काटेकोर शास्त्रीय मत्स्यपालनाला दिली अर्थशिस्तीची जोड

काटेकोर शास्त्रीय मत्स्यपालनाला दिली अर्थशिस्तीची जोड
काटेकोर शास्त्रीय मत्स्यपालनाला दिली अर्थशिस्तीची जोड

पाणथळ चोपण जमिनीच्या वापराच्या दृष्टीने नीरा (जि. पुणे) येथील पंडित चव्हाण यांनी सुरू केलेल्या  मत्स्य व कोळंबीपालनात यश, अपयश दोन्ही चाखले. मात्र त्यातही न डगमगता राज्यातील पहिला परवानाधारक गिफ्ट तिलापिया माशांचा फार्म त्यांनी उभारला. आपल्या प्रत्येक अपयशातून शिकत अर्थशिस्तीचा अवलंब केल्याने सर्वाधिक उत्पादन व उत्पन्न घेण्याचा मानही मिळविला. पुणे जिल्ह्यातील नीरा (ता. पुरंदर) येथील पंडित जगदेवराव चव्हाण (वय ४८ वर्षे) यांच्याकडे वडिलोपार्जित २० एकर शेती आहे. नीरा नदीच्या परिसरात व येथून दोन कॅनॉल जात असल्याने जमीन पूर्णपणे चोपण आहे. परिणामी, कोणत्याही पिकाचे उत्पादन चांगले येत नाही. सातत्याने येणाऱ्या या अडचणीमुळे १९९२ दरम्यान ही जमीन विकण्याचा विचार घरामध्ये सुरू झाला. त्या वर्षी पावसाळ्यात एका शेतामध्ये पाणी साचून राहिले होते. ते पाहताच त्या वेळी मत्स्यशेती करण्याचा विचार पंडितरावांच्या मनात आला. त्यांचे शिक्षण एम. एस्सी (रसायनशास्त्र) असून, तेव्हा ते एका कंपनीत नोकरी करत होते. नोकरी करता करता त्यांनी रोहू, मृगळ आणि कटला या जातींचे पालन सुरू केले. पहिल्या वर्षी त्यांना एक टन मत्स्य उत्पादन मिळाले. त्यातून खर्च वजा जाता २० हजार रुपये मिळाले. ज्या जमिनीतून काही उत्पन्न नव्हते, त्यातून उत्पन्न सुरू झाले. मग त्यांची रुची वाढली. हळूहळू मत्स्यशेतीमध्ये वाढ करत गेले. पंडितराव हे शास्त्राचे विद्यार्थी असल्याने शास्त्रीय पद्धतीचा अवलंब मत्स्यशेतीमध्ये करू लागले.

कोळंबी उत्पादनाचा ध्यास, अपयश आणि उभारी अभ्यास करताना कोळंबीविषयी समजले. त्यातून १९९६ मध्ये सहा लाख रुपये खर्च करून गोड्या पाण्यातील कोळंबी उत्पादनाचा अत्याधुनिक प्लांट उभा केला. त्यामध्ये अगदी प्रयोगशाळेपासून सर्व गोष्टींचा समावेश होता. प्रत्येक गोष्टी एमपीडा संस्थेच्या निकषाप्रमाणे करण्यात आली. मत्स्यशेती आणि स्वतःचा व्यवसाय यांचा ध्यास वाढल्याने १९९८ मध्ये नोकरीच्या बंधनातून मुक्त होण्याचा निर्णय घेतला. पाच एकरांपर्यंत तळे करण्यात आले. मात्र कोळंबीच्या व्यवसायातील अडचणी वाढत गेल्या. विजयवाडा (आंध्र प्रदेश) येथून कोळंबी बीज आणताना त्याचा खर्च, लागणारा वेळ आणि अन्य अनेक कारणांमुळे मरतुकीचे प्रमाण वाढत होते. प्रत्येक बॅचमध्ये झालेल्या चुकांची दुरुस्ती करून पुढील बॅच घेत गेले. मात्र अपेक्षित उत्पादन मिळत नव्हते. २००३ पर्यंत या साऱ्या प्रक्रियेत व्यवस्थापन खर्च सुरू होताच. त्यांच्यावर कर्ज १६ लाख रुपये होते. त्यावरील व्याज वगैरे वाढत २००६ पर्यंत ३० लाखांपर्यंत पोचले. पूर्ण कर्जबाजारी स्थितीत यश कोणत्याही बाजूने दिसत नव्हते. बाजारातील पत घसरलेली. जमिनीचा लिलाव होण्याची वेळ आलेली. मनात नकारात्मक विचार सुरू होते. मात्र पूर्वीच्या कंपनीतील वरिष्ठांनी काही कामे दिल्याने कसाबसा तग धरता आला. त्या टप्प्यातून बाहेर पडल्याचे पंडितराव सांगतात. पण मत्स्यशेतीमध्ये यश मिळविण्याचे ध्येय मनात होतेच. मत्स्यशेतीमध्ये नवीन काही करण्याचा विचारही सुटत नव्हता. त्यातून विजयवाडा येथे गिफ्ट तिलापियाचे पाच दिवसांचे प्रशिक्षण घेतले. त्याचा परवाना काढला. त्यासाठी पुणे विभागाचे तत्कालीन सहायक आयुक्त विजय शिखरे यांचे मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि मदत मिळाली. त्यातून २०१४ मध्ये त्यांचा गिफ्ट तिलापियाचा महाराष्ट्रातील पहिला फार्म उभा झाला. GIFT (जेनेटकली इंप्रूव्हड फार्म्ड) तिलापिया जुनकीय सुधारित पालनयोग्य तिलापिया जातीला गिफ्ट किंवा सुपर तिलापिया असेही म्हणतात. नाईल तिलापिया (शा. नाव - Oreochromis niloticus) माशाच्या जातीपासून निवड पैदास पद्धतीने गिफ्ट तिलापिया मासा विकसित केला आहे. या जातीची वैशिष्ट्ये ः

