भविष्यातील औद्योगिक पीक ठरण्याची ‘शुगरबीट’मध्ये क्षमता

भविष्यातील औद्योगिक पीक ठरण्याची ‘शुगरबीट’मध्ये क्षमता
भविष्यातील औद्योगिक पीक ठरण्याची ‘शुगरबीट’मध्ये क्षमता

कित्येक दशकांपासून समशीतोष्ण देशांमध्ये साखर उत्पादन या हेतूने ‘शुगरबीट’ अर्थात शर्कराकंदाची लागवड केली जाते. हे उष्णकटीबंधीय, द्विवार्षिक साखर उत्पादन व पशुखाद्यासाठी उपयोगात येणारे कंदवर्गीय पीक आहे. भारतातही या पिकावर चांगला अभ्यास झाला आहे. भविष्यात औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचे पीक म्हणून त्याला चालना मिळू शकते. जगातील एकूण साखर उत्पादनापैकी सुमारे ३० टक्के उत्पादन ‘शुगरबीट’ अर्थात शर्कराकंद पिकाद्वारे मिळते. अमेरिका, बेल्जियम, फ्रान्स, स्पेन व अन्य देशांमध्ये या पिकाचे मोठे उत्पादन घेतले जाते. या पिकापासून साखरेबरोबरच इथेनॉल, हिरवा चारा, ‘पल्प’ व चोथा मिळतो. शिल्लक भाग खत म्हणून वापरता येतो. भारतात ‘शुगरबीट’चा अभ्यास भारतात शुगरबीटची १९६० च्या दशकात लागवड झाली. ‘निंबकर ॲग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट’ने याया पिकावर संशोधन केले. त्याचबरोबर लखनौ येथील केंद्रीय ऊस संशोधन केंद्र, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे व विभागीय ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव या संस्थादेखील या पिकावर संशोधन करीत आहेत. भारतात पंजाब, कर्नाटक, तमिळनाडू, राजस्थान, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये या पिकाची लागवड केली जाते. अद्याप महाराष्ट्रात शुगरबीटची बाजारपेठ, विक्री याबाबत निश्‍चित सांगणे शक्य नाही. मात्र भविष्यात हे पीक औद्याोगिकदृष्ट्या महत्त्वाचे ठरू शकते. त्यादृष्टीने या पिकाची ओळख सांगणे हा लेखाचा उद्देश आहे. शुगरबीटचे महत्त्व

  • सध्याच्या बदलत्या हवामानात, कमी पर्जन्यमानाला अनुकूल
  • कमी पाण्यात एकरी ३५ ते ४० टन त्याचे उत्पादन येऊ शकते.
  • किडी-रोगांचा प्रादुर्भाव अन्य पिकांच्या तुलनेत कमी
  • पिकातील साखरेचे प्रमाण सुमारे १२ ते १५ टक्के
  • चोपण, क्षारपड जमिनींमध्ये उत्कृष्ट उत्पादन
  • जमिनीतील क्षार व अन्य हानिकारक घटक शोषून घेऊन जमीन सुपीक बनवते.
  • साखर, इथेनॉल व पशुखाद्य निर्मिती शक्य.
  • दुभत्या जनावरांना खाद्य म्हणून दिल्यास साधारणपणे अर्धा लिटर प्रति दिन प्रति गाय उत्पादनात वाढ होते. दुधाच्या गुणवत्तेतही वाढ होऊ शकते.
  • लागवडीसंबंधी महत्त्वाच्या बाबी

  • पीक कालावधी- साधारण ४ ते ५ महिने.
  • भारतात साधारणपणे ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांत लागवड
  • पाण्याचा निचरा होणारी वाळूमिश्रित जमीन योग्य
  •  लागवडीचे अंतर- ४० बाय १५ सेंमी. काहीवेळा ५० बाय १५ सेंमी., ४० बाय २० सेंमी अंतरानेही लागवड करतात.
  • बी दोन सेंटिमीटर खोल टोकावे लागते. एकरी सुमारे ४० हजार ते ४५ हजार बी लागते.
  • या पिकासाठी प्रखर सूर्यप्रकाश गरजेचा असतो.
  • साधारणपणे उगवणीसाठी २० ते २५ अंश सेल्सियस, वाढीसाठी ३० ते ३५ अंश तर साखर उत्पादनासाठी २५ ते ३५ अंश तापमान पोषक असते.
  • कंपन्यांचे विविध वाण उपलब्ध आहेत. इराण व युरोपातील काही कंपन्यांचे वाणही भारतात उत्पादीत केले जातात.
  • खत व्यवस्थापन

