उसाच्या उत्पादकता वाढीसाठी सिलिकॉन वापर

उसाच्या उत्पादकता वाढीसाठी सिलिकॉन वापर
उसाच्या उत्पादकता वाढीसाठी सिलिकॉन वापर

पिकांच्या वाढीसाठी अन्य अन्नद्रव्यांप्रमाणे सिलिकॉनची गरज असल्याचे अनेक संशोधनातून पुढे आले आहे. उसासारख्या बारमाही पिकांमध्ये त्याचा वापर उत्पादन वाढीसह साखरेच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतो. सिलिकॉन हे पिकासाठी महत्त्वाचे व उपयुक्त अन्नद्रव्य आहे. एकाच जमिनीमध्ये सातत्याने तीच ती पिके घेत राहिल्याने अन्नद्रव्यांची कमतरता भासत आहे. या अन्नद्रव्यांची पूर्तता होत नसल्याने जमिनी नापीक होत आहेत. अशीच बाब सिलिकॉन या अन्नद्रव्याची आहे. पिकांना पूर्वी हा घटक जमीन, पाणी आणि पाऊस याद्वारे उपलब्ध होत असे. मात्र, जमिनीतील त्याचा मात्रा कमी झाल्याने पिकाच्या उत्पादनावर विपरित परिणाम होत आहे.

