संत्र्यावर कोळशीचा प्रादुर्भाव, त्वरेने करा उपाययोजना

संत्र्यावर कोळशीचा प्रादुर्भाव, त्वरेने करा उपाययोजना
संत्र्यावर कोळशीचा प्रादुर्भाव, त्वरेने करा उपाययोजना

सद्यस्थितीत अकोला, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यांत संत्र्यावर काळ्या माशीच्या प्रादुर्भावास सुरवात झाली आहे. अकोल्याजवळ वाडेगाव परिसरात लिंबूवरही या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी त्वरेने उपाययोजना करणे गरजेचे आहे. किडीची ओळख : काळी माशी ः आकाराने लहान, १.० ते १.५ मि.मी. लांब. प्रौढ माशीचे पंख काळसर असून पोटाचा भाग लाल रंगाचा असतो. पांढरी माशी ः या माशीचे पंख पांढरे असतात. अंडी ः प्रौढ मादी माशी संत्र्याच्या नवतीच्या कोवळ्या पानांच्या खालील भागावर वर्तुळात अंडी घालते. अंडी सूक्ष्म व सुरवातीला पिवळसर रंगाची असतात. साधारणपणे चार ते पाच दिवसांनंतर अंड्यांचा रंग करडा होतो. उन्हाळ्यात अंडी १५ ते २० दिवसांत, तर हिवाळ्यात २५-३० दिवसांत उबतात. त्यामधून पिल्ले बाहेर येतात. पिल्लावस्था ः अंड्यातून बाहेर पडलेली पिल्ले अतिशय लहान, चप्पट व फिक्कट पिवळसर रंगाची असतात, त्यामुळे ती सहजपणे दिसत नाहीत. पिल्ले पानावर फिरून योग्य जागेचा शोध घेऊन स्थिरावतात. पानातील अन्नरस शोषतात. काही दिवसांनंतर पिल्लांचा रंग काळा होतो. याकाळात काळ्या माशीचा प्रादुर्भाव लक्षात येतो. पिल्लांच्या तीन अवस्था असून, त्या पूर्ण होण्यास चार ते सहा आठवड्याचा कालावधी लागतो. त्यानंतर पिल्ले कोषावस्थेत जातात. कोषावस्था ः ही अवस्था सहा ते दहा आठवड्यांची असते. कोष पूर्ण काळे व टणक असतात. नुकसानीचा प्रकार : अंड्यातून बाहेर पडलेली पिल्ले स्थिरावल्यानंतर समूहाने रस शोषतात. तर प्रौढ माश्या पानातून रस शोषतात. पिल्ले आपल्या शरीरातून साखरेसारखा चिकट पदार्थ बाहेर सोडते. या चिकट द्रवावर उष्ण व दमट हवामानात काळ्या बुरशीची वाढ होते. या काळ्या बुरशीलाच ‘कोळशी’ असे संबोधले जाते. पाने, फळे व फांद्यासहीत सर्व झाड काळे पडते. कोळशीमुळे पानाच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत बाधा येते. झाडे निस्तेज दिसतात, वाढ खुंटते, संत्र्याच्या उत्पादनावर व गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतो. सर्वेक्षण असे करावे : बागेचे दर आठवड्याने किडीसाठी सर्वेक्षण करावे. सर्वेक्षणासाठी बागेतील चार कोपऱ्यातील प्रत्येकी एक व मधला एक असे ५ चतुर्भूज (क्वाडरंट)/ठिकाणे निवडावेत. प्रत्येक निवडलेल्या जागेवरील २ झाडांवरील (म्हणजे एकूण बागेतील १० झाडांवरील) निरीक्षणे घ्यावीत. निवडलेल्या झाडावरील कोणतीही १० कोवळी पाने तोडावीत. एकूण दहा झाडांवरील १०० कोवळ्या पानाखाली काळ्या माशीची अंडी, पिल्ले व कोष असल्यास प्रादुर्भावाची टक्केवारी काढावी. बागेमध्ये प्रादुर्भाव सुरू झाल्याबरोबर नियंत्रणाचे उपाय योजावे. प्रकार १ प्रादुर्भावाची तिव्रता पाहण्यासाठी प्रादुर्भावग्रस्त तोडलेल्या पानाखालील एकूण पिल्ले व कोष प्रकाशात मोजावीत. या निरीक्षणासाठी किमान १० पट मोठे चित्र दर्शवणारा साधा भिंग असावा. पिल्लांवर टाचणी/सुई टोचावी. पिल्ले व कोषातून स्त्राव बाहेर आल्यास पिल्ले जिवंत असल्याचे समजावे. अशा जिवंत पिल्ले व कोषाची टक्केवारी काढावी. प्रकार २ पानाखालील पिल्ले व कोष बोटाच्या साह्याने हळूच दाब देऊन पुसण्याचा प्रयत्न करावा. जर ही पिल्ले व कोष सहज पानाखालून वेगळे झाले किंवा पुसले गेल्यास ते मृत समजावेत. पानावर शिल्लक राहीलेले जिवंत समजून, जिवंत पिल्लाचे प्रमाण जाणून घ्यावे. वरील निरीक्षणावरून रासायनिक किटकनाशकाची फवारणी करण्याची वेळ नक्की ठरवता येते. आवश्यक असताना फवारणी केल्याने त्याची कार्यक्षमता वाढते. अनावश्यक फवारण्या टाळता येतात. १) काळ्या माशीची अंडी व नुकतेच अंड्यातून निघालेली पिल्ले या अवस्थेत किडीचे नियंत्रणाचे उपाय योजावेत. या पिल्लांची त्वचा नाजूक असल्याने किटकनाशकाचे द्रावण त्यांच्या त्वचेमधे लवकर शोषले जाते. २) नंतरच्या पिल्लावस्था व कोष यांची त्वचा हळूहळू काळसर होऊन त्यांची त्वचा टणक होते. यावर कीटकनाशकांच्या फवारणीचा फारसा प्रभाव पडत नाही. उपाययोजना ः

