‘रेसिड्यू फ्री’ शेतीतून गुणवत्ताप्राप्त उत्पादन, बाजारपेठही केली साध्य

‘रेसिड्यू फ्री’ शेतीतून गुणवत्ताप्राप्त उत्पादन, बाजारपेठही केली साध्य
‘रेसिड्यू फ्री’ शेतीतून गुणवत्ताप्राप्त उत्पादन, बाजारपेठही केली साध्य

स्थावर मालमत्ता व्यावसायिक उद्योगातील दोन तरुणांनी एकत्र येत काळाची गरज ओळखून रासायनिक अवशेषमुक्त (रेसीड्यू फ्री) शेती सुरू केली आहे. कमीत कमी मानवी हाताळणी, शेतीचे काटेकोर व आंतरराष्ट्रीय निकषांनुसार व्यवस्थापन करीत उच्च दर्जाच्या विविध शेतमालाचे उत्पादन ते घेत आहेत. आपल्या उत्पादनांना पुणे, मुंबई, बंगळूर आदी विविध ठिकाणी व आघाडीच्या स्टोअर्समध्ये बाजारपेठ मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न व कौशल्य प्रशंसनीय आहेत.   

स्था वर मालमत्ता व्यावसायिक घराण्यातील दोन तरुण मुले एकत्र येतात. शेतीत काही करू इच्छितात ही बाबच मुळातच अनोखी आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग (पुणे) आणि त्यानंतर व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर शिक्षण (मुंबई) घेतल्यानंतर नीलेश पलरेशा यांनी ‘शेतापासून ताटापर्यंत’(फार्म टू फोर्क) या संकल्पनेवर काम सुरू केले. पलरेशा कुटुंबीयांची रांजणगाव गणपती देवस्थानापासून जवळ मलठण (ता. शिरूर, जि. पुणे) येथे  ‘कॅनॉल’लगत सुमारे १०० एकर शेती आहे. स्वच्छतेची काळजी घेत कमीत कमी हाताळणीसह ‘रेसीड्यू फ्री’ शेतमाल उत्पादन घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. सिंचनासाठी शेतात दोन विहिरी आहेत. त्यातील एका विहिरीलाच जिवंत झरे आहेत. त्यामुळे शाश्वततेसाठी सुमारे २.५ कोटी लिटर क्षमतेची दोन शेततळी आणि ६५ लाख लिटर क्षमतेचे एक शेततळे उभारले. सपाटीकरणापासून लागवडयोग्य होण्यापर्यंत जमिनीची सुधारणा केली. यात सुमारे ९.४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. आपण पिकवलेल्या मालाच्या अवशेषमुक्त गुणवत्तेची बाजारात खात्री पटवून देण्यासाठी ‘अर्थफूड’ ब्रॅण्ड तयार करण्याकडे लक्ष दिले.  

‘स्टार्टअप’ने घेतला आकार पलरेशा आणि सिद्धार्थ खिंवसरा हे दोघे मित्र. त्यांच्यामध्ये नेहमी शेतीतील भविष्यातील प्रकल्पांविषयी चर्चा होई. सिद्धार्थ यांचे थारपारकर गायींचे पालन आणि ए टू दूध उत्पादनाविषयी प्रयत्न सुरू होते. नियमित होणाऱ्या चर्चांमधून दोघांनी वेगवेगळे प्रयत्न करण्याऐवजी एकत्रितपणे प्रकल्प सुरू करण्याचा विचार केला. गाईंचा प्रकल्प हा शेतीशी जोडून सहजपणे पुढे जाऊ शकतो इथपर्यंत दोघांचेही एकमत झाले. ‘रायराह ग्रुप’ ने या ‘अर्थफूड’मध्ये सुमारे ६.४ कोटी रुपये गुंतवणूक करत ३० टक्के हिस्सा घेतला. थोडक्यात पुण्यातील बांधकाम क्षेत्रात नावाजलेला ‘व्हीटीपी’ आणि ‘रायराह’ हे दोन उद्योगसमूह रासायनिक अवशेषमुक्त शेती संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी एकत्र आले. त्यातून हा ‘स्टार्टअप’ सुरू झाला. यात सिद्धार्थ यांनी नव्या बाजारपेठ विकास, नवीन तंत्रज्ञान वापर यासह धोरणात्मक बाबींवर लक्ष केंद्रित केले.  

