जनुकीय सुधारणेचा "गोवर्धन' सेवा केंद्रांना पेलवेल?

गोवंश सेवा केंद्रात येणारा गोवंश एका विशिष्ठ शुद्ध भारतीय गोवंशाचा राहणार नाही. तिथे त्यांचे मुक्त गोठा पद्धतीमध्ये संगोपन आणि संवर्धन होणार आहे. अशावेळी नैसर्गिक संयोगामुळे अंतर प्रजननाची शक्‍यता जास्त आहे.
संपादकीय
संपादकीय

गोवंश हत्या बंदी हा कायदा देशभरात लागू झाला, त्यास महाराष्ट्र राज्य ही अपवाद नाही. या कायद्यामुळे अनेक प्रश्‍न तयार झाले आहेत. आपण एक सत्य स्वीकारले पाहिजे ते हे की आपल्या देशात जे काही पशुधन आहे ते बहुतांश अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक किंवा भूमिहीन शेतमजूर यांच्याकडे आहे. सर्वसाधारणपणे भाकड गाई, वयस्क गाई, कमी वजनाच्या शारीरिक वाढ न झालेल्या कालवडी, दोन - तीन वर्षे गाभण न राहणाऱ्या गाई, सतत गाभ बाहेर टाकणाऱ्या गाई, त्याचप्रमाणे वयस्क बैल, शेतीकाम-ओढकामासाठी उपयुक्त नसणारे बैल, अपंगत्व आलेले बैल, गाय, कालवड, वासरे, सतत आजारी असणारे पशुधन, असे अनउत्पादक पशुधन पशुपालक मरेपर्यंत सांभाळू शकत नाही. कारण ते स्वतःच दारिद्य्ररेषेखालील जीवन कंठत असतात. हे ग्रामीण भागातले वास्तव आहे. त्यासाठी अनत्पादक पशुधन विकल्याशिवाय दुसरा मार्गच नसतो. बाजारात असे पशुधन कोण विकत घेतो? तो कशासाठी विकत घेतो? त्याचे पुढे काय होते, हे कोणी सांगण्याची गरज नाही आणि पशुपालकांना त्याबाबतचे सोयरसुतकही नाही. आजघटकेला अशा अनउत्पादक पशुधन विकल्याने त्यांचा सांभाळण्याचा खर्च वाचतो आणि चार पैसेही मिळतात. हलाखीच्या आर्थिक परिस्थितीत जीवन कंठणाऱ्या पशुपालकांच्या संसाराला थोडाफार आर्थिक हातभार लागतो. आज शासन गोवंश हत्याबंदी याबाबत आग्रही का? हे समजून घेण्यासाठी गोविज्ञान काय आहे? हे समजून घ्यावे लागेल. ए-वन आणि ए-टू दुधाचा सिद्धांत - विदेशी गोवंशाचे दूध वापरल्यामुळे क्षयरोगाच्या बरोबरीने हृदय रोग होऊ शकतो, असे संशोधन न्यूझीलंड आणि आफ्रिकेतील मानवाच्या डॉक्‍टराने केले. त्यातूनच ए-वन आणि ए-टू दुधाचा सिद्धांत 1993 मध्ये मांडला गेला. - युरोपियन गाईच्या दुधात ए-वन बीटाकेसीन असते. त्याचे आताड्यात पचन होऊन बीटाकेझोमॉरफीन 7 हे पेप्टाईड तयार होते. - हे तयार झालेले बीटाकेझोमॉरफीन 7 रक्तात शोषले गेल्यास पहिल्या प्रकारचा मधुमेह, हृदयरोग, सिझोफ्रेनिया, स्वमग्नता सारखे रोग होतात, असे संशोधनात आढळून आहे. (डॉ. किथ वडूफोर्ड संशोधक यांचा सिद्धांत) या सिद्धांताचा परिणाम - न्यूझीलंडमधील गोपालक यांनी भारतीय गोवंशाच्या वळूचे वीर्य वापरून ए-वन गोवंशाचे ए-टू गोवंशात रुपांतर करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. - आज इंग्लंड, चीन, ऑस्ट्रेलिया आणि भारतात ए-टू दुधाची विक्री केंद्रे उघडली आहेत. या ए-टू दुधाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. - भारतीय गोवंशाचे दूध हे ए-टू चे असल्यामुळे मानवी आरोग्यास सुरक्षित आहे, असे सध्या मानले जाते.

