वाढते नैसर्गिक आणि सामाजिक प्रदूषण

सदाचार, सद्‌गुण, बंधुता, प्रामाणिकता, नीतिमत्ता, एकोपा, जिव्हाळा या सर्व गोष्टी अमलात आणणे आज काळाची गरज असून, ही विधायक कृत्ये जोपर्यंत समाजामध्ये मी माझ्यापासून सुरवात करीत नाही, तोपर्यंत सामाजिक प्रदूषण कमी होणार नाही.
संपादकीय
संपादकीय

काळानुसार निसर्गामध्ये खूप बदल होत आहे. सर्व ऋतूत- उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, योग्य वेळी येणारा पाऊस या घटनाक्रमात बदल होत आहे. त्यामुळे त्याचा ठपका आपण निसर्गावर ठेवून या कलियुगात निसर्गाच्या लहरीप्रमाणे पाऊस पडतो, असे म्हटले जाते. वेळेवर पाऊस न पडणे, मॉन्सून वेळेवर न येणे, काही ठिकाणी अतिवृष्टी होणे, त्यामुळे जीवित हानी, मालमत्तेचे नुकसान वाढले आहे. केरळ राज्यात पुराने घातलेले थैमान सर्वांनी पाहिले आहे. या वर्षी भारताच्या बऱ्याच भागांत चांगला पाऊस झाला, पण काही भागांत उदा. महाराष्ट्रात (त्यातल्या-त्यात) मराठवाड्यात पाऊस झालाच नाही. त्यामुळे खरिपातील बरीच पिके हातची गेली. दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली. अनेक शास्त्रज्ञांचे, हवामान खात्याचे अंदाज व्यर्थ ठरले. विज्ञानक्षेत्रामध्ये अनेक शोधामुळे भौगोलिक परिस्थितीवर पर्यायाने, निसर्गावरच मात करण्याचा खटाटोप मनुष्य करीत आहे. नव-नवीन शोधामुळे निसर्गातील हवा, पाणी प्रदूषण वाढले आहे. जंगल नष्ट होत आहे. त्या ठिकाणी औद्योगिक कारखाने, इतर विकासकामे होत आहेत. या अडथळ्यांमुळे निसर्गाचे संतुलन बिघडत चाललेले असून, त्याचा परिणाम ऋतूवर होत आहे. मग हे म्हणणे कितपत खरे आहे, की निसर्गाच्या लहरीपणामुळे पाऊस पडतो. असे नव्हे, तर मनुष्याच्या भौतिक सुखासाठी निसर्गाचा दुरुपयोग करून घेत असल्यामुळे ऋतू वेळेवर आपले काम करू शकत नाही. निसर्गाचे संतुलन मानवानेच बदलले, असे म्हटले तर वावगे होणार नाही.

याचबरोबर समाजामध्ये आपले पूर्वज कशा पद्धतीने राहत होते, त्यांच्यामध्ये सामाजिक समतोल किती चांगल्या प्रकारे असायचा, सामाजिक संतुलनासाठी अनेक नियम केले जात असत. परंतु, आज ही बंधने सैल झालेले असून, माणूस स्वतःला जसे वाटेल तसे वागू लागलेला आहे. आपण अमूक कृत्ये केल्यामुळे कलंकित होऊ, अशी भीती कुणालाच उरलेली नाही. याचे कारण आम्ही आज पूर्वजांप्रमाणे निसर्गाच्या सान्निध्यात राहत नाही व निसर्गाकडून आपण काही बोधही घेत नाही. पक्षी, जनावरे, मुंग्या या एकत्र कळपाने राहतात, हे आमचे पूर्वज जवळून पाहत असत. तसेच, मोठमोठे वृक्ष, नद्या, सागर, डोंगर, पर्वत या सर्वांकडे पाहून चिंतन करीत असत. वृक्षापासून सुखद सावली, फळं-फुलं, नद्यांपासून पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी, डोंगर माथ्यावर शुद्ध हवा या निसर्गाच्या खऱ्या चमत्काराचे व वास्तवाचे चिंतन आमचे पूर्वज करीत होते. निसर्ग हा जातीयवाद, गरीब, श्रीमंत असा भेदभाव करीत नाही, हे ते निसर्गाकडून, अनुभवत असत व त्यापासून शिकत असत. त्याचप्रमाणे समाजामध्ये वावरत असत. वृक्षवल्लीबरोबरच पाण्यातील प्राणी, जंगलातील प्राणी हेही आमचे सगेसोयरेच आहेत, असे नाते ते जपत असत, पण अलीकडे नेमके या नात्याचे जतन आम्ही केलेच नाही, याची जाणीव ठेवलीच नाही. निसर्गाचे अनुकरण केलेच नाही. उलट आम्ही त्यावर स्वार झालो आहोत. त्यामुळे निसर्गाचे व समाजाचे संतुलन बिघडलेले आहे. निसर्गाचे संतुलन कायम राखण्यासाठी वृक्षारोपण, पाणी अडवा, पाणी जिरवा, अवैध वाळूउपसा, निसर्गाशी छेडछाड न करणे, असे अनेक उपाय करता येतात; पण सामाजिक प्रदूषण दूर करण्यासाठी समाज म्हणून आपण काही सुरवात करणार किंवा नाही? समाजाचे प्रदूषण आधी कमी करणे आवश्‍यक आहे. एकदा का समाजाचे प्रदूषण कमी झाले, की शुद्ध सामाजिक मन तयार होईल व निसर्गावर मात न करता समाज निसर्गामधील प्रदूषण कमी करेल.

