तुझे आहे तुजपाशी

अनेक प्रयोग केल्यानंतर 60 सें. मी. खोलीपर्यंत ओलावा गेला तरी कापूस उत्तम पिकतो असे इस्त्राईलमध्ये आढळले. साध्या प्रयोगातून मिळालेल्या निष्कर्षामुळे पाण्याची तीनपट बचत झाली. असे प्रयोग सगळीकडे व्हावेत आणि कोणत्या पिकाला किती पाणी द्यायचे, ते शेतकऱ्यांना सतत शिकवत जावे.
संपादकीय
संपादकीय

जगाच्या सरासरीच्या दीडपट पाऊस भारतात पडतो तरी जल दरिद्री देशात आपला क्रमांक वरचा आहे. भांडवली जगात पाणी ही सर्वात जास्त नफा मिळवून देणारी क्रयवस्तू ठरवली गेली आहे. वर्ल्ड वॉटर व्हिजनच्या अहवालानुसार, जगातील कोट्यवधी लोकांना आजही दिवसाला 20 लिटरपेक्षा कमी पाणी मिळते. 2025 पर्यंत 200 कोटी लोक पाणी तुटवड्याने ग्रस्त होतील. महाराष्ट्रात प्रतिव्यक्ती प्रतिवर्षे 2076 घ.मि. पाणी उपलब्ध आहे. पाण्याची उपलब्धता 1000 घ.मि./व्यक्ती/वर्षे असेल तर त्या प्रदेशाला रुक्ष प्रदेश म्हणतात, असा युनोचा निकष आहे. जागतिक पाणी परिषदेच्या अहवालानुसार भारतात पाणी परिस्थिती फार बिकट आहे. त्याची कारणे अशी आहेत... - असमान पाऊस - पाण्याचा गैरवापर व बेफिकिरी भारताऐवढी जगात कुठेही नाही. - पाणी व्यवस्थापन अगदीच दुबळे आहे. - पाण्याच्या बेछुट वापराने पश्‍चिम महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा या राज्यांत जमिनी नापीक झाल्या. - जलसंधारणाचा कुठलाही मोठा प्रकल्प पूर्ण झाला नाही. देशातल्या 3800 प्रथमश्रेणी धरणांपैकी 1800 धरणे (जवळ जवळ 50%) महाराष्ट्रात आहेत. लघू व मध्यम प्रकल्प हजारोंच्या संख्येत तर पाझर तलाव, नाला बंधारे लाखोच्या संख्येत आहेत. सर्व मिळून सिंचन 18 टक्के असून त्यात विहिरीवरचे सिंचन 10 टक्के आहे. राज्यातल्या 44 हजार गावांपौकी 20 हजार गावात भीषण पाणीटंचाई आहे. अवर्षण प्रवण गावात एखाद्या वर्षी पाऊस पडला नाही तरी पाणीटंचाई होऊ नये म्हणून जलसंधारणाची कामे केली जातात. 1943 सालापासून (गेली 75 वर्षे) जलसंधारण कार्यक्रम राबवला जात आहे. अब्जावधी रुपये खर्च झाले आहेत. शेकडो कोटी मनुष्य दिवस खर्ची पडले. एवढा पैसा, श्रम आणि वेळ खर्च झाला; राज्यातली बोटावर मोजण्याएवढीही गावे जलसमृद्ध होऊ शकली नाही. "देणाराने खूप दिले, घेणाऱ्याची झोळी फाटकी,' हे वर्णन आपल्या देशाला तंतोतंत लागू पडते. पाण्याचा तुटवडा भासतो तेव्हा माणूस हरहुन्नराने त्याच्या उपलब्धतेसाठी प्रयत्न करतो. आमच्या एका शेतकरी मित्राने 80 एकरांत 100 बोअर करून एका मोठ्या शेततळ्यात पाणी साठवून तेथून शेतीला सिंचनाची व्यवस्था केली आहे. काही कुटुंबात एक दोन पिढ्या विहिरी खोदण्याचा धुमधडाका चालू असतो. शेवटी नशिबात पाणी नाही म्हणून प्रयत्न सोडून दिले जातात. काही ठिकाणी 60 -70 फूट विहिरी खोदूनही पुरेसे पाणी न मिळाल्यास उभे-आडवे बोअर करून विहिरीत पाणी खेचून आणायचा प्रयत्न होतो. कोरड्या भूगर्भात पाणी कुठे असेल ते सांगता येत नाही, म्हणून जुने लोक जमिनीत आडवा बोगदा खोदायचे. मुखापासून अंतर वाढेल तशी बोगद्याची खोली वाढायची. म्हणजे बोगदा जमिनीला समांतर न राहता तिरकस खोल व्हायचा. जिथे पाणी लागेल तिथून भूजल पातळीपर्यंत बोगद्यात पाणी भरायचे. बोगद्यात तळापर्यंत पायऱ्या असायच्या. पिण्यासाठी पायऱ्या उतरून पाणी काढले जाई. याला शाफ्ट पद्धतीची विहीर म्हणायचे. बीड शहराजवळची खजाना बावडी काहीशी अशाच प्रकारची आहे पण शाफ्टच्या मुखाशी विहीर असून