agricultural stories in marathi, AGROWON,special article on marathi bhashya din | Agrowon

एवढ्या जगात माय मानतो मराठी
भऱतकुमार गायकवाड
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

आज २७ फेब्रुवारी. मराठी राजभाषा दिन. माय मराठीला जिवंत ठेवण्याचे काम कष्टकरी शेतकऱ्यांनी केले आहे. ''मायवर आणि मातीवर'' जिवापाड प्रेम करणाऱ्या कष्टकऱ्यांचा विचार सुशिक्षितांसाठी लाखमोलाचा आहे. तो त्यांनी समजून घेतला पाहिजे.

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

जागतिकीकरणाच्या रेट्यात मायमराठीच्या लेकरांचा स्वभाषेबाबतचा स्वाभिमान हरवल्याचे चित्र दिसत आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला आता अठ्ठावन्न वर्षे पूर्ण होत आहेत. या कालावधीत मराठी माणसांनी कोणकोणते प्रयत्न केले? किती प्रयत्न केले? या गोष्टीचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. आज एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी, कादंबरीकार व नाटककार कुसुमाग्रज - विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिन. हा दिवस ''मराठी राजभाषा दिन'' म्हणून साजरा करण्यात येतो.  मराठी माणसांसाठी हा अभिमानाचा, गौरवाचा दिवस.

एखादा दिवस साजरा करणे खूप सोपे काम आहे. अमूक-अमूक दिवस साजरा करायचा आणि त्या कार्यक्रमाची छायाचित्रे वर्तमानपत्रात द्यायची, व्हॉट्सअॅप, फेसबुकवर टाकायची; मग झाला साजरा दिवस... मग पुढच्याच वर्षी त्या दिवसाचे स्मरण. खरे तर महाराष्ट्रात मराठीचे संवर्धन करण्याची गरज का निर्माण व्हावी, या गोष्टीच्या कारणांचा शोध घेणे व त्यावर उपाययोजना शोधणे हे प्रत्येक मराठी माणसाचे आद्य कर्तव्य आहे.
देशातील अन्य भाषिक राज्यांनी आपापल्या भाषेचा विकास साधलेला आहे. महाराष्ट्रात परकी भाषेचे अर्थात इंग्रजी भाषेचे प्रचंड अतिक्रमण होत आहे. त्या अतिक्रमणाविरुद्ध मराठी माणसांनी आवाज उठवला पाहिजे, लढा दिला पाहिजे; पण असे होताना दिसत नाही.

मराठी माणसांनी हे अतिक्रमण अगदी सहजरीत्या स्वीकारले आहे. आम्ही इंग्रजी बोलतो, आमच्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश देतो. म्हणजे महाराष्ट्रात राहून मराठी भाषेचा नाटकी अभिमान बाळगणारे आम्ही इंग्रजी भाषेच्या लाटेत वाहून जात आहोत. मराठी भाषेविषयीच्या आमच्या संवेदना बोथट झालेल्या आहेत. हे आजच्या समाजव्यवस्थेचे वास्तव! आमची मुले मराठी बोलत असतील, तर आम्ही घरात जाणीवपूर्वक त्यांच्याशी हिंदी, इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करतो. शाळेतही तीच अवस्था. शाळेतून तशा सूचना मिळतात अन् आम्ही त्यांच्या इशाऱ्यावर नाचतो. राज्याचे रहिवासी असलेल्या; पण अलीकडे जन्मलेल्या अशा पालकांच्या मुलांना मराठी भाषा बोलता येत नाही, वाचता येत नाही, लिहिणे तर दूरच!

