agricultural stories in Marathi, agrowon, special article on dipavali | Agrowon

शेतीतील अंधार करुया दूर...
डॉ. नागेश टेकाळे
गुरुवार, 8 नोव्हेंबर 2018

प्रत्येक पणतीला वावराचे रूप देऊन त्यात शासनरूपी तेल टाकून संशोधनाची वात लावूया. असे केले तर दुष्काळी वातावरणातसुद्धा ही पणती कायम तेवत राहील. शेतीतील अंधार दूर करणाऱ्या पणतीचे असे उजळणे हीच खरी बलिप्रतिपदा!

माझ्या आईवडिलांना शेतीची खूपच आवड होती. वडिलांची फिरती शासकीय नोकरी असल्यामुळे त्यांना शेतामध्ये प्रत्यक्ष जाता येत नसे. मात्र, त्याची उणीव आईने भरून काढली. वडील घरी आल्यावर शेतामधील वाणवळा पाहताना, त्याची चव घेताना त्यांच्या गप्पा शेताबद्दल जास्त असत. आमची संपूर्ण शेती सेंद्रिय होती. अर्थात, हे सर्व ५० वर्षांपूर्वीचे असल्यामुळे त्या वेळी ग्रामीण भागात रासायनिक खतांची ओळखही नव्हती. शेतात खरीप आणि रब्बीची मिळून जवळपास २५ प्रकारची विविध पिके आम्ही घेत असू. पिकांच्या निवडीमध्ये आईचा सहभाग मोठा होता. गावासाठी ती ‘सीड बँकेचे’ काम करत असे. कुणालाही कुठलेही मूठभर बी हवे असेल, तर आई ते माजघराच्या उतरंडीतून सहज काढून देत असे. आमच्या घरी ८-१० धान्यांच्या कणगी होत्या. सोबत माजघरातील उतरंडीमध्ये प्रत्येक मडक्यात आई कोणते, तरी बी बियाणे ठेवतच असे. वडिलांनी शेती करण्यासाठी एक सालकरी ठेवला होता. त्यांना आम्ही ‘गडी अण्णा’ म्हणत असू. त्यांचे सर्व कुटुंब आमच्या शेतीसाठी दिवस-रात्र कष्ट करीत असे. गडी अण्णा आणि त्यांचे कुटुंब हे आमच्या कुटुंबाचाच एक हिस्सा होते. दिवाळी हा सण शेतकऱ्यांचाच आहे, हे मी त्यांच्याकडूनच शिकलो. दिवाळीच्या प्रत्येक दिवशी ते आमच्या घरी येत, आमच्या आनंदात सहकुटुंब सहभागी होत. साखरेच्या करंजीपेक्षा गरिबाची गुळाची करंजी जास्त स्वादिष्ट आणि प्रेमाच्या बाखराने भरलेली असते, हे त्यांनीच मला खाऊ घालून शिकवले. शेतकऱ्यांबद्दल आस्था, प्रेम, आपुलकी, त्यांचे दु:ख, वेदना पाहताना, अनुभवताना मला आज आमच्या गडी अण्णाची आठवण प्रकर्षाने जाणवते.