‘अर्थफूड’ची वैशिष्ट्ये

  •   ग्लोबलगॅप’च्या सर्व निकषांचे काटेकोरपणे पालन
  •   अत्यंत स्वच्छ, आरोग्यपूर्ण वातावरणामध्ये पीक लागवड, व्यवस्थापन, काढणी आणि काढणीपश्चात प्रक्रिया  
  •   ताजी उत्पादने ग्राहकांच्या हाती देण्याचा प्रयत्न. प्रत्येक उत्पादनाची अंतिम तारीख निश्‍चित केलेली असते. त्या दरम्यान उत्पादन विकली न गेल्यास ती ‘शेल्फ’वरून दूर केली जातात.
  •   ''झीरो रेसीड्यू फ्री’ उत्पादने- रसायनांचा वापर टाळून पर्यावरणपूरक सेंद्रिय घटकांचा वापर. रासायनिक घटकांचा वापर केला तरी त्यांचे अवशेष राहणार नाहीत याची योग्य ती शास्त्रीय काळजी घेतली जाते.  फवारणीसह प्रत्येक निविष्ठा वापरांच्या नोंदी काटेकोरपणे ठेवल्या जातात.
  •   काढणीपासून ग्राहकांच्या हाती शेतमाल पोचेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर व्यक्तींकडून किमान हाताळणीवर भर -काढणीनंतर भाज्या आणि फळांची प्रतवारी. त्यानंतर मॉल्सच्या मागणीनुसार पॅकेजिंग केले जाते. त्याच दिवशी पुणे, मुंबई, कोल्हापूर आणि बंगळूर येथे माल स्टोअरपर्यंत पाठवण्यात येतो. यासाठी तीन रेफर व्हॅन्स आहेत.
  •   हंगामी आणि बिगरहंगामी उत्पादनासाठी एक एकर क्षेत्रामध्ये हायड्रोपोनिक्स तंत्रावर आधारीत पॉलिहाउस  
  • क्षेत्र व शेती पद्धतीचे नियोजन

