इतिहासकालीन जलसंधारण अन् त्यामागचे विचार...

इतिहासकालीन जलसंधारण अन् त्यामागचे विचार...
इतिहासकालीन जलसंधारण अन् त्यामागचे विचार...

दरवर्षी पिढ्यानपिढ्या पावसाचे पाणी वेगवेगळे उपाय करून साठवले गेले आणि पावसाळ्यानंतर वापरले गेले. यासाठी स्थलानुरूप उपाय करण्यात आले. त्यातील बरेचसे उपाय आजही व्यवस्थित काम करताहेत. याचा पुन्हा एकदा अभ्यास करण्याची गरज आहे. आपण पहिल्यापासून विचार केला, तर जेव्हा माणूस कंदमुळे खाऊन, शिकार करून जगत होता, गुहांमध्ये राहत होता, तेव्हा त्याची पाण्याची गरज मर्यादित होती. तेव्हा इतर प्राण्यांसारखा माणूसही पाण्याच्या स्रोतापर्यंत जात असे, हवे तेवढे पाणी पिऊन परत येत असे. पण, माणूस हा विचार करू शकणारा आणि भविष्याबद्दल विचार करून योजना आखणारा प्राणी असल्याने, जसजसा प्रगत होत गेला, तसतसा आपल्या सोयींबद्दल जास्त विचार करायला लागला. त्यातूनच शेती करणे, गुहेऐवजी, घरे बांधून एकत्र राहणे, सामुदायिक वस्ती तयार करून राहणे इत्यादी गोष्टी झाल्या. सुरवातीच्या काळात माणूस पाण्याच्या स्रोताजवळ वस्ती करायला लागला. आपण इतिहास पाहिला, तर हे लक्षात येते, की जगामध्ये सगळ्या संस्कृती या नद्यांच्या काठांवर बहरल्या. सगळ्या ऋतूंमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध असणे ही सगळ्यात महत्त्वाची बाब असल्याने, जिथे पाणी मुबलक तिथे माणसाने वस्ती केली. परंतु, हे सगळीकडे शक्य नव्हते. जिथे माणूस पृष्ठभागावरील पाण्याच्या स्रोतापासून लांब होता; पण वस्ती करायला सोयीची जागा होती, अशा ठिकाणी रोज लागणाऱ्या पाण्यासाठी स्रोतापर्यंत जाऊन पाणी घेऊन येणे ही व्यावहारिक बाब नव्हती. साहजिकच, भविष्याचा विचार करून काम करणाऱ्या माणसाने पाणी मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधले, ते होते त्या काळातील जलसंधारण. इतिहासकालीन जल व्यवस्थापनाची स्थिती ः आपल्याला जल व्यवस्थापन आणि जलसंधारणाची एक प्रदीर्घ परंपरा लाभली आहे. आपण आपल्याकडील तीर्थक्षेत्रे पाहिली तर लक्षात येईल, की ही सर्व ठिकाणे पाण्याच्या स्रोताजवळ, विशेषत: उगमाजवळ किंवा दोन- तीन स्रोतांच्या संगमाजवळ आहेत. जरा लक्ष देऊन पाहिले तर हेही लक्षात येते, की आजही ग्रामीण भागात फिरताना पाहिले तर जवळपास प्रत्येक गावात किमान एक तलाव, तळे दिसते आणि त्याच्या काठी एकतरी मंदिर असते. थोडा अभ्यास केला तर सहज लक्षात येते, की हा तलाव गावकऱ्यांनी खोदला, बांधला आणि पिढ्यानपिढ्या सांभाळला. या तलावात जोपर्यंत पाणी असते, तोपर्यंत गावातल्या बहुतांश विहिरींना पाणी असतेच. पूर्वीच्या काळी तलाव आणि इतर स्रोत हे योग्य जागा शोधून आणि विचार करून नीट बांधून वापरात आणले गेले आणि सांभाळले गेले. त्याकाळात राजा, अधिकारी आणि धनिक मंडळी सर्वसामान्य लोकांच्या सोयीसाठी पाणी साठवण्यासाठी खर्च करून सुविधा निर्माण करत होते. हे चांगले आणि पुण्याचे काम समजले जात असे. जलसंधारण आणि व्यवस्थापन हे लोकसहभागातून करायचे काम होते, ते सांभाळण्यात तत्कालीन राजव्यवस्थेचा थेट सहभाग नसे. आपण जेव्हा जलसंधारण म्हणतो, तेव्हा आपल्याकडे असते पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे नियोजन आणि व्यवस्थापन. कारण आपल्याकडे गोड पाणी वर्षोनुवर्षे देणारा एकच स्रोत आहे आणि तो म्हणजे नियमितपणे येणारा पाऊस. दरवर्षी पावसाचे पडणारे पाणी वेगवेगळे उपाय करून पिढ्यानपिढ्या जपले गेले, साठवले गेले आणि मग पावसाळ्यानंतर वापरले गेले. ते करताना स्थलानुरूप उपाय केले गेले आणि त्यातील बरेचसे