agricultural stories in Marathi, agrowon,success story of Vijaykumar Palve,pelvewadi,Dist.Nagar | Agrowon

काटेकोर पाणी नियोजनातून सांभाळली फळबाग
सूर्यकांत नेटके
मंगळवार, 6 नोव्हेंबर 2018

नगर जिल्ह्यातील पालवेवाडी (ता. पाथर्डी) हा दुष्काळी भाग. बहुतांश लोकांचा हंगामी शेती अन्‌ ऊसतोडणी हा व्यवसाय. या गावातील कृषी पदवीधर असलेल्या विजयकुमार पालवे यांनी नोकरी सोडून वडिलांनी सुरू केलेला रोपनिर्मितीचा व्यवसाय सांभाळला आहे. दुष्काळी परिस्थितीत शेततळ्याच्या आधारावर फळबाग जगवण्याची त्यांची धडपड वाखाणण्याजोगी आहे.

नगर जिल्ह्यातील पालवेवाडी (ता. पाथर्डी) हा दुष्काळी भाग. बहुतांश लोकांचा हंगामी शेती अन्‌ ऊसतोडणी हा व्यवसाय. या गावातील कृषी पदवीधर असलेल्या विजयकुमार पालवे यांनी नोकरी सोडून वडिलांनी सुरू केलेला रोपनिर्मितीचा व्यवसाय सांभाळला आहे. दुष्काळी परिस्थितीत शेततळ्याच्या आधारावर फळबाग जगवण्याची त्यांची धडपड वाखाणण्याजोगी आहे.

 पालवेवाडी (ता. पाथर्डी, जि. नगर) येथील विजयकुमार पालवे यांचे वडील (स्व.) गहिनीनाथ पालवे यांनी १९६८ साली पुणे येथील कृषी महाविद्यालयातून बीएसस्सी कृषीचे शिक्षण पूर्ण केले. मात्र नोकरी न करता शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी १९८८ साली वनीकरणासाठी लागणाऱ्या रोपनिर्मितीचा व्यवसाय सुरू केला. पालवेवाडी (ता. पाथर्डी) शिवारात चार हेक्‍टर २० गुंठे जमीन क्षेत्रात ते ज्वारी, बाजरी, हुलगा, मटकी या पिकांची लागवड करायचे. त्यानंतर त्यांनी १९९१ साली या क्षेत्रात टप्याटप्याने आंबा, चिकू, पेरूची लागवड केली. या मातृवृक्षांपासून कलमांच्या निर्मितीस सुरवात केली. शासनाने शंभर टक्के अनुदानावर १९९२ ला फळबाग लागवड योजना सुरू केली. मात्र त्याआधी पालवे यांनी दुष्काळी आणि जिरायती भागाची गरज लक्षात घेऊन फळबाग लागवड केली. पालवे यांच्या केसर आंब्याला देशपातळीवर १९९७, १९९८, १९९९ व २००० साली राष्ट्रीय फळप्रदर्शनात सलग चार वेळा गुणवत्तेत प्रथम क्रमांक मिळाला आहे.

विजयकुमार पालवे हे एमएसस्सी (कृषी) पदवीधर. त्यांनी गेल्या काही वर्षांपासून वडिलोपार्जित फळबाग आणि रोपवाटिका जिद्दीने जोपासली आहे. त्यांच्या पत्नी दीपाली पालवे या बीएसस्सी बीएड आहेत. त्यांची रोपवाटिका व्यवस्थापनात मदत होते. आई विमलबाई या रोपनिर्मितीच्या कामात मदत करतात.

फळबाग नियोजनात सहभाग
 विजयकुमार पालवे यांनी २००५ पासून २०१५ पर्यंत प्राध्यापक व प्राचार्य पदावर खासगी संस्थेवर नोकरी केली. वडील (स्व.) गहिनीनाथ पावले यांचे २०१५ मध्ये निधन झाल्यानंतर रोपनिर्मितीचा व्यवसाय बंद पडू नये म्हणून विजयकुमार पालवे यांनी नोकरी सोडून व्यवसायाची जबाबदारी घेतली. तीन वर्षांपूर्वी घरगुती कारणाने रोपनिर्मितीचा व्यवसाय अडचणीत आला होता. मात्र त्यावर मात करूनहा व्यवसाय नफ्यात आणला आहे. दर्जेदार रोपनिर्मितीतीत त्यांनी आघाडी घेतली आहे. सध्या चार हेक्टर क्षेत्रावर पालवे यांची मातृवृक्ष फळबाग आहे. यामध्ये भारतीय आंबा जाती (केसर, वनराज, रत्ना, हापूस, लंगडा), परदेशी आंबा जाती ( केंट, थॉमस अॅटकिन्सन, माया), डाळिंब (फुले भगवा सुपर, भगवा ), चिकू (कालिपत्ती), पेरू, लिंबू, सीताफळ, नारळ, करवंद (कोकण बोल्ड), आवळा, चिंच (प्रतिष्ठान, एस २६३), अंजीर, सुपारी, रामफळ, जांभूळ, साग अशी  लागवड आहे.

