मेळघाटातील शेती आणि समाज

मैत्री स्वयंसेवी संस्था, पुणे आयोजित शिबिरासाठी मेळघाटातील अतिदुर्गम अशा अादिवासी बांधवांच्या भेटीसाठी दिनांक २३ ते २७ सप्टेंबर दरम्यान गेलो होतो. तेथील अादिवासी बांधवांच्या शेती पद्धतींबरोबरच त्यांच्या एकूणच जीवन संस्कृतीचा बारकाईने अभ्यास केला. त्याचाच हा वृत्तांत...
संपादकीय
संपादकीय

मेळघाटात अादिवासी शेतकरी बांधव अजूनही निसर्गाला अनुकूल असणारी शेती पद्धतीचा अवलंब करतात. त्या परिसरात मका, तांदूळ, सोयाबीन, कुटकी, ज्वारी, कोदो, हरभरा आणि गहू ही पारंपरिक पिके घेतली जातात. खरीप हंगामात तांदूळ, मका, कुटकी, सोयाबीन, सावरया, कोदो ही पिके घेतली जातात. ज्या शेतकऱ्यांना पाणी देण्याची व्यवस्था आहे ते शेतकरी रब्बीमध्ये हरभरा आणि गहू घेतात. मेळघाटातील शेतकरी घरचेच बियाणे वापरतात. मागील सुमारे दहा वर्षांपासून हळूहळू संकरित बियाणांनी या भागातील शेतीत शिरकाव केला आहे. येथील शेतकरी मुखत्वे तूर हे पीक आंतरपीक पद्धतीने घेतात. मेळघाटात वनसंपदा मुबलक असल्यामुळे शेती करण्यासाठी लाकडी अवजारांचाच वापर केला जातो.   मेळघाटात पावटा, मिरची, भोपळा, गवारी, पालक, मेथी ही भाजीपाला पिके खरीप हंगामात घेतली जातात. ज्या अादिवासी शेतकरी बांधवांकडे सिंचनाची सोय आहे. ते थोड्याफार प्रमाणात बागायती भाजीपाला करतात. मेळघाटात विहिरीचे प्रमाण तुरळक आहे. विहिरीचे पाणी उपसण्यासाठी मुख्यत्वे तेलपंपाचा वापर केला जातो. या भागात २०१५ च्या नंतर शासनाच्या माध्यमातून सोलार पंपाचे वाटप करण्यात आले. परंतु शेतकरी गरीब परिस्थितीत असल्यामुळे लोकवाटा भरण्यासाठीसुद्धा त्यांच्याकडे पैसे नाहीत. ज्या शेतकऱ्यांनी शासनाचा लोकवाटा भरला त्यांना सोलार पंप देण्यात आले. मैत्री स्वयंसेवी संस्था पुणे यांच्यातर्फे रुईपठार तालुका चिखलदरा येथे गावातील पाणीपुरवठा योजनेसाठी सोलार पंप देण्यात आला. २०१५ नंतर चिलाटी तालुका चिखलदरा आणि परिसरातील २० ते २५ गावांत वीजपुरवठा करण्यात आला. त्यांना मिळणारी वीज मध्य प्रदेश विद्युत मंडळाची आहे. राज्यात शेतीमध्ये रासायनिक खते आणि कीडनाशकांचा भरमसाट वापर केला जातो. अधिक उत्पादनासाठी शेतीला ओरबाडले जात आहे. त्यामुळे आपल्या शेतीची वाटचाल वाळवंटीकरणाकडे होत आहे. परंतु मेळघाटातील अादिवासी समाज शेतीचा वापर हे फक्त रोज लागणारे धान्य पिकविण्यासाठी करतो. जनावरांची संख्या अधिक असल्यामुळे शेतीला शेणखताचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे शेतीची अवस्था चांगली आहे. वनसंपदा विपुल असल्यामुळे जंगलातील गवताचा वापर चारा म्हणून केला जातो. मेळघाटातील शेतकरी मुख्यत्वे खरीप हंगामातीलच पिके घेतात. नोव्हेंबर डिसेंबरमध्ये या भागातील बहुतेक गावात फक्त ज्‍येष्ठ नागरिक असतात. डिसेंबर ते मे-जून ही सहा महिने अनेक शेतकरी कामाच्या शोधात गाव सोडून इतर भागात जातात. मेळघाटातील अादिवासी बांधवांचा वार्षिक प्रपंचाचा खर्च हा स्थलांतरातून मिळवलेल्या पैशातूनच भागवला जातो. आज प्रत्येकजण हा पैशाच्या मागे पळत असताना मेळघाटमधील शेतकरी आजही पोटापुरते मिळाले तरी आनंदी आहेत. राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्याने प्रशासनापुढे मोठी समस्या निर्माण केली आहे. परंतु मेळघाटात आत्महत्येसारखा प्रकार निदर्शनास येत नाही. यातून आपण या मागास म्हणविणाऱ्या आदिवासी बांधवाकडून काही बोध घेण्याची गरज आहे.