७ सप्टेंबर १९०६ रोजी मुंबई येथे भांगवाडी नाट्यगृहात मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचा आठवा वार्षिक समारंभ लोकमान्य टिळक यांच्या अध्यक्षतेखाली साजरा झाला. या वेळी आपल्या भाषणात त्यांनी मराठी ही आपली व्यवहारभाषा व्हावी, तिचा वापर अधिक वाढावा, तसेच मराठी भाषेत उत्तम साहित्य निर्माण झाले पाहिजे, हे मुख्य विचार मांडले होते. टिळकांनी शंभर वर्षांपूर्वी मांडलेले हे विचार आजही मार्गदर्शक आहेत. त्या वेळी मराठी भाषेबाबत टिळकांना चिंता वाटत होती. आज मराठीला अस्तित्वाची लढाई लढावी लागत आहे. अशा परिस्थितीतही मराठी माणूस गप्प का? मराठी माणसांची मने इतकी संवेदनशून्य का होत आहेत? मराठी भाषेचा जिवंतपणा टिकून राहावा म्हणून काही लोक खूप प्रयत्नशील आहेत; पण ''महाराष्ट्रातच राहून मला मराठीविषयी काही देणे-घेणे नाही'' असे म्हणणाऱ्यांनाही वेळीच रोखले पाहिजे. मराठीवर ही दीन अवस्था दुसऱ्या राज्यातील लोकांनी नाही; तर माय मराठीच्याच लेकरांनी आणली आहे.

सुशिक्षित लोकांनीच परकी भाषेचा आग्रह धरला. माय मराठीला जिवंत ठेवण्याचे काम कष्टकरी शेतकऱ्यांनी केले आहे. म्हणून मराठीची खरी लेकरे शेतकरी आहेत. ''मायवर आणि मातीवर'' जिवापाड प्रेम करणाऱ्या शेतकऱ्यांचा विचार सुशिक्षितांसाठी लाखमोलाचा आहे. तो त्यांनी समजून घेतला पाहिजे.

मराठी भाषेची अशी खालावलेली स्थिती पाहून मराठी भाषेसंदर्भात शासनाने काही निर्णय घेतले पाहिजेत आणि अंमलबजावणीही तितक्याच ताकदीने केली पाहिजे. सध्या बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. चार दिवसांवर दहावीची परीक्षा आहे. या धावपळीत शाळा, महाविद्यालयांत मराठी राजभाषा दिन सर्वत्र साजरा केला जात नाही. कागदावरच ''मराठी भाषा दिन संपन्न'' असा अहवाल लिहून तयार होतो. वरिष्ठांकडेही जातो. अशा वायफळ प्रयत्नांमुळे मराठी भाषेची अभिवृद्धी होणार नाही. शाळा, महाविद्यालये म्हणजे विद्यार्थ्यांसाठीचे संस्कार केंद्र. अशा संस्कार केंद्रातून मराठी भाषेच्या संवर्धनाचा संस्कारच जर विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवला जात नसेल, तर येणाऱ्या पिढीकडून मराठीचे संवर्धन होईलच कसे? म्हणून मराठी साहित्य जगतातील थोर साहित्यिक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भाषेसंदर्भात शासनाने विविध उपक्रम राबवावेत. जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मनावर स्वभाषेचे योग्य संस्कार होतील.

शालेय शिक्षणातील मराठी माध्यमाला गळती लागलेली आहे. शहरात गल्लोगल्ली इंग्रजी शाळा दिसत आहेत. खेड्यातूनही असंख्य विद्यार्थी शहरात येत आहेत. इंग्रजी माध्यमाच्या या वेडामुळे मराठी शाळांना पुरेशी विद्यार्थी संख्या मिळत नाही. संख्येअभावी मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. वर्ग टिकवण्यासाठी गुरुजींना वाड्या-तांड्यावर भटकत जावे लागते. हे मराठी शाळेतील शिक्षकांचे अस्वस्थ करणारे वास्तव! मात्र पालकांसहित विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळेची गोडी लागल्यामुळे मराठी भाषेच्या शाळेविषयी कोणालाच चिंता वाटत नाही. राज्यात मराठी माध्यमाच्या शाळेची परवानगी घ्यायची असेल, तर प्रचंड नियमावली आहे. मात्र इंग्रजी शाळेच्या मान्यतेसाठी अशी नियमावली नसून, त्वरित मान्यता मिळते. राज्य सरकारला मराठी भाषेबद्दल खरोखरच तळमळ असेल, तर त्यांनी मराठी माध्यमांच्या शाळांनाच प्राधान्य द्यायला हवे. सर्वसामान्य माणसांना भाषेच्या अभिवृद्धीसाठी प्रेरणा, प्रोत्साहन देण्याचे कार्य भाषा अभ्यासकांनीच केले पाहिजे. भाषा अभ्यासक स्वभाषेबद्दल जागरूक असतील, तर नक्कीच स्वभाषेबद्दलची मरगळ दूर होईल.