आजही व्यवस्थित काम करत आहेत. आपण हे उपाय आणि त्यांच्यामागे असलेला विचार काही उदाहरणांवरून समजून घेऊयात. पावसाच्या पाण्याचे संधारण हे केवळ मंदिराजवळ किंवा गावाजवळ होते असे नाही. जलसंधारण आणि व्यवस्थापन करताना तिथली गरज काय आहे, तिथे काय करणे शक्य आहे इत्यादी बाबींचा विचार करून मग उपाय योजले गेले हे कळते. आत्ता अस्तित्वात असलेल्या अगदी दहाव्या किंवा त्याच्याही आधीच्या शतकातील वास्तूंमध्येसुद्धा आपल्याला याचे अगणित पुरावे मिळतात. अगदी आजही वापरात असलेले किंवा अगदी थोडी दुरुस्ती करून ते वापरता येण्यासारखे आहेत. हे सर्व उपाय लोकांनी त्या वेळी असणारी गरज, स्रोतांची ताकद, भौगोलिक परिस्थिती इत्यादी गोष्टींचा विचार करून केले होते, हे सहज कळते. अगदी समुद्रकिनाऱ्याजवळ जागा असो, गावामध्ये असो, नदीकिनारी असो, डोंगरावर असो, किंवा अगदी समुद्रामधील बेटावर असो, स्थलानुरूप उपाय योजून जलव्यवस्थापन करणे, ही त्यावेळच्या समाजातील जाणत्यांची खासीयत होती आणि महत्त्वाचे म्हणजे हे उपाय आजही तसेच उपयुक्त आहेत. आपण सध्या हे सगळे उपाय नजरेआड करून खूप नुकसान करून घेतोय असे मला वाटते. या सर्व उपायांचा विचार करून, योग्य पद्धतीने वापर करून, आपण आजही जलसंधारण अतिशय कार्यक्षमतेने करू शकतो. याबद्दल आपण पुढच्या भागात अधिक माहिती घेणार आहोत. सागरी किल्ल्यांमधील जलसंधारण ः कोणताही सागरी किल्ला पाहिला, अगदी कुलाबा असो, किंवा जंजिरा किंवा सिंधुदुर्ग; या किल्ल्यांतील पाणी नियोजनाबाबत असे लक्षात येते, की आजूबाजूला खारे पाणी असूनही, या सागरी किल्ल्यांवर गोड्या पाण्याचे साठे आहेत, मग ते तलावाच्या स्वरूपात आहेत किंवा विहिरींच्या. हे कसे शक्य झाले? यात काही चमत्कार आहे का? याचे उत्तर आहे, नाही. हा चमत्कार नाही. हे स्थलानुरूप जलसंधारणाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. किल्ल्याची तटबंदी बांधताना ही काळजी घेतली गेली, की किल्ल्याच्या परिसरात पडणाऱ्या पावसाचे पाणी बाहेर वाहून जाणार नाही. किल्ल्यावर एक पाण्याचा साठा तयार केला गेला आणि मग ते पाणी गरजेनुसार वर्षभर वापरले गेले. त्या मर्यादित पाण्याच्या साठ्याचे बाष्पीभवन कमी व्हावे यासाठी बांधकाम आणि आरेखनात अनेक उपाय केले गेले. थेट सूर्यप्रकाश पाण्यापर्यंत पोहोचणार नाही याची काळजी घेतली गेली, ते पाणी स्वच्छ राहील याची काळजी घेतली गेली. आजदेखील ही यंत्रणा व्यवस्थित परिणामकारकपणे काम करत आहे. डोंगरी आणि नागरी किल्ल्यांवरील जल व्यवस्थापन ः देशातील जवळपास सर्वच ठिकाणी असलेल्या किल्ल्यांवर जल व्यवस्थापन आपल्याला दिसून येते. हे केवळ नळदुर्ग किंवा औसा अशा जमिनीवरच्या किल्ल्यांमध्ये आहे असे नाही, तर महाराष्ट्रातील बहुसंख्य डोंगरी किल्ले आणि विशेष म्हणजे सागरी दुर्ग, या ठिकाणी हे जलसंधारण आणि व्यवस्थापन उपाय आजही वापर होण्याच्या परिस्थितीत दिसून येतात. किल्ल्याची तटबंदी बांधताना त्या किल्ल्याच्या परिसरात पडलेले पावसाचे पाणी बाहेर वाहून जाणार नाही याची काळजी घेतली होती. हे पाणी त्या परिसरात जिरवून, मग ते विहिरीच्या मार्गाने वापरले जात होते आणि तलावांमध्ये किंवा कुंडांमध्ये साठवून वापरले जात होते. आजही ही यंत्रणा आपल्याला व्यवस्थित काम करताना दिसते. हे तत्त्व वापरून अगदी सागरी किल्ल्यांवरही जलसंधारण आणि व्यवस्थापन करून गोड पाण्याची सोय केली होती. संपर्क ः डॉ. उमेश मुंडल्ये, ९९६७०५४४६० (लेखक पाणी, पर्यावरण आणि शेती विषयाचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com