लसीकरणातून रोखा ब्रुसेलॉसीस रोगाचा प्रसार

उत्तम वंशावळीच्या म्हशींच्या आहार, आरोग्य व्यवस्थापनाकडे लक्ष द्यावे.
उत्तम वंशावळीच्या म्हशींच्या आहार, आरोग्य व्यवस्थापनाकडे लक्ष द्यावे.

सद्यःस्थितीमध्ये म्हशींमध्ये ब्रुसेलॉसीस रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत अाहे. या रोगामुळे गर्भपात व प्रजननासंबंधी अडचणींचे प्रमाण वाढते. जास्त जनावरांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होते. बहुतांशवेळी रोगी जनावर विकले जाते यामुळे प्रसाराचे प्रमाण वाढते. याकरिता म्हशींचे योग्य वेळी लसीकरण करावे. म्हणजे पुढे या रोगाचा प्रसार होणार नाही.

म्हैसपालन करताना प्रत्येक म्हैसपालकाने उत्तम वंशावळीच्या म्हशी, सुयोग्य अाहार व्यवस्थापन, नियमित प्रजनन व रोगांना प्रतिबंध या बाबींकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे. अन्यथा आर्थिक तोटा सहन करावा लागतो. दर दीड वर्षाला एक वेत मिळणे व सशक्त रेडकांची उत्तम वंशावळ निर्माण करणे हा व्यवसाय वाढविण्यासाठी अत्यंत अावश्‍यक अाहे. परंतु म्हशीमध्ये ब्रुसेलॉसीस या रोगामुळे होणारे गर्भपात व प्रजननासंबंधी अडचणींचे प्रमाण वाढवताना दिसत अाहे. सांसर्गिक गर्भपात किंवा ब्रुसेलॉसीस हा रोग म्हशीमध्ये ब्रुसेला अबोरटस या जिवाणूंमुळे होतो. ब्रुसेलॉसीस रोगामध्ये म्हशींना जिवाणूंचा प्रादुर्भाव झाल्यास शरीरामध्ये उपचारानंतरही जिवाणू राहतात यामुळे म्हशी रोगाचे संक्रमण करतात व रोग इतर निरोगी म्हशींना पसरतो. या रोगामुळे गाभण म्हशींमध्ये सहा महिन्यानंतर गर्भपात होतो, त्यामुळे आर्थिक नुकसान होते व दूध उत्पादन मिळत नाही. रोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाकडून लसीकरणाची मोहीम ठराविक जिल्ह्यांमध्ये सध्या सुरू करण्यात अाली अाहे. जनावरांच्या सानिध्यात असणाऱ्या माणसांनाही या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो.   प्रसार ः गर्भाशयातील स्त्राव, दूध, पाणी, दूषित चारा, मलमूत्र इ. मार्गांनी या रोगाचा प्रसार होतो. लक्षणे

  • ब्रुसेला जिवाणूंचा प्रादुर्भाव झाला असल्यास म्हशीला ताप येतो.
  • गाभण काळात सहा महिन्यानंतर म्हशीमध्ये गर्भपात होतो.
  • जास्त म्हशी असतील तर एकाच वेळी गर्भपाताचे प्रमाण वाढते.
  • वार अडकणे, गर्भाशयाचा दाह, कासेचा दाह इ. लक्षणे दिसून येतात.
  • म्हशीमध्ये माजावर न येणे व लवकर गाभण न राहणे इ. प्रमुख लक्षणे दिसतात.
  • कधी - कधी म्हशीचे सांधे सुजतात.
  •     रेड्यांमध्ये वृषणाला सूज येते, सांधे सुजतात, विर्याद्वारे जिवाणू बाहेर टाकले जातात.
  • निदान
  •     गर्भपात झाल्यानंतर किंवा म्हैस व्याल्यानंतर तीन अाठवड्यांनी रक्ताद्वारे रोगाचे निदान करावे.
  •     रोज बेगॉल चाचणी करावी.
  •     पी. सी. अार. या चाचणीद्वारे रोगाचे निदान होते.
  •     जिल्हा पशुवैद्यकीय रोग निदान प्रयोगशाळा ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यरत असून येथे रोगाचे निदान होते.
  • पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये रोगाचे निदान केले जाते. याकरिता पशुवैद्यकामार्फत रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पाठवावेत.
  • उपाय

