पशू उपचारासाठी औषधी वनस्पती ठरताहेत फायदेशीर...

पशू उपचारासाठी औषधी वनस्पती ठरताहेत फायदेशीर...
पशू उपचारासाठी औषधी वनस्पती ठरताहेत फायदेशीर...

भारतात पुरातन काळापासून मानवी तसेच पशू उपचारासाठी औषधी वनस्पतींचा वापर होत आहे. आजही ग्रामीण भागात वैदू लोक जनावरांच्या उपचारासाठी औषधी वनस्पतींचा वापर करताना दिसतात. या उपचारपद्धती चांगल्या आहेत. परंतु, गेल्या काही वर्षांत औषधी वनस्पती नामशेष होत आहेत तसेच खात्रीशीर उपचार करणाऱ्या वैदूंची संख्यादेखील कमी होत आहे. हे लक्षात घेऊन परंपरागत पशू उपचार पद्धती, औषधी वनस्पतीचे संवर्धन आणि प्रसार करण्याचे काम बाएफ संस्थेने हाती घेतले आहे. या उपक्रमाबाबत माहिती देताना बाएफ संस्थेतील कार्यक्रम कार्यकारी सदाशिव निंबाळकर म्हणाले, की गेल्या चार वर्षांपासून आम्ही महाराष्ट्रातील पेठ (जि. नाशिक) आणि जव्हार (जि. पालघर) तालुक्यात पशू उपचारामध्ये औषधी वनस्पतींचा वापर करणाऱ्या ९७ वैदूंशी प्रत्यक्ष बोलून नोंदी घेतल्या. वैदूतर्फे जनावरांच्या काही प्राथमिक आजारावर होणारे उपचार, वापरण्यात येणाऱ्या औषधी वनस्पती, त्यांचा योग्य वापर आणि आजारावर उपचार केल्यानंतर होणारा परिणाम याच्या शास्त्रीय नोंदी घेतल्या. आजार लक्षात घेऊन वैदूने तयार केलेल्या औषधाची प्रत्यक्ष जनावरांवर चाचणी संस्थेच्या पशू तज्ज्ञांनी घेतली. या औषधोपचाराचा जनावरावर झालेला परिणाम तपासला. औषधी वनस्पती आणि तयार केलेल्या औषधाची खात्री करण्यात आली. त्यानंतर खात्रीशीर औषधी वनस्पती आणि उपचारपद्धतींचा प्रसार पशुपालकांपर्यंत करण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षांत पेठ (जि. नाशिक) आणि जव्हार (जि. पालघर) या तालुक्यांतील २६ गावांतील सुमारे ६०० पशुपालकांना औषधी वनस्पतींचा पशू उपचारात कसा वापर करायचा याचे प्रशिक्षण बाएफ संस्थेने दिले आहे. त्यांचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. पशुपालकांसाठी हर्बल गार्डन :

  • बाएफ संस्थेतील तज्ज्ञांनी औषधी वनस्पतींद्वारे पशू उपचाराची माहिती पोचविण्याबरोबरच गेल्यावर्षी पेठ आणि जव्हार तालुक्यांतील चार शेतकऱ्यांच्या शेतावर विविध प्रकारच्या तीस औषधी वनस्पतींची सुमारे ३० हजार रोपे तयार केली. याबाबत माहिती देताना बाएफ संस्थेतील वरिष्ठ संशोधन अधिकारी दीपक पाटील म्हणाले, की संस्थेच्या उपक्रमात सामील झालेल्या प्रत्येक पशुपालकास हर्बल गार्डन उभारणीसाठी प्रत्येकी तीस औषधी वनस्पतींच्या रोपांचे वाटप करण्यात आले. याबरोबर रोप लागवडीविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. पशुपालकांनी ही रोपे शेती बांधावर तर काही जणांनी गोठ्याजवळ लावून हर्बल गार्डन तयार केली. याचा चांगला फायदा पशुउपचारासाठी होत आहे.
  • हर्बल गार्डनमध्ये औषधी वनस्पतींची निवड करताना पहिल्यांदा जास्त प्रमाणात दिसणारे पशू आजार म्हणजेच पोटफुगी, जंत प्रादुर्भाव, हगवण, गोचिड प्रादुर्भाव लक्षात घेतला. या आजारावर उपचारासाठी लागणाऱ्या औषधी वनस्पतींची निवड करण्यात आली. पशुपालकांना या वनस्पतींपासून औषधनिर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आले. पशुपालक आजारानुसार औषध तयार करून जनावरांच्या उपचारासाठी वापरतात. यामुळे स्थानिक पातळीवर तातडीने प्रथमोपचार करणे शक्य झाले. सदर प्रशिक्षण कार्यक्रमामुळे स्थानिक वैदूंकडून परिसरातील शेतकरी औषधी वनस्पतींच्या उपचारांची माहिती घेत आहेत.
  • वैदू लोकांच्या अनुभवावरून ज्या दुर्मीळ आणि उपयुक्त औषधी वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत त्यांचे जतन व संवर्धन करण्याची जागरूकता पशुपालकांंमध्ये आली आहे. प्रामुख्याने गूळवेल, चिबड, कडुनिंब, वेखंड, मोह, निरगुडी, खाजकुहिली, करंज, सीताफळ, रिठा, बेल, अर्जुन सादडा, बाफळी, नरखी, पाभा, शतावरी, महारूख, आंबेहळद, निंभारा, कहानडोळ, कडू सिरडा, दाती, काळाकुडा, खरोटा, करवळ, खांदवेल, टेटू, धामोडा, रूई, पळस, शिसव, ओवा, रानमूग, एकदांडी, सफेद मुसळी, भारंगी, वाघोटा इत्यादी औषधी वनस्पतींच्या लागवडीवर भर देण्यात आला आहे.
  • औषधी वनस्पतींची नोंद ः १) पालघर आणि नाशिक जिल्ह्यांत पारंपरिक पशू औषधी वनस्पतींचा अभ्यास करताना १७८ प्रजातींची ७३ कुळे आणि १५२ वनौषधींची नोंद. २) नोंदण्यात आलेल्या प्रजातीपैकी ७४ वृक्ष,४९ झुडुपे,२९ क्षुप- वनस्पती आणि २६ वेलवर्गीय वनस्पतींचा जनावरांच्या औषधोपचारासाठी वापर. ३) बाएफतर्फे प्रकाशित मार्गदर्शन पुस्तकामध्ये ८० वनस्पतींच्या प्रजातींची नोंद. पशुपालकांपर्यंत पोचवतोय तंत्रज्ञान... परंपरागत औषधी वनस्पतींचा पशू उपचारातील वापराच्या शास्त्रीय नोंदी आम्ही ठेवत आहोत. जनावरांच्या आजारावर उपचार करणारे वैदू आणि पशुपालकांना योग्य पद्धतीने औषधी वनस्पतींच्या वापराचे प्रशिक्षण दिले जात आहे. परंपरागत ज्ञान आणि आधुनिक उपचारपद्धतीची सांगड घालून हे तंत्र राज्यभरातील पशुपालकांपर्यंत पोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. - गिरीश सोहनी, अध्यक्ष, बाएफ. संपर्क ः सदाशिव निंबाळकर, दीपक पाटील ०२०-२६९२६२४८ /२६९२६२६५ बाएफ, मध्यवर्ती संशोधन केंद्र, उरुळी कांचन, जि. पुणे

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com