  •   मलठण येथे पलरेशा कुटुंबीयांच्या मालकीचे क्षेत्र १०० एकर. त्यातील १६ एकर क्षेत्रामध्ये परदेशी भाजीपाला. यात ब्रोकोली, आईसबर्ग, लाल कोबी, झुकीनी, सेलेरी, पार्सेली आदींचा समावेश. शिवाय लेमन ग्रास, टोमॅटो, घेवडा आदी.  
  •   सुमारे ४५ एकर क्षेत्रात फळबाग (सघन लागवड) - आंबा, सीताफळ, चिंच, जांभूळ, तुती.
  •   एक एकरात हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानावर आधारीत संपूर्ण नियंत्रित पॉलिहाउसची उभारणी सुरू
  •   बेलवंडी (ता. श्रीगोंदा, जि. नगर)- कराराने २१० एकर क्षेत्र घेतले आहे. यात कारले, भोपळा, मेथी, कोथिंबीर, कांदा पात, लिमा बीन्स, भेंडी, गवार, काकडी, लाल भोपळे, मिरची, हळद, डाळिंब, लिंबू, ॲपल बेर, पेरु, पपई आदींचा समावेश.  
  •   सोमाटणे फाटा (ता. मावळ जि. पुणे) - कराराने ४० एकर क्षेत्र. येथे आंबा, पॅशन फ्रूट, अननस, ॲव्हाकॅडो, रांबुटीन आदी शेतमाल.
  • व्यवस्थापनातील बाबी लागवडीच्या नियोजनाविषयी माहिती देताना फार्म व्यवस्थापक तुषार चव्हाण म्हणाले की, बाजारपेठ व आमच्या विक्री विभागाकडून येणाऱ्या मागणीच्या अंदाजानुसार लागवडीचे नियोजन केले जाते. पालकाचे उदाहरण घ्या. त्याची लागवड एक महिन्याच्या फरकाने केली जाते. एकावेळी शेतात त्याच्या वेगवेगळ्या अवस्था पाहण्यास मिळतात. सुमारे २०० किलो ‘ए ग्रेड’ उत्पादनासाठी १० गुंठे लागवड केली जाते. त्यातून सुमारे २३० किलो उत्पादन ‘पॅकहाउस’कडे पाठवले जाते. लागवडीसह सर्व प्रक्रियांमध्ये ‘ग्लोबलगॅप’ प्रमाणीकरणाच्या सर्व निकषांचे पालन केले जाते. ‘झिरो रेसीड्यू’ उत्पादनांच्या निर्मितीमध्ये प्रत्येक विभागात त्या त्या वेळी करावयाचे काम, फवारणीची वेळ, किडी-रोगांना प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक घटक यांच्या नोंदी लिहिलेल्या असतात. बहुतांश वेळी सेंद्रिय पद्धतीद्वारे पीक संरक्षणाचा प्रयत्न असतो. रासायनिक घटकांचा वापर करताना ‘पीएचआय’ आणि ‘एमआरएल’ यांचा विचार केला जातो.

    काढणीचे नियोजन

  •   भाज्यांची काढणी एक दिवसाआड.
  •   काढणीनंतर त्या स्वच्छ धुतल्या जातात.
  •   तीन ‘ग्रेडस’मध्ये प्रतवारी केली जाते.
  •     उदा. ए - पॅकेजिंग करून स्टोअरला पाठवणे, बी -थेट किलोवर विक्री करण्यासाठी सी - ‘डिकंपोज’ केले जाते.
  •   सुमारे २० स्टोअर्सची पॅकेजिंग हाताळणी १५ व्यक्तींच्या साह्याने होते.
  •  विक्री व्यवस्था

  •   पहिल्या टप्प्यात केवळ भाज्यांची विक्री सुरू आहे. देशी आणि परदेशी मिळून ४० भाज्या नियमितपणे बाजारपेठेत पोचवल्या जातात. त्यात आईसबर्ग, लेट्यूस, ब्रोकोली, पोकचोय, झुकिनी, घेवडा, गवार, भेंडी, मिरची आदींचा समावेश.  
  •   पुणे (दोन वर्षे), मुंबई (सहा महिने), कोल्हापूर (तीन महिने) या तीन शहरांतील मॉल आणि स्टोअर्सला माल पाठवला जातो. बंगळूर येथील स्टोअरसोबत बोलणी सुरू.  
  •   सुमारे ४० प्रकारच्या भाज्या शेल्फवर. एका ‘स्टोअर’मध्ये खास ग्रामीण सजावटीचे ‘कियॉस्क’ उभारले आहे.  
  •   प्रत्येक स्टोअरच्या मागणीनुसार ताज्या भाज्यांचा पुरवठा  
  •   विभागनिहाय भाज्यांचे प्रमाण ठेवले जाते.
  •   दरमहा सुमारे १० लाख रुपयांची उलाढाल   
  • बाजारपेठ
  • सुमारे ९० ते ९५ टक्के लोक भाज्या मंडईतून घेतात. तर ५ ते १० टक्के लोक पॅकिंगमधील भाज्या घेऊ इच्छितात. या दहा टक्क्यांची विभागणी अशी
  •   मॉल किंवा स्टोअरमध्ये १५-२० टक्के परदेशी तर स्थानिक भाज्या ८० टक्के.
  •   मंडईमध्ये हाच ट्रेंड ९० ते ९५ टक्के स्थानिक आणि ५ ते १० टक्के परदेशी भाज्या असा आहे.
  • असा केला बाजारपेठेचा अभ्यास

