शाश्वत उपजीविकेची संधी देणारे ‘उमेद’

योजना विकासाच्या... उमेद
योजना विकासाच्या... उमेद

स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनेचे रूपांतर राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानात केले असून, त्याचेच नामकरण महाराष्ट्रात ‘उमेद’ असे केले आहे. उमेदने लाखो स्त्रियांना स्वरोजगाराची वाट दाखवली असून, त्यांच्यातील कौशल्याला नवे पंख दिले आहेत.

उमेद अर्थात महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान. यामध्ये गरिबी निर्मुलनासाठी आवश्यक समुदाय विकासापासून शाश्वत उपजीविका निर्मितीपर्यंतचा समावेश आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील गरीब आणि जोखीमप्रवण कुटुंबांना समृद्ध, आत्मसन्मानाचे आणि सुरक्षित जीवन जगता यावे यासाठी उमेद अंतर्गत एकात्मिक प्रयत्न करण्यात येतात. हे अभियान राज्यातील १५ जिल्ह्यांतील १३४ तालुक्यात तीव्रतेने (इन्टेन्सिव्ह) राबवले जात असून, तिथे जिल्हा व तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाची स्थापना केली आहेत. उर्वरित तालुक्यात कमी अधिक तीव्रतेने सुरू असून, पुढील टप्प्यात तीव्रतेने अभियान राबवण्यात येईल. स्वयंसाह्यता गट, बचत गट याद्वारे स्त्रियांचे संघटन करून त्यांच्यातील उद्योजकतेला चालना दिली जाते. ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसंघ, तर जिल्हा परिषद प्रभाग स्तरावर प्रभागसंघ तयार केले जातात. स्थानिक स्त्रियांची समुदाय संसाधन व्यक्ती म्हणून साखळी तयार केली असून, त्यांच्यामार्फत गरीब कुटुंबांची नेमकी ओळख पटवली जाते. त्यांना स्वयंसाह्यता गटात समाविष्ट केले जाते.

उमेदअंतर्गत कर्जपुरवठा अभियानातील सर्व उपक्रम स्त्रियांसाठी असून, राज्यात उमेदअंतर्गत एकूण १ लाख ८१ हजार महिला केंद्री स्वयंसाह्यता गट/ बचत गट स्थापन झाले आहेत. बचत गट तयार होऊन तीन महिने पूर्ण झाल्यानंतर १० हजार ते १५ हजार रुपये एवढा फिरता निधी (RF) दिला जातो. याचा उपयोग गटातील स्त्रिया मूलभूत गरजा व व्यवसायासाठी करू शकतात. गट सहा महिन्यांचा झाल्यानंतर, गटातील प्रत्येक सदस्यांचा सूक्ष्म गुंतवणूक आराखडा तयार करून  त्या गटास ६० हजार रुपये एवढा समुदाय गुंतवणूक निधी (CIF) दिला जातो. अति गरीब व जोखीमप्रवण कुटुंबासाठी प्रति ग्रामसंघ ७५ हजार, तर बँकांमार्फत प्रत्येक गटास १ लाख रुपये एवढ्या रकमेचे पहिले कर्ज दिले जाते. या उपलब्ध निधीतून स्त्रिया त्यांच्याकडे असणारे कौशल्य, संसाधने व त्यांची इच्छा यानुसार व्यवसाय निवडू शकतात. त्यासाठी आवश्यक कौशल्य व क्षमतांच्या वृद्धीसाठी उमेद अंतर्गत प्रशिक्षण दिले जाते. या अभियानाचा लाभ गावातील सर्व गरीब स्त्रिया बचत गटात सामील होऊन घेऊ शकतात. अभियानातील दशसूत्री अभियानात दशसूत्री संकल्पना स्वीकारली असून, त्याद्वारे समुदाय संस्थांमध्ये वित्तीय शिस्त, सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करण्याचा मुख्य उद्देश आहे. पहिली पाच सूत्रे ही धनव्यवहारांशी संबंधित आहेत. त्यामध्ये नियमित बैठका, नियमित बचत, नियमित अंतर्गत कर्ज व्यवहार, नियमित कर्ज परतफेड आणि नियमित दस्तऐवज अद्यावत ठेवणे याचा समावेश आहे. पुढील पाच सूत्रे ही मन व्यवहारांशी संबंधित आहेत. यामध्ये आरोग्य व स्वच्छता, शिक्षण, पंचायतराज संस्थांमध्ये स्त्रियांचा सहभाग, शासकीय योजनांचा लाभ व शाश्वत उपजीविका यांची सांगड घालणे याचा समावेश आहे.