फळझाडांची कलमे दर्जेदार राहावीत म्हणून पालवे मातृवृक्ष आणि कलमांना रासायनिक खतांचा वापर करत नाहीत. त्याऐवजी पालापाचोळ्याचे आच्छादन, गांडूळ खताचा वापर करतात. त्यांच्याकडील प्रकल्पात वर्षभरात दोन टन गांडूळ खत तयार होते. गांडूळ खत आणि झाडाच्या आळ्यात कुजवलेला पालापाचोळा यामुळे बागेत गांडूळांची संख्या वाढली. जमीन सुपीक झाली आहे. पालवे गेल्या वीस वर्षांपासून तुषार सिंचन तर पंधरा वर्षांपासून ठिबकचा वापर करीत आहेत. वर्षभरात चार लाख कलमांच्या निर्मितीचे त्यांचे उद्दीष्ट असते.

दर्जेदार शेणखताचा वापर
यंदा राज्यात बहुतांश भागात हुमणीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. या किडीच्या नियंत्रणाबाबत विजयकुमार पालवे म्हणाले, की ``आम्ही मात्र गेल्या काही वर्षांपासून हुमणी नियंत्रणाच्या उपाययोजना करीत आहोत. लिंबोणी, बाभळीच्या झाडांवर हुमणीचे भुंगे दिसतात. त्यामुळे मी शेताच्या परिसरात कुठेही लिंबोणी, बाभळीच्या झाड लावलेले नाही. शेणखतातूनही हुमणीचा प्रसार होतो. त्यामुळे वर्षभर आधीच शेणखत उकंड्यातून बाहेर काढून मोकळ्या जागेत पसरवून त्यात सुपर फॉस्फेट, हिरवळीचे खत, ट्रायकोडर्मा, मेटारायझिम, शिफारशीत कीडनाशक आणि पालापाचोळ्याचा एक-एक फुटाचा थर करून खत दाबून झाकून ठेवतो. त्यामुळे आमच्या बागेत अजून एकदाही हुमणीची आळी आढळून आली नाही.``

खेड्यात उभारली माती,पाणी तपासणी प्रयोगशाळा  
विजयकुमार पालवे यांनी कृषी विभागाच्या राष्ट्रीय मृदा आरोग्य व्यवस्थापन योजनेतून पालवेवाडीत लहानशी प्रयोगशाळा केली. यासाठी त्यांना  पंचेचाळीस हजार रुपयांचे अनुदान मिळाले. मात्र तेवढ्यावर न थांबता त्यांनी पाच लाख रुपये खर्च करून सुसज्ज माती, पाणी नमुने तपासणी प्रयोगशाळा तयार केली. कृषी विभागातर्फे ज्या रकमेत पाणी, माती नमुने तपासणी केली जाते, त्याच रकमेत पालवे पाणी, माती नमुने तपासणी करतात. आतापर्यंत सुमारे १२०० शेतकऱ्यांना त्यांनी ना नफा ना तोटा तत्त्वावर माती नमुने तपासणी करून दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांची वेळ आणि आर्थिक बचत होत आहे. पाणी फाउंडेशनमध्ये विजयकुमार पालवे यांनी जलमित्र म्हणून काम केले आहे. अनेक मान्यवर व्यक्तींनी पालवे यांच्या शेतीला भेट देऊन त्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