  • विक्री व्यवस्थापक सागर बोरा म्हणाले की, पुण्यामध्ये दोन वर्षांपासून विविध स्टोअर्समध्ये उत्पादने ठेवत आहोत. येथे सुमारे आठ स्टोअर्स जोडले आहेत. येथील विभागनिहाय भाज्यांची मागणी वेगळी आहे.  त्याचा विचार करून पुरवठा केला जातो. त्यामुळे भाज्या शिल्लक राहण्याचे व माघारी घेण्याचे प्रमाण कमी झाले आहे. पुणे शहरातील मगरपट्टा किंवा अन्य मॉलमध्ये परदेशी भाज्यांना चांगला उठाव आहे. सहा महिन्यांपासून मुंबई, ठाणे येथे तर तीन महिन्यांपासून कोल्हापूर येथील मॉलला पुरवठा होत आहे. सांगली, कोल्हापूर येथे परदेशी भाज्यांविषयी जागरूकता अद्याप पुरेशी व्हायची आहे. पुण्यामध्ये ठिकाणानुसार ही मागणी असते. स्वारगेट येथील स्टोअरमध्ये विक्रीसाठी उत्पादने ठेवली. मात्र  जवळच बाजार समिती असल्याने अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे लक्षात आले. मगरपट्टा येथील स्टोअरमध्ये शनिवार आणि रविवारी भाज्या जास्त विकल्या जातात. ठाण्यात दर बुधवारी विविध वस्तूंचे मोठे ‘सेल’ सुरू असतात. त्या अनुषंगाने येथील स्टोअर्सध्ये बुधवारीच आठवड्याच्या भाज्या खरेदी करण्याचा ‘ट्रेण्ड’ आहे.
  •   अंधेरी, मीरा रोड या उच्चभ्रू परिसरातही ‘रेसीड्यू फ्री’ उत्पादनांना चांगली मागणी आहे.  
  •   एका स्टोअर कंपनीने आमच्यासोबत ‘को ब्रॅंडिंग’ केले असून दोघांच्या लोगोसह उत्पादने विकली जात असल्याचे बोरा यांनी अभिमानाने सांगितले. बंगळूरमध्ये या कंपनीची पंधरा स्टोअर्स आहेत.  
  • ‘स्टोअर’अंतर्गत प्रयोग

  •   बोरा म्हणाले की, उत्पादनांची मांडणी यामुळे उत्पादनाच्या विक्रीत फरक पडतो. पूर्वी अन्य उत्पादकांच्या भाज्यांसोबत आमच्या भाज्या ठेवल्या जात. मात्र स्टोअर कंपनीसोबत चर्चा करून ग्रामीण झोपड्यांचा आकार व सुशोभीकरण करून उत्पादने ठेवली.  
  •   भाज्या ठेवण्याची पद्धतही महत्त्वाची असते. लोकांची नजर आणि ते उचलण्यासाठी पोचणारा हात यांचाही विचार केला. उदा. ग्राहकांना कांदा, बटाटा, टोमॅटो किंवा त्यांनी निश्‍चित केलेली भाजी घेण्याची सवय असते. त्यामुळे या तीनही भाज्या वेगवेगळ्या ठिकाणी अन्य उत्पादनांसोबत ठेवल्याने अन्य भाज्यांच्या विक्रीला चालना मिळाली.  
  •   काही स्टोअर्समध्ये पालेभाज्यांची विक्री होत नाही. तेथे वेगळ्या भाज्यांना मागणी असते. या बाबीवर लक्ष ठेवावे लागते.
  •   नवीन भागात उत्पादने रुजवण्याविषयी सांगायचे तर आरोग्यासाठी जागरूक असलेल्या कोल्हापूर येथे १०० किलोपासून सुरू करून मालाची ‘क्वांटीटी’ हळूहळू वाढवत गेलो. आता एक दिवसाआड आठवड्यातून तीन वेळा सुमारे दीडशे किलो भाज्या परदेशी पाठवल्या व विकल्याही जातात.  
  • रेसिड्यू फ्री फार्मिंग...