आज दिवाळी पाडवा, कार्तिक महिन्याचा पहिला दिवस म्हणजेच बलिप्रतिपदा. शेतकऱ्यांच्या दिवाळीमधील हा अतिशय आनंदाचा दिवस. रामायण, महाभारत ही महाकाव्ये, पुराणे आणि उपनिषधे हे गोष्टी रूपात असले, तरी त्याचे सार महत्त्वाचे आहे. विष्णुपुराणामध्ये श्री विष्णूंच्या दहा अवतारांची कथा आहे. जेव्हा अन्याय, अत्याचार परमसीमेवर पोचतो तेव्हा देवशक्ती तेथे येते आणि दुष्ट शक्तीचा नाश होतो. या सर्व ग्रंथ साहित्याकडे पाहण्याची माझी ही अशी सकारात्मक दृष्टी आहे. वामन अवतारामध्ये ‘बळी’ या विष्णुभक्त दैत्याची आणि त्याच्या दानधर्माची गोष्ट आहे. बळी राजा हा भक्त प्रल्हादाचा नातू. बळीचे या भूलोकावर राज्य होते. सर्व प्रजा ही शेतकरी होती. बळीराजा प्रजेच्या कल्याणासाठी दिवसरात्र झटत असे म्हणून शेतकऱ्यांना बळीचे लेकरे म्हणत. बळीची दैत्यसेना मात्र अत्याचारी होती. अत्याचाराने पीडित लोक विष्णूंना शरण गेले. प्रजेवर सैनिकांनी अत्याचार केला. कर्मचाऱ्यांनी अन्याय केला, तरी दोषी हा राजाच असतो म्हणून विष्णूंने ‘बटू’ च्या रूपात वामन अवतार घेऊन आपला प्रिय भक्त बळीकडे आले आणि तीन पावले जमीन मागितली. शेतकऱ्याच्या राजाला तीन पावले जमीन म्हणजे काहीच नाही. पहिल्या पावलात आकाश, दुसऱ्या पावलात भूलोक आणि तिसऱ्या पावलास जागाच शिल्लक न राहिल्याने बळीराजाने विश्वरूप विष्णूंच्या पुढे आपले मस्तक ठेवले आणि तो पाताळ लोकात ढकलला गेला. श्री विष्णूंचा तो परमभक्त म्हणून पाताळाचे राज्य त्यास मिळाले. भक्त प्रल्हादांच्या आग्रहामुळे श्री विष्णूंनी बळीराजास एक दिवस भूलोकावर येऊन आपल्या प्रिय प्रजेला म्हणजेच शेतकऱ्यांना भेटण्याची परवानगी दिली. बळीराजा आपल्या शेतकरी लेकरांना भेटण्यासाठी पृथ्वीतलावर येतो तोच दिवस म्हणजे बलिप्रतिपदा. शेतकरी लोक गावागावांत, शेतात, रानात हजारो पणत्यांची आरास करून पूर्वी बळी आगमन दिवस (बलिप्रतिपदा) साजरा करीत. मला आठवते. आमच्या लहापणी आमचे गडी अण्णा घरी येऊन धान्याने भरलेल्या कणगीभोवती दिव्यांची आरास करीत. उतरंडीच्या खोलीमध्येही आरास असे. अण्णा म्हणत, विविध धान्यांची पूजा म्हणजेच धनाची पूजा. याचाच सोपा अर्थ म्हणजे बळीची पूजा.

पाच दशकांनंतर बलिप्रतिपदा मी आज पाहत आहे. शेतामधील सर्व पणत्या दुष्काळामुळे विझल्या आहेत. बलिप्रतिपदा हा शेतकऱ्यांचा सण व्यापाऱ्यांच्या पेढीवर साजरा होत आहे. ज्या शेतकऱ्यांच्या डोळ्यांत मी शेकडो पणत्यांची रोषणाई पहिली तिथे आज अंधार आहे. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामधील दीडशेहून अधिक तालुक्यांमध्ये गंभीर दुष्काळ आहे. बळीराजाची लेकरे आज निसर्ग संकटात सापडली आहेत. या लेकरांनी त्यांचा रक्षणकर्ता, अन्नदाता म्हणून कोणत्या बळीराजाकडे पाहावे, हे मोठे प्रश्नचिन्ह आहे. आजच्या या निसर्गनिर्मित कठीण प्रसंगात शेतकऱ्यांना शासन आणि शास्त्रज्ञ या दोन बळीराजांची आवश्यकता आहे. शासन, शेतकरी आणि शास्त्रज्ञ हे तिघे एकत्र आले, तरच दिवाळीचा हा सण अशा या हलाखीच्या परिस्थितीमध्येसुद्धा उत्तमरीत्या साजरा होऊ शकतो.
अमेरिकेमधील टेक्सास प्रांतात नेहमीच कमी पाऊस पडतो. तेथील कृषी विद्यापीठ आणि कृ.िषशास्त्रज्ञ प्रतिवर्षी नवीन दुष्काळ प्रतिबंधक वाणे शोधून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत असतात. दुष्काळात बहरलेली मक्याची शेती मी तिथे पाहिली. केवढी तरी विविध गवताची वाणे निर्माण करून त्या विद्यापीठाने शेतकऱ्यांना शेतीपासून दुग्धव्यवसाय व गो-पालनाकडे वळवले. पाऊस पडला की नेहमीची शेती पुन्हा आहेच. शासन आणि व्यवसाय क्षेत्रसुद्धा विद्यापीठाच्या मागे खंबीरपणे उभे राहते. त्यामुळे दुष्काळ सहज पार पाडला जातो आणि म्हणूनच तेथील शेतकरी उद्‌ध्वस्त होत नाही, तर क.िठणातील कठीण आव्हान स्वीकारतो. दुष्काळाच्या समस्या शेतकऱ्यांनी शासनास सांगण्यापेक्षा शासनानेच शास्त्रज्ञांच्या साहाय्याने प्रत्यक्ष बांधावर जाऊन अभ्यास करावा आणि अभ्यासाअंती शाश्वत उपाययोजना करणे गरजेचे आहे. जेमतेम पाच इंच पावसावर इस्त्राईलमधील शास्त्रज्ञ, शासन आणि शेतकरी एकत्र येऊन अवघ्या जगाला दीपवून टाकणारी उत्कृष्ट शेती करून त्यातील अर्धी निर्यात करतात. आम्ही मात्र निराशेच्या गर्तेत बुडून जातो. वातावरण बदलामुळे हा दुष्काळाचा राक्षस यापुढे प्रत्येक खरीप आणि रब्बी हंगामास बळीराजाच्या लेकरांचे दार ठोठावणार आहे. आता पूर्वीसारखे बळीराजाचे राज्यही नाही आणि सेंद्रिय शेतीही नाही, जी शेतकऱ्यांचे रक्षण करू शकेल. अशा परिस्थितीत दिवाळीमधील दीपोत्सवाचा एक वेगळा अर्थ आणि संदेश आपण घेणे आवश्यक आहे.

