शेतीतील कर्ब चक्र जपू या

शेतीतील कर्ब चक्र जपू या
शेतीतील कर्ब चक्र जपू या

पर्यावरणातील विविध मूलद्रव्यांच्या चक्रानुसार जीवनाची गती निर्धारित होत असते. त्यातील महत्त्वाचे चक्र म्हणजे कर्ब चक्र. हे चक्र बिघडविण्यामध्ये मानवाचा हस्तक्षेप अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. सध्याच्याच धोरणाने मानव चालत राहिला तर केवळ पर्यावरणाचेच नाही, तर मानवाच्या जगण्याचे मूळच हादरून जाणार आहे. त्यामुळे हे चक्र पुढे अबाधित राहण्यासाठी सर्वात शहाण्या मानल्या जाणाऱ्या मानवालाच प्रयत्न करावे लागतील. सजीवांच्या शरीराचा ८०-९०% भाग हा कार्बन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन या तीन मूलद्रव्यांपासून बनलेला असतो. बाकी २० ते २५ मूलद्रव्ये कमी-जास्त प्रमाणात असतात. यातील प्रमुख आवश्यक मूलद्रव्यांना मुख्य, त्यापेक्षा कमी प्रमाणात लागणाऱ्यांना दुय्यम आणि अत्यंत अल्प प्रमाणात लागणाऱ्या मूलद्रव्यांना सूक्ष्मअन्नद्रव्ये अशी विभागणी केली जाते. प्रमुख मूलद्रव्यातील कर्ब हे कार्बन वनस्पती हवेतील कर्बवायूपासून मिळवितात. तर उर्वरित बाकी दोन घटक पाण्यातून मिळू शकतात. वनस्पती प्रकाश संश्‍लेषण क्रियेतून अन्ननिर्मिती करतात. प्राणी जगत या वनस्पतींनी तयार केलेल्या अन्नद्रव्यांवर अवलंबून असते, हे सर्वांना माहीत आहे. यातील कर्ब चक्र पूर्ण होण्यामध्ये असलेल्या सूक्ष्मजीवांच्या सहभागही पूर्वीच्या लेखात मांडला आहे. हे कर्ब चक्र हवा, जमीन व पाणी अशा पृथ्वीतलावरील तीनही घटकांत चालू असते. एखादी वनस्पती, सजीव किंवा जलयुक्त पदार्थ जाळला असता त्याचे राख रूपात खूप थोडे अवशेष शिल्लक राहतात. यावरून एवढीच मूलद्रव्यांची आवश्यकता असते आणि तेवढ्यांचा पुरवठा जमिनीतून सहजपणे होऊ शकेल असा दावा अनेक विचारवंत करतात. उर्वरित गरजेचे पदार्थ हवा, पाणी यातूनच मिळतात, अशी त्यांची जोड असते. मात्र, हे गणित इतके सोपे असत नाही. प्रत्येक वनस्पती आपापल्या अनुवंशिकतेप्रमाणे वेगवेगळे पदार्थ निर्माण करीत असतात. त्याप्रमाणे बाकी तेरा घटकांच्या गरजा कमी-जास्त बदलत असतात. प्रमुख तीन घटकाव्यतिरिक्त बाकी अन्नघटक कमी प्रमाणात लागत असले तरी त्याचे महत्त्व प्रमुख तीन घटकांपेक्षा किंचितही कमी होऊ शकत नाही. याबाबत जेस्टस व्हॉन लायबिग या कृषी रसायनशास्त्रज्ञाचा 'लॉ ऑफ मिनिमम' प्रसिद्ध नियम आहे. या नियमानुसार, गरजेपेक्षा एखादे अन्नद्रव्य कमी प्रमाणात उपलब्ध असल्यास अन्य सर्व अन्नद्रव्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असूनही उत्पादनामध्ये घट येते. त्यासाठी तो कमतरता असलेला घटक कारणीभूत ठरतो. लायबिग यांच्यावर आज अनेक विचारवंत