जनावरातील गोचीड तापाचे करा प्रभावी नियंत्रण

जनावरातील गोचीड तापाचे करा प्रभावी नियंत्रण
जनावरातील गोचीड तापाचे करा प्रभावी नियंत्रण

गोचीड ताप गाई आणि म्हशींमध्ये आढळणारा आजार असून, गोचिडाच्या माध्यमातून रोगप्रसार होत असतो. त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. संकरित गाईंमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात दिसतो. गोचीड ताप या अाजाराला थायलेरिओसिस असे म्हणतात. या आजारात तांबड्या रक्तपेशी नाश पावतात. त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. रोगाचे एकपेशीय जंतू जनावरांच्या शरीरामधील लीम्फ ग्रंथींमध्ये वाढतात, त्यामुळे लीम्फ ग्रंथींचा आकार मोठा होतो. थायलेरिया ॲन्नुलाटा, थायलेरिया ओरिन्तालीस या रोगकारक जंतूंमुळे हा रोग होतो. रोगसाथशास्त्र ः या रोगामध्ये प्रामुख्याने ४ मूलभूत घटकांचा अंतर्भाव असतो. पोषक वातावरण, जंतू आणि मध्यवर्ती पोषद (गोचीड), रोगाचा प्रादुर्भाव हा मोसमी असून, गोचिडींच्या प्रजननाशी निगडित असतो.

  • जुलै ते ऑक्‍टोबर महिन्यात जनावरांच्या शरीरावर गोचीड खूप जास्त प्रमाणात आढळतात.
  • उष्ण व दमट हवामान, इतर रोगाचा प्रादुर्भाव इत्यादी गोष्टी रोगनिर्मितीस मदत करतात.
  • देशी गाई, बैल रोगवाहक म्हणून कार्यरत असतात आणि या जनावरात क्वचितच लक्षणीय स्वरूपात रोग आढळून येत असतो.
  • विदेशी जनावरांची रोगाचा बळी पडण्याची शक्यता तुलनात्मकदृष्ट्या जास्त असते. सामान्यतः गाई, बैल यांच्या तुलनेत म्हशी प्रतिरोधक असतात. परंतु काही ठिकाणी रोगवाहक राहण्याची शक्‍यता असते. परंतु गोचिडीच्या माध्यमातून झालेल्या रोगाची तीव्रता प्रखर असते.
  • सततच्या स्थलांतरणामुळे थकवा जाणवतो व त्यामुळेसुद्धा या रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याचे आढळून आले आहे.
  • सहसा संकरित वासरामध्ये या रोगाचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे प्रादुर्भाव झालेली जनावरे या रोगाला जास्त बळी पडतात.
  • गाई, बैलांच्या तुलनेत म्हशींमध्ये लक्षणीयदृष्ट्या रोगाची तीव्रता कमी असते.
  • बाह्य लक्षणे ही तीव्र स्वरूपातील रोगासमानच असतात. परंतु प्रखरता कमी असते. म्हशीमध्ये सहसा वरील लक्षणे कमी-अधिक प्रमाणात दिसून येतात, त्यामुळे म्हशीमध्ये या रोगाचे निदान करण्यात चूक होऊ शकते.
  • रोगाचा पूर्वकाल १० ते २५ दिवसांचा असतो. स्थानिक क्षेत्रात रोगक्षम वासरे रोगास बळी पडतात किंवा देशी जनावरांसमान प्रतिरोधक असतात.
  • प्राैढ देशी जनावरांत बाह्य लक्षणे आढळून येत नाहीत. परंतु इतर रोगप्रवण जनावरांस रोगप्रसार करतात.
  • लक्षणे ः

  • जनावरांच्या शरीराचे तापमान ४० ते ४१ अंश सेल्सिअस (१०२-१०६ अंश फॅरनहाइट) पर्यंत वाढते.
  • नाकातून, डोळ्यांतून पाणी (अश्रू) वाहणे, हृदयाचे जलद स्पंदन, लासिकाग्रंथी (लीम्फ ग्रंथी) आकारमानाने वाढतात.
  • रक्तमिश्रित विष्ठा, भूक कमी होणे, रवंथ करणे बंद होते. नाडीचे ठोके जलद होतात. जनावर कृश होत जाते आणि अर्धशयन स्थिती ग्रहण करते.
  • श्‍वसनाला त्रास होतो अाणि श्वसनाचा वेग जलद असतो. शेवटच्या काळात नाकावाटे फेसाळ विसर्ग वाहतो.
  • रोगनिदान ः

  • पशुवैद्यक सहसा या रोगाचे निदान लक्षणावरून करतात. तसेच कानाच्या रक्त वाहिनीमधून रक्त काचपट्टी तयार करून पाठवल्यास या रोगाचे अचूक निदान करता येते.
  • आधुनिक निदान पद्धतीचा वापर करून या रोगाच्या जंतूची जनुकीय चाचणी करण्यात येते. ही पद्धत अतिशय अचूक असली तरी याला २४ तास लागतात व लागणारी उपकरणे महागडी आहेत.
  • औषधोपचार ः जनावरांवर उपचार पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच करावा.
  • प्रतिबंधक उपाय ः

  • गोचीड निर्मूलन करण्यासाठी गोचिडाचे जीवनचक्र समजून घेणे आवश्‍यक आहे.
  • गोचीड जमिनीवर पडतो व जवळील भेगांमध्ये (भिंत, जमीन) शिरतो अाणि जवळपास तीन ते पाच हजार अंडी घालतो.
  • अंड्यातून निघणारे सूक्ष्म गोचीड जनावरांच्या अंगावर चिकटून रक्त पितात व खाली पडतात. खाली पडल्यानंतर ते कात टाकतात. अश्‍याच प्रकारे दोन ते तीन वेळा होते व नंतर मादी गोचीड परत अंडी घालते.
  • गोठ्यातील गोचीड निर्मूलन ः

    1. जनावरांचा नियमित खरारा करावा.
    2. पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने जनावरांचे गोचीड निर्मूलन करावे.
    3. वर्षातून दोनदा गोठ्यातील भेगा फ्लेमगनच्या साह्याने जाळून घ्याव्यात.

    संपर्क ः डॉ. प्रतीक इंगळे पाटील, ७५८८५८९५७७ (विकृतिशास्त्र विभाग, नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय, नागपूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com