agricultural stories in Marathi, agrowon, types of bacterial fertilisers | Agrowon

जाणून घ्या जिवाणू खतांचे प्रकार
अंबादास मेहेत्रे, डॉ. उल्हास सुर्वे, डॉ. एस. एच. पठाण
रविवार, 7 ऑक्टोबर 2018

पिकांच्या वाढीसाठी नत्र व स्फुरद ही अन्नद्रव्ये महत्त्वाची आहे. या अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेसाठी निसर्गात कार्यरत जिवाणूचा वापर करणे शक्य आहे. प्रयोगशाळेमध्ये वाढ करून, योग्य अशा वाहकामध्ये मिसळून जिवाणू खते तयार केली जातात. अत्यंत कमी प्रमाणात बीज प्रक्रियेवेळी वापरली असता, १५ ते २० टक्क्यांपर्यंत रासायनिक खतांची बचत साध्य होते.

पिकांच्या वाढीसाठी नत्र व स्फुरद ही अन्नद्रव्ये महत्त्वाची आहे. या अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेसाठी निसर्गात कार्यरत जिवाणूचा वापर करणे शक्य आहे. प्रयोगशाळेमध्ये वाढ करून, योग्य अशा वाहकामध्ये मिसळून जिवाणू खते तयार केली जातात. अत्यंत कमी प्रमाणात बीज प्रक्रियेवेळी वापरली असता, १५ ते २० टक्क्यांपर्यंत रासायनिक खतांची बचत साध्य होते.

वातावरणात नत्र वायु स्थितीत ७८% इतक्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतो. मात्र, वनस्पतींना तो घेणे शक्य होत नाही. जमिनीतील काही सूक्ष्म जिवाणू या वायुरूप नत्राचे रूपांतर पिकांना उपलब्ध स्वरुपात करून देतात. उदा. रायझोबियम, अॅझाटोबॅक्टर, अॅझोस्पिरिलिम व निळे-हिरवे शैवाल इत्यादी. या जिवाणूंची योग्य माध्यमामध्ये प्रयोगशाळेत वाढ करण्याचे तंत्र संशोधकांनी विकसित केले आहे. अशा नत्र स्थिर करणाऱ्या, जमिनीतील स्फुरद विरघळणाऱ्या व सेंद्रिय पदार्थाचे विघटन करणाऱ्या उपयुक्त जिवाणूंची स्वतंत्रपणे वाढ केली जाते. ते वाहकात मिसळून जिवाणू खते तयार केली जातात. त्यांना जिवाणू संवर्धने बॅक्टरीयल कल्चर / बॅक्टरीअल इनाक्युलंट/ नायट्रोजन फिक्सर अशा विविध नावांनी ओळखले जाते. जिवाणू खते ही संपूर्ण सेंद्रिय व सजीव असतात. ही जिवाणू खते वापरण्याचे प्रमाणही कमी असते. पेरणीपूर्वी बीजप्रक्रियेसाठी १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम जिवाणू खते चोळल्यास नत्राची हेक्टरी २५ ते ३० टक्के बचत होते. त्याचबरोबर उत्पादनात सुद्धा १५ ते २० टक्क्याने वाढ होते.

जिवाणू खतांचे प्रकार

१) अॅझाटोबॅक्टर (असहजीवी) :
या जिवाणूचा शोध १९०१ मध्ये सर्व प्रथम बायजेरिकिया या शास्त्रज्ञाने लावला. हे जिवाणू शेंगवर्गीय पिके वगळता इतर एकदल व तृणधान्य पिकांच्या मुळाभोवती राहून असहजीवी पद्धतीने नत्र वायूचे अमोनियात रूपांतर करतात. त्यामुळे नत्र पिकांना उपलब्ध होते. उदा. ज्वारी, बाजरी, ऊस, गहू, मका, कांदा, बटाटा, कापूस, सूर्यफूल, वांगी, मिरची तसेच फुलझाडे व फळझाडांसाठी वापरावे. इत्यादी .

२) अॅझोस्पिरिलिम (सहजिवी) : हे जिवाणू तृणधान्यांच्या व भाजीपाला पिकांच्या मुळांमध्ये व मुळांभोवती राहून सहजिवी पद्धतीने नत्र स्थिरीकरण करण्याचे कार्य करते. हे अॅझाटोबॅक्टरपेक्षा आधिक कार्यक्षम असून १.५ ते २ पट अधिक नत्र पिकांना उपलब्ध करून देतात. अॅझोस्पिरिलिम हे प्रामुख्याने ज्वारी पिकाच्या पेरणीच्या वेळी बीजप्रक्रियेसाठी वापरतात.

