यंत्रामुळे ऊसशेती झाली अधिक सुलभ

यंत्रामुळे ऊसशेती झाली अधिक सुलभ
यंत्रामुळे ऊसशेती झाली अधिक सुलभ

कोल्हापूर हा उसाचा प्रमुख जिल्हा. येथील शिरोळ तालुक्यात असलेल्या औरवाड गावातील संजय कोले अलीकडील वर्षांत यांत्रिक शेतीकडे वळले आहेत. बाळभरणी, आंतरमशागत, फवारणी, खोडकी तासणे आदी विविध कामांसाठी यंत्रांचा वापर करून मजूरटंचाईवर मात केली आहे. त्यामुळे योग्य वेळेत कामे करताना मजुरी व श्रमही हलके करण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे. कोल्हापूर जिल्ह्याची मुख्य अोळखच मुळी उसासाठी आहे. त्यातही शिरोळ तालुक्यात अनेक प्रगतीशील शेतकरी पाहण्यास मिळतात. तालुक्यातील अौरवाड येथे संजय कोले यांची संयुक्त कुटुंबाची सुमारे पंचवीस एकर शेती आहे. जवळपास सर्वच क्षेत्र त्यांनी उसासाठी दिले आहे. या तालुक्‍यातील बहुतांशी शेतकरी आडसाली हंगामाची निवड करतात. कोले यांचादेखील याच हंगामात ऊस असतो. उसाची शेती करताना प्लॉट बदलून शेती करण्याला त्यांनी प्राधान्य दिले आहे. मजूरसमस्येवर मात करणारी साधने पूर्वी म्हणजे किमान सहा वर्षांपूर्वी कोले पारंपरिक पद्धतीने ऊस शेती करायचे. त्या वेळी तीन फुटी सरी सोडून ऊस लागवड ते करीत. यात पहिल्यांदा वाकुरी पाडणे, लागवड करणे, त्यानंतर सातत्याने भांगलणी, बाळबांधणी, मजूर लावून कीडनाशक फवारणी आदी कामांसाठी मजुरांची गरज भासायची. या सगळ्यांचा खर्च वाढून उत्पादन खर्च एकरी साठ हजार रुपयांच्या पुढे जायचा. भांगलण, वाकुऱ्या पाडणे यासाठी जादा मनुष्यबळ लागायचे. मजूरटंचाईचा फटका कोले यांनाही बसू लागला. अनेकवेळा मजूर वेळेत यायचेदेखील नाहीत. मग त्यांच्यावर विसंबून बसण्यापेक्षा यंत्रांद्वारे ही कामे करण्याचे त्यांनी ठरवले. त्यांचे नियोजन पुढीलप्रमाणे केले. मिनी ट्रॅक्टरचा वापर उसाचे जादा क्षेत्र असल्याने त्यांनी मिनी व मोठा ट्रॅक्‍टर घेतला. मग मशागतीचे सूत्रच बदलून गेले. शेत तयार करताना मोठ्या ट्रॅक्‍टरने नांगरट करणे, सरी सोडणे ही कामे होऊ लागली. उर्वरित सर्व कामांसाठी मिनी ट्रॅक्‍टर उपयोगी पडू लागला. बाळबांधणी, पक्की बांधणी, आंतरमशागत अशी कामे या ट्रॅक्टरचलित यंत्राद्वारे होऊ लागली. यातून श्रमात बचत होताना खर्चातही सुमारे ४० टक्के बचत होऊ लागली. खेकडा यंत्राचा वापर बाळभरणीसाठी होतो. मिनी ट्रॅक्टरच्या शाप्टला जोडून कोले यांनी फवारणीदेखील साधली आहे. यात एका एकरातील फवारणी साधारण दोन ते अडीच तासांत आटोपते. पूर्वी सरी साडेतीन फुटापर्यंत असायची. आता ती पाच फुटी झाली आहे. त्यामुळेही अनेक कामे सुलभ झाली आहेत. बुडके तासण्याचे काम झाले सोपे लागवडीचा ऊस तुटून गेल्यानंतर खोडव्याचे व्यवस्थापन करण्यासाठी जमिनीतील खोडकी तासणे हे काम असते. त्यासाठी मोठे मनुष्यबळ लागत होते. कोले यांनी त्यासाठी मोठा रोटर तयार करून घेतला आहे. त्याद्वारे एकसारखेपणाने तसेच दोन तासांतच काही एकरांवर हे काम करणे सुलभ होऊ लागले. मोठी शेती असल्याने पाच ते सहा एकरांतील खोडकी तासण्याचे काम एका दिवसात होऊ लागल्याने मनुष्यबळाची मोठी बचत झाली. पालाकुट्टी यंत्राद्वारे अलीकडील काळात उसाचे पाचट न जाळता त्याचा वापर करण्यावर शेतकऱ्यांचा भर असतो. त्याची कुट्टी करून जमिनीला खत म्हणून दिले जाते. त्यातून जमिनीची सुपीकता वाढीस लागते. कोलेदेखील भाडेतत्त्वावर कुट्टी करणारे यंत्र आणून त्याचा उसात वापर करतात. साधारण दोन हजार ते अडीच हजार रुपये प्रति एकर त्याचा दर आहे. भरणीसाठी वापरली शक्कल मोठी भरणी करताना रोटरचा अनोख्या पद्धतीने वापर केला आहे. ट्रॅक्‍टर सरीतून फिरताना माती उकरण्याऐवजी माती बसविण्याचे काम करेल अशा पद्धतीने रोटरमध्ये सुधारणा करून घेतली आहे. हा रोटर माती उकरण्याचे काम न करता दोन्ही बाजूस मातीचा चांगला थर बसविण्याचे काम करतो. यांत्रिकीकरणामुळे उत्पादनास चालना यांत्रिकीकरणामुळे कामाचा ताण कमी होऊन पीक व्यवस्थापनात कमालीचा बदल झाला. वेळापत्रकानुसार कामाची यादी तयार होऊ लागली. टप्प्याटप्प्याने १० एकरांपर्यंत ठिबक सिंचनाचा अवलंब करणे कोले यांना शक्य झाले आहे. बहुतांश सर्व कामे ट्रॅक्टरचलित अाहेत. कोले व घरातील अन्य सदस्य ट्रॅक्टर चांगल्याप्रकारे हाताळू शकतात. त्यामुळे त्यासाठी स्वतंत्र व्यक्तीची गरज भासत नाही. सर्व कामांतून मिळालेल्या आत्मविश्‍वासाचा परिणाम एकरी उत्पादनात चांगली वाढ होण्यावर झाला आहे. एकरी १०० ते १०३ टन ऊस उत्पादन त्यांना मिळते. शिरोळ येथील श्री दत्त साखर कारखान्यानेही त्यांना निविष्ठांबाबत मदत केली आहे. यामुळे कारखान्याच्या ‘झेप एकरी दीडशे टन’ या कार्यक्रमातही ते सहभागी झाले आहेत. अलीकडेच यांत्रिक भांगलणीचे एक प्रात्यक्षिक त्यांच्या पाहणीत आले आहे. त्याचा अजून अभ्यास करून मगच त्याकडे वळण्याचा निर्णय घेतला जाईल असे ते म्हणाले. संपर्क ः संजय कोले, ९८५०३३०१०६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com