मेळघाटात मुख्यत्वे चार जमाती आहेत १) कोरकू ही जमात ८० टक्के आहे. कोरकुंचा मुख्य व्यवसाय शेती आणि मजुरी आहे. २) गोंड या जमातीचा व्यवसाय जनावरे सांभाळणे आणि शेती करणे आहे. या भागात मुख्यत्वे बैल जोपासण्याची परंपरा ही पुरातन आहे. तेथील स्थानिक देशी बैल आजूबाजूच्या परिसरात विक्रीसाठी पाठवली जातात आणि त्यातून अर्थार्जन केले जाते. ३) बलई (अनुसूचित जाती) या जमातीचा मुख्य व्यवसाय शेतमजुरी हा आहे. यांची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. ४) गवळी या जमातीचा मुख्य व्यवसाय पशुपालन करून दुध व्यवसाय करणे हा आहे. मेळघाटात मुख्य समाज कोरकू हाच आहे. बाकी जमाती तुरळक आहेत. सर्वत्रच समाज पैशाच्या अधीन जाऊन व्यसनाधीनतेकडे चालला आहे. त्यामानाने मेळघाटातील युवकांची शरीरसंपदा वाखाणण्याजोगी आहे. या भागातील युवकांना निसर्गदत्त शरीरसंपदा मिळालेली असल्यामुळे त्यांना थोड्याशा मार्गदर्शनाची गरज आहे. आज शहरी भागात लाखो रुपये खर्च करून खेळाडू घडविण्यासाठी अनेक संस्था काम करीत आहेत. या संस्थांनी उपजत गुण असलेल्या युवकांना मेळघाटात जाऊन प्रशिक्षण दिले तर त्यातून अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू आपण सहज घडवू शकू. गरज फक्त इच्छाशक्तीची आहे. मेळघाटातील अादिवासी बांधवांच्या अपेक्षा आपल्यापेक्षा अगदीच नगण्य आहेत. मैत्री स्वयंसेवी संस्थेने जसे आरोग्य सेवेत काम केले तसे अनेकांना वाव आहे. कारण काही युवक या संस्थेच्या माध्यमातून पुणे येथे धावण्याच्या स्पर्धेत सहभागी होत आहे. त्यामुळे त्यांच्यातील उपजत गुण हे समाजापुढे येत आहेत. आता हळूहळू या भागात शासनाच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य सुविधा पोचण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे युवकांचा शिक्षणाकडे ओढा वाढला आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून मेळघाटातील अनेक युवक पदवी मिळविण्याकडे वाटचाल करीत आहे. येथील युवक आणि युवती शिक्षित होत असल्यामुळे व्यसनाचे आणि अंधश्रद्धेचे प्रमाण हळूहळू कमी होत चालले आहे.

१९९७ मध्ये जेव्हा सकाळमध्ये आलेल्या कुपोषणाच्या बातमीचा संदर्भ घेऊन मैत्री संस्थेची एक टीम मु. सेमाडोह तालुका चिखलदरा येथून ४० कि.मी. जंगल तुडवत चिलाटी गावात पोचली होती. त्यावेळची परिस्थिती आणि आजच्या परिस्थितीत मोठा फरक पडला आहे. मेळघाटात शासनाच्या माध्यमातून आता हळूहळू रस्त्याचे काम मोठ्या प्रमाणात चालू आहे. परंतु वनविभागाचे कायदे केंद्र सरकारचे आहेत. त्यामुळे राज्य सरकारचे काम धिम्यागतीने चालते. काही भाग हा व्याघ्र प्रकल्पात येत असल्यामुळे तेथे विकासकामांसाठी अडचणी येतात. आधुनिकतेच्या नावाखाली आज पृथ्वीवर प्रदूषणाचे प्रमाण भस्मासुरासारखे वाढत चालले आहे. त्यावर मोठमोठी चर्चासत्रे आणि परिसंवाद आयोजित केले जातात, तरीही शहरी किंवा ग्रामीण समाज अजून प्रदूषणाप्रती जागृत झालेला दिसत नाही. त्यामानाने मेळघाटात प्रदूषणाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. मेळघाटात शहरी भागातील फिरायला जाणारे नागरिक प्लॅस्टिकचा भस्मासूर सोडून येत आहेत. यावर विचार करण्याची वेळ आली आहे. येथील पर्जन्यमान झपाट्याने कमी होत आहे. मेळघाटातील अादिवासी बांधवांचा काहीही दोष नसताना त्याची शिक्षा त्यांना विनाकारण मिळत आहे. या परिसराचे जसजसे रस्त्याचे जाळे विणले जात आहे. तसे तेथे शहरी व्यसने पोचण्यास सुरवात झाली आहे. सुधारणेबरोबर समाज विघातक व्यसने तेथे पोचणे ही तेथील सुदृढ समाजाच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे.

- दीपक जोशी: ९८५०५०९६९२ (लेखक प्रगतशील शेतकरी आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com