३) बायजेरिकिया (असहजीवी) ः हे जिवाणू मुख्यतः आम्लधर्मी जमिनीत आढळतात. शेंगवर्गीय पिके वगळून एकदल व तृणधान्य पिकांसाठी वापरतात.

४) रायझोबियम : हे सहजीवी जिवाणू द्विदल (शेंगवर्गीय) वर्गीय वनस्पतीच्या मुळावर गाठी करून राहतात. हे जिवाणू अन्न वनस्पतींकडून घेतात. वनस्पतींच्या मुळांवर ग्रंथी निर्माण करतात. या ग्रंथीद्वारे हवेतील मुक्त नायट्रोजनचे स्थिरीकरण करून अमोनियाच्या रूपाने पिकास उपलब्ध करतात. पिकाच्या मुळांवरील एका गाठीत लाखो जिवाणू असतात. पूर्ण वाढलेल्या गाठी लोह हिमोग्लोबिनमुळे गुलाबी दिसतात. या जिवाणूंना रोपाशिवाय स्वतंत्रपणे नत्र स्थिर करता येत नाही, म्हणून त्यांना सहजीवी जिवाणू म्हणतात. हे जिवाणू खत फक्त द्विदल / शेंगवर्गीय पिकांसाठी उपयुक्त असतात. वेगवेगळ्या पिकांसाठी ठराविक प्रकारचे रायझोबियम गटाचे जिवाणू खत वापरावे लागते.

महत्त्वाचे रायझोबियम जिवाणू व पिकांचे गट

 • रायझोबियम जिवाणू ःपिकांचे गट
 1. रायझोबियम मेलीलोटी ः अल्फा अल्फा गट : लसूण घास (Lucerne), मेथी (Fenugreek)
 2. रायझोबियम ट्रायफोली ः बरसीम गट : बरसीम
 3. रायझोबियम जपोनिकमः सोयाबीन गट : सोयबीन, भुईमूग, चवळी, ज्यूट
 4. रायझोबियम सायसारी ः हरभरा गट : हरभरा
 5. रायझोबियम लेग्युमिनीसेरम ःवाटाणा गट : वाटाणा , मसूर (Lentil)
 6. रायझोबियम फॅजोओलाय  ःघेवडा गट: सर्व प्रकारच्या घेवडा

५) निळे-हिरवे शैवाल : हे एकपेशीय, सूक्ष्मदर्शी, तंतुमय शरीररचना असलेली गोड्या पाण्यातील स्वयंपोषी पाणवनस्पती आहे. निळ्या-हिरव्या शैवालातील हेटरोसिस्ट या पेशी नत्र स्थिरीकरण करतात. हरित द्रव्यामुळे हे हिरवे दिसते, तर फायकोबीलीनमुळे निळे दिसते. यांची वाढ भात शेतात चांगली होते.

निळ्या-हिरव्या शैवालाचे फायदे :

 • हवेतील नत्र स्थिरीकरण करून जवळ-जवळ २५ ते ३० किलो नत्र प्रति हेक्टर एका हंगामात मिळते. रासायनिक खतांच्या नत्र मात्रेमध्ये हेक्टरी २५ ते ३० किलो बचत होते.
 • जमिनीत अद्राव्य स्वरूपातील स्फुरद भात पिकास काही प्रमाणात उपलब्ध होतो.
 • जमिनीत सेंद्रिय पदार्थांची भर पडते. जमिनीचा पोत सुधारतो.

६) अझोला : ही पाणवनस्पतीच्या पेशीत नेचेवर्गीय अॅनाबेना अझोली हे निळे-हिरवे शैवाल सहजीवी पद्धतीने वाढते. ही वनस्पती प्रकाश संश्लेषण पद्धतीने अन्न तयार करते. त्याच प्रकारे शैवाल हवेतील नत्र स्थिर करून अझोलात साठवते. अझोलामुळे प्रति हेक्टरी २० ते ४० किलो नत्र मिळते. भारतात अझोलाची अझोला पिनाटा ही जात सर्वत्र आढळते.

