भूमिगत बंधारा वाढवेल विहिरींची पाणी पातळी

भूमिगत बंधारा वाढवेल विहिरींची पाणी पातळी
भूमिगत बंधारा वाढवेल विहिरींची पाणी पातळी

सध्या अनेक गावांमध्ये विहिरीचे पाणी लवकर संपल्यामुळे गावकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा ठिकाणी, सर्वेक्षण आणि अभ्यास करून, योग्य जागा नक्की केली आणि भूमिगत बंधारा बांधावा. या उपायामुळे विहिरीतील पाणी साठवण्याचा कालावधी साधारण अडीच ते तीन महिन्यांनी वाढवता येऊ शकतो. मागील भागात आपण भूमिगत बंधारा म्हणजे काय, तो कुठे बांधावा, काय दक्षता घ्यावी याबद्दल माहिती घेतली. ही संकल्पना आणि जलसंधारणाचा उपाय रुढ उपायांपेक्षा वेगळा असल्याने काही उदाहरणे देऊन हा उपाय कसा उपयुक्त ठरतो हे आजच्या लेखात आपण पाहणार आहोत. स्वामी विवेकानंद महाविद्यालय परिसरातील जलसंधारण ः वाडा गावात असलेल्या स्वामी विवेकानंद महाविद्यालयात पाण्याचा स्रोत म्हणजे सुमारे ७० वर्ष जुनी असलेली एक लहानशी विहीर. शाळा, महाविद्यालय, छात्रालय, इत्यादी गोष्टी या विहिरीवर आणि नळपाणी योजनेवर अवलंबून आहेत. एकूण विद्यार्थी संख्या अंदाजे ५००० आणि विहीर जरी आज संस्थेच्या ताब्यात असली तरी ती खूप जुनी असल्याने सर्व गाव तिथे पाण्यासाठी येतो. त्यामुळे संस्था आणि गाव असा दुहेरी दबाव या एका विहिरीवर येऊन पाणी साधारण मार्चमध्ये संपते हा तिथल्या मंडळींचा अनुभव. विहिरीच्या प्रवाहाच्या वरच्या बाजूला एक पाझर तलाव आहे. पण इथे पाणी उताराने वाहून जात असल्याने हा पाझर तलाव पाऊस संपता संपता कोरडा पडतो आणि त्याचा विहिरीला फारसा उपयोग होत नाही. या विहिरीतून पाणी मिळण्याचा कालावधी वाढवता येतो का हे बघायला मला बोलावले होते. तिथे जाऊन सर्वेक्षण करून विहीर मोठी करणे आणि विहिरीच्या प्रवाहाच्या खालच्या बाजूला जागा नक्की करून तिथे एक भूमिगत बंधारा बांधायचा, असे दोन उपाय ठरले. १) डिसेंबर २०१८ मध्ये केशवसृष्टी ग्रामविकास योजना या संस्थेच्या माध्यमातून आम्ही पाऊस संपल्यावर डिसेंबरमध्ये तिथे एक भूमिगत बंधारा बांधला. त्यानंतर, त्या विहिरीची पाण्याची पातळी पुढच्या १५ दिवसांमध्ये साधारण तीन फुटांनी वाढली. जी विहीर मार्चमध्ये कोरडी होत असे, त्या विहिरीत आजही मे महिना अर्धा उलटून गेल्यावरही पाणी आहे. २) गेल्या वर्षीच्या पावसाचे पाणी अडवता न आल्याने या उपायाचा पूर्ण फायदा आत्ताच्या उन्हाळ्यात मिळणार नाही. पण आत्ता चालू असलेल्या विहिरीच्या पुनर्बांधणीनंतर ही विहीर येत्या पावसाळ्यानंतर संस्था आणि गाव यांना वर्षभर पाणी देऊ शकेल. ३) भूमिगत बंधाऱ्याचा आणखी एक फायदा असा होणार आहे, की या बंधाऱ्यामुळे विहिरीला फायदा तर होणार आहेच, त्याचबरोबर, पाझर तलावातही पाणी जास्त काळ थांबणार आहे, ज्यामुळे विहिरीला अधिक फायदा होईल. वनवासीपाडा गावात बांधलेला भूमिगत बंधारा ः ठाणे, पालघर जिल्ह्यांत प्रगती प्रतिष्ठान ही संस्था चार दशकांहून जास्त काळ या भागात विविध लोकोपयोगी कामे करत आहे. त्यांनी काही गावांमध्ये विहीर बांधून त्यावरून गावासाठी नळपाणी योजना पूर्ण करून दिल्या आहेत. त्यातील बहुसंख्य यशस्वीपणे चालू आहेत. सध्या, कमी होत चाललेल्या पावसाने म्हणा किंवा लोकांची पाण्याची गरज वाढली म्हणा किंवा नळपाणी योजना झाल्यामुळे लोकांचा पाणीवापर वाढला असल्याने अनेक विहिरी मार्चअखेर कोरड्या पडण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. या कोरड्या पडत चाललेल्या विहिरींचा पाणी देण्याचा कालावधी वाढवता येतो का हे बघण्यासाठी आणि काही गावांमध्ये प्रयोग म्हणून संस्थेसोबत आम्ही काम केले.