  • अन्य कोणत्याही मत्यजातींपेक्षा झपाट्याने वाढ. सुरवातीला २० ग्रॅम वजनाचे तिलापिया सहा महिन्यांत ६५० ग्रॅमपर्यंत वाढतात.
  • रोगप्रतिकारशक्ती व जगणुकीचे प्रमाण व जास्त.
  • सर्व प्रकारचे खाद्य खातो.
  • माशाची चव अतिशय उत्तम.
  • हा मासा जिवंत स्थितीत बाजारात नेता येतो, त्यामुळे याला चांगला दर मिळतो.
  • थोडक्यात, मत्स्यशेतीसाठी आदर्श मासा आहे. मात्र या जातीचे पालन करण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाकडून परवाना (लायसन्स) घेणे बंधनकारक आहे.
  • परवान्यासाठी महत्त्वाच्या अटी

  • तलावाचे क्षेत्र कमीत कमी १ एकर असावे, खोली ५ फूट असावी.
  • तलावाला कुंपण (फेन्सिंग) तसेच पक्ष्यांपासून बचावासाठी बर्ड नेट फेन्सिंग असावे.
  • तलावातील एकही मासा तलावाच्या बाहेर जाऊन शेजारील नदी, नाले, कॅनाल, तलाव अशा अन्य जलस्रोतामध्ये मिसळू नये.
  • उत्तम गुणवत्तेसाठी मत्स्यबीज राजीव गांधी सेंटर फॉर अॅक्वाकल्चर (RGCA), विजयवाडा (आंध्र प्रदेश) यांच्याकडूनच घेणे बंधनकारक आहे. येथून संपूर्ण नर मत्स्यबीज मिळतात, त्यामुळे तलावात पैदास होत नाही.
  • माशांना कृत्रिम खाद्य देणे आवश्यक.
  • पंडितरावांनी मिळविले यश पंडित चव्हाण यांनी २०१४ पासून गिफ्ट तिलापिया या माशाची शेती सुरू केली. एकरी साडेदहा टन एवढे विक्रमी उत्पादन ८ महिन्यांत घेतले. आता त्यांच्याकडे तीन एकर तळ्यामध्ये गिफ्ट तिलापियाचे पालन केले जाते.

  • तलावाची खोली ८ फूट असून, त्यात ४.५ ते ५ फूट पाणीपातळी ठेवली जाते.
  • तलावाभोवती निकषानुसार कुंपण व बर्ड फेन्सिंग केले. पाणी आत येण्याच्या व बाहेर जाण्याच्या पाइपवर जाळ्या लावल्या आहेत. त्यामुळे तलाव बाह्य सजीवांपासून अलिप्त झाला.
  • बीज सोडण्यापूर्णी तळ्याची नांगरणी करून खते दिली जातात.
  • बीज आणण्यापूर्वी तलावात एक मोठ्या हाप्याची नर्सरी तयार करतात. त्यात वियजवाडा येथून आणलेले मत्स्यबीज सोडले जाते. एक ग्रॅममध्ये सुमारे १० बीज येतात. एकरी २० हजार प्रमाणात नर्सरी केली जाते. मत्स्यशेतीतील ही सर्वांत अवघड बाबही त्यांनी करून दाखवली.
  • तलावाच्या माशांची संख्या व त्यांच्या तोंडाच्या आकारमानानुसार योग्य आकार व प्रमाणात खाद्य दिले जाते.
  • तलावातील पाण्याची रोज सकाळी तपासणी करतात. त्यात पाण्याचा पीएच, विरघळलेला ऑक्सिजन, नायट्रेट व अमोनिया मोजला जातो. आवश्यकतेनुसार सुधारणा करतात.
  • मासे विशिष्ट वजनाचे झाल्यानंतर तलावात योग्य तेवढा हवेचा पुरवठा करावा लागतो.
  • उत्पादन खर्चातील बचत म्हणजेच वाढीव नफा