शुद्ध भारतीय गोवंशाचे रोगप्रतिकाशक्ती, निष्कृष्ट वैरणीवर उत्कृष्ट उत्पादनक्षमता, कोणत्याही वातावरणाशी सहज समरस होऊन उत्पादन क्षमतेमध्ये सात्यत, हे अनुवंशिक गुणधर्म आहेत. भारतीय गोवंशाच्या गाईच्या दुधात तुपात, दह्यात, ताकात, गोमुत्रात अनेक औषधी गुणधर्म आहेत. त्यांच्यापासून उत्कृष्ट प्रकारचे सेंद्रिय खत मिळते, अशा गुणधर्मामुळे संपूर्ण मानव जातीचे लक्ष शुद्ध भारतीय गोवंशाकडे लागलेले आहे. असा गुणसंपन्न शुद्ध भारतीय गोवंश वाचला पाहिजे, जगला पाहिजे आणि भारतीय गोवंशाचे जतन, संगोपन, आणि संवर्धन हे पशुवैद्यकीय शास्त्राच्या सर्व कसोट्या लावून झाले पाहिजे, ही शासनाची धारणा आहे, याबाबत शंका घेण्याचे कारण नाही. या सर्व बाबींचा सारासार विचार करून शासनाने मुंबई आणि उपनगर हे जिल्हे सोडून 21 जिल्ह्यांमध्ये स्वयंसेवी संस्थांद्वारे गोवर्धन गोवंश सेवा केंद्राची स्थापना करण्यात आली. या सर्व गोवर्धन गोवंश सेवा केंद्रास प्रत्येकी 1 कोटी रुपयांचे अनुदान 4 टप्प्यात वितरण करण्यात येणार असून, यापैकी पहिल्या टप्प्याचे 25 लाख रुपये अनुदान संबंधित सेवा केंद्रांना वितरीत करण्यात आले आहे. या गोवर्धन गोवंश सेवा केंद्रात शेतकऱ्यांकडील अनउत्पादक गाई, वयस्क गाई, अपंग गाई, वयस्क बैल, वयात येऊनही गाभण न राहणाऱ्या कालवडी, अशक्त दुबळी नर, माद्या, वासरे, कोणाचीही मालकी नसणाऱ्या गाई, कालवडी, बैल, खच्ची केलेले आणि खच्ची न केलेले नर, तसेच आजाराने त्रस्त झालेले बैल, गाई, कालवडी यांचे संगोपन आणि संवर्धन होणार आहे. या गोवंश सेवा केंद्रात समाविष्ट झालेल्या पशुधनास आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. गोवंश सेवा केंद्रात येणारा गोवंश एका विशिष्ट शुद्ध भारतीय गोवंशाचा राहणार नाही. तिथे त्यांचे मुक्त गोठा पद्धतीमध्ये संगोपन आणि संवर्धन होणार आहे. अशावेळी नैसर्गिक संयोगामुळे अंतर प्रजननाची शक्‍यता जास्त आहे,

त्यामुळे निष्कृष्ट उत्पादन क्षमता असणाऱ्या वासरांची पैदास होणे अटळ आहे. प्रजनन संस्थेच्या रोगाने बाधित झालेल्या गाई, कालवडीमध्ये नैसर्गिक संयोग घडल्यास वळूदेखील बाधित होतो. अशा रोगाने बाधित झालेल्या वळूंच्या नैसर्गिक संयोगामुळे गोवंश सेवा केंद्रातील इतर गाई, कालवडीमध्ये प्रजनन संस्थेचे रोग होऊ शकतात. हे सर्व टाळण्यासाठी 100 टक्के निकृष्ट वळूचे योग्य वेळी योग्य वयात खच्चीकरण करण्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. गोवर्धन गोवंश सेवा केंद्रातील देशी गाई कालवडीमध्ये अनुवंशिक सुधारणा करण्यासाठी उच्च प्रतीच्या शुद्ध भारतीय गोवंशाच्या वळूच्या रेतमात्रा, कृत्रिम रेतनासाठी उच्च प्रतीच्या वळूच्या रेतमात्रा, कृत्रिम रेतनासाठी वापरणे हाच मुळी अनुवंशिक सुधारणेचा आत्मा आहे आणि याच माध्यमातून गोवर्धन, गोवंश सेवा केंद्रातून दर्जेदार गोवंश पशुपालकांना खरेदीसाठी उपलब्ध होईल. ही योजना राबवण्याचा शासनाचा हेतू चांगला आहे. हे साध्य करावयाचे असेल तर संस्थाचालकांना पशुवैद्यकीय शास्त्रातील व्यवस्थापनशास्त्र, आरोग्यशास्त्र, आहारशास्त्र आणि प्रजननशास्त्र यांचे आकलन होणे गरजेचे आहे. गोसेवा, गोप्रेम गोविज्ञान हा त्याचा स्थायीभाव असला पाहिजे. शुद्ध भारतीय गोवंशाचे जतन, संगोपन, आणि संवर्धन हा त्यांचा श्‍वास आणि ध्यास पाहिजे, अनुवंशिक सुधारणा कार्यक्रमातील सर्व नोंदी ठेवणे गरजेचे आहे. या सर्व प्रक्रियेतूनच शुद्ध भारतीय गोवंशाची शुद्धता जपली जाईल.

पशुवंश संवर्धन आणि जतन ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. गोवंश सेवा केंद्र चालवणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना हा गोवर्धन पेलवेल का? वास्तविक तो पेलवला पाहिजे. असे न झाल्यास गोवर्धन गोवंश सेवा केंद्रातील जनुकीय सुधारणा कार्यक्रम म्हणजे गाडीबरोबर नळ्याची यात्रा, असे स्वरुप राहील. गोवंश सेवा केंद्रातील गोवंशाचे संगोपन पशुधन मरेपर्यंत होईल, पण जनुकीय सुधारणा कार्यक्रमाचा हेतू साध्य होणार नाही. - डॉ. श्रीकांत सरदेशपांडे लेखक सेवानिवृत्त पशुधन विकास अधिकारी आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com