यायाम करून शरीर कमावतो ते देखील शरीर धनच. आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी विविध उपाय योजतो, नियम पाळतो, पथ्य पाळतो हे सारे शरीर संपदा वाढावी यासाठी करतो. शाळेत गेल्यावर आपण ज्ञान मिळवतो. लिहायला वाचायला शिकतो. ही ज्ञानसंपदा वाढत गेली तर व्यावहारिक जगात आपण टिकून राहतो. ज्ञानाच्या बळावर आपल्याला हवे ते मिळवू शकतो. थोडक्यात सांगायचे तर धनाची व्याप्ती खूप वेगवेगळी आहे. आपण कोणत्या पातळीवर त्याकडे कसे पाहतो हे महत्त्वाचे आहे. विविध पातळ्यांवरील आपली धनसंपदा वाढीस लागावी, ती अबाधित राहावी, वृद्धिंगत व्हावी यासाठी आपणच प्रयत्न करायला हवेत ना!

दिनेश दीक्षित  ः ९४०४९५५२४५ (लेखक शेती, साहित्याचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com