  • सावधानता ः पूर्वीपासून मत्स्यशेतीचा अनुभव असूनही गिफ्ट तिलापिया पालन एक एकरावर प्रथम करून पाहिले. त्यानंतर हळूहळू त्यात ३ एकरापर्यंत वाढ केली.
  • नोंदी ः प्रत्येक बॅच व त्या संबंधित सर्व घटकांच्या नोंदीसह जमा-खर्च ठेवला जातो. त्यात योग्य त्या सुधारणा करत उत्पादन खर्चात बचत साधली. सुरवातीला त्यांना प्रति किलो माशांसाठी ९०० ग्रॅम खाद्य लागे, त्यात सुधारणा केल्याने आता प्रति किलो ६०० ग्रॅम इतके कमी केले. परिणामी, पूर्वीच्या ५८ रु. प्रति किलो हा उत्पादन खर्च कमी होऊन ४० रुपये झाला. प्रति किलो १८ रुपयांची बचत शक्य झाली.
  • सध्या मत्स्यखाद्य आंध्र प्रदेशातून मागवले जाते. वाहतुकीसाठी प्रति किलो १० रुपये खर्च होतो. हा खर्च कमी करण्यासाठी नुकतीच ८ लाख खर्चून स्वतःची फीडमिल यंत्रणा खरेदी केली आहे. खाद्यनिर्मितीमुळे आणखीही बचत होणार आहे. शेवटी उत्पादनखर्चात बचत म्हणजेच नफ्यात वाढ.
  • अपेक्षित दर मिळाल्याशिवाय विक्री करायची नाही हे धोरण. तलावावर किंवा मागणीप्रमाणे अलिबाग, मुंबई येथे जिवंत माशांची विक्री करतात.
  • सुरवातीला लोकांपर्यंत या माशांची चव समजावी, यासाठी विविध पदार्थ करूनही विकले. त्यातून परिसरामध्ये आता सामिष आहारामध्ये या माशांच्या मेजवानीचे प्रमाण वाढले. संपूर्ण मासे विकले जातात.
  • मासे शिल्लक राहिले तरी प्रति दिन सरासारी ३ ग्रॅम प्रमाणे वजन वाढत जाते. त्यामुळे दर मिळेपर्यंत थांबले तरी नुकसान होत नाही, असा पंडितराव यांचा अनुभव आहे.
  • मजूर कमी लागतात. त्यातही कुटुंबीयांची मदत होते.
  • पंडितराव चव्हाण यांच्या सघन गिफ्ट तिलापिया मत्स्यशेतीचे अर्थशास्त्र

    गिफ्ट तिलापिया खर्च व उत्पन्न (१ एकर तलावासाठी, रुपये) अ) स्थिर खर्च

  • तलाव बांधणे १ लाख
  • उपकरणे ओरिएटर, प्रयोगशाळा किट- ६० हजार
  • पंप संच -२० हजार
  • बर्ड नेट व क्रॅब नेट -३० हजार
  • एकूण खर्च (अ) - २.१० लाख
  • ब) स्थिर खर्चावरील व्याज - २१ हजार (अ) अधिक (ब)     - २.३१ लाख

    (क) चालू खर्च

  • तळ्याची पूर्वतयारी- १० हजार
  • बीज (२०,००० नग)- ६० हजार
  • खाद्य १० टन (४० रु. /किलो) ४ लाख
  • कामगार पगार (१८० - गुणिले -३००) ५४ हजार
  • इतर खर्च ५० हजार
  • एकूण (क) ५.७४ लाख
  • ड) एकूण (अ अधिक ब अधिक क) ८.०५ लाख इ) माशांच्या विक्रीतून येणारे उत्पन्न (१०,००० किलो, १२० रु. प्रति किलो दर) - १२ लाख संपर्क ः पंडित चव्हाण, ९८६०८१२८०० (लेखक मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरी येथील निवृत्त सहयोगी अधिष्ठाता आहेत.)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com