पीक बदलातून शेती केली किफायतशीर...

पीक बदलातून शेती केली किफायतशीर...
पीक बदलातून शेती केली किफायतशीर...

जलसंपदा विभागात कार्यरत असणाऱ्या नारायण अात्माराम बळी यांनी नोकरी सांभाळून देऊळगाव माळी (ता. मेहकर, जि. बुलडाणा) येथील वडिलोपार्जित शेतीदेखील चांगल्या पद्धतीने विकसित केली आहे. पारंपरिक पिकांच्या बरोबरीने कांदा, मोहरी बीजोत्पादनातून त्यांनी शेती आर्थिकदृष्ट्या सक्षम केली आहे. कोणतीही गोष्ट करावयाची ठरवली, की मार्ग सुचतो. अशीच काहीशी गोष्ट जलसंपदा विभागात कार्यरत असलेले नारायण बळी यांच्याबाबत घडली. नोकरी सांभाळत त्यांनी शेतीच्या आवडीतून वडिलोपार्जीत अाठ एकर शेतीचे पारंपरिक चित्र पालटले. उपलब्ध साधनसामुग्री, सुधारित पीक पद्धतीचा अवलंब करत शेती शाश्वत करण्याचा प्रयत्न केला आहे. देऊळगाव माळी (ता. मेहकर, जि. बुलडाणा) येथे नारायण बळी यांची शेती अाहे. या शेतीमध्ये पारंपरिक पिकांच्या लागवडीवर भर न देता पीक बदलावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. नारायण बळी यांची जलसंपदा खात्यात अमरावती, अकोला या जिल्ह्यात बहुतांश सेवा झाली. सध्या ते बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर विभागात सिंचन शाखा अधिकारी म्हणून कार्यरत अाहेत. नोकरी निमित्ताने त्यांना फिरती असते. तरीदेखील नोकरी करत त्यांनी शेतीकडेही चांगले लक्ष दिले आहे. अाठवडा किंवा पंधरा दिवसांतून जेव्हा वेळ मिळेल त्या वेळी शेतात भेट देऊन त्यांनी शेती व्यवस्थापनाचे गणित सांभाळले आहे. शेती व्यवस्थापनासाठी त्यांनी एक सालगडी ठेवला आहे. याचबरोबरीने शेती नियोजनात त्यांच्या पत्नी सौ. शोभा यांचे चांगले सहकार्य मिळते. त्यांचा मुलगा, मुलगी दोघेही इंजिनिअर असून पुण्यात नोकरी करतात. शाश्वत पाणीपुरवठ्याची सोय ः नारायण बळी यांनी आठ एकर शेतीला पुरेसे पाणी उपलब्ध होण्यासाठी कोराडी प्रकल्पालगत शेवगा शिवारात विहीर आणि कूपनलिका खोदून तेथून दोन हजार फुटांची पाइपलाइन करून पाणी अाणले. या विहिरीवरील कृषी पंपामध्ये मोबाईल तंत्रज्ञानाचा वापर केल्याने घरूनच पंप चालू- बंद करता येतो. मजुरांच्या अडचणीमुळे मोबाईल तंत्रज्ञान उपयुक्त ठरले आहे. पाइपलाइनला तुषार सिंचन संच जोडलेला आहे. त्यामुळे पिकाच्या गरजेनुसार संरक्षित पुरेसे पाणी देणे शक्य होते. आंतर पीकपद्धती, बीजोत्पादनावर भर ः पीक नियोजनाबाबत नारायण बळी म्हणाले की, खरिपात आठ क्षेत्रावर सोयाबीन लागवड असते. त्यामध्ये तुरीचे आंतरपीक घेतले जाते. सुधारित लागवड पद्धतीचा अवलंब केला जातो. प्रयोगशील शेतकरी तसेच कृषी तज्ज्ञांच्या सल्याने पीक व्यवस्थापन केल्यामुळे पीक उत्पादनात अपेक्षित वाढ मिळते. सोयाबीनचे एकरी १० ते १२ क्विंटल आणि तुरीचे चार क्विंटल उत्पादन मिळते. रब्बीमध्ये कांदा बीजोत्पादनावर प्रामुख्याने भर राहतो. यावर्षी साडेतीन एकरामध्ये कांदा बीजोत्पादन घेतले अाहे. सध्या कांदा बी परिपक्व होण्याच्या स्थितीत आहे. एकरी चार क्विंटल कांदा बियाणाचे उत्पादन मिळते. प्रति क्विंटल ३५ हजार दर मिळतो. याचबरोबरीने यंदा साडेतीन एकरावर मोहरी बीजोत्पादन केले आहे. एकरी सहा क्विंटलचे उत्पादन मिळाले आहे. मागीलवर्षी पाच हजार रुपये क्विंटल असा दर