    ‘अर्थफूड’ चे संस्थापक नीलेश पलरेशा म्हणाले की, उत्तम दर्जाच्या शेतीमालाची निर्यात होते असे अभ्यासातून लक्षात आले. निर्यात न होणाऱ्या भाज्या स्थानिक बाजारात पाठवल्या जातात हे काही योग्य वाटले नाही. आपल्या लोकांनादेखील उत्तम अन्न हवे आहे. शहरातील प्रत्येक गल्लीत आता ‘जीम्स’ उभ्या राहात आहेत. आरोग्याविषयी जागरूकता वाढते आहे. भारतातच खूप मोठी संधी आहे. ती घेतलीच पाहिजे या उद्देशाने आम्ही कामाला लागलो. पहिल्या वर्षी संपूर्ण सेंद्रिय शेतीसाठी काम सुरू केले. मालाची उपलब्धता अजून वाढावी यासाठी ‘रेसीड्यू फ्री’ शेतीवर अधिक भर दिला. ग्राहकांना उत्पादनांबाबत ‘ट्रेसेबिलिटी’ दिली आहे.

  •   ताज्या ‘रेसीड्यू फ्री’ भाज्या व फळे योग्य दरात देऊ शकलो तर प्रचंड मागणी राहू शकते हा विचार आहे. निर्यातीपेक्षाही भारतीय बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय दीर्घकालीन व अधिक कष्टाचा आहे याची जाण आहे. मात्र भारतीय बाजारपेठेमध्ये सातत्यपूर्ण ‘रेसीड्यू फ्री’ उत्पादनांचा पुरवठा करणारे उत्पादक अद्याप फारसे नाहीत हीच संधी आहे.
  •   सेंद्रिय शेतीत ‘थर्ड पार्टी इन्स्पेक्शन’ असले पाहिजे. जागतिक पातळीवर सर्वात कडक मानले जाणारे ग्लोबलगॅप प्रमाणीकरण आम्ही सुरू केले आहे. प्रमाणपत्र काही दिवसांतच हाती पडेल.
  •   भविष्यात वाढत्या मागणीनुसार पुरवठा करण्यासाठी करारशेतीचा विचार आहे. सध्या फार्म परिसरातीलच  शेतकऱ्यांची निवड करत आहोत. ही करारशेती नैतिकता, परस्पर समन्वय आणि नियमित निरीक्षण यावर आधारीत असेल.
  • ट्रेडिंगपेक्षा स्वउत्पादनांकडे कल अर्थफूडचे भागीदार सिद्धार्थ खिंवसरा म्हणाले की, गायींची मला फार आवड आहे. त्यामुळे ए-टू दूध आणि त्यावर आधारीत उत्पादनांचा व्यवसाय करण्याचा विचार होता. शेती व दुग्ध व्यवसाय असा हेतू ठेवून दीड वर्षापूर्वी गुंतवणूक केली. केवळ ‘ट्रेडिंग’ न करता स्वतः उत्पादन करण्यात उतरलो आहोत. गेल्या दोन वर्षांमध्ये पाच ते सहा टन असलेली विक्री आता ४० टनांपर्यंत पोचली आहे. सध्या फार्मवर देशी थारपारकर जातीच्या ४३ गायींचे पालन मुक्त संचार गोठा पद्धतीने करीत आहोत.

     सागर बोरा- ९९६०६२८८११     कार्यालय- ८६६९६७६११६    ई-मेल ः basket@theearthfood.com

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com