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काही उपाययोजना आखता येतील. मुलांना मराठी वृत्तपत्र वाचनाची आवड लावली पाहिजे. मराठीतील विविध मासिकांचा वर्गणीदार झाले पाहिजे. मी अधिकाधिक मराठी भाषेचा वापर करेन, इतरांनाही सांगेन, अशी प्रतिज्ञा घेतली पाहिजे. भाषेच्या संवर्धनासाठी अधिक प्रयत्न करता यावेत, यासाठी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना रीतसर प्रशिक्षण दिले पाहिजे. वेगवेगळे कार्यालयीन अर्ज फक्त मराठीतूनच असावेत. शासकीय, प्रशासकीय व न्यायालयीन कामकाजात मराठी भाषेचा वापर करावा, भाषेच्या अभिवृद्धीसाठी विविध विषयांवर तज्ज्ञ व्यक्तींचे परिसंवाद आयोजित केले पाहिजेत. असे प्रयत्न भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी केले, तरच या भाषेबाबतची अनास्था दूर होईल.
भऱतकुमार गायकवाड  : ९८८१४८५२८५
(लेखक ग्रामीण कथाकार आहेत.)

इतर संपादकीय
गोकुळानं ‘गणित’ नाही मांडलंपशुपालनातून दूध व्यवसाय म्हणजे मुळातच उद्योग आहे...
ब्राझीलचा धडा घेणार कधी?सातत्याने दोन वर्षांच्या चांगल्या पाऊसमानानंतर...
भाराभर चिंध्या राज्यात १२७ वा पशुसंवर्धन दिन नुकताच साजरा...
मथुरेचं दूध का नासलं?राज्यात मे महिन्याचे तापमान यंदा नैसर्गिक आणि...
चिमुरड्याच्या कॅमेऱ्यात कैद आनंदी शेतकरीआपल्याकडील शेतकरी आनंदी असू शकतो का? उत्तर...
‘अ’तंत्र निकेतनपुरेसा अभ्यास आणि तयारीअभावी, यंत्रणेचा विरोध...
तूर घ्या तूर, मोझांबिकची तूर! कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील मतदानाचे पर्व संपताच...
मधमाश्‍या नाहीत तर मानवी जीवन नाहीजून २०१५ मध्ये इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च...
उंटावरून शेळ्या नका हाकूगेल्या हंगामात राज्यात कापसावर गुलाबी बोंड अळीचा...
स्वस्त पशुखाद्य दुकान संकल्पना राबवा शासनाच्या आदेशानुसार गाईच्या दुधाला ३.५ टक्के...
डोळे उघडवणारे ‘अदृश्य सत्य’संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या...
भूगर्भाची तहान भागवूया उन्हाच्या झळा वाढल्याने यंदा आपले राज्य देशात...
‘दादाजीं’ची दखल घ्याउघड्या डोळ्यांनी पाहिलं मरण कशाला आता रचता सरण...
उत्पन्न दुपटीसाठी हवा कोरडवाहू शेतीवर भरभा रत सरकारने २०१६-१७ च्या अर्थसंकल्पामध्ये...
चुकीच्या धोरणामुळे खतांचा असंतुलित वापर रासायनिक खते सम्पृक्त (कॉन्सन्ट्रेटेड) ...
आता गोंधळ ‘ॲंटीडोट’चागेल्या हंगामात कापसावर रासायनिक कीडनाशकांच्या...
गोड साखरेची कडू कहाणीमाजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी साखर...
केंद्रस्थानी हवा लहान शेतकरीज गभरातील ९० टक्के लहान शेतकरी हे ८० टक्के अन्न...
तेलंगणाचा ‘मास्टर स्ट्रोक’तेलंगणा सरकारने खरीप हंगामासाठी निविष्ठा...
नागलीला प्रोत्साहन म्हणजे कुपोषण आणि...कर्नाटकच्या निवडणुकीच्या धांदलीत, विद्यमान...