आजच्या या जीवघेण्या स्पर्धेमध्ये भ्रष्टाचार, गुंडगिरी, जातीयवाद, भोंदुगिरी, अंधश्रद्धा, लालच या सर्व बाबींमुळे माणूस स्वार्थी होत चालला आहे. त्यामुळे सामाजिक प्रदूषण वाढत आहे. सदाचार, सद्‌गुण, बंधुता, प्रामाणिकता, नीतिमत्ता, एकोपा, जिव्हाळा या सर्व गोष्टी अमलात आणणे आज काळाची गरज असून, ही विधायक कृत्ये जोपर्यंत समाजामध्ये मी माझ्यापासून सुरवात करीत नाही, तोपर्यंत सामाजिक प्रदूषण कमी होणार नाही.

21 व्या शतकाकडे वाटचाल करीत असताना शिक्षणक्षेत्रात ज्या ठिकाणी नवीन पिढी घडते त्यांच्यावर चांगले संस्कार घडतात, त्या ठिकाणी राजकीय हस्तक्षेप होऊन अशा प्रकारे बरेच शिक्षण क्षेत्र भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. सहकार क्षेत्रातसुद्धा या भ्रष्टाचाराची लागण झालेली आपण पाहत आहोत. लोकशाहीमध्ये समाजाचा अविभाज्य घटक म्हणजे राजकीय क्षेत्र. जनतेने जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी निवडून दिलेले राजकीय क्षेत्रसुद्धा या भ्रष्टाचाराला जवळ घेऊन गरीब जनतेसाठी नव्हे, तर स्वतःसाठी सगे-सोयरे, नातेवाइकांसाठी सत्तेचा दुरुपयोग करीत आहेत. या सर्व क्षेत्रांतील भ्रष्टाचाराच्या भस्मासुरामध्ये समाजामध्ये प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे समाजाचा समतोल सुटत चालला आहे. समानतेचा विचार मांडून आचरणात आणण्याकरिता राज्यकर्त्यांना वेळ नाही. संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान, शिवकालीन पाणी योजना, अशा महापुरुषांची नावे देऊन समाजामधील समतोल व निसर्गामधील प्रदूषण कमी करण्याचे एकीकडे प्रयत्न केले जातात; तर दुसरीकडे शासकीय योजनांमध्ये भ्रष्टाचार बोकाळत चालला आहे. बोटावर मोजण्याइतके अधिकारी-पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते चांगले व प्रामाणिक असून जमणार आहे का? गुटका बंदी, प्लॅस्टिक बंदी जाहीर केली जाते. प्रत्यक्षात बंदी असलेली बहुतांश उत्पादने बाजारात राजरोसपणे मिळतात. कायदे आहेत; परंतु त्यांची अंमलबजावणी होत नाही.

कायद्यात अनेक पळवाटा असतात. अनेक वेळा शासन प्रशासनाला लाच देऊन गुंड प्रवृत्तीचे लोक, समाजातील धनदांडगे लोक कायद्याचे उल्लंघन करतात, हे वास्तव आपणास नाकारता येणार नाही. आज नकली दारूच्या सीलबंद बाटल्यांची सर्रास विक्री ही संगनमतानेच चालू आहे. संरक्षित वनक्षेत्र, शहरांमधील झाडे न तोडण्यासाठीचा कायदा आहे, पण प्रत्यक्षात अवैध वृक्षतोड करून शहरात लाकडाच्या मोठमोठाल्या गाड्या भरून येतात, सौदे होतात, विक्री होते. हे सर्व एकमेकांच्या संगनमतानेच होते ना? या सर्व बाबींमुळे सकारात्मक काम करणारे सर्व क्षेत्रातील अधिकारी, पदाधिकारी समाजाच्या कसोटीत व परीक्षेत टिकत नाहीत. नाइलाजास्तव बरीच मंडळी सकारात्मक दृष्टी ठेवून वाटचाल करतात, ते दुर्लक्षित होतात. सामाजिक समतोल हा विघातक नाही, तर सर्वांकडून होत असलेल्या विधायक कामावर साधता येतो, हे लक्षात घेऊन वाटचाल करावी लागेल. - लक्ष्मीकांत कंकाळ ः 9422216608 (लेखक शेती प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com