  • शेणखत- एकरी ५ टन- लागवडीपूर्वी
  • रासायनिक खते-
  • एकूण नत्र-स्फुरद- पालाश (एकरी व किलोमध्ये)-प्रत्येकी ३० किलो
  • पैकी लागवडीनंतर निम्मी व ५० दिवसांनी उर्वरित मात्रा द्यावी लागते.
  • गरजेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्ये द्यावी लागतात.
  • पाणी व्यवस्थापन या पिकाला पाणी खूप कमी लागते. पाणी जास्त झाल्यास पिकाची वाढ खुंटते व कंद कुजतात. लागवडीपूर्वी तसेच वाफसा आल्यावर, उगवणीनंतर १५ ते २० दिवसांनी गरजेनुसार पाणी द्यावे. लागवडीपासून ७५ दिवसापर्यंत पीक तणमुक्त ठेवणे गरजेचे आहे. तणनाशकाचा वापर करणे गरजेचे नाही. किडी-रोग

  • कीटक- तंबाखूवरील पाने खाणारी अळी (स्पोडोप्टेरा) या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो.
  • तसेच मावा, तुडतुडे, फुलकिडे या रसशोषक किडींही आढळतात.
  • रोग- मर, कंदकुज, मूळकुज, बुरशीजन्य ठिपके
  • नियंत्रण- तज्ज्ञांच्या शिफारसीनुसार.

    काढणीपूर्व व पश्‍चात नियोजन

  • काढणीआधी २०-२५ दिवस पाणी बंद करावे लागते.
  • काढणी यंत्राद्वारे करणे सुलभ होऊ शकते.
  • बीट काढणीनंतर सावलीत ठेवावे.
  • काढणीनंतर २४ तासांत बीटाचा वापर सुरू करावा लागतो.
  • उत्पादन- एकरी ३५ ते ४० टन उत्पादन (सुमारे चार ते पाच महिन्यांत)
  • ‘केव्हीके’ येथे चाचण्या बारामती येथील ‘अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट’चे अध्यक्ष राजेंद्र पवार म्हणतात की सध्याच्या दुष्काळी परीस्थितीत कमी पाण्यावर येणारे, कमी कालावधीत, कमी खर्चात चांगले उत्पादन देणारे पीक म्हणून ‘शुगरबीट’ कडे पाहाता येते. मुख्य किंवा आंतरपीक म्हणूनही ते घेता येते. मागील वर्षी बारामती कृषी विज्ञान केंद्रात (केव्हीके) घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये दोन वाण उत्कृष्ट ठरले आहेत. या वर्षी परिसर क्षेत्रात सुमारे १०० एकर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन आहे. युरोपातील तज्ज्ञांचे उद्या मार्गदर्शन गुरुवार (ता. १) रोजी केव्हीके येथे शेतकऱ्यांसाठी या पिकाबाबत मोफत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी युरोपातील तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट व केव्हीके, बारामती येथील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. अधिकाधिक शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केव्हीकेतर्फे करण्यात येत आहे. महाराष्ट्रात अद्याप ‘शुगरबीट’ प्रक्रिया प्रकल्प’ कार्यरत नाहीत. सद्यस्थितीत पशुखाद्य म्हणूनच त्याची लागवड करावी लागते. मात्र औद्योगीक दृष्ट्या भविष्यात या पिकाला चालना मिळू शकते. संपर्कः डॉ. मिलींद जोशी-९९७५९३२७१७ (लेखक कृषी विज्ञान केंद्र, बारामती येथे विशेष विषेतज्ज्ञ (पीक संरक्षण आहेत)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com