१) प्रयोगासाठी दहा गावे पहिल्या टप्प्यासाठी निवडली त्यातील एक म्हणजे वनवासीपाडा. दुर्गम भाग, अजूून वीज नाही. आत्ता कुठे तारा टाकल्या जात आहेत, त्यामुळे सौर ऊर्जेवर सुविधा मिळविण्याचा प्रयत्न करणारे एक उत्साही गाव असे या गावाचं वर्णन करता येईल. या गावात विहिरीवर नळपाणी योजना करून पाणी गावात आले, पण पाण्याचा वापर वाढून विहीर मार्चमध्ये कोरडी पडायला लागली. म्हणून गेलं वर्षभर नळपाणी योजना बंद करून परत पाणी ओढून काढणे सुरू झाले आणि बायाबापड्यांना परत काम आणि कष्ट नशिबात आले. २) विहिरीचा पाणी देण्याचा कालावधी वाढवून हे कष्ट संपवता येतात का याचं सर्वेक्षण करताना असे लक्षात आले, की या भागातून पाणी उताराने सतत पुढे वाहून जात राहाते, त्यामुळे आणि पाण्याचा वापर वाढल्याने त्याचा परिणाम विहिरीच्या पाणी देण्याच्या क्षमतेवर होतो आहे. विहिरीच्या प्रवाहाच्या खालच्या भागात एका ठिकाणी भूमिगत बंधारा बांधण्यासाठी एक सुयोग्य जागा मिळाली आणि मग तिथे बंधारा बांधणे नक्की केले. ३) बंधारा बांधायच्या वेळी खणल्यावर खाली विहिरीतून आणि एकूणच त्या भागातून वाहून जाणारे पाणी बघायला मिळाले, लोकांना ते दाखवता आले. त्या ठिकाणी भूमिगत बंधारा बांधला गेला. आज त्या विहिरीतील पाण्याची पातळी मागील दोन वर्षांपेक्षा उत्तम आहे. अर्थात, हे काम मार्चमध्ये केल्याने त्याचा पूर्ण उपयोग यावर्षी होणे शक्य नाही, कारण या वर्षीचे पावसाचे बरेचसे पाणी आधीच वाहून गेले आहे. पण तरीही आता मिळणारा फायदा हे सांगतोय की एक पाऊस होऊन गेला की मग पुढे ही विहीर कोरडी होण्याची शक्यता दिसत नाही, इतके या भागातून वाहून जाणारे पाणी नवीन बांधलेला भूमिगत बंधारा अडवून, साठवून ठेवणार आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यानंतर गावाला पुरेसा पाणीपुरवठा होणार आहेच. याचबरोबरीने भाजीपाला लागवड, मोगरा लागवड, इत्यादी गोष्टींसाठीही पुरेसे पाणी उपलब्ध राहील, ज्यातून गावात समृद्धी आणणं शक्य होणार आहे. अशी कित्येक उदाहरणे आपल्याला कोकणात पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यांपासून मराठवाड्यात अगदी जालना आणि बीड येथील काही गावांमध्ये आम्ही केलेल्या कामांमध्ये बघायला मिळू शकतात. आपल्या परिसरातील भूजल पातळी राखण्यासाठी, विहिरींचा पाणी देण्याचा कालावधी वाढविण्यासाठी भूमिगत बंधारा हा उपाय सर्वात प्रभावशाली असल्याचा आमचा गेल्या बारा वर्षांचा अनुभव आहे. सध्या आपल्याला खूप गावांमध्ये विहिरीचे पाणी लवकर संपल्यामुळे गावकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे, हा अनुभव येतोय. विशेषत: सह्याद्री पर्वतरांगेच्या दोन्ही बाजूंना असलेल्या उताराच्या भागात वसलेल्या गावांमध्ये हा प्रश्न सार्वत्रिक आहे. अशा ठिकाणी, सर्वेक्षण करून, योग्य अभ्यास करून, योग्य जागा नक्की केली आणि हा उपाय केला तर विहिंरीचा पाणी देण्याचा काळ साधारण अडीच ते तीन महिन्यांनी वाढवता येऊ शकतो. यात महत्त्वाची गोष्ट ही, की हा उपाय आपण आपल्या डोक्याने, विचाराने न करता, योग्य आणि यात प्रत्यक्ष अनुभव असलेल्या तज्ज्ञ व्यक्तीच्या सल्ल्याने आणि मार्गदर्शनाखालीच करावा. अन्यथा, खर्च तर होईल पण पाणी न थांबल्याने फायदा व्हायच्या ऐवजी नुकसान होऊ शकते. असे स्थलानुरूप उपाय योग्यप्रकारे केले तर प्रत्येक गावाला त्या परिसरात पुरेसे पाणी अडवता, जिरवता आणि साठवून वापरता येणे शक्य आहे. संपर्क ः डॉ. उमेश मुंडल्ये, ९९६७०५४४६० (लेखक पाणी, पर्यावरण आणि शेती विषयाचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com