पूर्वी बलिप्रतिपदेस शेतकरी स्वत: दीपोत्सव करून धनधान्याची कोठारे उजळत असे. आता हेच काम शासन आणि शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांना सोबत घेऊन करावे लागणार आहे. प्रत्येक पणतीला वावराचे रूप देऊन त्यात शासनरूपी तेल टाकून संशोधनाची वात लावूया. असे केले तर दुष्काळी वातावरणातसुद्धा ही पणती कायम तेवत राहील. शेतीतील अंधार दूर करणाऱ्या पणतीचे असे उजळणे, हीच खरी बलिप्रतिपदा!

डॉ. नागेश टेकाळे - ९८६९६१२५३१
(लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)
..............................

इतर संपादकीय
वृक्ष होऊन जगू यामागील आठवड्यात असाच एक मुलाखतीचा सुंदर, कार्यक्रम...
एकत्र या, निर्यात वाढेलकेंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतमाल...
कपाळावर कंकू नसेल; पण मनगटात ताकद आहे...शेतकरी मोर्चाच्या बॅनरपासून ते पहिल्या रांगेत...
शिल्लक कांद्याचे करायचे काय?कांद्याचे भाव दिवसेंदिवस खाली खाली येत आहेत....
ऑपरेशन ‘मनीऑर्डर’शेतीमालास मिळत असलेल्या अत्यंत कमी दराबाबत...
‘स्मार्ट’ पाऊल पडते पुढे प्रचलित बाजार व्यवस्थेत उत्पादक आणि ग्राहक या...
शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यातच... नियोजनवादी औद्योगिकीकरण दुसऱ्या महायुद्धानंतर...
शेत तेथे हवे शेततळेमहाराष्ट्रात २०१२ ते २०१४ सलग तीन वर्षे भीषण...
शेतीच्या शोषणातून आर्थिक विकास अशक्यभांडवलशाही औद्योगीकरण  सतराव्या शतकात...
संघर्ष वाढला; मदतही वाढवा वन्यजीव प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या...
काळ्या आईचे जपूया आरोग्यपृथ्वीवर निवास करणाऱ्या सुमारे ६.७ अरब...
यांत्रिकीकरणात घडवूया क्रांतीराज्यात आत्तापर्यंत १७१ अवजारे बॅंका तयार झाल्या...
शेतरस्त्यातून जाते देश विकासाची वाटजुन्या हैद्राबाद संस्थानातील जिल्ह्यांत...
अस्वस्थ वर्तमान अन् स्वस्थ शासनदेशाच्या कानाकोपऱ्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत...
शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी ‘स्मार्ट’...महाराष्ट्र शेतकरी उत्पादक कंपनी चळवळीत अग्रेसर...
शेती कल्याणासाठी हवे स्वतंत्र वीजधोरणसगळा भारत दीपोत्सव (दिवाळीचा सण) साजरा करत असताना...
सामूहिक संघर्षाचे फलितसामाजिक प्रतिष्ठेच्या आवरणाखालील मागासलेपणाच्या ...
कोरडवाहू शेतकऱ्यांना प्राधान्य कधी?२०१८ चा दुष्काळ हा ‘न भूतो न भविष्यती’ असा आहे....
कसे असावे इथेनॉल धोरण? इथेनॉलनिर्मितीबाबत प्रकल्प उभारणीस कर्जपुरवठा,...
नियमनमुक्तीचा खरा अर्थप्रचलित बाजार व्यवस्थेत शेतीमालाच्या लुटीबरोबर...