फायदेशीर ठरला जैव कोळसानिर्मिती उद्योग

जैव कोळसा निर्मितीची यंत्रणा.
जैव कोळसा निर्मितीची यंत्रणा.

शेतातील काडीकचरा, भुस्सा आदींच्या प्रक्रियेतून कोल्हार (जि. नगर) येथील अनिश कुंकूलोळ यांनी जैव कोळसा (बायोकोल) ब्रिकेट निर्मिती उद्योग सुरू केला व यशस्वीपणे सुरूही ठेवला आहे.  ‘बॉयलर’ इंधन असलेल्या बायोकोलचे दररोज ५० ते ६० टन उत्पादन या प्रकल्पात घेतले जाते. तीन- चार मोठ्या कंपन्यांना त्याचा पुरवठा करीत महिन्याला साठ लाख रुपयांची उलाढाल करण्यापर्यंत या उद्योगाने मजल मारली आहे.

न गर जिल्ह्यातील कोल्हार (ता. राहाता) येथील उद्योजक अनिश अजित कुंकूलोळ यांनी उद्योगाची अनेक क्षेत्र व्यापली आहेत. जगात नवं, कुठं काय चाललं आहे याकडं त्यांचं लक्ष असतं. ट्रॅक्टर एजन्सी तसेच ‘बॉयलर आॅपरेटिंग’चा त्यांचा व्यवसाय आहे. जालना येथील या कुटुंबीयांच्या नातेवाइकांनी जैवकोळसा (बायोकोल) निर्मिती सुरू केली होती. त्याची प्रेरणा समोर होती.

उद्योगाचा विस्तार कुंकूलोळ कुटुंबाने कोल्हार येथे काही वर्षांपूर्वी बायोकोल ब्रिकेट तयार करण्यास सुरवात केली. त्या वेळी त्याचे लघू स्वरूप होते. वर्षाला सहा हजार टन ब्रिकेट्स तयार व्हायच्या. ‘एमबीए’ पर्यंत शिक्षण घेतलेल्या कुटुंबातील अनिश यांनी उद्योगाचा विस्तार करण्यास सुरवात केली.  

कच्च्या मालाचे आगार बायोकोलच्या उत्पादनासाठी नगर भागात कच्चा माल भरपूर उपलब्ध होता. सोयाबीन काढणीनंतर मागे पालापाचोळा तसाच राहतो. उसाचं पाचट उपलब्ध होतं. मक्याच्या कणसातून दाणे काढल्यानंतर कणसं तशीच वाया जायची. कोपरगाव, श्रीरामपूर तालुक्यांच्या पूर्व भागात कपाशी मोठ्या प्रमाणात घेतली जाते. त्याच्या काड्या फेकून दिल्या जायच्या किंवा जाळण्यासाठी वापर व्हायचा. पर्यावरणाच्या रक्षणाला हातभार, कच्च्या मालाचा विनियोग या हेतूने अनिश या उद्योगाकडे पाहतात.