मिळाला होता. कांदा बीजोत्पादनातून खर्च वजा जाता एकरी नव्वद हजाराचा नफा शिल्लक रहातो. कांदा आणि मोहरी बीजोत्पादनासाठी बियाणे कंपन्यांसोबत करार केला आहे. बियाणे कंपनीतील तज्ज्ञांशी सातत्याने संपर्क ठेवत दर्जेदार बीजोत्पादनावर त्यांचा भर आहे. या बीजोत्पादनातून त्यांना चांगला आर्थिक नफा मिळतो. याचबरोबरीने रब्बीत काही क्षेत्रावर गहू, लसूण लागवड असते. सेंद्रिय निविष्ठांचा वापर ः मागील काही वर्षांत झालेल्या खर्चाचा अाढावा घेत नारायण बळी यांनी पीक व्यवस्थापनाचा खर्च कमी करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. पूर्वी रासायनिक खते, कीटकनाशकांवर मोठ्या प्रमाणावर खर्च व्हायचा. इतर शेतकऱ्यांपेक्षा पीक उत्पादन चांगले यायचे, मात्र खर्च अधिक झाल्याने नफ्याचे गणित जुळत नव्हते. गेल्या दोन वर्षांपासून बळी यांनी मोहरी, कांदा बीजोत्पादन घेताना रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर थांबविलेला आहे. जमिनीत गाळ मिसळलेला आहे. त्याचबरोबरीने सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर केला जातो. तसेच सेंद्रिय कीडनाशकांच्या वापरावर भर दिला आहे. सेवानिवृत्तीपर्यंत शेती पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीवर नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. याचबरोबरीने मिश्र पीक, सापळा पिकांच्या लागवडीचे त्यांनी नियोजन केले आहे. रासायनिक खतांचा वापर कमी करतानाच पिकांना लागणारी अन्नद्रव्ये पुरवण्यासाठी त्यांनी सेंद्रिय खतांच्या वापरावर भर दिला. सध्या जीवामृत तसेच गोमुत्राचा अधिकाधिक वापर केला जातो. बळी यांनी काही महिन्यांपूर्वी गीर गाय विकत घेतली. शेण, गोमूत्रापासून घनजीवामृत, जीवामृत निर्मिती आणि शेतीमध्ये वापरास सुरवात केली आहे. या पद्धतींची शास्त्रशुद्ध माहिती मिळवण्यासाठी पुस्तकांचे वाचन, तसेच काही ठिकाणी त्यांनी प्रशिक्षणदेखील घेतले आहे. याचा शेती व्यवस्थापनात चांगला फायदा दिसून आला आहे. शेती बांधावर तीळ, काशीफळाची लागवड ः नारायण बळी यांच्या आठ एकर शेतात तीन मोठे बांध आहेत. या शेती बांधाचादेखील त्यांनी कल्पतेने वापर केला आहे. शेती बांधावर ५० सागवानाची लागवड आहे. याचबरोबरीने दरवर्षी खरिपात तीळ आणि काशी फळाची लागवड करतात. यंदा त्यांना ३० किलो तीळ आणि चार क्विंटल काशीफळांचे उत्पादन मिळाले. प्रति २०० रुपये दराने काशी फळाची विक्री केली जाते. जमीन सुपीकतेवर भर ः नारायण बळी यांची एकाच ठिकाणी अाठ एकर शेती अाहे. या सलग शेतीचे त्यांनी पीक व्यवस्थापनाच्यादृष्टीने विभाग केले. जलसंधारणासाठी जमिनीत ठिकठिकाणी चर घेतले. अती पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होईल, अशा पद्धतीने जमिनीची आखणी केली. यासोबतच जमिनीचा पोत सुधारण्यासाठी मागील दहा वर्षांत टप्प्याटप्प्याने गाळ मिसळला. त्याचा चांगला फायदा पीक उत्पादनासाठी दिसून आला आहे. शेतीची चांगली बांधबंदिस्ती केल्याने पावसाचे पाणी शेतशिवारात चांगले मुरते. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढ आणि जमिनीत ओलावा टिकण्यास मदत झाली आहे. संपर्क ः नारायण बळी, ९७६७८२५३१८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com