सुधारित ट्रेलरमुळे कमी होईल अपघाताचे प्रमाण

सुधारीत ट्रेलरमुळे कमी होईल अपघाताचे प्रमाण
सुधारीत ट्रेलरमुळे कमी होईल अपघाताचे प्रमाण

ट्रॅक्टर व उसाने भरलेला ट्रेलर हे ग्रामीण महाराष्ट्रातले अगदी परिचयाचे दृश्य आहे. त्याचप्रमाणे उसाने भरगच्च भरलेल्या ट्रेलरला होणारे अपघात हेही नवीन नाहीत. या अपघातामुळे होणारी जीवित व   शेतीमालाची हानी अत्यंत दुर्दैवी असून, त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. या समस्या कमी करण्यासाठी भोसरी (जि. पुणे) येथील कॅप्युलम इंजिनिअरिंग या कंपनीने प्रयत्न केले असून, ट्रेलरमध्ये  सुधारणा केल्या आहेत.

आजच्या परंपरागत ट्रेलरमध्ये दोन महत्त्वपूर्ण कमतरता असतात. एक म्हणजे ट्रेलरला ब्रेक नसतात. दुसरी कमतरता म्हणजे मालाने भरलेल्या ट्रेलरचा गुरुत्वमध्य खूपच उंच असतो. या दोन्ही गोष्टींमुळे ट्रेलर पलटी होण्याची शक्यता वाढते. या समस्येवर मात करण्यासाठी कॅप्युलम कंपनीने ट्रेलरमध्ये सुधारणा केल्या आहेत. कॅप्युलम कंपनी गेल्या २५ वर्षापासून औद्योगिक ट्रेलर निर्मितीच्या व्यवसायात आहे. संरक्षण क्षेत्राला लागणारे विशेष ट्रेलर निर्मिती करणाऱ्या थोड्या कंपन्यापैकी कॅप्युलम ही एक आहे. औद्योगिक व संरक्षण क्षेत्रातील अनुभव वापरून कॅप्युलम कंपनीने हा सुरक्षित ट्रेलर बनवला असल्याचे कार्यकारी संचालक योगीराज गदो यांनी सांगितले.

सध्याच्या ट्रेलरची रचना व समस्या  ट्रेलरला कोणत्याही प्रकारचे ब्रेक नसतात. त्यामुळे ट्रॅक्टर चालकाने जर ब्रेक लावला तर त्याला जोडलेल्या मालाने भरलेल्या व वेगात असलेल्या ट्रेलरचा सर्व भार जोडभागांवर येतो. अचानक लागलेल्या ब्रेकमुळे ट्रेलरची दिशा बदलते व ट्रेलर पलटी खातो. त्याचप्रमाणे चढावर किंवा उतारावर ट्रॅक्टरने ब्रेक लावल्यावर सर्व भार ट्रॅक्टरवर देऊन ट्रेलर पलटी होतो.  सध्याच्या ट्रेलरला प्लेट स्प्रिंग किंवा पाटे वापरले जातात. या पाट्यांच्या रचनेमुळे शेतीमाल भरल्यावर ट्रेलरचा गुरुत्वमध्य हा ट्रॅक्टरपेक्षा उंचावर जातो. या अंगभूत दोषामुळे ट्रेलर पलटी होण्याची शक्यता वाढते.  स्प्रिंग पाटे फक्त एकाच दिशेन म्हणजे वरून येणारे वजन घेऊ शकतात. बाजूने येणारे धक्के घेऊ शकत नाहीत. त्यामुळे रस्त्याने जाताना ट्रेलर हेलखावे खात जातो. त्यातून दोन ट्रेलर एकत्र जोडून जात असल्यास हे हेलकावे भीतीदायक ठरतात. कित्येक वेळा ट्रेलर पलटी होऊन जिवघेणे अपघात होतात.

या समस्यांवर केलेली उपाययोजना  कॅप्युलम कंपनीने तयार केलेल्या ट्रेलरला चारही चाकांना हायड्रालिक ब्रेकची योजना केलेली आहे. ही ब्रेकची यंत्रणा ट्रॅक्टरच्या ब्रेकच्या यंत्रणेला जोडलेली आहे. त्यामुळे ट्रॅक्टरचालकाने ब्रेक लावला की त्याच प्रमाणात ट्रेलरच्या चारही चाकांचे ब्रेक लागतात. मालाने भरलेल्या ट्रेलरचा कोणत्याही प्रकारचा भार पुढील ट्रॅक्टरवर येत नाही. यामुळेच अपघाताची शक्यता जाते. या ट्रेलरला डिस्क ब्रेक लावले आहेत. त्यामुळे शेतातून जाताना लागणाऱ्या चिखलामुळे ब्रेकची कार्यक्षमता कोणत्याही प्रकारे कमी होत नाही.  कॅप्युलम कंपनीने ट्रेलरला स्प्रिंग पाट्यांऐवजी वैशिष्ट्यपूर्ण ‘रबर टॉर्शन बार’ ही यंत्रणा वापरली आहे. यात  विशेष प्रकारचे रबराचे बार वापरले असून, भार आल्यावर हे रबर बार काही प्रमाणात फिरून लवचिकतेच्या गुणधर्मामुळे पुन्हा पूर्ववत होतात. या क्षेत्रातील ४० वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या माधव बांदिवडेकर यांनी या यंत्रणेचे खालील फायदे सांगितले. a. या रबर टॉर्शन बार यंत्रणेचे आयुष्य खूप चांगले असते. त्यामुळे स्प्रिंग पाटे तुटणे, बदलणे याचा त्रास व खर्च वाचतो.   b. रबर टॉर्शन बार या यंत्रणेमुळे ट्रेलरची उंची कमी राहत असली तरी ग्राऊंड क्लिअरन्स कमी होत नाही. त्याच प्रमाणे गुरुत्वमध्य खाली राहतो. परिणामी ट्रेलर पलटी होण्याची शक्यता खूप कमी होते. c. रबर टॉर्शन बार यंत्रणा ही कोणत्याही बाजूने येणारे धक्के घेऊ शकते. त्यामुळे रस्त्यावरून जाताना ट्रेलर हेलकावत नाही. अपघाताची शक्यता कमी होते. श्री. गदो यांनी सांगितले की या सुधारित ट्रेलरमध्ये अंतर्गत माल वाहतूकीच्या जागेमध्ये सुमारे ३०% पर्यंत  वाढ होते. प्रत्येक फेरीत अधिक माल नेणे शक्य होते.

‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स’चा नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा पुरस्कार ट्रॅक्टर ट्रॉली चालवताना येणाऱ्या विविध समस्या तंत्रज्ञान व आरेखनातून सोडवण्यात यश आले आहे. परिणामी अपघाताचे प्रमाण कमी होणार असून, प्रति फेरी ३० टक्क्यांपर्यंत अधिक शेतीमाल वाहून नेणे शक्य होणार आहे. या उत्पादनासाठी कॅप्युलम इंजिनिअरिंगला मराठा चेम्बर ऑफ कॉमर्सचे या वर्षीचे नावीन्यपूर्ण उत्पादनाचे हरी मालिनी जोशी हे पारितोषिक देऊन गौरव केला आहे.

ः ०२० -२७१३०१४४/४५  ः योगीराज गदो, ९३७३७३७३०१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com