  • रोगग्रस्त म्हशींना निरोगी म्हशींपासून वेगळे बांधावे.  
  • गर्भपात झालेले वासरू, झार यांची गोठ्यापासून दूर योग्य ती विल्हेवाट (खड्ड्यात पुरणे) लावावी.
  • पशुवैद्यकामार्फत उपचार करावेत परंतु शरीरात जिवाणू कायम राहतात.
  • शक्यतो कृत्रिम रेतनाचा वापर करावा.
  • उपचार जास्त दिवस करावे लागतात अाणि प्रतिजैविके जास्त कालावधीसाठी द्यावी लागतात.
  • लसीकरण

  • रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता योग्य वेळी लसीकरण करून घ्यावे.
  • पशुवैद्यकाच्या सल्ल्याने फक्त तीन ते अाठ महिन्यांपर्यंत कॉटन १९ स्ट्रेन ही लस दोन मिली कातडीखाली द्यावी. रेड्यांना लसीकरण करू नये.
  • ही लस २ ते ८ अंश सेल्सिअस तापमानामध्ये ठेवावी अाणि पशुवैद्यकामार्फत द्यावी.
  • माणसांमधील ब्रुसेलॉसीस रोगाची लक्षणे ब्रुसेलॉसीस हा रोग संसर्गजन्य असल्यामुळे प्रादुर्भाव झालेल्या जनावरापासून माणसांना होतो. जनावरामध्ये काम करणारे कामगार, पोस्टमाॅर्टम करणारे लोक, पशुवैद्यक, इ. लाेकांमध्ये हा रोग होण्याची शक्यता असते. माणसामध्ये या रोगाला मॉल्टा फिनर असे म्हणतात.

    माणसामध्ये  दिसणारी लक्षणे

  • सतत ताप येतो.
  • सायंकाळनंतर तापाचे प्रमाण वाढते.
  • पाठदुखी, अंग दुखणे, भूक न लागणे.
  • वजन कमी होणे.
  • डोके दुखणे.
  • रात्री घाम येणे.
  • अशक्तपणा.
  • वृषणावर सुज.
  • सांधेदुखी इ. लक्षणे दिसून येतात.
  • डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य प्रतीजैवकाचा वापर केल्यास अाजार अाटोक्यात येतो
  • प्रतिबंधात्मक उपाययोजना

  • नवीन म्हशी खरेदी करण्यापूर्वी शक्यतो नियमित रक्ताद्वारे रोगाचा प्रादुर्भाव तपासून घ्यावा. जास्त म्हशी असतील त्या पशुपालकांनी काटेकोरपणे रोगाचे निदान करून घ्यावे.
  • मादी म्हशींना १९ स्ट्रेन या लसीचे लसीकरण करून घ्यावे. म्हणजे भविष्यात रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही.
  • एकाच वेळी गोठ्यामध्ये जास्त गर्भपाताचे प्रमाण अढळून अाल्यास रोगाचे निदान करावे.
  • रोगी म्हशींना वेगळे बांधावे. चारा, पाणी इ. देण्याची वेगळी व्यवस्था असावी म्हणजे रात्रीच्यावेळी प्रसार होणार नाही.
  • जागतिक स्तरावर प्रगत देशामध्ये ब्रुसेलॉसीस रोगाचे समूळ उच्चाटन झाले अाहे. यामुळे पुढील चांगल्या वंशावळीसाठी लसीकरण करून ब्रुसेलॉसीस रोगावर नियंत्रण मिळवावे.
  • संपकर्  ः डॉ. एम. व्ही. इंगवले, ९४०५३७२१४२ (स्नातकोतर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com