टीका करीत असले तरीही १००-१२५ वर्षांपूर्वी मांडलेल्या वरील सिद्धांताचा प्रभाव आजही कृषिक्षेत्रावर कायम आहे. या सिद्धांताचा प्रतिवाद करताना काही विचारवंत एक वेगळा सिद्धांत मांडतात. त्यानुसार, जमिनीत एखादे अन्नद्रव्य गरजेपेक्षा कमी उपलब्ध असेल तर भरपूर उपलब्ध असणाऱ्या अन्नद्रव्यापासून जमिनीतील सूक्ष्मजीव पाहिजे असणारे अन्नद्रव्य तयार करून त्याची कमतरता भरून काढतात. याला शास्त्रीय भाषेत 'ट्रान्स म्युटेशन' असे म्हटले जाते. शेतीत आज सर्वत्र उत्पादन घटत आहे. त्याला इतर अनेक घटकांबरोबरच काही अन्नघटकांची कमतरता हेही एक प्रमुख कारण आहे. ट्रान्स म्युटेशन होऊ शकत असते तर ही परिस्थितीच निर्माण झाली नसती. मूलद्रव्य या शब्दाचा अर्थच असा आहे, की मूळ द्रव्य असा आहे. त्यांचे वेगवेगळ्या मूलद्रव्यांसोबत बंध तयार होऊन वेगवेगळे पदार्थ तयार होतात. मूलद्रव्याचे मूळ गुणधर्म आणि तयार झालेल्या पदार्थाचे गुणधर्म हे वेगळे असू शकतात. उदा. हायड्रोजन हे ज्वालाग्राही आणि ऑक्सिजन हे ज्वलनाला मदत करणारे मूलद्रव्य असले तरी त्यापासून तयार होणारा पाणी (H२O) हा पदार्थ मात्र आग विझवणारा आहे. मूलद्रव्यातील अनेक घटकांची चक्रे सातत्त्याने पर्यावरणामध्ये फिरत असतात. त्यातील बहुतांश सर्व चक्रांची कणा असलेले कार्बनचे चक्र हा आपला आजचा प्रमुख विषय आहे. वनस्पती निर्माण होत असता, काही घटक हवेतून, काही पाण्यातून तर काही जमिनीतून घेतात. या सर्व चक्रांच्या साह्याने ते अन्न तयार करतात. हेच अन्न सूक्ष्मजीवांच्या मध्यस्थीने प्राणी खातात. त्यांच्यापासूनचे टाकाऊ पदार्थ, विष्ठा आणि मृत शरीर यांचे विघटन सूक्ष्मजीव करतात. काही वनस्पती थेट सूक्ष्मजीवामार्फत विघटन होऊन संपतात. शेवटी हवेतील घटक हवेत, जमिनीतील जमिनीत जाऊन अन्नचक्र पूर्ण होते. कर्ब चक्र पूर्ण होणे याला शेतीत प्रचंड महत्त्व आहे. परंतु, हा विषय फारसा चर्चेत कधीच नसतो. आपण फक्त चांगले कुजलेले खत वापर इतपतच चर्चा करतो. कर्बचक्र नेमकेपणाने समजून घेण्यासाठी एका मानव स्पर्शविरहित जंगलाचे उदाहरण घेऊ. या जंगलात झाडे, झुडपे, गवते, वेल अशा सर्व वनस्पती वाढत आहेत. या वनस्पतींनी तयार केलेल्या अन्नद्रव्यांवर उपजिविका करणारे प्राणीही आहेत. एका बाजूला अनेक प्रकारचे वनस्पतीजन्य पदार्थ तयार होतात, ते त्याच परिसंस्थेतील प्राण्यांकडून वापरले जातात. या गवते खाणाऱ्या प्राण्यांवर जगणारे मांसाहारी प्राणी अशी साखळी आहे. यातील प्रत्येक वनस्पती, प्राणी यांचे त्याज्य पदार्थ किंवा मृत शरीरे जंगलातील जमिनीवर पडतात. मृत शरीरावर जगणाऱ्या लहान मोठ्या प्राण्यांच्या शरीरात त्यातील काही अंश परत जातो. उर्वरित भागांचे विघटन दृश्य