मी टंचाईची वाट पाहतच नाही...
नगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्‍यात यंदा दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. मात्र ‘शांततेच्या काळात घाम गाळला, तर युद्धाच्या काळात रक्त सांडावे लागत नाही' या वाक्‍याचा आदर्श ठेवून विजयकुमार पालवे यांनी पाण्याचे नियोजन केले. त्यांच्या मोबाईलमध्ये पावसाची माहिती देणारे दोन ‘ॲप' आहेत. त्यातून मिळालेल्या माहितीनुसार त्यांना दोन महिन्यांपूर्वीच कमी पावसाचा अंदाज आला होता. फळबागेशेजारील ओढ्याला यंदा पाणीच आले नाही. त्यामुळे चार विहिरी कोरड्या आहेत. परंतु त्यांनी अगोदरच नियोजन करून दोन कोटी लिटरचे शेततळे उपलब्ध पाण्याने भरून ठेवले. सध्या टॅंकरने पाणी विकत घेऊन शेततळे भरण्याचे काम सुरू आहे. सध्या पालवेवाडीच्या तीस किलोमीटर परिसरात पाणी नाही. अजून दुष्काळाचे आठ महिने काढायचे आहेत. मात्र कोणत्याही परिस्थितीत फळबाग आणि कलमे जगली पाहिजेत असे त्यांनी पाण्याचे गणित ठरविले आहे. पाणी कमी पडले तर फळझाडांच्या हलक्या छाटणीचे त्‍यांनी नियोजन केले आहे.  सर्व झाडांना पालापाचोळ्याचे आच्छादन केले आहे. फळबाग वाचविण्यासाठी शक्‍य सर्व उपाययोजना करणार; पण दुष्काळापुढे हार मानणार नाही, असा निर्धार पालवे यांनी केला आहे.

 - विजयकुमार पालवे ः ९४२३१६४७६०

फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
अळिंबी उत्पादनातून केली संकटांवर मातलोणी (जि. जळगाव) येथील अनिल माळी यांच्याकडे कृषी...
पशुपालन, प्रक्रिया उद्योगात नेदरलॅंडची...शास्त्रीय पद्धतीने पशुपालन, दुग्धोत्पादन आणि...
आदिवासी पाड्यावर रुजली कृषी उद्योजकताकोणे (ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) येथील आदिवासी...
दोनशे देशी गायींच्या संगोपनासह ...सुमारे दोनशे देशी गायींचे संगोपन-संवर्धन यासह...
अर्थकारण उंचावणारी उन्हाळी मुगाची शेती वाशिम जिल्ह्यातील पांगरी नवघरे येथील दिलीप नवघरे...
शंभर एकरांत सुधारित तंत्राने शेवग्याची...नाशिक जिल्ह्यातील पवारवाडी (ता. मालेगाव) येथील...
निर्धारातून टाकोबाईची वाडीच्या...सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याचा काही भाग...
निसर्गरम्य पन्हाळा तालुक्यात ...कोल्हापूर जिल्ह्यातील डोंगराळ, निसर्गरम्य पन्हाळा...
दुष्काळात स्वयंपूर्ण शेतीचा आदर्श,...नव्वद क्विंटल तूर, ३० क्विंटल ज्वारी व हरभरा, १५०...
उच्चशिक्षित कृषी पदवीधराने उभारला...गोपालपुरा (जि. आणंद, गुजरात) येथील एमएस्सी...
अभ्यासातून शेतीमध्ये करतोय बदलवेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथील महाविद्यालयात...
आळिंबी, गव्हांकुर उत्पादनातून बचत गटाची...गोद्रे (ता. जुन्नर, जि. पुणे) गावातील महिलांनी...
कुटुंबाची एकी, सुधारित तंत्र, शिंदे...नांदेड जिल्ह्यातील वसंतवाडी येथील शिंदे परिवाराला...
दुष्काळात बाजरी ठरतेय गुणी, आश्‍वासक... कमी पाणी, कमी कालावधी, अल्प खर्चातील बाजरी...
AGROWON AWARDS : नैसर्गिक, एकात्मिक...ॲग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार...
रडायचं नाही, आता लढायचं : वैशाली येडे पुणे : सावकाराचे कर्ज डोक्यावर ठेवून पतीने...
विविध उपक्रमांच्या माध्यमातून माणगाव...कोल्हापूर जिल्ह्यातील माणगावच्या ग्रामस्थांनी...
‘जय शिवराय’ गटाची बीजोत्पादनातील कंपनी...सांगली जिल्ह्यातील उरुण इस्लामपूर येथील जय शिवराय...
AGROWON AWARDS : धैर्य, हिंमत व...अॅग्रोवन प्रेरणा पुरस्कार  वैशाली येडे...
AGROWON_AWARDS : शेतीउपयोगी यंत्रांचा...ॲग्रोवन स्मार्ट संशोधक शेतकरी पुरस्कार शेतकरी ः...