प्रशिक्षण व योजनांची सांगड

  • ग्रामीण भागातील युवक युवतींना पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेअंतर्गत प्रशिक्षण व कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्धतेसाठी प्रयत्न केले जातात. या वर्षी सुमारे २३ हजार युवक-युवतींना प्रशिक्षण व रोजगार उपलब्धता करण्याचे ठरवले आहे.
  • स्वयंरोजगार करण्याची इच्छा असणाऱ्या युवक-युवतींना जिल्हा स्तरावर लीड बँकांच्या माध्यमातून RESTI  या योजनेअंतर्गत प्रशिक्षण दिले जाते. बँकांमार्फत कर्ज उपलब्ध केले जाते. या वर्षी प्रतिजिल्हा ७५० युवक-युवतींना प्रशिक्षण व स्वयंरोजगार उपलब्धतेचे उद्दिष्ट आहे.
  • अभियानात वर्धिनी, प्रेरिका, पशुसखी,  कृषी सखी, कृतिसंगम सखी अशा पद्धतीने समुदाय संसाधन व्यक्ती म्हणून काम करण्याची संधी मिळते. योग्य प्रशिक्षणानंतर सुमारे २१ हजार स्त्रियांनी याचा लाभ घेतला.
  • अभियानात जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर प्रदर्शनांचे आयोजन करून स्त्रियांच्या बचत गटातील उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध केली जाते. या महिलांना विक्रीसंबंधीची कौशल्ये शिकवण्यासाठी  उस्मानाबाद, वर्धा, रत्नागिरी जिल्ह्यात केरळ येथील ‘कुटुंबश्री’ संस्थेच्या मदतीने लघू उद्योग सल्लागार तयार केले आहेत. वर्धा जिल्ह्यात गटाच्या वस्तूंची विक्री व व प्रदर्शन करण्यासाठी वर्धिनी सेवा संघामार्फत जिल्हा स्तरावर कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध केली आहे.
  • सध्या राजमाता जिजाऊ पोषण आहार अभियानात कुपोषण निर्मूलनासाठी उमेदने भागीदारी केली आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागासोबत WASH कार्यक्रमांतर्गत स्वच्छतेचे काम सुरू आहे.
  • उपजीविकेच्या दृष्टीने कृषी विभाग, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभाग, आदिवासी विकास ‍विभाग, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अशा विविध विभाग आणि योजनेतही उमेद सहभागी आहे. अनेक जिल्हा परिषदेमार्फत शेष फंडातून ग्रामसंघांना निधी उपलब्ध केला असून, ग्रामसंघानी त्यातून उद्योग सुरू केले आहेत.राज्यात १ लाख ८१ हजार बचत गट असून, ३९५६ ग्रामसंघ आहेत.
  • अभियानात सहभागी बचत गटांना ३१८७.७९ कोटी इतके कर्ज विविध बँकांमार्फत उपलब्ध केले आहे. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या गटांना केंद्र शासनाच्या व्याजावरील अनुदान व राज्यशासनाच्या सुमतीबाई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत व्याजावरील अनुदान मिळते. थोडक्यात गटांना प्रभावी शून्य टक्के दराने कर्ज उपलब्ध होते.
  • यांच्याकडे संपर्क करा

  • गावाच्या जवळ युनिट म्हणून इन्टेन्सिव्ह तालुका अभियान व्यवस्थापक, तालुक्यात तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष तर सेमी आणि नॉन इन्टेन्सिव्ह क्षेत्रात गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे संपर्क साधावा.
  • अधिक माहितीसाठी वेबसाइट -http://www.umed.in  
  • डॉ. सुरेखा मुळे, (वरिष्ठ सहायक संचालक (माहिती) मंत्रालय, मुंबई)  : drsurekha.mulay@gmail.com

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com