  • कीडग्रस्त कलमा/रोपे इतर भागात लागवडीसाठी वापरू नये.
  • काळी माशी अंडी घालण्याच्या अपेक्षित वेळेपूर्वी सल काढण्याचे टाळावे.
  • शिफारशीत अंतरावरच संत्र्याची लागवड करावी.
  • अतिरिक्त नत्र खताचा वापर व पाणी साठू देणे टाळावे.
  • हस्त बहाराचे वेळी ओलीत उशिरा सुरू करावे. (विशेषतः मोसंबी/लिंबू).
  • काळ्या माशीचे प्रौढ कोषातून बाहेर पडत असताना म्हणजे नवतीच्या कालावधीच्या दरम्यान बागेमध्ये पिवळ्या रंगाचे किमान १० चिकट सापळे प्रति हेक्टर लावावेत. अशा पिवळ्या रंगाच्या पत्र्याच्या पृष्ठभागावर दररोज एरंडीचे तेल लावावे. आकर्षित झालेल्या माशा चिकटून मरतील. किडींचे प्रजोत्पादन, प्रसारावर काही अंशी अटकाव होईल.
  • काळ्या माशीवर पाळत ठेवण्यासाठी बागेत सायंकाळच्या वेळी २ तास प्रकाश सापळयांचा वापर करावा. त्यासाठी पिवळा प्रकाश ५०० नॅनोमीटर तरंग लांबीचा असावा.
  • बागेत स्वच्छता ठेवावी. प्रादुर्भावग्रस्त गळलेली पाने गोळा करून नष्ट करावी.
  • अंड्यातून पिल्ले बाहेर निघाल्यानंतर या किडींच्या पिल्लांच्या पहिल्या किंवा दुसऱ्या अवस्थेत असल्याची खात्री करून मॅलाडा बोनीनेन्सीस या परभक्षक किटकांची १०० अंडी असलेले कार्ड प्रतिझाड बसवावे. तसेच क्रायसोपा व लेडीबर्ड बिटल या मित्र किटकांचे संवर्धन करावे.
  • बागेमधे प्रौढ किंवा पिल्लांचा प्रादुर्भाव सुरू झाल्याबरोबर नियंत्रणाचे उपाय योजावे.
  • पहिल्या किंवा दुसऱ्या अवस्थेच्या पिल्लांवर फवारणी प्रभावी ठरते. त्यासाठी १ किलो निंबोळी तेल अधिक २०० ग्रॅम डिटर्जंट पावडर प्रति १०० लिटर पाणी घेऊन द्रावण तयार करावे. यासाठी प्रथम डिटर्जंट पावडरचे थोड्या पाण्यामधे एकजीव द्रावण तयार करावे. नंतर या द्रावणात १ किलो निंबोळी तेल टाकून चांगले ढवळावे. यानंतर ह्या द्रावणात पाणी टाकून एकूण मात्रा १०० लिटर करावी. हे मिश्रण चांगले ढवळत फवारणीसाठी वापरावे. फवारणी सकाळ किंवा सायंकाळच्या वेळी फूटपंपाने संपूर्ण झाडावर करावी.
  • काळ्या व पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भावाचा आढावा ः संत्र्यांची लागवड असलेल्या बहूसंख्य देशात काळ्या किंवा पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव आढळून येतो. भारतातील विदर्भातही काळी/पांढरी माशी यांचा प्रादुर्भाव आणि त्यामुळे निर्माण झालेल्या कोळशीमुळे १९७०-१९८० व १९८०-१९९० या दोन दशकात संत्रा बागांचे मोठे नुकसान झाले. संत्र्याची लागवडही मंदावली होती. काळ्या/पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव १९९१ नंतर काही प्रमाणात कमी झाल्याचे जाणवत असले तरी या दशकाच्या उत्तरार्धामध्ये पुन्हा वाढू लागल्याचे चित्र तयार झाले. या किडीच्या दोन प्रजातीपैकी १९८० पर्यंत पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने आढळत होता. यानंतर दोन्ही प्रजातींचा प्रादुर्भाव होता. मात्र, १९८० दशकाच्या उत्तरार्धापासून काळ्या माशीचे प्राबल्य दिसत आहे. ही प्रजात डॉ. वाग्लूम यांना नागपूर परिसरातील संत्र्यावर १९९१ मध्ये प्रथम आढळली होती. संपर्क ः डाॅ. ए. व्ही. कोल्हे, ०९९२२९२२२९४ (कीटकशास्त्र विभाग, डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com