मार्केट शोधले एखाद्या मालाचं उत्पादन घेणं कदाचित सोपं असतं. पण त्याहून विक्रीचं तंत्र अवघड असतं. अनिश यांनी ‘बायोकोल’चे खरेदीदार कोण आहेत याचा शोध आधीच घेतला होता. त्यातूनच पुण्यातील तसेच रांजणगाव (ता. शिरूर) येथील दोन ते तीन आघाडीच्या कंपन्यांना आपले ग्राहक बनवण्यात अनिश यांना यश मिळाले आहे. प्रतिटन ५३०० पासून ते ५९०० रुपयांपर्यंत दर त्यांना मिळतो. निर्मिती आणि पुरवठा यापुढं जाऊन एका आघाडीच्या कंपनीची ‘बॉयलर यंत्रणा’च त्यांनी चालवायला घेतली आहे. कोल्हापूरला होत असलेल्या बायोकोलच्या एकूण उत्पादनापैकी निम्मे उत्पादन या कंपनीला पुरवले जाते. गुंतवणूक या उद्योगात गुंतवणूक मोठी करावी लागते. एकदा गुंतवणूक केल्यानंतर मात्र जास्त खर्च कच्च्या मालावर करावा लागतो. उद्योगक्षमता मोठी असल्याने म्हणजेच सहा यंत्रांच्या क्षमतेसाठी अनिश यांनी सव्वा दोन कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक केली आहे. मात्र लघू स्वरूपात एका यंत्रासह देखील हा व्यवसाय सुरू करता येतो. त्यासाठी गुंतवणूक कमी होऊ शकते असे अनिश सांगतात. दुष्काळात दिलासा ब्रिकेटनिर्मितीसाठी पाण्याची गरज कमी लागते. त्यामुळे पाणी कमी असलेल्या ठिकाणी हा उद्योग सुरू करण्यास अडचण येत नसल्याचे अनिश म्हणाले.   व्यवसाय नियोजन, विस्तार   डाळिंबावर मध्यंतरी तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव झाला. शेतकऱ्यांना डाळिंबाच्या बागा काढून टाकाव्या लागल्या. त्यासाठी एकरी पाच-सहा हजार रुपये खर्च येत होता. शिवाय जेसीबी यंत्राच्या वापरामुळं जमिनीत खड्डे तयार होत होते. अनिश यांनी त्यातून मार्ग काढला. त्यांनी ‘वूड चीपर’ यंत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे काम सोपे करून दिले. त्याचे पैसेही घेतले नाहीत. त्याचबरोबर कच्च्या मालासाठी पैसेही मोजावे लागले नाहीत. अनिश यांचे पूर्वीही अन्य उद्योगक्षेत्रात कर्ज होते. त्यामुळं या उद्योगासाठी कर्ज मिळणं फारसं अवघड गेलं नाही. अनिश तेवढ्यावरच थांबणार नाहीत. या प्रकल्पाचा विस्तार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आता करार शेतीवर भर द्यायचं ठरविलं आहे. अनिश यांची ३० एकरांपर्यंत शेतीही आहे. कच्च्या मालाच्या उपलब्धतसाठी आपल्या सुमारे २२ एकरांत मिलीया डुबिया वनस्पतीचे नियोजन केले आहे. शेवरी, सुबाभूळसह अन्य झाडे लावली आहेत. नफा-तोट्याचं गणित पाहून अन्य शेतकऱ्यांनाही अशा प्रकारची झाडे लावण्यासाठी ते प्रोत्साहन देणार आहेत. इंधन मिळण्याबरोबरच पर्यावरण रक्षणाचं काम करणारे प्रकल्प उभे राहिले तर शेतकऱ्यांसाठी दुष्काळी परिस्थितीत नव्या संधी तयार होऊ शकतात हेच या उदाहरणावरून दिसून येते.

अनिश यांचा आजचा व्यवसाय

  • कोल्हार येथे प्रकल्पस्थळ. सुमारे ११ एकर क्षेत्र. ३२ हजार चौ. फुटाचे शेड
  • ब्रिकेट तयार करणारी यंत्रे- सहा
  • कच्चा माल सुकवण्यासाठी चार एकरांची सुविधा
  • कच्चा माल- लाकडी भुस्सा, पालापाचोळा, झाडांचे अवशेष आदी. परिसरातील ५० ते ६० किलोमीटर परिघातील शेतकऱ्यांकडून तो आणण्यात येतो.
  • लाकडाचे अत्यंत छोटे तुकडे (चीप्स) करण्यासाठी ११ यंत्रे (वूडचीपर), पंजाब आदी भागातून आणलेली.
  • निर्मिती, अर्थकारण

  • महिन्याला १०० टन ब्रिकेटनिर्मितीची क्षमता. सध्या ५० ते ६० टननिर्मिती
  • वार्षिक उत्पादन क्षमता पोचली १५ हजार टनांपर्यंत
  • उलाढाल- दरमहा सुमारे साठ लाख रुपये
  • नफ्याचं प्रमाण दहा टक्के. उत्पादन प्रक्रियेतला सर्वाधिक म्हणजे साठ ते सत्तर टक्के खर्च कच्च्या मालावर. दहा ते बारा टक्के खर्च विजेवर. उर्वरित खर्च प्रक्रियेवर.
  • रोजगारावरही मोठा खर्च होतो.
  •  - अनिश कुंकूलोळ, ८६०५२६९९९९, ७०२०१२२०५७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com