  • जर्मन शास्त्रज्ञ डॉ. जस्टिन व्हॉन लीबेग यांनी १९४८ मध्ये पिकांना मोठ्या प्रमाणात सिलिकॉनची गरज असल्याचे सिद्ध केले. नत्राइतकीच या खताची गरज पिकांना असते. किंबहुना तृणधान्य वर्गातील उदा. ऊस, भात, गहू, मका, ज्वारी अशा पिकांना तर नत्रापेक्षाही जास्त प्रमाणात सिलिकॉनची गरज असते.
  • परदेशामध्ये झालेल्या अनेक संशोधनामध्ये बारा महिन्यांच्या कालावधीच्या ऊस पिकामध्ये हेक्टरी ३८० ते ४०० किलो सिलिकॉनची आवश्यकता असल्याचे निष्कर्ष आहेत. मॉरिशस येथील शास्त्रज्ञ व्हॉटमन डिव्हिलीयर्स यांनी १९३७ मध्ये केलेल्या अभ्यासामध्ये सिलिकॉनचा वापर केल्याने ऊसउत्पादनामध्ये हेक्टरी ३६ ते ४० टनाने वाढ झाल्याचे दिसून आले होते. चीनी संशोधक पीई व झुऊ यांनी केलेल्या प्रयोगामध्ये उसाची उंची, वजन, व्यास आणि साखरेचे प्रमाण यामध्ये अनुकूल परिणाम आढळले आहेत.
  • भारतामध्ये डॉ. नारायण सावंत यांनी उसासह विविध पिकांमध्ये सिलिकॉनच्या वापराचे चांगले निष्कर्ष मिळत असल्याचे सिद्ध केले.
  • उसाची उत्पादकता ही प्रामुख्याने जमिनीची सुपीकता, उसाची जात, फुटव्यांची संख्या, उसाचे वजन, पाण्याचे व्यवस्थान, सेंद्रिय व रासायनिक खतांचा संतुलित वापर, रोग व किडीचे व्यवस्थापन व योग्य वेळी तोडणी इ. बाबीवर अवलंबून असते. यात आता सिलिकॉन हाही महत्त्वाचा घटक ठरणार आहे. सिलिकॉनचे पिकाच्या विविध घटकांवरील परिणाम खालीलप्रमाणे आहेत. जमिनीची सुपीकता ः जमीन ही पिकांच्या बाबतीत प्रामुख्याने मुळांची वाढ, अन्नद्रव्यांचा पुरवठा, हवा व पाणी यांचे योग्य संतुलन यात महत्त्वाचे कार्य करते. सिलिकॉनयुक्त खतांचा पुरवठा केल्यास यातील सिलिसिक आम्ल जमिनीच्या आरोग्यावर अनुकुल परिणाम करते. जमीन भुसभुशीत होऊन मुळांची वाढ होण्यास मदत होते. जलधारणा शक्ती वाढते. हवा आणि पाण्याचे योग्य संतुलन राखण्यास मदत करते. जीवाणूंचे कार्य सुलभ होते. मुळाच्या पोकळ्या मजबूत असल्याने अन्नद्रव्यांचा पुरवठा सुलभरीत्या होतो. अलीकडे राहुरी येथील विद्यापीठामध्ये झालेल्या अभ्यासामध्ये जमिनीचा सामू व सेंद्रिय कर्बाचे प्रमाणदेखील वाढत असल्याचे दिसून आले आहे. जास्त तापमानामध्ये जमिनीतून होणारे बाष्पीभवनही कमी होण्यास मदत होते. अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढणे ः रासायनिक खतांतील नत्र, स्फरद, पालाश या प्रमुख व अन्य सूक्ष्म अन्नद्रव्ये वाया जाण्याचे प्रमाण मोठे आहे. दिलेल्या नत्रयुक्त खतातून नत्र ४० ते ४५ टक्के वाया जातो. स्फुरदयुक्त खतातील ८० ते ८५ टक्के स्फुरद जमिनीत स्थिरावस्थेत जातो, तर पालाशयुक्त खतांतील पालाश वाया जाण्याचे प्रमाण २० ते ३० टक्के एवढे असते. दक्षिण कोरिया येथील प्रयोगात सिलिकॉनचा वापर केला असताना या मुख्य खतांचा उपलब्धता वाढत असल्याचे दिसून आले. नत्रयुक्त खते २० ते ४० टक्के, स्फुरदयुक्त खते ४० ते ७० टक्के, पालाशयुक्त खते २० ते २५ टक्केने वाढल्याचे सिद्ध झाले. अन्नद्रव्याची उपलब्धता वाढल्याने उत्पादनामध्ये वाढ मिळते. फुटव्यांचे प्रमाण वाढून, कांड्याची लांबी, जाडी व वजन वाढण्यास मदत होते. प्रकाश संश्‍लेषण व सिलिकॉन ः सिलिकॉनच्या वापरामुळे पानांचे आकारमान वाढते. पाने सरळ व ताठ होतात. त्यामुळे पानांवर जास्त प्रमाणात सूर्यकिरणे पडतात. परिणामी प्रकाश संश्‍लेषण क्रिया मोठ्या प्रमाणात होते. कर्बग्रहण वाढते. सौरशक्तीचे पानांमध्ये अन्ननिर्मितीची क्रिया वाढते. उत्पादनवाढीस मदत होते. कीड व रोगास प्रतिबंध ः पानातील पेशीभित्तिका जाड होऊन, त्याभोवती सिलिकॉनचे आवरण तयार होते. यामुळे रसशोषक किडींना पानामध्ये सोंड खूपसून रस शोषणे कठीण जाते. तसेच रोगांचे बिजाणू पानांवर रुजत नाहीत. त्यांची वाढ होत नाही. थोडक्यात, उसावरील लोकरी मावा, पायरिया, खोडकिडा अशा किडी आणि तांबेरा, पानावरील ठिपके, रिंगस्पॉट अशा रोगांना सिलिकॉनमुळे अटकाव होत असल्याचे दिसून आले आहे. हा अभ्यास जोन्स व हेन्ड्रिक (१९६७) आणि लेबीन आणि रेनमान (१९६९) या शास्त्रज्ञांनी केला आहे. उसातील शर्करेचे अन्य संयुगांमध्ये रूपांतर -(इन्व्हर्जन ऑफ शुगर) ः ऊस पक्व झाल्यानंतर उसामध्ये सुक्रोजचे रुपांतर शर्करेच्या अन्य संयुगांमध्ये होऊ लागते. त्यामुळे उसाचे वजन आणि साखरेच्या उताऱ्यावर परिणाम होतो. कृषी शास्त्रज्ञ अलेक्झांडर (१९७९) यांनी केलेल्या संशोधनामध्ये सिलिकॉन हे उसामध्ये साखर निर्मिती, साठवण व अन्य संयुगांमधअये होणाऱ्या रूपांतर कमी करते. परिणामी उसाचे वजन घटत नाही. पाण्याची बचत ः उन्हाळ्यामध्ये तसेच कमी पावसाच्या प्रदेशात ऊस पिकांस पाण्याचा पुरवठा कमी होतो, त्याचा फटका वाढीला बसतो. सिलिकॉनची कमतरता असल्यास पानांमधून बाष्पीभवनाचा वेग सुमारे ३० टक्क्याने जास्त असल्याचे संशोधनात आढळले आहे. मात्र, याचा पुरवठा उत्तम असल्यास कमी पाण्याचा पिकावरील ताणही कमी राहतो. दुष्काळी परिस्थितीतही पीक तग धरते. उस लोळणे ः सिलिकॉनमुळे ऊस कणखर होतो.मुळांची घनात व लांबी वाढत असल्याने मुळे जमिनीत खोलवर रुजतात. उसाला भक्कल आधार मिळाल्याने ऊस लोळण्याचे प्रमाण कमी होते. जमिनीवरील परिणाम ः सिलिकॉनचे जमिनीवरील परिणाम तपासण्यात आले. त्यात जमिनीचा सामू कमी होऊन सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढल्याचे आढळले. तसेच नत्र, स्फुरद, पालाश यांची उपलब्धता वाढली. स्थानिक अभ्यासातील निष्कर्ष ः

  • राहुरी येथील कृषी विद्यापीठामध्ये घेतलेल्या चाचण्यामध्ये सिलिकॉनयुक्त खतांच्या हेक्टरी ४०० किलो या प्रमाणात वापर करण्यात आला होता. त्यात उसाची उंची, कांड्याची लांबी व जाडी, फुटव्याची संख्या, रसाची शुद्धता यामध्ये अनुकुल परिणाम मिळाले आहे. साखर उतारा अर्धा टक्केने वाढला. हेक्टरी उत्पादनात १५ टन, साखर उत्पादन २.६१ टन वाढ मिळाल्याचे दिसून आले.
  • व्हीएसआय, पुणे येथील प्रयोगामध्ये उसाचे उत्पादन १८.३ टन, साखरेचे उत्पादन २.६ टन प्रति हेक्टर वाढल्याचे दिसून आले.
  • शिवाजी थोरात, ९८५००८५८११ (लेखक इंटरनॅशनल सोसायटी फॉर सिलिकॉन इन ॲग्रीकल्चर, फ्लोरिडा, अमेरिका या संस्थेचे सदस्य आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com