आणि अदृश्य अशा सजीवांकडून जिवाणूंकडून केले जाते. त्यांचे सेंद्रिय खतात रूपांतर होते. या सेंद्रिय खतांतील मूलद्रव्ये घेत अनेक वनस्पतींचे अंकुरण व वाढ होत राहते. अशाप्रकारे कर्ब चक्र चालू राहते. पुढे अशा परिसंस्थेत मानव या सजीवातील सर्वांत बुद्धिमान मानल्या जाणाऱ्या प्राण्याचा हस्तक्षेप वाढत गेला. मानवाने अनेक वनोउपज घटकांचे स्वतःसाठी उपयोग शोधून काढले. या परिसंस्थेतून, जंगलातून सुरवातीला आवश्यकतेइतके आणि पुढे हव्यास आणि औद्योगिकीकरणाच्या वाढत्या मागणीनुसार वाढत्या प्रमाणामध्ये बाहेर नेण्यास सुरवात केली. इथे कर्ब चक्र तुटत गेले. जंगल परिसंस्थेचा ऱ्हास होऊ लागला. आज आपण सर्वत्र बोडके डोंगर, वृक्षहीन माळराने पाहत आहोत. त्याचप्रमाणे उत्पादकता कमी होत चाललेल्या शेतजमिनी पाहत आहोत. हा कर्ब चक्र तुटण्याचाच परिणाम आहे. मानव हस्तक्षेप विरहित जंगल आज शोधून सापडणार नाही. घनदाट जंगलांचे अस्तित्त्व अपवादात्मक राहिले आहे. मानवाने जंगले तोडून त्याचे शेतजमिनीत रूपांतर केले. जळण, इमारती लाकूड व पैसा यासाठी बहुतेक डोंगर उघडे बोडके केले. या सर्वांना आपण केवळ पर्यावरणाची हानी म्हणून दुर्लक्ष करतो. मात्र, नेमके काय होते यावर कर्ब चक्राच्या माध्यमातून विचार करू. शेतीअंतर्गत कर्ब चक्र ः

  • आपण शेती करतो, विविध उत्पादनांची निर्मिती करतो. त्याचे पुढे काय होते? याकडे लक्ष दिल्यास, आपण स्वतःच्या गरजेचे धान्य, कडधान्य ठेऊन बाकीचे विकून टाकतो. वैरणमूल्य असणारे कडबा, काड गरजेपुरते जनावरासाठी ठेवून उर्वरित विकून टाकतो. ज्या घटकांना वैरण मूल्यही नसते, ते भाग जळण म्हणून वापरतो किंवा कचरा म्हणून टाकून देतो.
  • बहुतांशी धान्ये-कडधान्ये, फळे, तेलबिया या मानवांकडून खाल्ल्या जातात. या माणसांची विष्ठा त्याच्या जमिनीकडे परत येत नाही. वैरण म्हणून वापरल्यानंतर तयार जनावरांकडून तयार होणारे शेण व त्याचे कंपोस्टही किती प्रमाणात शेतात परत येते, हाही अभ्यासाचाच विषय आहे. कारण, बहुतांश शेणखत व सेंद्रिय खत प्राधान्याने फळबाग-भाजीपाला, ऊस, हायटेक शेती यांना दिले जाते. या इतक्‍या चाळणीतून शिल्लक राहिल्यावरच ते धान्यांच्या किंवा कोरडवाहू शेतीकडे येत असल्याचे दिसून येईल. अनेकवेळा व्यावसायिक शेतीच्या चाळणीतून काही शिल्लक राहत नाही. त्यातच धान्या-कडधान्याचे क्षेत्र प्रचंड मोठे असते, तर त्या तुलनेतही सेंद्रिय खत खाणारी शेती छोटी असते. यातून खूप मोठ्या क्षेत्रावर कर्ब चक्र तुटत गेले. परिणामी मोठ्या क्षेत्रावरील जमिनींची सुपीकता धोक्यात आली आहे. त्यातही ज्या अल्प जमिनीमध्ये सेंद्रिय खतांचा वापर होतो, त्यातून सेंद्रिय खतांचे उत्पादन अल्प प्रमाणात होते.