७) स्फुरद विरघळणारे जिवाणू (Posphate solubilizers): काही जिवाणू मातीतील घट्ट स्वरूपातील स्फुरदाचे विघटन करून त्याचे पाण्यात विद्राव्य स्वरूपात रूपांतर करतात. जमिनीमध्ये बद्ध झालेल्या स्फुरदाची पिकांना उपलब्धता करून देतात. परिणामी स्फुरदयुक्त रासायनिक खतांची बचत होते. उत्पादनात १५ ते २० टक्क्यांनी वाढ करतात.
स्फुरदमुळे कर्बयुक्त पदार्थ तया करण्याची प्रक्रिया जोमाने होते. पिकांच्या मुळाची जोमदार वाढ होते. पीक फॉस्फरिक ॲसिडच्या रूपाने स्फुरद घेतात. काही जिवाणू सायट्रिक आम्ल, लॅक्टिक आम्ल, फ्यूमारिक आम्ल, फॉस्फेटच्या द्रवात रूपांतर करून पिकास उपलब्ध करून देतात. उदा. बॅसिलस, सुडोमोनास इत्यादी. स्फुरद विरघळणारे जिवाणू खते वापरल्यास सोयाबीन, भुईमूग, हरभरा व बटाटा उत्पादनात लक्षणीय वाढ होते.

जैविक खते वापरण्याचे फायदे ः

 • बियाण्याची उगवण लवकर व चांगली होते.
 • पिकांची वाढ जोमदार होते.
 • पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
 • जिवाणू खते वापरल्यास पीक उत्पादनात १५ ते २० % वाढ होते.
 • जिवाणू खतांच्या वापराने जमिनीची सुपीकता व उत्पादकता वाढते.
 • जिवाणू खतांचा जमिनीवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही.
 • नत्र प्रमाण योग्य ठेवून पोत सुधारतो व नंतरच्या पिकास त्याचा फायदा होतो.
 • रासायनिक खताची १५ ते २५ बचत होते.
 • कमी खर्चिक, प्रदूषणमुक्त व वापरण्यास अत्यंत सोपे.

अंबादास ना. मेहेत्रे, ९५४५३२३९०६
डॉ. एस. एच.पठाण, ८१४९८३५९७०

(कृषी विद्या विभाग, पदव्युत्तर महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)

इतर कृषी सल्ला
कपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...
केळी पीक सल्लासद्यःस्थितीत तापमानात वाढ होत आहे; (३० ते ३५ अंश...
ज्वारी, हरभरा, सूर्यफूल पिकातील आंतर...रब्बी हंगामात प्रामुख्याने ज्वारी, हरभरा, करडई...
आंतरपिकातून मिळेल चांगले उत्पादनआंतरपीक पद्धतीमध्ये चांगले उत्पादन मिळविण्यासाठी...
डाउनी, भुरीच्या प्रादुर्भावाकडे लक्ष...सर्वसाधारण सर्वच द्राक्ष विभागांमध्ये येत्या...
जाणून घ्या जिवाणू खतांचे प्रकारपिकांच्या वाढीसाठी नत्र व स्फुरद ही अन्नद्रव्ये...
आंतरपीक ठरते फायदेशीर...आंतरपीक पद्धतीमध्ये दोनही पिकांना वेगवेगळ्या...
टोमॅटोवरील फळे पोखरणाऱ्या अळीचे...खरीप हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात भाजीपाला...
नियोजन रब्बी हंगामाचे : करडई, जिरायती...करडई जमीन ः मध्यम ते भारी (खोल) जमीन...
उसाच्या उत्पादकता वाढीसाठी सिलिकॉन वापरपिकांच्या वाढीसाठी अन्य अन्नद्रव्यांप्रमाणे...
कोरडवाहू क्षेत्रातील रब्बी हंगामाची...रब्बी हंगामाच्या यशस्वितेसाठी कोरडवाहू...
द्राक्ष कलम करण्याची पद्धतीखुंटरोपाची निवड डॉगरीज, डीग्रासेट, रामसे किंवा...
अन्नद्रव्यांचे प्रकार, महत्व जाणून करा...पिकांच्या वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्ये जाणून घेऊन...
मका पिकावर नवी कीड अमेरिकन लष्करी अळीचा...अमेरिकन लष्करी अळी (स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा) ही...
कपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...
मळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...मळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...