दुसऱ्या बाजूला नैसर्गिक उताराच्या बोगद्याने पाणी खाली जमिनीच्या पृष्ठभागावर येते. हेमाडपंथी मंदिरासमोर बारव असायची. बारव मंदिराचा भाग असल्यामुळे तिचे पाणी तीर्थ मानले जायचे. जिथे पाणी सहजगत्या उपलब्ध नसते तिथे ते काटकसरीने वापरले जाते. नळ नसलेल्या गावात डोक्‍यावर पाणी वाहून साठवले जाते. अशा गावात दर माणसी पाणी वापर 20-25 लिटरपेक्षा जास्त नसतो. देशातली बहुतांश खेडी व वाड्या वस्त्यांवर अशीच परिस्थिती आहे. विहिरीचे पाणी सिंचनासाठी काटकसरीने वापरले जाते. त्या उलट कालव्याचे पाणी अनिर्बंध पद्धतीने वापरण्यात येते. पाण्याची कमतरता आणि काटकसर सर्वात जास्त राजस्थानात पहायला मिळते. राजस्थानच्या अकरा जिल्ह्यात देशात सर्वात कमी पाऊस पडतो. तिथे सर्वात जास्त उष्णता आहे. वाळूची वावधाने येतात. बारीक रेतीचे प्रचंड ढीग पंख लावल्यासारखे इथून तिथे उडत जातात. जैसरमेल, बाडमेर आणि बिकानेर या तीन जिल्ह्यांत परिस्थिती फारच बिकट आहे. त्यामुळे इथे पाण्याचा जास्त अभाव असायला पाहिजे होता, पण या अतितुटीच्या तीनही जिल्ह्यांतल्या प्रत्येक गावात गरजे पुरते पाणी नेहमी असते. विशेष म्हणजे या सर्व गावांनी स्वत:च्या प्रयत्नातून पाण्याच्या बाबतीत स्वावलंबन मिळवले आहे. जैसरमल जिल्ह्यात एकही बारमाही नदी नाही. भूजल पातळी 125 ते 400 फूट खाली आहे. वर्षातल्या फक्त 10 दिवसांत 160 मि.मि. पाऊस पडतो. लोकांनी या दहा दिवसांत पावसाचे करोडो थेंब पडताना बघितले आणि घरा घरात, गावागावात, शहराशहरात ते थेंब साठवायचे काम केले. थेंब ना थेंब साठवला आणि साठवलेल्या पाण्याचा अत्यंत काटकसरीने उपयोग करायच्या तंत्राचा अंगिकार केला. तुटीच्या पावसाचा देश म्हणून इस्त्रायलचे नाव सगळेच घेतात. तिथे उत्तरेत थोडा पाऊस पडतो आणि दक्षिणेचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग वैराण वाळवंट आहे. वाळवंटात पाण्याशिवाय शेती होऊ शकत नव्हती आणि वाळूत प्रवाही पद्धतीने सिंचन शक्‍य नव्हते. या अडचणीतून ठिबक पद्धतीचा जन्म झाला आणि या पद्धतीच्या शोधामुळे सिंचन क्षेत्रात जगात क्रांती झाली. कापूस हे इस्त्रायलचे महत्त्वाचे पीक आहे. कापसाची त्यांची उत्पादकता जगात सर्वांत जास्त आहे. कापसाच्या मुळ्या जमिनीत खोल जातात. मूळ संस्थेचा अभ्यास करून कापसाच्या शेतात दीड मीटर खोलीपर्यंत ओलावा जाईल, असे पाणी देणे सुरू झाले. एका पिकाला एवढे पाणी म्हणजे कहर होता. अनेक प्रयोग केल्यानंतर 60 सें. मी. खोलीपर्यंत ओलावा गेला तरी कापूस उत्तम पिकतो असे आढळले. साध्या प्रयोगातून मिळालेल्या निष्कर्षामुळे पाण्याची तीनपट बचत झाली. असे प्रयोग सगळीकडे व्हावेत आणि कोणत्या पिकाला किती पाणी द्यायचे ते शेतकऱ्यांना सतत शिकवत जावे. विहिरीच्या बाबतीत त्यांनी असेच प्रयोग केले. विहिरी खोल करत करत 2000 मीटर खोलीवर त्यांना न संपणारा पाणी साठा सापडला. निकडीच्या वेळेला दोन कि.मी. खोलीवरचे पाणी उपसून ते शेतीला देतात. पाणी प्राणापेक्षा अधिक मोलाचे आहे. पाण्याने जीवनमान सुधारते. पाण्याच्या गैर वापराने संस्कृती नष्ट होतात. याचे भान जलसंपदा विभागाला व्हावे. या विभागाने चालवलेला पाण्याचा विध्वंस थांबवला नाही तर शेती बरबाद होईल. भयानक दुष्काळाला सामोरे जावे लागेल.

बापू अडकिने : 9823206526 (लेखक महाराष्ट्र सिंचन सहयोगचे उपाध्यक्ष आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com