अळी नियंत्रणासाठी मित्रकीटक ट्रायकोग्रामा उपयुक्त

अळी नियंत्रणासाठी मित्रकीटक ट्रायकोग्रामा उपयुक्त
अळी नियंत्रणासाठी मित्रकीटक ट्रायकोग्रामा उपयुक्त

विविध किडींचे शत्रू निसर्गामध्ये कार्यरत असतात. ते शेतकऱ्यांसाठी मित्र कीटक असून, त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करावेत. आवश्यकता भासल्यास शेतीमध्ये असे कीटक, त्यांची अंडी सोडणे असे पर्याय वापरावेत. अळीवर्गीय किडीच्या नियंत्रणामध्ये उपयुक्त ठरणाऱ्या ट्रायकोग्रामा या मित्र कीटकाची माहिती घेऊ. ट्रायकोग्रामा हा एक परोपजीवी कीटक आहे. तो अळी वर्गीय कीटकांचे अंडे नष्ट करतो. या किडींसाठी उपयुक्त

  • प्रामुख्याने कापसावरील बोंड अळ्या म्हणजेच ठिपक्‍यांची बोंड अळी, हेलिकोवर्पा (अमेरिकन बोंड अळी) आणि गुलाबी बोंड अळी यांच्या अंडी नाश करतो.
  • तुरीवरील शेंगा पोखरणारी अळी
  • उसावरील खोडकिडा.
  • टोमॅटो, भेंडी, वांग्यावरील फळ पोखरणारी अळी
  • भुईमूग, सूर्यफुलावरील अळी,
  • भात, ज्वारी, मका या पिकांवरील येणारे पतंगवर्गीय किडींचा नाश करतात.
  • अन्य धान्ये, भाजीपाला आणि फळझाडावरील कीटकांच्या अंड्याचा नाश ट्रायकोग्रामाच्या विविध प्रजाती करतात.
  • अशी आहे कार्यपद्धती

  • ट्रायकोग्रामा हा गांधील माशीसारखा दिसायला असून अतिशय सूक्ष्म आकाराचा (०.४०-०.७० मिमि) असतो.
  • ट्रायकोग्रामा हा आपल्या शेतातील पिकांचे कुठलेही नुकसान करीत नाही तर हा सूक्ष्म किडा शेतात फिरुन बोंड अळ्यांचे अंडे शोधून काढतो. किडीच्या अंड्यामध्ये स्वतःचे अंडे टाकतो.
  • ट्रायकोग्रामाची अंडी अवस्था १६-२४ तास असते.
  • त्यानंतर त्यातून अळी बाहेर पडते. अळी अवस्था २-३ दिवस असते. ही अळी किडीच्या अंड्यातील घटकांवर जगते. त्यामुळे त्यातून किडीची उत्पत्ती होऊ शकत नाही.
  • त्यानंतर अळी कोषावस्थेत जाते. कोषावस्था २-३ दिवस असते.
  • ७ व्या किंवा ८ व्या दिवशी ट्रायकोग्रामा प्रौढ किडीच्या अंड्यातून बाहेर पडतो.
  • प्रौढ पुढे २ ते ३ दिवस शेतात फिरुन अळीवर्गीय किडीच्या अंड्यांचा शोध घेऊन, त्यात आपली अंडी घालतो. अशा पद्धतीने हा शेतकऱ्यांना कीड नियंत्रणात मदत करतो.
  • ट्रायकोग्रामाच्या प्रजाती ः आपल्याकडील वातावरणात ट्रायकोग्रामा चिलोनिस, ट्रायकोग्रामा जापोनिकम आणि ट्रायकोग्रामा बॅक्‍ट्री उपयुक्त ठरतात. ट्रायकोकार्ड वापरण्याचे प्रमाण

  • भुईमूग, कापूस, तूर, भात, सूर्यफुल, ऊस, वांगी, ज्वारी, मका या पिकावरील येणारे पतंगवर्गीय किडींचा नाश करतात. इत्यादी पिकांवर एकरी २-३ कार्डस दर १०-१५ दिवसांनी २ ते ३ वेळा लावावे. पीक ४०-५० दिवसाचे झाल्यावर पहिल्यांदा कार्ड लावावे. -टोमॅटो, भेंडी, वांगे अशा भाजीपाला पिकामध्ये दहा दिवसांनी एकरी २ कार्ड लावावे.
  • उसावरील सर्व प्रकारच्या खोडकिड्यावर ट्रायकोग्रामा चिलोनिस एकरी १-२ कार्डस दर दहा दिवसांनी ८-१० वेळा लावावे. हे कार्ड उसाला ४५ दिवसांपासून वापरावे. ट्रायकोग्रामा खोडकिड्याचा नायनाट करतो.
  • कापूस पिकावरील तिन्ही बोंड अळ्यांसाठी ट्रायकोग्रामा चिलोनिस आणि ट्रायकोग्रामा बॅक्‍ट्री वापरावे. पेरणीपासून ४०-४५ दिवसांपासून ट्रायकोकार्ड लावायला सुरवात करावी. एकरी २-३ कार्ड दर १० दिवसांच्या अंतराने ४-५ वेळा लावावे. गुलाबी बोंड अळीचा अंडावस्थेमध्येच नाश करता येतो.
  • मका, ज्वारी पिकावर एकरी १-२ कार्डस दर दहा दिवसांच्या अंतराने पेरणीपासून ४०-४५ दिवसांनी लावावे.
  • भातावरील खोडकिड्यासाठी ट्रायकोग्रामा जापोनिकमचे १-२ कार्डस सहा आठवडे लागोपाठ लावावे. परत रोवणी केल्यानंतर ३० दिवसांपासून कार्ड लावायला चालू करावे.
  • ट्रायकोकार्डचे प्रसारण केल्यानंतर रासायनिक कीडनाशकांचा वापर टाळावा.
  • ट्रायकोकार्डविषयी... ट्रायकोकार्डस हे चांगल्या प्रतीचे असावेत. उत्तम प्रतीचे निकष - १ c.c. चे कार्ड असावे. त्यावरील पॅरासिटीझमचे प्रमाण ८० ते ९० टक्के असलेच पाहिजे. -ट्रायकोकार्ड हे काळ्या रंगाच्या अंड्याचे दिसेल. -हे कार्ड तयार झाल्यापासून ३५-४० दिवसांपर्यंतच वापरावे. कारण तोपर्यंत ट्रायकोग्रामा पूर्णपणे बाहेर पडतो. निसर्गात आढळणारे अन्य मित्रकीटक क्रायसोपा, मॅलाडा, लेडीबर्ड बिटल (ढालकिडा), ब्रॅकॉन, अपेंटेलीस, पेंटॅटोमिड ढेकूण, मॅंटीड, भक्षक कोळी, क्रिप्टोलेमस, सिरफीड माशी, कॅम्पोलेटीस, कॅरोप्स, इक्‍निमोनीड, रोगस, सुत्रकृमी असे अनेक मित्र किटक निसर्गात आढळून येतात. या मित्र कीटकांची ओळख करून घ्यावी. त्यांची उपस्थिती शेतामध्ये असल्यास किडीच्या नियंत्रणासाठी रासायनिक कीडनाशकांचा पर्याय शक्यतो टाळावा. - डॉ. शिवाजी तेलंग, ९४२१५६९०१८ (कापूस संशोधन केंद्र, नांदेड.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com