  • त्यातच आपल्या शेतीच्या व्यवस्थापनाच्या पद्धतीही विचित्र आहेत. धान्य किंवा फळे काढून घेतल्यानंतर उर्वरित भाग पशुखाद्यासाठी घेतला जातो. त्यानंतर जमिनीखालील मुळांचा भाग हा पुढील पेरणीपूर्वी धसकटे म्हणून गोळा करून टाकण्याची पद्धत आहे. जमीन स्वच्छ करून पेरणी करण्याच्या या पद्धतीमुळे कोणत्याही पिकाचे कोणतेही अवशेष मूळ त्या जमिनीकडे जात नाहीत. कारण कर्ब चक्राचा अभ्यासच नसल्याने कोणालाही काही गैर वाटत नाही.
  • असाही विचार आवश्यक...

  • पृथ्वीतलावर मानवांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. त्या तुलनेत मानवाच्या गरजेशिवाय अन्य प्राण्यांचे अस्तित्वावरच घाला येत आहे. माणूस केवळ त्याच्या उपयुक्त प्राण्यांच्या सांभाळाचा विचार करतो. बहुतेक शेतीतील पदार्थ मानवाकडून उपजिविकेसाठी आणि या पाळीव प्राण्यांसाठी वापरले जातात. मानवाने पाळलेले प्राणीही अखेर तोच खातो. अशाप्रकारे केवळ मानव केंद्रित पर्यावरण तयार होत आहे.
  • या सर्व घटकांच्या वापरातून तयार झालेले मानवाचे टाकाऊ भाग उदा. मूत्र, विष्ठा यांचा शेतीच्या सुपीकतेसाठी अत्यल्प वापर होतो. अंतिमतः मृत्यूनंतर त्याचे शरीरही धार्मिक परंपरेप्रमाणे जाळले (दहन) किंवा गाडले (दफन) केले जाते. म्हणजे ते कोणत्याही अर्थाने निसर्गात पुन्हा जात नाही. अन्य प्राण्यांचे शरीर जिवंतपणी आणि मेल्यानंतरही अन्य प्राण्यांच्या किंवा निसर्गाच्या संपूर्णपणे उपयोगी ठरते. इतर सर्व प्राणी कोणाचे तरी भक्षक वा भक्ष्य असतात. मानव सर्वांचा भक्षक आहे, मात्र भक्ष्य कोणाचाच नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. यातून मूलद्रव्याचे चक्र तुटत आहे.
  • उलट मानवाचे मृत शरीर जाळण्यासाठी आणखी टनभर लाकडांचे ज्वलन होते. त्यातून जंगलांचे आणखी नुकसान होते. कर्ब चक्र तुटण्याचे हेही महत्त्वाचे कारण आहे.
  • मानवी शरीरापासूनचे सर्व घटक शेतामध्ये कसे जातील, अगदी त्याचे मृत शरीरही सेंद्रिय घटक म्हणून शेतीसाठी कसे उपयोगी पडेल, याचा विचार व्हायला हवा. अर्थात, याला आपल्याकडील सामाजिक, धार्मिक रुढी, परंपरांचा अडसर होऊ शकतो. मात्र, शाश्वत भविष्यांकडे जाण्यासाठी असा विचार आवश्यक ठरेल, यात शंका नाही.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com